Quoteपंतप्रधानांनी या भेटीत महाकुंभ मेळा 2025 साठी केल्या जात असलेल्या विकास कामांची केली पाहणी
Quoteपंतप्रधानांनी एआय आधारित कुंभ सहायक चॅटबॉटचा केला प्रारंभ
Quoteमहाकुंभ हा आपल्या श्रद्धा, अध्यात्म आणि संस्कृतीचा दिव्य महोत्सव आहे: पंतप्रधान
Quoteप्रयाग हे असे ठिकाण आहे जिथे पावलोपावली पवित्र स्थाने, पुण्य क्षेत्र आहेत: पंतप्रधान
Quoteकुंभ हे माणसाच्या अंतर्मनातील चेतनेचे नाव आहे: पंतप्रधान
Quoteमहाकुंभ हा एकतेचा महायज्ञ आहे : पंतप्रधान

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेशचे मंत्री, सहकारी खासदार आणि आमदार, प्रयागराजचे महापौर आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

प्रयागराज येथील संगमाच्या या पवित्र भूमीला मी भक्तीभावाने प्रणाम करतो. या महाकुंभासाठी दाखल होत असलेल्या सर्व साधू-संतांना देखील मी नमन करतो. महाकुंभ यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे कर्मचारी, कामगार आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मी विशेष अभिनंदन करतो. जगातील एवढा मोठा कार्यक्रम, दररोज लाखो भाविकांच्या स्वागताची व सेवेची तयारी, सलग 45 दिवस चालणारा महायज्ञ, नव्या शहराच्या स्थापनेची भव्य मोहीम, प्रयागराजच्या या भूमीवर नवा इतिहास रचला जात आहे.

 

|

पुढील वर्षी होणारे महाकुंभाचे आयोजन देशाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख एका नवीन शिखरावर प्रस्थापित करेल. आणि हे मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे, मोठ्या श्रद्धेने मी हे सांगतो, या महाकुंभाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर मी म्हणेन की, हा एकतेचा असा महायज्ञ असेल, ज्याची संपूर्ण जगात चर्चा होईल. या कार्यक्रमाच्या भव्य आणि दिव्य यशासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

आपला भारत हा पवित्र स्थळे आणि तीर्थक्षेत्रांचा देश आहे. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, नर्मदा अशा असंख्य पवित्र नद्यांचा हा देश आहे. या नद्यांच्या प्रवाहाचे जे पावित्र्य आहे, या असंख्य तीर्थक्षेत्रांचे जे महत्त्व आहे, जे महात्म्य आहे, त्यांचा संगम, त्यांचे संमीलन, त्यांचा योग, त्यांचा संयोग, त्यांचा प्रभाव, त्यांचा प्रताप, हा प्रयाग आहे. हा केवळ तीन पवित्र नद्यांचा संगमच नाही आहे. प्रयागविषयी सांगितले गेले आहे- “माघ मकरगत रबि जब होई। तीरथपतिहिं आव सब कोई”  अर्थात, जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, सर्व दैवी शक्ती, सर्व तीर्थ, सर्व ऋषी, महर्षी, मनीषी प्रयागमध्ये दाखल होतात. हे ते स्थान आहे, ज्यांच्या प्रभावाविना पुराण पूर्ण होत नाहीत. प्रयागराज ते स्थान आहे ज्याची प्रशंसा वेदांच्या ऋचांनी केली आहे.

 

|

बंधू आणि भगिनींनो,

प्रयाग म्हणजे जिथे प्रत्येक पावलो-पावली पवित्र स्थाने आहेत, जिथे प्रत्येक पावला-पावलावर पुण्यमय क्षेत्रे आहेत. त्रिवेणी माधवम् सोमम्, भारद्वाजम् च वासुकीम्। वंदे अक्षय-वटम् शेषम्, प्रयागम् तीर्थनायकम्। अर्थात त्रिवेणीचा त्रिकाल प्रभाव, वेणी माधवचा महिमा, सोमेश्वराचा आशीर्वाद, ऋषी भारद्वाजांची तपोभूमी, नागराज वासुकीचे विशेष स्थान, अक्षय वटचे अमरत्व आणि शेषाची अशेष कृपा… हे आहे आमचे तीर्थराज प्रयाग!

तीर्थराज प्रयाग म्हणजे- “चारि पदारथ भरा भँडारू।  पुन्य प्रदेस देस अति चारू”। अर्थात्, जिथे धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही गोष्टी सुलभ आहेत ते प्रयाग आहे. प्रयागराज केवळ एक भौगोलिक भूखंड नाही आहे. हे एक आध्यात्मिक अनुभव क्षेत्र आहे. हा प्रयाग आणि प्रयागच्या लोकांचाच आशीर्वाद आहे, की मला या भूमीवर वारंवार येण्याचे भाग्य लाभते. गेल्या कुंभात देखील मला संगमात स्नान करण्याचे भाग्य लाभले होते. आणि, आज या कुंभाच्या प्रारंभापूर्वी पुन्हा एकदा गंगामातेच्या चरणी येऊन आशीर्वाद प्राप्त करण्याचे भाग्य लाभले आहे.

आज मी संगम घाटावर पहुडलेल्या हनुमानजींचे दर्शन घेतले. तसेच अक्षयवट वृक्षाचे आशीर्वाद घेतले. या दोन्ही ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी हनुमान कॉरिडॉर आणि अक्षयवट कॉरिडॉर बांधण्यात येत आहे. मला सरस्वती विहीर पुनर्विकास प्रकल्पाचीही माहिती मिळाली. आज येथे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

 

|

मित्रांनो,

महाकुंभ हे आपल्या देशाच्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रवासाचे एक पवित्र आणि जिवंत प्रतीक आहे. एक असा कार्यक्रम जिथे प्रत्येक वेळी धर्म, ज्ञान, भक्ती आणि कला यांचा दिव्य समागम होत असतो. आपल्याकडे सांगितले गेले आहे, दश तीर्थ सहस्राणि, तिस्रः कोट्यस्तथा अपराः । सम आगच्छन्ति माघ्यां तु, प्रयागे भरतर्षभ ॥ अर्थात्, संगमात स्नान केल्याने करोडो तीर्थांचे पुण्य प्राप्त होते. प्रयागमध्ये स्नान करणारा सर्व पापांपासून मुक्त होतो. राजे-सम्राटांचा काळ असो किंवा शेकडो वर्षांच्या गुलामगिरीचा काळ असो, श्रद्धेचा हा प्रवाह कधीच थांबला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे कुंभ राशीचा कारक कोणतीही बाह्य शक्ती नाही आहे. कोणत्याही बाह्य व्यवस्थे ऐवजी कुंभ, मनुष्याच्या अंतर्मनाच्या चेतनेचे नाव आहे. ही चेतना स्वतः जागृत होते. ही चेतना भारताच्या कानाकोपऱ्यातून लोकांना संगमाच्या तटाकडे खेचू लागते. गाव, वाड्या, शहरांकडून लोक प्रयागराजच्या दिशेने निघतात. सामूहिकतेची अशी शक्ती, असा समागम खचितच इतर कोणत्या तरी ठिकाणी पाहायला मिळेल.

येथे येऊन संत, ऋषी, मुनी, विद्वान, सर्वसामान्य सर्व एक होऊन त्रिवेणीत स्नान करतात. येथे जातीय भेद नाहीसे होऊन सांप्रदायिक कलह दूर होतात. एका ध्येयाने, एका कल्पनेने करोडो लोक जोडले जातात. यावेळीही महाकुंभाच्या वेळी विविध राज्यांतून कोट्यवधी लोक इथे जमतील, त्यांची भाषा वेगळी असेल, जाती वेगळ्या असतील, श्रद्धा वेगळ्या असतील, पण संगम नगरीत आल्यावर सगळे एक होतील. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतो की महाकुंभ हा एकतेचा महान यज्ञ आहे. ज्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या भेदभावाचा त्याग केला जातो. येथील संगमात डुबकी मारणारा प्रत्येक भारतीय 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे अद्भुत चित्र सादर करतो.

 

|

मित्रांनो,

महाकुंभाच्या परंपरेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या काळात देशाला दिशा मिळते. महाकुंभादरम्यान देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर, देशासमोरील आव्हानांवर, संतांच्या वादात, संवादात, शास्त्रार्थात, वाद-विवादात विस्तृत चर्चा होत असायची आणि त्यानंतर सर्व संत मिळून राष्ट्राच्या विचारांनाही त्यांनी नवा मार्ग दाखवायचे. कुंभसारख्या ठिकाणी संत-महात्म्यांनी देशाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दळणवळणाची आधुनिक साधने नसताना कुंभसारख्या आयोजनांनी मोठ्या सामाजिक बदलांचा पाया घातला. कुंभमध्ये संत आणि जाणकार मंडळी समाजाच्या सुख-दुःखाची चर्चा करत, वर्तमान-भविष्याचे चिंतन करत असत, आजही कुंभसारख्या मोठ्या सोहळ्याचे महत्त्व तितकेच आहे. अशा घटनांमधून देशाच्या कानाकोपऱ्यात समाजात सकारात्मक संदेश जातो, राष्ट्रीय विचाराचा हा प्रवाह अखंड वाहत असतो. या कार्यक्रमांची नावे वेगळी, थांबे वेगळे, मार्ग वेगळे, पण प्रवासी तेच असतात, उद्दिष्ट एकच असते.

मित्रांनो,

कुंभ आणि धार्मिक यात्रांचे इतके महत्त्व असूनही त्यांच्या महत्त्वाकडे पूर्वीच्या सरकारांच्या काळात लक्ष दिले गेले नाही. अशा आयोजनादरम्यान भाविकांचे हाल होत राहिले, पण त्यावेळच्या सरकारांना त्याची पर्वा नव्हती. याचे कारण त्यांना भारतीय संस्कृतीविषयी आणि भारताच्या श्रद्धांविषयी आपुलकी नव्हती. पण आज केंद्रात आणि राज्यात भारताविषयी श्रद्धा असलेले आणि भारतीय संस्कृतीचा आदर करणारे सरकार आहे.

त्यामुळे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकरता सुविधा उपलब्ध करून देणे ही डबल इंजिन सरकार आपली जबाबदारी मानते. त्यामुळे येथे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून हजारो कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. शासनाचे विविध विभाग ज्या प्रकारे महाकुंभाची तयारी पूर्ण करण्यात व्यग्र आहेत ते अतिशय कौतुकास्पद आहे. देशाच्या किंवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कुंभमेळ्यात पोहोचण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी येथे दळणवळणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रयागराज शहराचा अयोध्या, वाराणसी, रायबरेली, लखनौशी संपर्क सुधारण्यात आला आहे. मी ज्या सर्वंकष शासकीय दृष्टीकोनाबद्दल बोलतो त्या संपूर्ण शासकीय महाप्रयत्नांचा महाकुंभही या ठिकाणी दिसून येतो.

 

|

मित्रांनो,

आमच्या सरकारने विकासासोबत वारसा समृद्ध करण्यावर देखील भर दिला आहे.  आज देशाच्या अनेक भागांमध्ये वेगवेगळी पर्यटन जाळी (सर्कीट) विकसित केली जात आहेत. रामायण सर्किट, श्री कृष्ण सर्किट, बुद्धीस्ट सर्किट, तीर्थंकर सर्किट… या माध्यमातून आम्ही देशातील अशा ठिकाणांना महत्त्व देत आहोत ज्यांच्याकडे पूर्वी लक्ष दिलं गेलं नव्हतं. स्वदेश दर्शन योजना असो, प्रसाद योजना असो... या माध्यमातून तीर्थक्षेत्रांवर सुविधांचा विस्तार केला जात आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराने संपूर्ण शहर कसे भव्य केले याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.  विश्वनाथ धाम, महाकाल महालोकाची आज जगभरात चर्चा आहे. इथे अक्षय वट कॉरिडॉर, हनुमान मंदिर कॉरिडॉर, भारद्वाज ऋषी आश्रम कॉरिडॉरमध्येही हाच दृष्टीकोन दिसून येतो.  सरस्वती कुप, पाताळपुरी, नागवसुकी, द्वादश माधव मंदिर या ठिकाणांचा भाविकांसाठी कायापालट केला जात आहे.

मित्रांनो,

आपले हे प्रयागराज, निषादराजाचीही भूमी आहे. प्रभू रामाच्या, मर्यादा पुरुषोत्तम होण्याच्या प्रवासात शृंगवेरपूर हा देखील महत्त्वाचा टप्पा आहे. प्रभू राम आणि केवटची भेट आजही आपल्याला प्रेरणा देते. केवट नावाड्याला आपला प्रभू समोर भेटल्याने त्याने त्यांचे पाय धुतले आणि  नावेतून नदीपलीकडे नेले.  या भेटीत एक अनोखी श्रद्धेची भावना आहे, त्यात देव आणि भक्त यांच्यातील मैत्रीचा संदेश आहे. या घटनेतील संदेश असा आहे की देवही आपल्या भक्ताची मदत घेऊ शकतो. प्रभू श्री राम आणि निषादराज यांच्यातील मैत्रीचे प्रतीक म्हणून शृंगवरपूर धाम विकसित होत आहे. प्रभू राम आणि निषादराज यांच्या मूर्तीही येणाऱ्या पिढ्यांना समता आणि समरसतेचा संदेश देत राहतील.

मित्रांनो,

कुंभमेळ्यासारखा भव्य आणि दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यात स्वच्छतेचा मोठा वाटा आहे.  महाकुंभाच्या तयारीसाठी नमामि गंगे कार्यक्रम वेगाने पुढे नेण्यात आला आहे.  प्रयागराज शहरातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी गंगा दूत, गंगा प्रहरी आणि गंगा मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे.  यावेळी कुंभमेळ्यामध्ये माझे 15 हजारांहून अधिक स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी कुंभमेळ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी घेणार आहेत. आज मी, कुंभमेळ्याची तयारी करत असलेल्या माझ्या सफाई कामगार बंधू-भगिनींचेही आगाऊ आभार व्यक्त करत आहे. इथे कोट्यवधी लोकांना, ज्या पावित्र्याचे, स्वच्छतेचे आणि अध्यात्माचे दर्शन घडेल ते तुमच्या योगदानामुळेच शक्य होईल.  या न्यायाने, तुम्हीही येथील प्रत्येक भक्ताच्या पुण्यसंचयात वाटेकरी व्हाल.  ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी उष्ट्या पत्रावळी उचलून प्रत्येक काम महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला, त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या कृतीने या कार्यक्रमाची महती वाढवाल. तुम्हीच आहात जे सकाळी कामावर सर्वप्रथम हजर होता आणि  रात्री उशिरापर्यंत कार्यरत असता. 2019 मध्येही कुंभमेळ्यातील स्वच्छतेचे खूप कौतुक झाले होते. जे लोक दर 6 वर्षांनी कुंभमेळ्यात किंवा महाकुंभात स्नान करण्यासाठी येतात त्यांनी इतकी स्वच्छ आणि सुंदर व्यवस्था प्रथमच पाहिली होती. म्हणूनच तुमचे पाय धुवून मी कृतज्ञता व्यक्त केली होती. आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतल्याने मला मिळालेले समाधान माझ्या आयुष्यातील संस्मरणीय अनुभव बनले आहे.

मित्रांनो,

कुंभमेळ्याशी संबंधित आणखी एक पैलू आहे, ज्याची फारशी चर्चा होत नाही. हा पैलू आहे - कुंभमेळ्यामुळे होणारा आर्थिक घडामोडींचा विस्तार…..आपण सर्वजण पाहत आहोत की कुंभमेळ्याच्या आधी या परिसरात आर्थिक घडामोडी कसा वेग पकडत आहेत! येत्या सुमारे दीड महिन्यात संगमाच्या काठावर नवीन शहर वसवले जाणार आहे.  येथे दररोज लाखो लोक येतील. संपूर्ण व्यवस्था सांभाळण्यासाठी प्रयागराजमध्ये मोठ्या संख्येने लोकांची गरज भासणार आहे. आमचे 6000 हून अधिक नावाडी मित्र, हजारो दुकानदार सहकारी, पूजापाठ आणि स्नान-ध्यानात मदत करणारे….. सर्वांचे काम खूप वाढणार आहे. म्हणजेच येथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. पुरवठा साखळी अखंड कायम ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना इतर शहरांमधून माल आणावा लागेल. प्रयागराज कुंभमेळ्याचा परिणाम आसपासच्या जिल्ह्यांवरही होईल. देशातील इतर राज्यातून येणारे भाविक, रेल्वे किंवा विमानाची सेवा घेतील, यामुळे देखील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. म्हणजे…. महाकुंभामुळे  सामाजिक सक्षमीकरण तर होईलच, शिवाय लोकांचे आर्थिक सबलीकरणही होईल.

 

|

मित्रांनो,

महाकुंभ 2025 चे आयोजन ज्या युगात होत आहे ते युग तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागील आयोजनांपेक्षा खूप पुढे आहे. आज पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त लोकांकडे स्मार्ट फोन आहेत.  2013 मध्ये डेटा आजच्यासारखा स्वस्त नव्हता. आज मोबाईल फोनमध्ये, मोबाईल धारकांना सहज हाताळण्याजोगी यूजर फ्रेंडली ॲप्स आहेत, ज्यांचा वापर तंत्रज्ञान फारसं माहीत नसलेल्या व्यक्तीही करू शकतात. थोड्या वेळापूर्वी आत्ताच मी, कुंभ असिस्टंट चॅटबॉट चे उद्घाटन केले. कुंभ कार्यक्रमात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅटबॉटचा वापर केला जाणार आहे. एआय चॅटबॉट, अकरा भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्यास सक्षम आहे. विदा (डेटा) आणि तंत्रज्ञानाच्या या संगमाशी अधिकाधिक लोक जोडले जावेत असेही मी सुचवतो. उदाहरणार्थ, महाकुंभशी संबंधित छायाचित्रण स्पर्धा आयोजित करता येईल. महाकुंभ हा एकतेचा महान यज्ञ म्हणून दाखवण्यासाठी ही छायाचित्रण स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये कुंभमेळ्याबद्दलचे आकर्षण वाढेल. कुंभमेळ्यासाठी येणारे बहुसंख्य भाविक यात सहभागी होणार आहेत. ही छायाचित्रे समाजमाध्यमावर पोहोचल्यावर किती मोठे चित्रपटल (कॅनव्हास) तयार होईल याची आपण कल्पनाही करू शकत नाही.  त्यात किती रंग, किती भावना सापडतील हे मोजणे कठीण होईल. तुम्ही अध्यात्म आणि निसर्गाशी संबंधित स्पर्धाही आयोजित करू शकता.

 

|

मित्रांनो,

आज देश एकत्रितपणे विकसित भारताच्या संकल्पाकडे… संकल्पपूर्तीकडे वेगाने वाटचाल करत आहे. मला विश्वास आहे की या महाकुंभातून निर्माण होणारी आध्यात्मिक आणि सामूहिक शक्ती आपला संकल्प आणखी मजबूत करेल. महाकुंभ स्नान, ऐतिहासिक आणि अविस्मरणीय व्हावे, गंगामाई, यमुनाई आणि  सरस्वती माता यांची त्रिवेणी मानवतेला लाभावी... हीच आपल्या सर्वांची इच्छा आहे. संगमनगरीत येणाऱ्या प्रत्येक भक्ताला माझ्या हार्दिक शुभेच्छा, मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारही मानतो. 

माझ्यासोबत बोला - 

भारत माता की जय.

भारत माता की जय.

भारत माता की जय.

गंगा माता की जय.

गंगा माता की जय.

गंगा माता की जय.

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India, France seal Rs 64,000 cr deal for 26 Rafale-M jets for Navy

Media Coverage

India, France seal Rs 64,000 cr deal for 26 Rafale-M jets for Navy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister attends the Civil Investiture Ceremony-I
April 28, 2025

Prime Minister, Shri Narendra Modi, today, attended the Civil Investiture Ceremony-I where the Padma Awards were presented."Outstanding individuals from all walks of life were honoured for their service and achievements", Shri Modi said.

The Prime Minister posted on X :

"Attended the Civil Investiture Ceremony-I where the Padma Awards were presented. Outstanding individuals from all walks of life were honoured for their service and achievements."

|