बिना येथील रिफायनरीमध्ये पेट्रोकेमिकल संकुलाची केली पायाभरणी
नर्मदापुरम येथे केली ‘पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी झोन’ची आणि रतलाम येथे मेगा इंडस्ट्रियल पार्कची पायाभरणी
इंदूर येथे दोन आयटी पार्क आणि संपूर्ण राज्यात सहा नव्या इंडस्ट्रियल पार्कची केली पायाभरणी
“आजचे प्रकल्प मध्य प्रदेशाविषयी केलेल्या संकल्पपूर्तीचा आमचा ध्यास व्यक्त करत आहेत”
“कोणतेही राज्य किंवा कोणत्याही देशाच्या विकासाकरता, शासन पारदर्शक असणे आणि भ्रष्टाचाराचे उच्चाटन होणे गरजेचे असते”
“भारताने गुलामगिरीची मानसिकता दूर सारली आहे आणि आता स्वतंत्र असल्याच्या आत्मविश्वासाने आगेकूच करत आहे”
“भारताला अखंड राखणारा सनातन ज्यांना तोडायचा आहे, अशांपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे”
“भारताचे जी20 चे उल्लेखनीय यश, 140 कोटी भारतीयांचे यश आहे”
“भारत जगाला एकत्र आणण्याचे आपले कसब दाखवत आहे आणि विश्वमित्र म्हणून उदयाला येत आहे”
“उपेक्षितांना प्राधान्य देणे हा सरकारचा मूलभूत मंत्र आहे”
“मोदींच्या हमीचा गतइतिहास तुमच्या समोर आहे”
“5 ऑक्टोबर 2023 रोजी राणी दुर्गावती यांची 500 वी जयंती अतिशय भव्यतेने आणि उत्साहात साजरी केली जाईल”
“ ‘सबका साथ सबका विकास’ चे मॉडेल आज संपूर्ण जगाला मार्ग दाखवत आहे”

भारत माता की–जय,

भारत माता की–जय,

मध्य परदेशचे मुख्यमंत्री बंधू शिवराज जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीप सिंह पुरी, मध्य प्रदेशचे इतर मंत्री महोदय, खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय कुटुंबीयांनो!

बुंदेलखंडची ही धरती वीरांची धरती आहे, शूरवीरांची धरती आहे. या भूमीला बीना आणि बेतवा, दोन्हींचा आशीर्वाद मिळाला आहे. आणि मला तर एक महिन्यात दुसऱ्यांदा, सागरला येऊन आपणा सर्वांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. आणि मी शिवराज जींच्या सरकारचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद  देतो कारण आज इथे येऊन, आपणा सर्वांचे दर्शन घेण्याची संधी दिली. मागच्या वेळी मी संत रोहिदासजींच्या त्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना भेटायला आलो होतो. आज मला मध्य प्रदेशचा विकास आणि त्या विकासाला नवी गती देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याची संधी मिळत आहे. हे प्रकल्प, या क्षेत्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती देतील. या प्रकल्पांवर केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता, पन्नास हजार कोटी किती असतात? आपल्या देशातल्या अनेक राज्यांचा पर्ण वर्षाचा अर्थसंकल्प देखील इतका नसतो, जितका खर्च आज एकाच कार्यक्रमासाठी भारत सरकार करत आहे. यातून हे दिसून येते की मध्य प्रदेशसाठी आमचे संकल्प किती  मोठे आहेत. हे सगळे प्रकल्प येणाऱ्या काळात मध्य प्रदेश मध्ये लाखो तरुणांना रोजगार देतील. हे प्रकल्प, गरीब आणि मध्यमवर्गातल्या कुटुंबांची स्वप्न सत्यात उतरवणारे आहेत. मी बीना रिफायनरीचे विस्तारीकरण आणि अनेक नव्या सुविधांच्या भूमिपूजनाच्या मध्य प्रदेशच्या कोट्यवधी जनतेला अनेक अनेक शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

स्वतंत्र्याच्या या अमृतकाळात देशाच्या प्रत्येक नागरिकाने आपला भारत विकसित करण्याचा संकल्प सोडला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी भारत आत्मनिर्भर व्हावा, आपल्याला परदेशातून कमीत कमी आयात करायला लागावी, हे गरजेचे आहे. आज भारत पेट्रोल – डीझेल तर आयात करतोच, आपल्याला पेट्रो – केमिकल उत्पादनांसाठी देखील इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. आज बीना रिफायनरीत ज्या पेट्रो – केमिलक संकुलाचे भूमिपूजन झाले आहे, ते भारताला अशा वस्तूंच्या बाबतीत आत्मनिर्भर बनविण्याचे काम करेल. अनेकांना हे माहित नसते, हे जे प्लास्टिक पाईप तयार होतात, बाथरूममध्ये वापरली जाणारी प्लास्टिकची बादली आणि मग्गे असतात, प्लास्टिकच्या तोट्या असतात, प्लास्टीकची खुर्ची आणि टेबल असतात, घरांचा रंग असतो, कारचं बंपर असतं, कारचा डॅशबोर्ड असतो, पॅकींगची सामुग्री असते, वैद्यकीय उपकरणं असतात, ग्लुकोजची बाटली असते, वैद्यकीय सिरींज असते, वेगवेगळ्या प्रकारचे कृषी उपकरण असतात, या सर्वांमध्ये पेट्रोकेमिकलची खूप मोठी आणि महत्वाची भूमिका असते. आता बीना इथे बनत असलेले हे आधुनिक पेट्रोकेमिकल संकुल या संपूर्ण क्षेत्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल, याची तुम्हाला हमी द्यायला मी आलो आहे. यामुळे इथे नव नवीन उद्योग येतील, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या लहान उद्योगांना तर मदत मिळेलच, सर्वात मोठी गोष्ट ही आहे, की माझ्या तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी मिळणार आहेत.

आजच्या नव्या भारतात उत्पादन क्षेत्राचा देखील कायापालट होत आहे. जस जशा देशाच्या गरजा वाढत आहेत, देशाच्या गरजा बदलत आहेत, उत्पादन क्षेत्राला देखील आधुनिक बनविणे तितकेच गरजेचे आहे. हाच विचार घेऊन आज इथे या कार्यक्रमात मध्य प्रदेशातल्या 10 औद्योगिक प्रकाल्पांवर देखील काम सुरु करण्यात आले आहे. नर्मदापूरम इथे अक्षय ऊर्जेशी संबंधित उत्पादन क्षेत्र असो, इंदोरमध्ये दोन नवे आयटी पार्क्स असो, रतलाममध्ये मेगा औद्योगिक पार्क असो, हे सर्व मध्य प्रदेशची औद्योगिक शक्ती आणखी वाढवतील. आणि जेव्हा मध्य प्रदेशची औद्योगिक शक्ती वाढेल, तर याचा फायदा सर्वांना होणार आहे. इथले तरुण, इथले शेतकरी, इथले लहान लहान उद्योग, सर्वांची कमाई वाढेल, सर्वांना जास्तीत जास्त नव्या संधी मिळतील.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

कुठल्याही देशाच्या किंवा राज्याच्या विकासासाठी सरकार पूर्ण पारदर्शकतेने चालवले जावे, भ्रष्टाचारावर नियंत्रण असावे हे अतिशय गरजेचे असते. इथे मध्य प्रदेश मध्ये आजच्या पिढीला माहित नसेल, पण के काळ असाही होता, जेव्हा मध्य प्रदेश देशातले सर्वात वाईट राज्य म्हणून ओळखले जायचे. स्वातंत्र्यानंतर ज्यांनी दीर्घ काळ मध्य प्रदेश मध्ये राज्य केलं, त्यांनी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी, याशिवाय मध्य प्रदेशला काहीही दिलं नाही, मित्रांनो, काहीच दिलं नाही. अशा परिस्थितीत मग मध्य प्रदेशात उद्योग कसे आले असते? कुठलाही व्यापारी इथे येण्याची हिंमत कशी करणार होता? तुम्ही जेव्हा आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, आमच्या सहकाऱ्यांना सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे मध्य प्रदेशाचे भाग्य बदलण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत. आम्ही मध्य प्रदेशाला भीती मुक्त केले, इथे कायदा – सुव्यवस्था प्रस्थापित केली. जुन्या पिढीच्या लोकांना आठवत असेल की, काँग्रेसने कशा प्रकारे याच बुंदेलखंडला रस्ते, वीज आणि पाणी यासारख्या सुविधांसाठी रडवले आहेत. आज भाजपा सरकार मध्ये प्रत्येक खेड्या पर्यंत रस्ते पोचत आहेत, प्रत्येक घरापर्यंत वीज पोचत आहे. इथे दळणवळण आणि संपर्क सुविधा सुधारले आहेत, त्यामुळे उद्योग – धंद्यांसाठी देखील एक अनुकूल, सकारत्मक वातावरण बनले आहे. आज मोठ मोठे गुंतवणूकदार मध्य प्रदेशात येऊ इच्छितात, इथे नवे नवे कारखाने सुरु करू इच्छितात. मला खात्री आहे, येणाऱ्या काही वर्षांत मध्य प्रदेश, औद्योगिक विकासाची नवी शिखरं गाठणार आहे.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

आजचा नवा भारत, अतिशय वेगाने बदलत आहे. तुम्हाला आठवत असले, लाल किल्ल्यावरून मी गुलामगिरीच्या मानसिकते पासून मुक्ती आणि सर्वांचे प्रयत्न या बाबतीत सविस्तर विवेचन केले होते. आज मला हे बघून अभिमान वाटतो की भारताने गुलामगिरीची मानसिकता मागे टाकत स्वतंत्र असल्याच्या भावनेने मार्गक्रमण सुरु केले आहे.

आणि कोणताही देश जेव्हा असा निश्चय करतो, तेव्हा त्याचे परिवर्तन सुरू होते. नुकतेच जी-20 परिषदे दरम्यान आपण याची एक झलक पहिली असेल. मित्रहो, गावा गावांमधील मुलांच्या ओठांवर देखील आज जी-20 हा शब्द आत्मविश्वासाने उमटत आहे. भारताने जी-20 चे यशस्वीपणे आयोजन कसे केले ते आपण सर्वांनी पाहिले आहे. मला एक सांगा मित्र हो, सांगाल ना, मला उत्तर द्याल, हात वर करून उत्तर द्या, मागे बसले आहेत, ते सुद्धा उत्तर देतील, सगळे बोलतील, आपण मला सांगा, की जी-20 च्या यशाचा तुम्हा सर्वांना अभिमान वाटला की नाही? आपल्याला अभिमान वाटला की नाही? देशाला अभिमान वाटला की नाही? अभिमानाने आपली मान ताठ झाली की नाही? आपली छाती फुलली की नाही?

 

माझ्या कुटुंबातील प्रिय सदस्यहो,

आपली जी भावना आहे, तीच आज सर्व देशाची भावना आहे. जी-20 ने एवढे मोठे यश मिळवले, त्याचे श्रेय कोणाला जाते? याचे श्रेय कोणाला मिळते? याचे श्रेय कोणाला मिळते? हे कोणी करून दाखवले? नाही, हे मोदींनी नाही केलं, हे आपण सर्वांनी केलं. हे आपलं सामर्थ्य आहे. हे 140 कोटी भारतीयांचं यश आहे. मित्रहो. भारताच्या सामूहिक ताकदीचा हा पुरावा आहे. आणि या परिषदेत सहभागी होण्यासाठी जगभरातून परदेशी पाहुणे भारतात आले होते, असे आयोजन यापूर्वी कधीच पहिले नसल्याचेही ते सांगत होते. भारताने देशातील विविध शहरांमध्ये परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले, त्यांना भारताचे दर्शन घडवले, देशातील विविधता पाहून, भारताचा वारसा पाहून, भारताची समृद्धी पाहून ते खूप प्रभावित झाले. आपल्या इथे मध्य प्रदेशात, भोपाळ, इंदूर आणि खजुराहो येथे जी-20 च्या बैठका झाल्या, आणि त्यामध्ये सहभागी होऊन जे लोक गेले, ते तुमचे गुणगान करत आहेत, तुमची स्तुती करत आहेत. जी-20 च्या आयोजनाच्या निमित्ताने या ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळाली, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. तुम्ही मध्य प्रदेशची सांस्कृतिक, पर्यटन, कृषी आणि औद्योगिक क्षमता जगासमोर आणली आहे. त्यामुळे संपूर्ण जगात मध्य प्रदेशची नवी छबी तयार झाली आहे. जी-20 चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी शिवराज जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमची देखील प्रशंसा करतो.

 

माझ्या कुटुंबियांनो,

एकीकडे आजचा भारत जगाला जोडण्याची क्षमता सिद्ध करत आहे. आपला भारत जागतिक मंचावर जागतिक मित्र म्हणून उदयाला येत आहे. तर दुसरीकडे असे काही पक्ष आहेत, जे देश आणि समाजात फूट पाडण्यामध्ये मग्न आहेत. त्यांनी एकत्र येऊन एक इंडी-आघाडी तयार केली आहे. काही लोक या इंडी-आघाडीला अहंकारी- आघाडी असेही म्हणतात. त्यांचा नेता ठरलेला नाही, नेतृत्वाबाबत संभ्रम आहे. मात्र त्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. मला वाटतं, त्या बैठकीत त्यांनी ही अहंकारी आघाडी भविष्यात कसे काम करेल, याचे धोरण आणि रणनीती आखली आहे. त्यांनी स्वतःचा छुपा अजेंडाही तयार केला आहे. आणि हे धोरण, रणनीती काय आहे? हे इंडी आघाडीचे धोरण आहे, भारताच्या संस्कृतीवर हल्ला करण्याचे या अहंकारी युतीचे धोरण आहे. भारतीयांच्या विश्वासावर हल्ला करणे, हा इंडी आघाडीचा निर्णय आहे. इंडी आघाडी ही अहंकारी आघाडीची मनोवृत्ती आहे- भारताला ज्या विचारांनी, संस्कारांनी, ज्या परंपरांनी हजारो वर्षांपासून जोडले आहे, त्याचा नाश करणे. ज्या सनातन पासून प्रेरणा घेऊन देवी अहिल्याबाई होळकर यांनी देशाच्या काना कोपऱ्यामध्ये सामाजिक काम केले, महिला उत्थानाचे अभियान राबवले, देशाच्या अस्मितेचे रक्षण केले, ही अहंकारी आघाडी, इंडी आघाडी तेच सनातन संस्कार, परंपरा संपवण्याचे उद्दिष्ट ठेवून एकत्र आली आहे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई, मेरी झांसी नाही दुंगी, अशी ललकारी देऊन इंग्रजांना आव्हान देऊ शकली, ती याच सनातनची ताकद होती. ज्या सनातनवर गांधीजींनी आयुष्यभर विश्वास ठेवला, ज्या प्रभू श्री रामाने त्यांना आयुष्यभर प्रेरणा दिली, तेच त्यांचे शेवटचे शब्द ठरले - हे राम! ज्या सनातन परंपरेने त्यांना अस्पृश्यतेविरुद्ध आंदोलन करण्यासाठी प्रेरित केले, ती सनातन परंपरा या इंडी आघाडीला, या अहंकारी आघाडीला, संपवायची आहे.

ज्या सनातन पासून प्रेरणा घेऊन स्वामी विवेकानंद यांनी समाजातील वाईट गोष्टींबद्दल लोकांना जागरूक केले, या इंडी आघाडीला तो सनातन संपवायचा आहे. ज्या सनातन पासून प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळकांनी भारत मातेला स्वतंत्र करण्याचा विडा उचलला, गणेश उपासनेला स्वातंत्र्य चळवळीशी जोडले, सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा निर्माण केली, इंडी आघाडीला आज तोच सनातन नष्ट करायचा आहे.

 

मित्रहो,

स्वातंत्र्य चळवळीत फाशीवर जाणारे वीर म्हणायचे, की पुढील जन्म मला पुन्हा याच भारत मातेच्या पोटी येवो, ही सनातनची ताकद होती. सनातन संस्कृती जी संत रविदासांचे प्रतिबिंब आहे, सनातन संस्कृती जी माता शबरीची ओळख आहे, जी सनातन संस्कृती महर्षी वाल्मिकींचा आधार आहे, ज्या सनातन संस्कृतीने हजारो वर्षांपासून भारताला जोडले आहे, यांना एकत्र येऊन आता त्याच सनातनचे तुकडे तुकडे करायचे आहेत. आज हे लोक उघडपणे बोलू लागले आहेत आणि उघडपणे हल्ले करू लागले आहेत. उद्या हे लोक आपल्यावरचे हल्ले आणखी वाढवणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक सनातनी, या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने, या देशाच्या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने, या देशातील कोट्यवधी जनतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. सनातनचा नाश करून त्यांना देशाला पुन्हा एकदा हजारो वर्षांच्या गुलामी मध्ये ढकलायचे आहे. मात्र, आपल्याला एकत्र येऊन अशा शक्तींना रोखायचे आहे, आपल्या सामुहिक शक्तीने, आपल्या एकजुटीने त्यांचे मनसुबे हाणून पडायचे आहेत.

 

माझ्या कुटुंबियांनो,

भारतीय जनता पक्ष देशभक्ती, जनशक्ती आणि जनसेवेच्या राजकारणासाठी समर्पित आहे.

वंचितांना प्राधान्य हा भाजपच्या सुशासनाचा मूल-मंत्र आहे. भाजप सरकार हे संवेदनशील सरकार आहे.

दिल्ली असो वा भोपाळ, आज सरकार आपल्या दारी पोहोचून आपली सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोनाच्या इतक्या भयंकर संकटकाळात सरकारने देशातल्या कोट्यवधी नागरिकांचे मोफत लसीकरण केले.

तुमच्या सुख-दुःखात आम्ही सदैव तुमच्यासमवेत आहोत. आमच्या सरकारने 80 कोटीहून अधिक नागरिकांना मोफत अन्न-धान्य दिले, गरिबाघरची चूल विझू नये, गरिबाला उपाशी राहावे लागता कामा  नये, गरीब, दलित, मागास, आदिवासी कुटुंबातल्या मातांना उपाशी राहावे लागल्याने पोट बांधून रात्र काढायची वेळ येऊ नये असाच आमचा प्रयत्न आहे. आपले मूल उपाशी आहे या विचाराने आई तळमळू नये यासाठी गरीबाच्या या मुलाने गरीबाघरच्या अन्नधान्याची चिंता केली, गरीब आईला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाची चिंता केली आणि आपणा सर्वांच्या आशीर्वादाने मी आजही हे दायित्व निभावत आहे.

 

माझ्या कुटुंबियांनो, 

मध्य प्रदेशने विकासाची नव-नवी शिखरे सर करावीत, मध्य प्रदेशमधल्या प्रत्येक कुटुंबाचे जीवन सुखकर व्हावे, घरोघरी समृद्धी नांदावी यासाठीच आमचे अखंड प्रयत्न सुरु आहेत. मोदींच्या वचनपूर्ततेचा इतिहास आपल्यासमोर आहे. हा इतिहास आठवा, तो पहा. मोदींनी पक्क्या घरांची हमी दिली होती, आज मध्य प्रदेशातच 40 लाखाहून जास्त कुटुंबाना पक्की घरे मिळाली आहेत.घरा-घरात स्वच्छतागृहाची हमी आम्ही दिली होती, त्याचीही आम्ही पूर्तता केली. गरिबांना मोफत उपचाराची हमी आम्ही दिली होती. प्रत्येक घरासाठी बँक खाते उघडण्याचे आश्वासन दिले होते. आपल्या माता-भगिनींना धूर मुक्त स्वयंपाकघराची हमी दिली होती. या प्रत्येक हमीची पूर्तता आपला सेवक, मोदी आज पूर्ण करत आहे. आमच्या भगिनींचे हित लक्षात घेऊन आम्ही या रक्षाबंधनाला गॅस सिलेंडरच्या किमतीतही मोठी कपात केली. यामुळे उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांनाही सिलेंडर आता आणखी 400 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. उज्वला योजना आपल्या भगिनी-मुली यांचे जीवन कसे सुलभ करत आहे हे आपण सर्वजण जाणताच. कोणत्याही भगिनी-मुलींना धुराचा त्रास सहन करत स्वयंपाक करावा लागू नये असाच आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच केंद्र सरकारने कालच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता देशात आणखी 75 लाख भगिनींना मोफत गॅस जोडणी दिली जाईल. कोणतीही भगिनी गॅस जोडणीपासून वंचित राहता कामा नये हे आमचे उद्दिष्ट आहे. एकदा तर आम्ही हे काम पूर्ण केले पण काही कुटुंबे वाढली, कुटुंबे विभागली गेली तर दुसऱ्या कुटुंबाला  lगॅसची गरज आहे. यामध्ये जी नावे आहेत त्यांच्यासाठी ही नवी योजना घेऊन आम्ही आलो आहोत.

 

मित्रांनो,

आम्ही दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहोत. मध्यस्थाना बाजूला करून प्रत्येक लाभार्थीला योजनेचा संपूर्ण लाभ मिळेल याची हमी आम्ही दिली होती. याचेच एक उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आहे. या योजनेच्या लाभार्थी प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात 28 हजार रुपये थेट पाठवण्यात आले. सरकारने या योजनेवर 2 लाख साठ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च  केला आहे. 

 

मित्रांनो,

शेतकऱ्यांचा कृषी खर्च कमी राहावा, त्यांना स्वस्त दरात खते मिळावीत असाच गेली नऊ वर्षे सरकारचा प्रयत्न राहिला आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून आमच्या सरकारने 9 वर्षात 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. युरियाची गोणी, आपण शेतात जाताना जो युरिया घेऊन जाता ना, त्या युरियाची गोणी अमेरिकेत 3000 रुपयांना विकली जाते मात्र तीच गोणी आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना आम्ही फक्त 300 रुपयांमध्ये उपलब्ध करून देतो आणि यासाठी सरकारी तिजोरीतून दहा लाख कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आपल्याला आठवत असेलच पूर्वी या युरियाच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असत. या युरीयासाठी शेतकऱ्यांना अनेकदा लाठ्याकाठ्या झेलाव्या लागत तोच युरिया आता किती सहजपणे जागो-जागी उपलब्ध होत आहे.

 

माझ्या कुटुंबियांनो,

सिंचनाचे महत्व काय असते हे बुंदेलखंडापेक्षा अधिक उत्तम कोण जाणू शकते ? भाजपच्या दुहेरी इंजिन सरकारने बुंदेलखंड मध्ये अनेक सिंचन प्रकल्पांवर काम केले आहे. केन-बेतवा लिंक कालव्याचा, बुंदेलखंडसहित या भागातल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे आणि आयुष्यभर होणार आहे, भावी पिढ्यांनाही होणार आहे. देशातल्या प्रत्येक भगिनीच्या घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठीही आमचे सरकार अखंड परिश्रम करत आहे. केवळ चार वर्षातच देशात सुमारे 10 कोटी नव्या कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधेही 65 लाख कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. याचा मोठा लाभ बुंदेलखंडमधल्या माझ्या माता-भगिनींना होत आहे. बुंदेलखंडमध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत पाण्याच्या स्त्रोत निर्मितीवरही मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. 

 

मित्रांनो,

आमचे सरकार या भागाच्या विकासासाठी, या भागाचा गौरव वृद्धींगत करण्यासाठी संपूर्णपणे कटीबद्ध आहे, आपणासाठी पूर्णपणे समर्पित आहे. या वर्षी 5 ऑक्टोबरला राणी दुर्गावती जी यांची 500 वी जयंती आहे. दुहेरी इंजिन सरकार हा पुण्य योग मोठ्या दिमाखात साजरा करणार आहे.

 

मित्रांनो,

आमच्या सरकारच्या प्रयत्नांचा सर्वात जास्त लाभ गरिबांना झाला आहे, दलित, मागास, आदिवासी वर्गाला झाला आहे. वंचितांना प्राधान्य, सबका साथ, सबका विकास याचे हे प्रारूप आज जगालाही मार्गदर्शक ठरत आहे. जगातल्या सर्वोच्च - 3 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून भारत आता वाटचाल करत आहे. भारताला सर्वोच्च – 3 मध्ये येण्यासाठी मध्य प्रदेशची मोठी भूमिका आहे आणि मध्य प्रदेश ती भूमिका निभावेल. यातून इथल्या शेतकऱ्यांसाठी, इथल्या उद्योगांसाठी, इथल्या युवकांसाठी नव-नव्या संधी निर्माण होणार आहेत. येती पाच वर्षे मध्य प्रदेशच्या विकासाला नवी झळाळी देणारी वर्षे आहेत. आज ज्या प्रकल्पांची आम्ही पायाभरणी केली आहे, ते प्रकल्प मध्य प्रदेशचा विकास अधिक वेगवान करतील. विकासाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात, विकासाच्या या उत्सवात सहभागी झालात आणि आशीर्वाद दिलात यासाठी आपणा सर्वांचे खूप-खूप आभार. आपणा सर्वाना खूप-खूप  शुभेच्छा.

माझ्यासमवेत म्हणा

भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi