नमस्कार, तेलंगणाच्या राज्यपाल, डॉक्टर तमिलिसै सौंदरराजन जी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी,केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी जी, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद महमूद अली गारू, टी श्रीनिवास यादव, संसदेतले माझे सहकारी, माझे मित्र बंडी संजय गारू, के लक्ष्मण गारू, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींनो,
नमस्कारम।
उत्सवाच्या या वातावरणात, आज तेलंगणा आणि आंध्रप्रदेशाला एक भव्य भेट मिळाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस, एकाप्रकारे, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशाची समान संस्कृती आणि वारसा याला जोडणारी ठरणार आहे. मी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लोकांना, विशेषत: या दोन्ही राज्यांतील मध्यमवर्गाचे, निम्न मध्यमवर्गाचे, उच्च मध्यमवर्गाचे वंदे भारत ट्रेनसाठी खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज सेना दिवसही आहे. प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाच्या सैन्यदलांचा सार्थ अभिमान आहे. देशाच्या सीमांच्या रक्षणार्थ भारतीय सैन्याने गाजवलेले शौर्य अतुलनीय आहे. मी सर्व सैनिकांना, माजी सैनिकांना, त्यांच्या कुटुंबीयांना सैन्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
सध्या, पोंगल, माघ बीहू, मकर संक्रांती, उत्तरायण अशा उत्सवांचा उत्साह सगळीकडे आपल्याला दिसतो आहे. देशातले हे प्रमुख काही दिवस, मोठे सण-उत्सव, आसेतू हिमाचल,काश्मीर ते कन्याकुमारी, अटक ते कटक देशाला जोडतात. आपल्या सगळ्यांना एकत्र आणतात. एक भारत-श्रेष्ठ भारताचं चित्र आपल्या मनात निर्माण करतात. तशाच प्रकारे वंदेभारत गाडी देखील आपल्या गतीमुळे, आपल्या प्रवासातून, विविध प्रदेशांना जोडण्याची, त्यांना जाणून घेण्याची संधी आपल्याला देते.वंदेभारत एक्सप्रेस गाडी एक राष्ट्र म्हणून, आपली समान संस्कृती, आपल्या श्रद्धा यांनाही जोडते. आज जी नवी गाडी सुरू झाली आहे,ती, हैदराबाद, वारंगल, विजयवाड़ा आणि विशाखापट्टणम यांसारख्या शहरांना जोडणार आहे. श्रद्धा आणि पर्यंटनाशी संबंधित अनेक महत्वाची ठिकाणे, या मार्गांवर येतात. म्हणूनच या वंदे भारत एक्सप्रेसमुळे भाविक आणि पर्यटकांना देखील मोठा लाभ मिळणार आहे. या गाडीमुळे सिकंदराबाद आणि विशाखापट्टणम यांच्यातील प्रवासाचा वेळ देखील कमी होणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
वंदे भारत गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य देखील आहे. ही गाडी नव्या भारताचे संकल्प आणि सामर्थ्य याचे प्रतीक आहे. ही गाडी अशा भारताचे प्रतीक आहे, जो अतिशय जलद अशा परिवर्तनाच्या मार्गावर चालतो आहे. असा भारत, जो आपली स्वप्ने, आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आतुर झाला आहे. प्रत्येक भारतीय यासाठी उत्सुक आहे. असा भारत जो जलद वेगाने वाटचाल करत, आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यास उत्सुक आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस, अशा भारताचे प्रतीक आहे, ज्याला सगळे काही सर्वोच्च हवे आहे. उत्तम हवे आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस, अशा भारताचे प्रतीक आहे, जो आपल्या प्रत्येक नागरिकाला उत्तम सुविधा देण्यास इच्छुक आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस अशा भारताचे प्रतीक आहे, जो पारतंत्र्याच्या मानसिकेतून बाहेर निघत, आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करतो आहे.
मित्रांनो,
आज देशात, वंदे भारत एक्सप्रेसबाबत ज्या जलद गतीने काम होत आहे, त्याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे . ही सिकंदराबाद-विशाखापट्टणम वंदे भारत 2023 या वर्षातली पहिली ट्रेन आहे आणि आपल्याला आनंद होईल, की आपल्या देशात, 15 दिवसांच्या आत ही दुसरी वंदे भारत ट्रेन धावते आहे. यातून आपल्याला हेच दिसते, की कशाप्रकारे, वंदे भारत अभियान, आपल्या रेल्वेरुळांवर जलद गतीने धावत, वास्तवात बदल घडवून आणत आहे. वंदे भारत ट्रेन, भारतातच तयार करण्यात आलेली, देशाची गाडी आहे. तिच्या जलद गतीचे, कितीतरी व्हिडिओ, लोकांच्या मनात,सोशल मीडियावर सध्या व्यापलेले आहेत. मी आणखी एक आकडा तुम्हाला सांगेन, जो ऐकून आपल्यालाही चांगले वाटेल, हे ऐकणं रोचक ठरेल. गेल्या काही वर्षांतच, सात वंदे भारत गाड्यांनी एकूण 23 लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. हे अंतर म्हणजे, पृथ्वीच्या 58 फेऱ्या मारण्याइतके अंतर आहे. या गाड्यांमधून आतापर्यंत 40 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जो वेळ वाचतो, तो देखील अनमोल आहे.
बंधू भगिनींनो,
कनेक्टीविटीचा वेगाशी आणि या दोहोंचाही, सगळ्याच विकासाशी थेट संबध आहे. कनेक्टीविटीशी संबधित पायाभूत कामे केवळ दोन्ही जागांचीच नाही तर स्वप्नांची वास्तवाशी गाठ घालते. उत्पादनांची बाजारपेठेशी तर बुद्धीमत्तेची योग्य मंचाशी गाठ घालून देते. कनेक्टिविटी आपल्यासह विकासाच्या शक्यतांचाही विस्तार करते. म्हणजेच इथे गती आहे. जिथे जिथे गती आहे तिथे प्रगती आहे आणि प्रगती असेल तर समृद्धी निश्चित आहे. आम्ही असा काळ पाहिला आहे जेव्हा आपल्याकडे विकास आणि आधुनिक कनेक्टिविटीचा लाभ खूपच कमीजणांना मिळत असे. यामुळे देशातील मोठ्या लोकसंख्येचा वेळ फक्त येण्याजाण्यात, वाहतूकीतच खर्च होत असे. यामुळे देशाच्या सामान्य नागरिकाचे, देशाच्या मध्यमवर्गाचे मोठे नुकसान होत असे. आज भारत त्या जुनाट विचारांना मागे टाकून पुढे जात आहे. आज भारतात सर्वांना गती आणि प्रगतीशी जोडण्यासाठी वेगाने काम होत आहे. वंदे भारत रेल्वेगाडी हे याचे मोठे प्रमाण आहे, प्रतिक आहे.
मित्रहो,
इच्छाशक्ती असेल तर मोठ्यात मोठी उद्दिष्टेही सहज गाठता येतात. आपण बघत आहोत की 8 वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेबाबत किती प्रकारे निराशाजनक बाबी ऐकायला बघायला मिळत होत्या. कमी वेग, घाणीचं आगार, तिकिट आरक्षणाबद्दलच्या तक्रारी, सतत दररोजच्या दुर्घटना. भारतीय रेल्वेत सुधारणा होईल ही आशाच देशातील लोकांनी सोडून दिली होती, जेव्हा रेल्वेसंबधित नव्या मुलभूत सोयींबाबत काही विचारणा होत असे तेव्हा निधीच्या कमतरतेची सबब सांगितली जायची, तोटा होतो असं सांगितलं जायचं.
परंतू मित्रहो,
स्पष्ट हेतूने, प्रामाणिक हेतूने, आम्ही हे आव्हानही पेलायचे ठरवले. गेल्या आठ वर्षांमधील भारतीय रेल्वेच्या कायापालटाच्या मागे हाच मंत्र आहे. आज भारतीय रेल्वेतून प्रवास म्हणजे एक सुखद अनुभव बनला आहे. देशातील कितीतरी रेल्वे स्थानके अशी आहेत जेथे आता आधुनिक होत चाललेल्या भारताचे चित्र दिसून येते. गेल्या सात आठ वर्षांत जी कामे आमच्या सरकारने सुरु केली आहेत ती येत्या 7- 8 वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट करणार आहेत. आज पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विस्टाडोम कोच आहे, हेरिटेज ट्रेन आहे. शेतकऱ्यांची उत्पादने दूरवरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी किसान रेल्वे चालवली गेली. मालगाड्यांसाठी स्पेशल फ्रेट कॅरिडॉरवर वेगाने काम सुरु आहे. देशातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूकीची स्थिती अधिक उत्तम व्हावी म्हणून दोन डझनांहून अधिक नव्या शहरांमध्ये मेट्रो जाळ्याचाही विस्तार होत आहे. रिजनल रॅपिड ट्रांझिट सिस्टिम सारख्या भविष्यातल्या व्यवस्थांवरही देशात वेगाने काम सुरु आहे.
बंधु भगिनींनो,
तेलंगणात गेल्या आठ वर्षांमध्ये रेल्वेच्या बाबतीत अभूतपूर्व कामे झाली आहेत. 2014 पूर्वी आधी आठ वर्षांमध्ये तेलंगणातील रेल्वेसाठी 250 कोटी रुपयांहून कमी निधी होता. तर आज हा निधी वाढला आहे आणि 3 हजार कोटींपर्यंत पोचला आहे. तेलंगणातील मेडकसारखी काही ठिकाणं अशी आहेत जी प्रथमच रेल्वेने जोडली गेली आहेत. 2014 पूर्वी आठ वर्षांमध्ये तेलंगणात सव्वाशे किलोमीटरहूनही कमी रेल्वेमार्ग निर्मिती झाली.गेल्या आठ वर्षांमध्ये तेलंगणात सव्वादोनशेहूनही जास्त किलोमीटरचे ट्रॅक मल्टीट्रॅकिंगचे काम केले गेले आहे. याच कालावधीत तेलंगणात रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण 3 पटींहून अधिक झाले आहे. लवकरच आम्ही तेलंगणात सर्व ब्रॉडगेज मार्गांवर विद्युतीकरणाचे काम पूर्ण करणार आहोत.
मित्रहो,
आज जी वंदेभारतची मार्गक्रमणा सुरू आहे ती एका बाजूने आंध्रप्रदेशाशीही जोडलेली आहे.आंध्रप्रदेशात रेल्वेचे जाळे मजबूत करण्यासाठी केंद्रसरकार सातत्याने काम करत आहे. 2014च्या तुलनेत आज आंध्र प्रदेशात कितीतरी पटीने वेगाने नवीन रेल्वे मार्ग निर्मिती केली जात आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात आंध्र प्रदेशात वार्षिक 60किलोमीटर रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण होत असे. आता हा वेग वाढून दरवर्षी 220 किलोमीटरहून जास्त झाला आहे. लोकांसाठी केंद्रसरकारचे हे प्रयत्न, जीवनसुलभता यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे आणि व्यवसायसुलभतेतही वाढ होत आहे. गती आणि प्रगतीचीही वाटचाल अशीच सुरू राहील.याच विश्वासाने तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांना वंदेभारत रेल्वेगाडीसाठी पुन्हा एकवार खूप खूप शुभेच्छा, प्रवाशांना शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद!