नमस्कार.
देशातील कोट्यवधी तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे अभियान अविरत सुरू आहे. आज 50 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. हे नियुक्तीपत्र तुमच्या मेहनतीचे आणि प्रतिभेचे फळ आहे. मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन करतो. आता तुम्ही राष्ट्र उभारणीच्या प्रवाहात सामील होणार आहात, जो थेट लोकांशी संबंधित आहे. भारत सरकारचे कर्मचारी म्हणून तुम्हाला सर्वांना खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही पदावर असाल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, देशबांधवांचे जीवनमान सुलभ करणे हे तुमचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वीच, 26 नोव्हेंबरला देशाने संविधान दिन साजरा केला. या दिवशी 1949 मध्ये देशाने सर्व नागरिकांना समान अधिकार देणारी राज्यघटना स्वीकारली. सर्वांना समान संधी देऊन सामाजिक न्याय स्थापित केला जाईल अशा भारताचे स्वप्न राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार बाबासाहेबांनी पाहिले होते. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर बराच काळ देशात समानतेच्या सिद्धांताकडे दुर्लक्ष केले गेले. 2014 पूर्वी समाजाचा एक मोठा वर्ग मूलभूत सुविधांपासून वंचित होता. 2014 मध्ये जेव्हा देशाने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, सरकार चालवण्याची जबाबदारी दिली, तेव्हा सर्वात आधी आम्ही वंचितांना प्राधान्य देण्याच्या या मंत्रासह पुढे जाण्याच्या दिशेने सुरुवात केली. ज्यांना योजनांचा लाभ कधीच मिळाला नाही, ज्यांना अनेक दशकांपासून सरकारकडून कोणतीही सुविधा मिळाली नाही, त्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करत सरकार स्वतः त्यांच्यापर्यंत पोहचले आहे.
सरकारच्या विचारसरणी आणि कार्यसंस्कृतीत झालेल्या या बदलामुळे आज देशात अभूतपूर्व परिणाम दिसून येत आहेत. नोकरशाही तीच, जनताही तीच. फाईल्सही समान आहेत, काम करणारे लोक तेच आहेत, पद्धतही तीच आहे. पण जेव्हा सरकारने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना प्राधान्य दिले तेव्हा संपूर्ण परिस्थिती बदलू लागली. एकापाठोपाठ एक काम करण्याची पद्धत अतिशय वेगाने बदलू लागली, कामाची पद्धत बदलू लागली, जबाबदाऱ्या निश्चित होऊ लागल्या आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सकारात्मक परिणाम दिसू लागले. एका अभ्यासानुसार, देशातील 13 कोटींहून अधिक लोक 5 वर्षांत गरिबीतून बाहेर आले आहेत. सरकारच्या योजना गरीबांपर्यंत पोहोचल्याने किती मोठा बदल घडून येतो हे यातून दिसून येते. आज सकाळीच तुम्ही पाहिले असेल की विकसित भारत संकल्प यात्रा कशी गावागावत पोहचत आहे. तुमच्यासारखेच सरकारी कर्मचारी सरकारच्या योजना गरीबांच्या दारापर्यंत पोहोचवत आहेत. सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर तुम्हाला देखील त्याच हेतूने, चांगल्या हेतूने, समर्पणाने आणि निष्ठेने लोकांची सेवा करण्यासाठी स्वतःला समर्पित करावे लागेल.
मित्रांनो,
आजच्या बदलत्या भारतात तुम्ही सर्वजण पायाभूत सुविधांच्या क्रांतीचे साक्षीदार आहात. आधुनिक द्रुतगती मार्ग असोत, आधुनिक रेल्वे स्थानके असोत, विमानतळ असोत, जलमार्ग असोत, आज देश यावर लाखो कोटी रुपये खर्च करत आहे. आणि जेव्हा सरकार इतक्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांवर पैसे खर्च करत आहे, गुंतवणूक करत आहे, तेव्हा हे अतिशय स्वाभाविक आहे, कोणीही हे नाकारू शकत नाही, कारण यामुळे रोजगाराच्या लाखो नवीन संधीही निर्माण होतात. 2014 पासून आणखी एक मोठा बदल घडून आला को म्हणजे वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प शोधून काढले जात आहेत आणि युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहेत. अर्धवट पूर्ण झालेले प्रकल्प प्रामाणिक लोकांचे पैसे वाया घालवतात, जे देशाचे आपले करदाते आहेत. खर्चही वाढतो आणि जो लाभ मिळायला हवा होता तो देखील मिळत नाही. आपल्या करदात्यांवर हा मोठा अन्याय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, केंद्र सरकारने लाखो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला आणि त्यांना गती देण्यासाठी सातत्याने देखरेख ठेवली आणि यश मिळवले आहे. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ, बिदर-कलबुर्गी रेल्वे मार्ग हा असाच एक प्रकल्प होता, जो अनेक वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. पण हा प्रकल्पही रखडला होता. 2014 मध्ये हे काम पूर्ण करण्याचा आम्ही संकल्प केला आणि केवळ 3 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला. सिक्कीमच्या पाक्योंग विमानतळाची कल्पनाही 2008 साली करण्यात आली होती. पण 2014 पर्यंत ते केवळ कागदावरच राहिले. 2014 नंतर या प्रकल्पाशी संबंधित सर्व अडथळे दूर करण्यात आले आणि 2018 पर्यंत ते पूर्ण करण्यात आले. त्यातून रोजगारही उपलब्ध झाला. पारादीप रिफायनरीची चर्चा देखील 20-22 वर्षांपूर्वी सुरू झाली होती, परंतु 2013 पर्यंत काहीही लक्षणीय घडले नाही. जेव्हा आमचे सरकार आले, तेव्हा आम्ही सर्व रखडलेल्या प्रकल्पांप्रमाणेच पारादीप रिफायनरी हाती घेतली आणि ती पूर्ण केली.
ज्यावेळी अशा प्रकारचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होतात, तेव्हा प्रत्यक्ष रोजगारांच्या संधी तर निर्माण होतातच पण त्याबरोबरच हे रोजगार अनेक अप्रत्यक्ष संधी देखील तयार करतात.
मित्रांनो,
देशात रोजगार निर्मिती करणारे एक खूप मोठे क्षेत्र आहे- बांधकाम क्षेत्र(रियल इस्टेट). हे क्षेत्र ज्या दिशेने चालले होते त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबरच मध्यमवर्गाची मोठी हानी निश्चित होती. रेरा कायद्यामुळे आज रियल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आली आहे. या क्षेत्रात सातत्याने गुंतवणूक वाढत आहे. आज देशात एक लाखापेक्षा जास्त रियल इस्टेट प्रकल्प रेरा कायद्या अंतर्गत नोंदणीकृत आहेत. पूर्वी प्रकल्प थांबून राहायचे, रोजगाराच्या नव्या संधी ठप्प पडत असायच्या. देशाचा वाढत जाणारा हा रियल इस्टेट उद्योग मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी तयार करत आहे.
भारत सरकारची धोरणे आणि निर्णय यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेला शिखरावर पोहोचवले आहे. जगातील मोठमोठ्या संस्था भारताच्या विकासदरा - संदर्भात सकारात्मक आहेत. अलीकडेच गुंतवणूक मानांकन क्षेत्रात जगात अग्रणी असलेल्या संस्थेने भारताच्या जलद विकासावर आपले शिक्कामोर्तब केले आहे. त्यांचा असा अंदाज आहे की रोजगाराच्या वाढत्या संधी, कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्येचे मोठे प्रमाण आणि कामगार उत्पादकतेमधील वाढ या कारणांमुळे भारताच्या विकासाची जलद गती अशीच सुरू राहील. भारतात उत्पादन आणि बांधकाम निर्मिती क्षेत्राची मजबुती देखील याचे एक मोठे कारण आहे. ही सारी तथ्ये या गोष्टीचे दाखले आहेत की आगामी काळात भारतात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अपार शक्यता अशाच प्रकारे तयार होत राहतील. ही गोष्ट या देशातील युवा वर्गासाठी अतिशय महत्त्वाची आहे. एक सरकारी कर्मचारी या नात्याने तुमची देखील यामध्ये मोठी भूमिका आहे. तुम्हाला हे सुनिश्चित करायचे आहे की भारतात होत असलेल्या विकासाचा लाभ समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचेल. कोणतेही क्षेत्र कितीही दूर का असेना, तुमचे या गोष्टीला प्राधान्य असले पाहिजे की कोणतीही व्यक्ती कोणत्याही दुर्गम स्थानावर का असेना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेच पाहिजे. भारत सरकारचे कर्मचारी या नात्याने तुम्ही हा दृष्टिकोन घेऊन पुढे जाल तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल.
मित्रांनो,
आगामी 25 वर्षे तुमच्यासाठी आणि देशासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. अतिशय कमी पिढ्यांना अशा प्रकारची संधी मिळाली आहे. या संधीचा पुरेपूर वापर करा. माझा हा देखील आग्रह आहे की तुम्ही सर्व ‘कर्मयोगी प्रारंभ’ या नवीन लर्निंग मॉडेलची माहिती घेऊन त्याचा पुरेपूर वापर करा. आपला एकही सहकारी असा असता कामा नये जो यासोबत जोडून आपली क्षमता वाढवत नसेल. शिकण्याची जी प्रवृत्ती तुम्हाला या टप्प्यापर्यंत घेऊन आली आहे त्या या शिकण्याच्या प्रवृत्तीला बंद होऊ देऊ नका. सातत्याने शिकत रहा. सातत्याने स्वतःचा दर्जा उंचावत रहा. हा तुमच्या जीवनाचा प्रारंभ आहे. देश देखील प्रगती करत आहे. तुम्हाला देखील प्रगती करायची आहे. या ठिकाणी आला आहात तिथे अडकून पडायचे नाही आहे आणि यासाठी खूप मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला कर्मयोगी एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. तेव्हापासून लाखो नवीन सरकारी कर्मचाऱ्यांनी याच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. माझ्यासोबत पंतप्रधान कार्यालयात पीएमओ मध्ये जे काम करतात ते देखील वरिष्ठ लोक आहेत. देशातील महत्त्वपूर्ण गोष्टी ते पहात आहेत. मात्र ते देखील यासोबत जोडून सातत्याने आपल्या चाचण्या करत आहेत, परीक्षा देत आहेत, कोर्सेस करत आहेत. ज्यामुळे त्यांची क्षमता, त्यांचे सामर्थ्य माझ्या पीएमओला देखील बळकट करते, देशाला देखील मजबूत करते. आमचा ऑनलाइन ट्रेनिंग प्लेटफॉर्म iGoT Karmayogi वर देखील 800 पेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आपल्या कौशल्यात वाढ करण्यासाठी याचा नक्कीच वापर करा. आणि जेव्हा आज तुम्ही तुमच्या जीवनात एक नवीन सुरुवात करत आहात, तुमच्या कुटुंबाची स्वप्ने, त्यांना एक नवीन उंची प्राप्त होत आहे. माझ्याकडून तुमच्या कुटुंबियांना देखील, मी खूप खूप शुभेच्छा देतो.
आता जेव्हा सरकारमध्ये आला आहात, तेव्हा जर शक्य झाले तर आजच एक गोष्ट डायरीमध्ये लिहून ठेवा की एक सामान्य नागरिक या नात्याने तुमची 20,22,25 या वयापर्यंत जी काही वर्षे झाली असतील, सरकारमध्ये तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी अडचणी आल्या. कधी बस स्थानकात अडचण आली असेल, कधी चौकात पोलिसांमुळे काही अडचण आली असेल, कधी सरकारी कार्यालयात त्रास झाला असेल, ते सर्व लक्षात ठेवा आणि हा निर्धार करा की मला माझ्या आयुष्यात सरकारकडून जो काही त्रास झाला तो त्रास एखाद्या सरकारी सेवकामुळे झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला अशा प्रकारे त्रास होईल असा व्यवहार मी कधीही करणार नाही. तुम्ही इतका जरी निर्णय घेतलात की जे माझ्यासोबत घडले तसे मी इतरांसोबत वागणार नाही. तुम्ही कल्पना करू शकता की आपण सर्वसामान्य नागरिकांना किती जास्त प्रमाणात मदत करू शकतो. राष्ट्र निर्मितीच्या
दिशेने मी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो.
खूप-खूप आभार.