कारागीर आणि छोट्या व्यवसायांशी निगडित लोकांना प्रोत्साहन देणे हे “पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे'' हे उद्दिष्ट
यंदाच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या घोषणेने सगळ्यांचे लक्ष वेधले.
“स्थानिक कलाकुसरीच्या निर्मितीमध्ये लहान कारागीर महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांना सक्षम करण्यावर पंतप्रधान विश्वकर्मा योजना भर देते”
"पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांच्या समृद्ध परंपरा जपत त्यांचा विकास करणे हा पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा उद्देश आहे "
“कुशल कारागीर हे आत्मनिर्भर भारताच्या खऱ्या भावनेचे प्रतीक आहेत आणि आमचे सरकार अशा लोकांना नव्या भारताचे विश्वकर्मा मानते”
"भारताच्या विकासाच्या प्रवासात गावातील प्रत्येक घटकाला त्याच्या विकासासाठी सक्षम करणे आवश्यक आहे"
"आपल्याला देशाच्या विश्वकर्मांच्या गरजांनुसार आपल्या कौशल्य पायाभूत सुविधा व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे"
"आजचे विश्वकर्मा उद्याचे उद्योजक होऊ शकतात"
"कारागीर आणि शिल्पकार जेव्हा मूल्य साखळीचा एक भाग बनतात तेव्हा त्यांना बळकट केले जाऊ शकते"

नमस्कार!

गेल्या अनेक दिवसांपासून अर्थसंकल्पानंतर वेबिनार घेण्याचा एक पायंडा आम्ही पाडला आहे. गेल्या तीन वर्षात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या अर्थसंकल्पाविषयी विविध हितसंबंधीयांशी चर्चा करण्याची एक परंपरा आम्ही सुरू केली आहे, आणि जो अर्थसंकल्प आपण मांडला आहे, तो आपण लवकरात लवकर संपूर्ण लक्ष देऊन कसा लागू करता येईल, याबद्दल भागधारक काही सूचना किंवा सल्ले देऊ शकतात का, त्यांच्या सूचनांवर सरकार काय अंमलबजावणी करू शकते, अशा सर्व गोष्टींवर अत्यंत भरीव मंथन या वेबिनारमध्ये होते. मला अतिशय आनंद आहे की सर्व संघटना, व्यापार आणि उद्योग यांच्याशी थेट संबंधित असलेले घटक, मग ते शेतकरी असोत, महिला असोत, युवा असोत किंवा आदिवासी असोत, आपले दलित बंधूभगिनी असोत, हे सगळे अर्थसंकल्पाचे भागीदार आणि हजारोंच्या संख्येने इथे संपूर्ण दिवस बसलेले लोक यांच्या विचारमंथनातून अतिशय उत्तम सूचना/सल्ले आपल्याला मिळतात. सरकारसाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या सूचना यातून मिळाल्या आहेत; आणि माझ्यासाठी आणखी एक आनंदाची बाब ही की, या वेबिनारमध्ये या अर्थसंकल्पात अमुक असायला हवे, अमुक असायला नको होते, असे हवे होते अशा चर्चा करण्याऐवजी सर्व भागधारक हा अर्थसंकल्प सर्वांसाठी उपयुक्त कसा ठरेल, त्याचे काय मार्ग असू शकतात, याविषयी मुद्देसूद चर्चा करतात.

हा आपल्यासाठी लोकशाहीचा एक नवा आणि महत्वाचा अध्याय आहे. जी चर्चा संसदेत होते, खासदार जी चर्चा करतात, तसेच गहन विचार जनता जनार्दनाकडून ऐकायला मिळणे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. आजचा अर्थसंकल्पोत्तर वेबिनार भारतातील कोट्यवधी लोकांच्या कला आणि त्यांची कौशल्ये यांना समर्पित आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही 'स्कील इंडिया' मोहिमेअंतर्गत, कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून कोट्यवधी युवकांना कौशल्य वाढविण्याचे, त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. कौशल्य विकास या क्षेत्रात आपण जितके विशिष्ट प्रयत्न करू, जितके थेट प्रयत्न करू, तितके त्याचे परिणाम चांगले होतील. आता जर का हे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, पीएम विश्वकर्मा योजना, याच विचारातून जन्माला आली आहे.

या अर्थसंकल्पात पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणा झाल्यानंतर त्यावर व्यापक चर्चा झाली आहे. वर्तमानपत्रांचे देखील लक्ष वेधून घेतले आहे, जे अर्थतज्ञ आहेत, त्याचे देखील याकडे लक्ष गेले आहे. आणि म्हणूनच या योजनेची घोषणा आकर्षणाचे केंद्र बनली आहे. आता या योजनेची गरज काय होती, याचे नाव विश्वकर्माच का ठेवले, आपण सर्व हितसंबंधीय या योजनेच्या यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्वाचे आहात, या विषयांवर देखील मी थोडंफार बोलणार आहे आणि काही गोष्टी आपल्याशी विचारमंथन करून समोर येतील.

मित्रांनो,

आपल्या पुराणांत भगवान विश्वकर्मा यांना सृष्टीचे नियंत्रक आणि निर्माते मानले आहे. त्यांना सर्वात मोठा शिल्पकार म्हटले जाते आणि विश्वकर्माच्या मूर्तीची जी कल्पना केली आहे, त्यात त्यांच्या हातात वेगवेगळी हत्यारे आहेत. आपल्या समाजात, स्वतःच्या हाताने काही ना काही निर्माण करणारे आणि ते सुद्धा हत्यारांच्या मदतीने करणारे, अशा लोकांची एक समृद्ध परंपरा आहे. जे लोक वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करतात, त्यांच्याकडे तर लक्ष दिलेच आहे, मात्र आपले लोहार, सोनार, कुंभार, सुतार, मूर्तिकार, कारागीर, राजमिस्त्री, अनेक आहेत, जे शतकानुशतके आपल्या विशिष्ट सेवांमुळे समाजाचा अविभाज्य घटक आहेत. या वर्गांनी बदलत्या आर्थिक गरजांच्या अनुसार वेळोवेळी स्वतःमध्येही बदल घडवले आहेत. त्यासोबतच, त्यांनी स्थानिक परंपरांच्या अनुसार नवनव्या गोष्टींचाही विकास केला आहे. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रातील काही भागातले आपले शेतकरी बंधू भगिनी, त्यांचे धान्य, बांबूपासून बनवलेल्या मोठमोठ्या कोठया/पेटाऱ्यांमध्ये साठवून ठेवतात त्याला कणगी म्हणतात, आणि स्थानिक कारागीरच ते तयार करतात. त्याचप्रमाणे, जर आपण किनारी प्रदेशात गेलो, तर समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिल्पांचा विकास झाला आहे. आता केरळविषयी सांगायचे तर, केरळमधली 'उरू' ही नाव तर पूर्णपणे हातांनीच तयार केली जाते. मासे पकडणाऱ्या या नौका तिथले वाढईच तयार करतात. त्या तयार करण्यासाठी एक विशेष कौशल्य, दक्षता आणि विशेषज्ञता हवी असते.

मित्रांनो,

स्थानिक शिल्पांचे छोट्या प्रमाणात उत्पादन आणि त्यांच्याप्रती लोकांचे आकर्षण कायम राखण्यासाठी कारागिरांची भूमिका महत्वाची असते. मात्र दुर्दैवाने, आपल्याकडे त्यांची भूमिका, एकप्रकारे समाजाच्या भरवशावर सोडून देण्यात आली आहे. त्यांची भूमिका मर्यादित करण्यात आली आहे, आणि अशी परिस्थिती बनवण्यात आली, की ही सगळी कामे हलकी कामे म्हणून ओळखली जाऊ लागली, त्यांचे महत्त्व कमी केले गेले. खरे तर, एक काळ असा होता, जेव्हा याच कामांमुळे जगभरात आमची ओळख होती. ही निर्यातीचे अत्यंत प्राचीन मॉडेल होते, ज्यात आपल्या कारागिरांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. मात्र, पारतंत्र्याच्या दीर्घ कालखंडात हे मॉडेल देखील उद्ध्वस्त झाले, त्याचे खूप नुकसानही झाले. स्वातंत्र्यानंतर, आमच्या कारागिरांना सरकारकडून मदतीचा हात मिळण्याची आवश्यकता होती. अत्यंत व्यवस्थितरित्या सरकारने यात हस्तक्षेप करण्याची गरज होती. जिथे आणि ज्यांना गरज आहे, त्यांना मदत देण्याची गरज होती, मात्र ती मदत मिळू शकली नाही. त्याचा परिणाम असा झाला, की आज या असंघटित क्षेत्रातले जास्तीतजास्त लोक केवळ आपला चरितार्थ चालवण्यासाठी काहीतरी व्यवस्था करत असतात. अनेक लोक आपले पिढीजात आणि पारंपरिक व्यवसाय सोडून देऊ लागले आहेत. आजच्या गरजांनुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचे त्यांच्याकडचे सामर्थ्य कमी पडू लागले आहे. या संपूर्ण वर्गाला आपण असेच त्यांच्या परिस्थितीच्या भरवशावर, वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही. हा असा वर्ग आहे, ज्याने शेकडो वर्षांपासून पारंपरिक कलांचा उपयोग करत, आपले शिल्प, आपल्या कला जतन करुन ठेवल्या होत्या. हा असा वर्ग आहे, ज्याने आपले असामान्य कौशल्य आणि विशेष कलाकृतींच्या निर्मितीतून, आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. हे लोक आत्मनिर्भर भारताच्या खऱ्या भावनेचे प्रतीक आहेत. आमचे सरकार अशा सर्व लोकांना, अशा वर्गांना भारताचे विश्वकर्मा मानते; आणि म्हणूनच, त्यांच्यासाठी आम्ही विशेषतः पीम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरु केली आहे. ही योजना नवी आहे, मात्र अतिशय महत्वाची आहे.

मित्रांनो,

साधारणपणे आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे, आणि समाजातील विविध शक्तींच्या माध्यमातूनच समाजव्यवस्था विकसित होत असते, चालत असते. काही असे घटक असतात, ज्यांच्यावाचून समाजजीवन स्थिरावणेही कठीण होऊन जाते, मग पुढे जाण्याचा तर प्रश्नच येत नाही. आपण त्यांच्याशिवाय समाजाची कल्पनाच करु शकत नाही. असे होऊ शकते की त्यांच्या कार्याला आज तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे, त्यांच्या कार्यात आधुनिकता आली आहे. मात्र, त्या कार्याच्या औचित्याबद्दल तर काहीच दुमत असणार नाही. ज्या लोकांना ग्रामीण अर्थव्यवस्था माहीत आहे, त्यांना तर हेही माहीत असेल की एखाद्या कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर असोत किंवा नसोत, पण पारंपरिक सोनार मात्र नक्कीच असतात, म्हणजे प्रत्येक कुटुंब पिढ्यानपिढ्या त्याच विशिष्ट सोनारांकडून आपले दागिने करून घेतात, दागिने विकत घेतात. अशाच गावात, शहरांमध्ये जे विविध कारागीर आहेत, जे आपल्या कौशल्याच्या आधारावर अवजारांचा वापर करत आपले आयुष्य घालवतात, त्या सगळ्या समाजात विखुरलेल्या समुदायावर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

मित्रांनो,
महात्मा गांधींची ग्राम स्वराज्याची संकल्पना पाहिली तर ग्रामीण जीवनात शेतीबरोबरच इतर व्यवस्थाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. गावाच्या विकासासाठी, गावात राहणाऱ्या प्रत्येक घटकाला सक्षम आणि आधुनिक करणे आपल्या विकासाच्या प्रवासासाठी आवश्यक आहे.
मी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत आदी महोत्सवाला गेलो होतो; तिथे मी हे पाहिले की, आपल्या आदिवासी भागातील हस्तकला आणि इतर कामांमध्ये जे लोक निपुण आहेत, असे बरेच लोक आले होते, त्यांनी स्टॉल लावले होते. पण माझे लक्ष एका ठिकाणी गेले, ते म्हणजे लाखेपासून बांगड्या बनवणारे जे लोक होते, ते लाखेच्या बांगड्या कशा तयार करतात, त्यावर कशाप्रकारे छपाई करतात, गावातील महिला हे कशाप्रकारे करतात, आकाराच्या बाबतीत त्यांच्याकडे कोणते तंत्रज्ञान आहे, हे दाखवत होते. तिथे आलेल्या लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्र होते; आणि मी पाहत होतो की तिथे जो कोणी यायचा तो किमान दहा मिनिटे उभा असायचा. त्याचप्रमाणे लोखंडाचे काम करणारे आपले लोहार बंधू-भगिनी, मातीची भांडी बनवणारे आपले  कुंभार बंधू-भगिनी, लाकूडकाम करणारे आपले लोक, सोन्याचे दागिने घडवण्याचे काम करणारे आपले सोनार, या सर्वांना आता आधार देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आम्ही छोट्या दुकानदारांसाठी, पदपथावरील विक्रेत्यांसाठी पीएम स्वनिधी योजना आणली, याचा त्यांना   फायदा झाला, त्याचप्रमाणे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना मोठी मदत होणार आहे.

मी एकदा युरोपातील एका देशात गेलो होतो, ती खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे तेथील गुजराती, जे दागिन्यांच्या व्यवसायात आहेत, अशा लोकांना भेटायला मिळाले, तर मी म्हणालो आजकाल काय चालले आहे, ते म्हणाले की, दागिन्यांमध्ये इतके तंत्रज्ञान आले आहे, अनेक यंत्रे आली आहेत, पण सहसा हाताने घडवल्या जाणाऱ्या दागिन्यांचे खूप आकर्षण असते आणि त्याची मोठी बाजारपेठ आहे, याचा अर्थ या पद्धतीतही सामर्थ्य आहे.
मित्रांनो,
असे अनेक अनुभव आहेत आणि म्हणूनच या योजनेद्वारे केंद्र सरकार प्रत्येक विश्वकर्मा मित्राला सर्वांगीण संस्थात्मक सहाय्य प्रदान करेल. विश्वकर्मा मित्रांना सहज कर्ज मिळेल, त्यांचे कौशल्य वाढेल, त्यांना सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य मिळेल, या सर्व गोष्टी खात्रीशीर केल्या जातील. याशिवाय डिजीटल सक्षमीकरण, ब्रँडची जाहिरात आणि उत्पादनांच्या बाजारपेठेतील प्रवेशासाठीही व्यवस्था केली जाईल. कच्च्या मालाची उपलब्धताही सुनिश्चित केली जाईल. पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांच्या समृद्ध परंपरा जतन करणे, हाच केवळ या योजनेचा उद्देश नाही, तर त्याचा मोठा विकास करणे देखील आहे.
मित्रांनो,
आता आपल्याला त्यांच्या गरजेनुसार कौशल्य पायाभूत सुविधांची पुनर्रचना करण्याची गरज आहे. सरकार मुद्रा योजनेतून कोट्यवधी रुपयांचे कर्ज बँक हमीशिवाय देत आहे. या योजनेचा आपल्या विश्वकर्मा मित्रांना अधिकाधिक लाभ द्यायचा आहे. आपल्या ज्या डिजिटल साक्षरता मोहिमा आहेत, त्यातही आपल्याला आता विश्वकर्मा मित्रांना  प्राधान्य द्यायचे आहे. 
मित्रांनो,
आजच्या विश्वकर्मा मित्रांना उद्याचे मोठे उद्योजक बनवण्याचा आमचा उद्देश आहे. यासाठी त्यांच्या उप-व्यवसाय मॉडेलमध्ये स्थैर्य आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, आकर्षक डिझायनिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग यावरही आम्ही काम करत आहोत. यामध्ये ग्राहकांच्या गरजाही लक्षात घेतल्या जात आहे. आमची नजर केवळ स्थानिक बाजारपेठेवर नाही तर, आम्ही जागतिक बाजारपेठेवरही लक्ष केंद्रित करत आहोत. मी आज येथे जमलेल्या सर्व संबंधितांना आवाहन करतो की त्यांनी विश्वकर्मा मित्रांना प्रोत्साहन द्यावे, त्यांच्यात जागरूकता आणावी आणि त्यांना पुढे जाण्यास मदत करावी. त्यासाठी आपणा सर्वांना आवाहन आहे की, आपण सर्वजण अधिकाधिक तळागाळात काम करणाऱ्या लोकांशी जोडले जा, या विश्वकर्मा मित्रांमध्ये जा, त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख उपलब्ध करून द्या.
मित्रांनो,
कारागीर आणि शिल्पकारांना मूल्य साखळीचा एक भाग बनवूनच आपण त्यांना बळकट करू शकतो. त्यांच्यापैकी बरेच जण आपल्या एमएसएमई क्षेत्रासाठी पुरवठादार आणि उत्पादक बनू शकतात. त्यांना साधने आणि तंत्रज्ञानाची मदत देऊन त्यांना अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवता येईल. उद्योग जगत या लोकांना त्यांच्या गरजांशी जोडून उत्पादन वाढवू शकते. उद्योग त्यांना कौशल्य आणि दर्जेदार प्रशिक्षणही देऊ शकतो. सरकारे त्यांच्या योजनांमध्ये अधिक चांगले समन्वय साधू शकतात आणि बँका या प्रकल्पांना वित्तपुरवठा करू शकतात. अशा प्रकारे, प्रत्येक हितसंबंधितांसाठी ही लाभदायी परिस्थिती असू शकते. कॉर्पोरेट कंपन्या स्पर्धात्मक किंमतीत दर्जेदार उत्पादने मिळवू शकतात. बँकांचे पैसे अशा योजनांमध्ये गुंतवले जातील ज्यावर विश्वास ठेवता येईल, आणि यावरून सरकारच्या योजनांचा व्यापक परिणाम दिसून येईल. आपले स्टार्टअप्स देखील ई-वाणिज्य मॉडेलद्वारे हस्तकला उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ निर्माण करू शकतात. या उत्पादनांना स्टार्टअप्सकडून उत्तम तंत्रज्ञान, डिझाइन, पॅकेजिंग आणि वित्तपुरवठा यामध्येही मदत मिळू शकते. मला आशा आहे की पीएम-विश्वकर्माच्या माध्यमातून खाजगी क्षेत्रासोबतची भागीदारी आणखी मजबूत होईल. यासह, आपण खाजगी क्षेत्रातील नवोन्मेषाचे सामर्थ्य आणि व्यावसायिक कौशल्याचा पुरेपूर लाभ घेऊ शकू.
मित्रांनो,
मी येथे उपस्थित असलेल्या सर्व संबंधितांना सांगू इच्छितो की, त्यांनी परस्परांमध्ये चर्चा करून ठोस कृती आराखडा तयार करावा. आम्ही अतिदुर्गम भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यापैकी अनेक लोकांना प्रथमच शासकीय योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपले बहुतेक बंधू - भगिनी दलित, आदिवासी, मागास, महिला आणि इतर दुर्बल घटकांतील आहेत. त्यामुळे व्यावहारिक आणि प्रभावी धोरण विकसित करण्याची गरज आहे. ज्याद्वारे आपण गरजूंपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल सांगू शकतो. योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. एक काल मर्यादा ठरवून आपल्याला मिशन मोडमध्ये काम करावेच लागेल आणि मला विश्वास आहे की, आज जेव्हा तुम्ही चर्चा कराल तेव्हा तुमच्या लक्षात अर्थसंकल्प असेल, सोबतच असे लोक तुमच्या लक्षात असतील, त्यांच्या गरजा तुमच्या लक्षात असतील, त्या पूर्ण करण्याचा मार्ग काय असू शकतो, योजनेची रचना काय असावी, उत्पादन काय असावे, जेणेकरून खर्‍या अर्थाने लोकांचे भले करता येईल.
मित्रांनो,
आज वेबिनारचे शेवटचे सत्र आहे. आत्तापर्यंत आपण अर्थसंकल्पाच्या वेगवेगळ्या भागांवर 12 वेबिनार केले आहेत आणि बरेच विचारमंथन झाले आहे. आता परवा संसद सुरू होईल, नव्या आत्मविश्वासाने, नव्या सूचना घेऊन सर्व खासदार संसदेत येतील आणि अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत या प्रक्रियेत नवे चैतन्य पाहायला मिळेल. हे विचारमंथन हा एक अनोखा उपक्रम आहे, हा एक फायदेशीर उपक्रम आहे आणि संपूर्ण देश याच्याशी जोडला जातो, भारतातील प्रत्येक जिल्हा जोडला जातो, आणि ज्यांनी वेळ काढून हे वेबिनार समृद्ध केले, ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत.
पुन्हा एकदा, आज उपस्थित असलेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि ज्यांनी आतापर्यंत हे वेबिनार आयोजित केले आहेत, पुढे नेले आहेत आणि उत्कृष्ट सूचना दिल्या आहेत त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो.

खूप खूप शुभेच्छा!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How Modi Government Defined A Decade Of Good Governance In India

Media Coverage

How Modi Government Defined A Decade Of Good Governance In India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi wishes everyone a Merry Christmas
December 25, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi, extended his warm wishes to the masses on the occasion of Christmas today. Prime Minister Shri Modi also shared glimpses from the Christmas programme attended by him at CBCI.

The Prime Minister posted on X:

"Wishing you all a Merry Christmas.

May the teachings of Lord Jesus Christ show everyone the path of peace and prosperity.

Here are highlights from the Christmas programme at CBCI…"