“ एक वसुंधरा एक आरोग्य – हा एक दृष्टीकोन आम्ही जगासमोर ठेवला आहे. यामध्ये मानव, प्राणी अथवा वनस्पती, अशी सर्वांगीण आरोग्यसेवा समाविष्ट आहे"
“परवडणारे वैद्यकीय उपचार उपलब्ध करणे ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता”
"आयुष्मान भारत आणि जनऔषधी योजनांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या 1 लाख कोटींहून अधिक रुपयांची बचत झाली"
"पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान केवळ नवीन रुग्णालयांनाच चालना देत नाही तर एक नवीन आणि संपूर्ण आरोग्य परिसंस्था देखील घडवत आहे"
"आरोग्यसेवेतील तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे ही उद्योजकांसाठी एक उत्तम संधी. सार्वत्रिक आरोग्यसेवेसाठी आमच्या प्रयत्नांना चालनाही देईल"
“औषध निर्माण क्षेत्रातील बाजार आकार आज 4 लाख कोटी रुपये मुल्याचा. खाजगी क्षेत्र आणि या क्षेत्रातील तज्ञ अभ्यासक यांच्यातील योग्य समन्वयाने तो 10 लाख कोटी रुपयांचा होऊ शकतो”

नमस्कार. 

मित्रांनो, 

जेव्हा आपण आरोग्याविषयी चर्चा करतो, तेव्हा या विषयाकडे, कोविडपूर्व काळ आणि कोविडोत्तर असं विभागून बघायला हवं. कोविडने संपूर्ण जगाला दाखवून दिलं आणि शिकवलं देखील की जेव्हा इतकं मोठं संकट येतं तेव्हा समृद्ध देशाच्या विकसित व्यवस्था सुद्धा उध्वस्त होतात. जग आता पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त लक्ष आरोग्य सेवेकडे देऊ लागलं आहे, मात्र भारताचा दृष्टीकोन फक्त आरोग्य सेवेपुरताच मर्यादित नाही, तर आपण एक पाऊल पुढे जाऊन निरामयतेसाठी देखील काम करत आहोत. म्हणून आपण जगासमोर एक विचार ठेवला आहे - एक पृथ्वी - एक आरोग्य. म्हणजे जीव सृष्टीसाठी, मग ते मनुष्य असो की प्राणी असो, वृक्षं असोत, सर्वांसाठी एक सर्वंकष आरोग्य सेवेचा विचार आहे. कोविड जागतिक महामारीने आपल्याला हे देखील शिकवलं आहे, की पुरवठा साखळी, किती महत्वपूर्ण विषय बनला आहे. जेव्हा जागतिक महामारी टिपेला होती, तेव्हा काही देशांसाठी औषधं, लसी, वैद्यकीय उपकरणं, अशा जीवन रक्षक गोष्टी दुर्दैवानं हत्यार बनल्या होत्या. गेल्या वर्षांच्या अर्थसंकल्पात भारतानं या सगळ्या विषयांवर खूप लक्ष दिलं आहे. आम्ही सातत्यानं परदेशांवर असलेली अवलंबिता कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत सर्वच भागधारकांची भूमिका फार मोठी आहे. 

मित्रांनो, 

स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं भारतात आरोग्य सेवेबद्दल एक एकात्मिक दृष्टीकोन, एक दूरगामी विचार नव्हता. आम्ही आरोग्य सेवेला केवळ आरोग्य मंत्रालयापर्यंतच मर्यादित ठेवलं नाही, तर, ‘संपूर्ण सरकार’ यावर भर दिला आहे. भारतात उपचार परवडणारे असावेत ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 5 लाख पर्यंत मोफत उपचार ही सुविधा देण्यामागे देखील आमच्या मनात हीच भावना आहे. या योजनेत आतापर्यंत देशाच्या कोट्यवधी रुग्णांची जवळपास 80 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, जे आजारपणात उपचारांवर खर्च झाले असते, ते आता वाचले आहेत. आत्ता 7 मार्चलाच उद्या देश जन औषधी दिवस साजरा करत आहे. आज देशभरात जवळपास 9 हजार जनऔषधी केंद्र आहेत. या केंद्रांवर बाजारापेक्षा खूप स्वस्त किमतीवर औषधे उपलब्ध आहेत. यामुळे देखील गरीब आणि मध्यमवर्गातल्या कुटुंबांचे केवळ औषधांवर खर्च होणारे जवळपास 20 हजार कोटी रुपये वाचले आहेत. म्हणजे केवळ 2 योजनांमुळेच आतापर्यंत भारताच्या आपल्या नागरिकांची 1 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

मित्रांनो, 

गंभीर आजारांसाठी देशात चांगल्या आणि आधुनिक आरोग्य पायाभूत सुविधा असणे तितकेच गरजेचे आहे. सरकारचा मुख्य भर यावर देखील आहे की लोकांना घराजवळच चाचण्यांची सुविधा मिळायला हवी, प्राथमिक उपचारांची उत्तम सुविधा असावी. यासाठी देशभरात दीड लाख आरोग्य आणि निरामयता केंद्र तयार होत आहेत. या केंद्रांवर मधुमेह, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित आजारांच्या चाचण्या करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. पीएम आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशनअंतर्गत अतिगंभीर आरोग्य पायाभूत सुविधा लहान शहरे आणि खेड्यांपर्यंत नेल्या जात आहेत. यात लहान शहरांत दवाखाने तर बांधले जात आहेतच, आरोग्य क्षेत्राशी संबंधित एक संपूर्ण व्यवस्था विकसीत होत आहे. यातही आरोग्य उद्योजाकांसाठी, गुंतवणूकदारांसाठी, व्यावसायिकांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. 

मित्रांनो, 

आरोग्य पायाभूत सुविधांसोबतच सरकारची प्राथमिकता मनुष्यबळावर देखील आहे. गेल्या वर्षांत 260 पेक्षा जास्त नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. यामुळे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा 2014 च्या तुलनेत, म्हणजे आम्ही सत्तेत आलो त्यापूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाल्या आहेत. आपल्याला देखील माहित आहे की यशस्वी डॉक्टरसाठी यशस्वी तंत्रज्ञ अतिशय आवश्यक असतात. म्हणूनच या वर्षीच्या अर्थसंकल्पात नर्सिंग क्षेत्राच्या विस्तारावर भर दिला आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या जवळच 157 नवे नर्सिंग महाविद्यालये सुरु करणे, वैद्यकीय मनुष्यबाळासाठी फार मोठं पाऊल आहे. हे केवळ भारतासाठीच नाही, तर जगाची मागणी पूर्ण करण्यात देखील उपयोगी होऊ शकते. 

मित्रांनो, 

आरोग्य सुविधा सुलभ आणि स्वस्त बनविण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका सातत्यानं वाढत आहे. म्हणूनच आमचं  लक्ष आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञांनाच्या अधिकाधिक वापरावर देखील आहे. डिजिटल आरोग्य ओळखपत्र या माध्यमातून आम्ही देशवासियांना योग्य वेळी आरोग्य सुविधा देऊ इच्छितो. ई-संजीवनी सारख्या टेलि-समुपदेशनाच्या माध्यमातून घरबसल्या 10 कोटी लोक डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकले आहेत. आता 5G तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात स्टार्टअप्स करता देखील अनेक संधी निर्माण होत आहेत. ड्रोन तंत्रज्ञानामुळे औषधे पोहोचविणे आणि चाचण्यांशी संबंधित लॉजिस्टिक्समध्ये एक क्रांतिकारी बदल घडून येताना दिसत आहे. हे सार्वत्रिक आरोग्य सेवेच्या आमच्या प्रयत्नांना बळ देईल. ही आपल्या उद्योजकांसाठी देखील एक मोठी संधी आहे. आपल्या उद्योजकांनी हे सुनिश्चित करावे की, आपण कुठलेही तंत्रज्ञान आयात करणे टाळले पाहिजे, यात आत्मनिर्भर बनायचेच आहे. आपण यासाठी आवश्यक संस्थात्मक सुधारणा देखील करत आहोत. औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रात असलेल्या संधी बघता, गेल्या काही वर्षांत नव्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. बल्क ड्रग पार्क असो, वैद्यकीय उपकरण पार्क असो, या व्यवस्था विकसित करणे असो, उत्पादन निगडीत प्रोत्साहन योजनांवर 30 हजार कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. वैद्यकीय उपकरण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत 12 ते 14 टक्के दराने वाढ होत आहे. येणाऱ्या 2-3 वर्षांत ही बाजारपेठ, 4 लाख कोटींपर्यंत पोचणार आहे. 

भविष्यातील वैद्यकीय तंत्रज्ञान, उच्च दर्जेदार उत्पादन आणि संशोधनासाठी कुशल मनुष्यबळावर आम्ही काम सुरू केले आहे. आयआयटी आणि इतर संस्थांमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनाच्या प्रशिक्षणासाठी जैव वैद्यकीय अभियांत्रिकी किंवा तत्सम इतर अभ्यासक्रमही राबवले जातील. या कामी खाजगी क्षेत्राचा जास्तीत जास्त सहभाग असावा, उद्योग, शिक्षण क्षेत्र आणि सरकार यांच्यात जास्तीत जास्त समन्वय असावा यासाठी आपण एकत्रितपणे काम केले पाहिजे.मित्रहो,

कधीकधी संकटसुद्धा आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी घेऊन येते. कोविड काळात औषध क्षेत्राने हे दाखवून दिले आहे. कोविड काळात भारताच्या औषध क्षेत्राने ज्या प्रकारे संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला आहे, तो अभूतपूर्व आहे. आपण त्याचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. आपली ही प्रतिष्ठा, हे कर्तृत्व, आल्यावर असणाऱ्या विश्वासाला अजिबात तडा जाता कामा नये, खरे तर विश्वास वाढला पाहिजे. उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून औषध क्षेत्रातील संशोधन आणि नाविन्यतेला चालना देण्यासाठी एक नवीन कार्यक्रम सुरू केला जात आहे. या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळेल, त्याचबरोबर रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. आज या क्षेत्राची बाजारपेठ 4 लाख कोटी रूपयांची आहे. या कामी खाजगी क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधता आला तर हे क्षेत्र 10 लाख कोटी रूपयांचा टप्पा ओलांडू शकते. औषध उद्योगाने या क्षेत्रातील महत्त्वाची प्राधान्य क्षेत्रे ओळखून त्यात गुंतवणूक करावी, असे मी सुचवतो. संशोधनाला चालना देण्यासाठी सरकारने इतरही अनेक पावले उचलली आहेत. युवा वर्ग आणि संशोधन उद्योगासाठी अनेक आय सी एम आर प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. अशा प्रकारच्या आणखी कोणत्या पायाभूत सुविधा खुल्या करता येतील, हे पाहावे लागेल.

मित्रहो,

प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेबाबत सरकारने केलेल्या प्रयत्नांचा मोठा परिणाम दिसून आला आहे. घाणीमुळे पसरणाऱ्या आजारांपासून बचावासाठी स्वच्छ भारत अभियान, धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यासाठी उज्ज्वला योजना, प्रदूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यासाठी जल जीवन मिशन, अशा अनेक उपक्रमांचे चांगले परिणाम आज देशभरात पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे कुपोषण, अशक्तपणा हीसुद्धा आपल्या देशाला सतावणारी मोठी समस्या आहे. म्हणूनच आम्ही राष्ट्रीय पोषण मोहिम हाती घेतली आहे. आणि आता आनंदाची गोष्ट म्हणजे श्रीअन्न म्हणून परिचित असणारे भरड धान्य, जे एकप्रकारे सुपर फूड आहे, पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे अन्न आहे आणि जे आपल्या देशातील प्रत्येक घरातील लोकांना अगदी चांगलेच ठाऊक आहे. या श्रीअन्नाच्या प्रसारावर भर देण्यात आला आहे.

भारताच्या प्रयत्नांमुळेच हे वर्ष संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाते आहे. पीएम मातृवंदना योजना आणि मिशन इंद्रधनुष अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही निरोगी मातृत्व आणि निरोगी बालपणाची खातरजमा करत आहोत. योगाभ्यास असो, आयुर्वेद असो, फिट इंडिया चळवळ असो, या सर्व उपक्रमांनी लोकांचा आजारांपासून बचाव करण्यात मदत केली आहे. भारतातील आयुर्वेदाशी संबंधित उत्पादनांची मागणी संपूर्ण जगभरात वाढत आहे. भारताच्या प्रयत्नांमुळे जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपारिक औषधाशी संबंधित जागतिक केंद्र भारतातच उभारले जाते आहे. म्हणूनच आरोग्य क्षेत्रातील संबंधितांना आणि विशेषत: आयुर्वेद क्षेत्रातील मित्रांना मी विनंती करतो की आपण पुराव्यावर आधारित संशोधन खूप वाढवले पाहिजे. केवळ निकालाबद्दल चर्चा करणे पुरेसे नाही. पुरावेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आयुर्वेद क्षेत्रात काम करणारे उद्योजक, संशोधन क्षेत्रातील सहकारी यांना सहभागी व्हावे लागेल, त्यांना पुढाकार घ्यावा लागेल.

मित्रांनो,

वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक पायाभूत सुविधांपासून ते मनुष्यबळापर्यंत देशात सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी एक बाजू आहे. देशात ज्या नवीन सुविधा निर्माण केल्या जात आहेत, ज्या नवीन क्षमता निर्माण केल्या जात आहेत, त्याचे फायदे केवळ देशवासियांसाठीच्या आरोग्य सुविधांपुरते मर्यादित राहणार नाहीत. आता जग एकमेकांशी खूप जोडलेले आहे. भारताला जगातील सर्वात आकर्षक वैद्यकीय पर्यटन स्थळ बनवण्याची ही मोठी संधी आपल्यासमोर आहे. वैद्यकीय पर्यटन हे भारतातील एक मोठे क्षेत्र म्हणून उदयाला येते आहे. देशातील रोजगार निर्मितीचे हे एक फार मोठे माध्यम म्हणून विकसित होते आहे.

मित्रहो,

सर्वांच्या प्रयत्नानेच आपण विकसित भारतात विकसित आरोग्य आणि निरोगी वातावरण निर्माण करू शकतो. या वेबिनारला उपस्थित असलेल्या सर्वांनी आपापल्या सूचना द्याव्यात असा आग्रह मी करेन. आपण ठरवलेल्या कालमर्यादेत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निश्चित आराखड्यासह अर्थसंकल्पाची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करू या, सर्व संबंधितांना सोबत घेऊन पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पापूर्वी आपण ही स्वप्ने  साकार करूया. या अर्थसंकल्पानुसार अंमलबजावणी करता यावी, यासाठी तुमच्या सूचना गरजेच्या आहेत. यामध्ये तुमच्या सूक्ष्म अनुभवाचा लाभ महत्वाचा आहे. तुमचा अनुभव, तुमच्या वैयक्तिक विकासाच्या संकल्पाची सांगड देशाच्या संकल्पाशी सांगड घालून, सामूहिक शक्तीतून, सामूहिक प्रयत्नातून आपण निश्चितच यश मिळवू शकू, असा विश्वास मला वाटतो. माझ्या तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा.

धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi