छत्रपती वीर शिवाजी महाराज की जय !
छत्रपती वीर संभाजी महाराज की जय !
महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान रमेश जी, मुख्यमंत्री एकनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी राजनाथ सिंह जी, नारायण राणे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजीत पवार जी, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, नौदल प्रमुख एडमिरल आर. हरी कुमार, नौदलाचे सर्व मित्र आणि माझ्या कुटुंबियांनो,
4 डिसेंबरचा हा ऐतिहासिक दिवस..आपल्याला आशीर्वाद देत असलेला हा सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला...मालवण-तारकर्लीचा हा नितांतसुंदर किनारा...चहुबाजूला असलेल्या छत्रपती वीर शिवाजी महाराज यांच्या कीर्तीच्या गाथा.. राजकोट किल्यावर महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आणि आपला हा जयघोष ..प्रत्येक भारतवासीयामध्ये जोश निर्माण करत आहे. आपल्यासाठी म्हटले गेले आहे-
चलो नई मिसाल हो, बढ़ो नया कमाल हो,
झुको नही, रुको नही, बढ़े चलो, बढ़े चलो ।
नौदल दिनानिमित्त नौदलाच्या सर्व सदस्यांना मी विशेष शुभेच्छा देतो.मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीरांनाही आज आपण प्रणाम करतो.
मित्रहो,
सिंधुदुर्गच्या या वीरभूमीवरून देशवासियांना नौदल दिनाच्या शुभेच्छा देणे ही गौरवाची मोठी बाब आहे. सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावते. एखाद्या देशासाठी सागरी सामर्थ्य किती महत्वाचे असते हे छत्रपती वीर शिवाजी महाराजांनी जाणले होते. त्यांचे ब्रीदवाक्य होते, - जलमेव यस्य, बलमेव तस्य! म्हणजे ज्याचा समुद्रावर ताबा तो सामर्थ्यवान.त्यांनी सामर्थ्यवान नौशक्ती उभारली. कान्होजी आंग्रे, मायाजी नाईक भाटकर, हीरोजी इंदुलकर, असे अनेक योद्धे आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत.नौदल दिनानिमित्त देशाच्या अशा पराक्रमी योद्धयांनाही मी नमन करतो.
मित्रहो,
छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत आज भारत गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडत वाटचाल करत आहे. आपले नौदल अधिकारी जे एपो-लेट्स धारण करतात त्यावर आता छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या वारश्याची झलक दिसणार आहे.नवे एपो-लेट्सही नौदलाच्या ध्वजचिन्हाप्रमाणेच असतील.
नौदलाच्या ध्वजाशी छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या वारश्याची सांगड घालण्याची संधी मला गेल्या वर्षी मिळाली हे माझे भाग्य आहे. आता एपो-लेट्सवरही छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या वारश्याचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या या वारश्याचा अभिमान बाळगतानाच एक घोषणा करताना मला आनंद होत आहे.भारतीय नौदल आता आपल्या पदश्रेणीचे नामकरण भारतीय परंपरेनुरूप करणार आहे.सशस्त्र दलांमध्ये नारीशक्तीची संख्या वाढवण्यावरही आम्ही भर देत आहोत.नौदल जहाजात देशाच्या पहिल्या महिला कमांडिंग अधिकाऱ्याची तैनाती केल्याबद्दल मी नौदलाचे अभिनंदन करतो.
मित्रहो,
आज भारत आपल्यासाठी मोठी उद्दिष्टे निश्चित करत आहे आणि पूर्ण शक्तीनिशी ती साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताकडे मोठे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य आहे, 140 कोटी भारतीयांचा विश्वासाचे. हे सामर्थ्य, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या भक्कमपणाचे आहे. देशाच्या चार राज्यांमध्ये काल आपण याच सामर्थ्याची झलक पाहिली. देशाने पाहिले जेव्हा संकल्पाला जनाधार मिळतो..लोकांच्या मनाशी तो जोडला जातो..लोकांच्या आकांक्षा त्याच्याशी जोडल्या जातात ..तेव्हा किती सकारात्मक परिणाम दिसून येतात.
वेगवेगळ्या राज्यांचे प्राधान्यक्रम वेगवेगळे आहेत, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत.मात्र सर्व राज्यांचे लोक राष्ट्र प्रथम या भावनेने भरलेले आहेत. देश आहे तर आम्ही आहोत,देशाची प्रगती झाली तर आमची प्रगती होईल हीच भावना आज प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे.आज देश, इतिहासातून प्रेरणा घेत उज्वल भविष्याचा आराखडा आखण्यात गुंतला आहे. नकारात्मकतेच्या राजकारणाला पराभूत करत प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करण्याचा निश्चय केला आहे. हाच प्रण आपल्याला विकसित भारताच्या दिशेने नेईल.हाच प्रण आपल्या देशाचे हक्काचे वैभव परत आणेल.
मित्रहो,
भारताचा इतिहास म्हणजे केवळ एक हजार वर्षांच्या गुलामीचा इतिहास नव्हे,केवळ पराभव आणि निराशेचा इतिहास नव्हे. तर भारताचा इतिहास म्हणजे विजयाचा इतिहास आहे. भारताचा इतिहास ज्ञान आणि विज्ञानाचा इतिहास आहे.भारताचा इतिहास कला आणि सृजनशीलतेचा इतिहास आहे. भारताचा इतिहास आपल्या सागरी सामर्थ्याचा इतिहास आहे. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा असे तंत्रज्ञान नव्हते, अशी संसाधने नव्हती त्या काळात समुद्रामध्ये आपण सिंधुदुर्गसारखे अनेक किल्ले उभारले.
हजारो वर्षाच्या प्राचीन काळापासून भारताकडे सागरी सामर्थ्य आहे.गुजरातच्या लोथल इथे मिळाले सिंधू संस्कृतीचे बंदर आज आपला मोठा वारसा आहे.एके काळी सुरत बंदरात 80 पेक्षा जास्त जहाजे लंगर टाकून उभी असत.चोल साम्राज्याने याच सामर्थ्याच्या बळावर आग्नेय आशियामधल्या अनेक देशापर्यंत आपला व्यापार विस्तारला.
म्हणूनच परदेशी शक्तींनी भारतावर आक्रमण केले तेव्हा सर्वात आधी आपल्या याच सामर्थ्याला लक्ष्य केले. जो भारत नावा आणि जहाजे निर्मितीसाठी प्रसिद्ध होता त्याची ही कला,हे कौशल्य सर्व काही ठप्प केले गेले.आपण जेव्हा समुद्रावरचा ताबा गमावला तेव्हा आपले सामरिक-आर्थिक सामर्थ्यही आपण गमावून बसलो.
यासाठीच आज भारत विकसित राष्ट्राचे लक्ष्य घेऊन वाटचाल करत आहे तेव्हा आपले हे गमावलेले वैभव आपल्याला परत मिळवायचेच आहे. म्हणूनच आज आमचे सरकार याच्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत काम करत आहे. आज भारत नील अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व प्रोत्साहन देत आहे.आज भारत ‘सागरमाला’ अंतर्गत बंदरभिमुख विकास करत आहे. आज भारत ‘सागरी दृष्टीकोना’ अंतर्गत आपल्या संपूर्ण सागरी सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. व्यापारी मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने नवे नियम तयार केले आहेत. सरकारच्या प्रयत्नातून गेल्या 9 वर्षात भारतात नाविकांच्या संख्येत 140 टक्याहून जास्त वाढ झाली आहे.
माझ्या मित्रांनो,
हा भारताच्या इतिहासाचा असा कालखंड आहे जो केवळ 5-10 वर्षांचा नव्हे तर येणाऱ्या शतकाचा इतिहास घडवणार आहे. 10 वर्षांपेक्षा कमी काळात भारत जगातल्या 10 व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवरून झेप घेत 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि आता लवकरच तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने आज भारताची जोमदार वाटचाल सुरु आहे.
आज देश विश्वास आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे.भारतामध्ये विश्व-मित्राचा उदय होताना जगाला दिसत आहे. आज अंतराळ असो वा समुद्र, जगाला भारताचे सामर्थ्य सर्वत्र दिसत आहे. आज संपूर्ण जग भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक मार्गिकेबद्दल बोलत आहे. यापूर्वी आपण गमावलेला मसाल्याचा मार्ग,आता पुन्हा भारताच्या समृद्धीचा सक्षम आधार बनणार आहे. आज जगभरात मेड इन इंडियाची चर्चा होत आहे. तेजस विमान असो वा शेतकऱ्यांसाठी ड्रोन, यूपीआय प्रणाली असो किंवा चांद्रयान 3 सर्वत्र आणि प्रत्येक क्षेत्रात , मेड इन इंडियाचा डंका आहे. आज आपल्या सैन्याच्या बहुतांश गरजा मेड इन इंडिया म्हणजेच स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांद्वारे पूर्ण केल्या जात आहेत. देशात प्रथमच वाहतूक विमानांची निर्मिती सुरू होत आहे. गेल्या वर्षीच मी कोची येथे स्वदेशी विमानवाहू युद्धनौका, आयएनएस विक्रांत नौदलाला सुपूर्द केली होती. आयएनएस विक्रांत हे मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारताचे एक सशक्त उदाहरण आहे. आज भारत जगातील अशा काही देशांपैकी एक आहे ज्यांच्याकडे अशाप्रकारचे सामर्थ्य आहे.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षांत, आम्ही पूर्वीच्या सरकारांची आणखी एक जुनी विचारसरणी बदलली आहे. पूर्वीची सरकारे आपल्या सीमावर्ती आणि समुद्रकिनारी असलेल्या गावांना शेवटची गावे मानत.आपल्या संरक्षणमंत्र्यांनीही त्याचा उल्लेख केला आहे. या विचारसरणीमुळे आपला किनारी भागही विकासापासून वंचित राहिला, मूलभूत सुविधांचा अभाव होता. आज समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावणे हे केंद्र सरकारचे प्राधान्य आहे.
आमच्या सरकारने 2019 मध्ये प्रथमच मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार केले. आम्ही मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सुमारे 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.यामुळे 2014 पासून भारतातील मत्स्य उत्पादनात 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. भारतातून मासे निर्यातीतही 110 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सरकार आपल्या मच्छिमारांना सर्वतोपरी मदत करत आहे. आमच्या सरकारने मच्छिमारांसाठीचे विमा कवच 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केले आहे.
देशात प्रथमच मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळाला आहे. सरकार मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मूल्य साखळी विकासावरही भर देत आहे. आज सागरमाला योजनेच्या माध्यमातून संपूर्ण समुद्रकिनारी आधुनिक संपर्क सुविधांवर भर दिला जात आहे. यासाठी लाखो कोटी रुपये खर्च केले जात आहेत, जेणेकरून समुद्रकिनारी नवे उद्योग उभे राहिले पाहिजेत, नवे व्यवसाय आले पाहिजेत.
मासे असोत किंवा इतर सीफूड म्हणजेच समुद्री खाद्यपदार्थ असो, त्याला जगभरात जास्त मागणी आहे. त्यामुळे मच्छीमारांचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही सीफूड प्रक्रियेशी संबंधित उद्योगावर भर देत आहोत. मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करता यावी यासाठी त्यांच्या बोटींचे आधुनिकीकरण करण्यासाठीही मदत केली जात आहे.
मित्रांनो,
कोकण हा अभूतपूर्व संधींचा परिसर आहे. आमचे सरकार या क्षेत्राच्या विकासासाठी पूर्ण कटिबद्धतेने काम करत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग, परभणी आणि धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. चिपी विमानतळ सुरू झाले आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिका माणगावपर्यंत जोडली जाणार आहे.
इथल्या काजू उत्पादकांसाठीही विशेष योजना आखल्या जात आहेत. समुद्रकिनारी वसलेल्या निवासी भागांचे संरक्षण करणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी खारफुटीची व्याप्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारने यासाठी विशेष मिष्ठी योजना तयार केली आहे. यामध्ये मालवण, आचरा-रत्नागिरी, देवगड-विजयदुर्गसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे खारफुटी व्यवस्थापनासाठी निवडण्यात आली आहेत.
मित्रांनो,
वारसाही आणि विकासही , हा आपला विकसित भारताचा मार्ग आहे. त्यामुळे आज या परिसरातही आपला वैभवशाली वारसा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले गड-किल्ले जतन करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा निर्धार आहे. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात या वास्तूंच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. आपला हा वैभवशाली वारसा पाहण्यासाठी देशभरातून लोक यावेत असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे या भागातील पर्यटनही वाढणार असून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत.
मित्रांनो,
इथून आता विकसित भारताकडे वेगवान वाटचाल करायची आहे. असा विकसित भारत ज्यामध्ये आपला देश सुरक्षित, समृद्ध आणि सामर्थ्यशाली होऊ शकेल. आणि मित्रांनो, साधारणपणे लष्कर दिन ,हवाई दल दिन , नौदल दिन हे दिल्लीत साजरे केले जातात.आणि दिल्लीच्या आसपासच्या भागातील लोक यात सहभागी होत असत आणि बहुतेक कार्यक्रम हे संबंधित दलाच्या प्रमुखांच्या घरांच्या लॉनमध्ये आयोजित केले जात असत.ती परंपरा मी बदलली आहे. आणि माझा प्रयत्न आहे की, तो लष्कर दिन असो, नौदल दिन असो किंवा हवाई दल दिन असो , तो देशाच्या वेगवेगळ्या भागात साजरा केला जावा. आणि याच योजनेअंतर्गत या वेळी नौदल दिन या पवित्र भूमीवर आयोजित केला जात आहे, जिथे नौदलाचा जन्म झाला होता.
आणि काही लोक मला काही वेळापूर्वी सांगत होते की,या लगबगीमुळे गेल्या आठवड्यापासून हजारो लोक येत आहेत. मला ठाम विश्वास आहे की, आता या भूमीकडे देशातील लोकांचे आकर्षण वाढेल. सिंधुदुर्गाविषयी तीर्थाची भावना निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धाच्या क्षेत्रात खुप मोठे योगदान होते.आपल्याला ज्या नौदलाचा अभिमान वाटतो त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. तुम्हा देशवासियांना याचा अभिमान वाटेल.
आणि म्हणून नौदलातील माझ्या सहकाऱ्यांचे, आपल्या संरक्षण मंत्र्यांचे , या कार्यक्रमासाठी असे ठिकाण निवडण्यासाठी मी मनापासून अभिनंदन करतो. मला माहित आहे की, ही सर्व व्यवस्था करणे कठीण आहे परंतु या क्षेत्राचा देखील फायदा होतो, मोठ्या संख्येने सामान्य लोक देखील यात सहभागी होतात आणि आज देश विदेशातील अनेक पाहुणे देखील येथे उपस्थित आहेत.त्यांच्यासाठीही अनेक गोष्टी नवीन असतील की अनेक शतकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाची संकल्पना सुरू केली होती.
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, इतकेच नाही तर भारत ही लोकशाहीची जननी आहे. याकडे जी -20 मध्ये जगाचे लक्ष वेधले गेले आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. तसेच भारतानेच नौदलाच्या या संकल्पनेला जन्म दिला, ताकद दिली आणि आज जगाने ती स्वीकारली आहे. आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम जागतिक पटलावरही एक नवा विचार निर्माण करणारा आहे.
आज पुन्हा एकदा नौदल दिनानिमित्त मी देशाच्या सर्व जवानांना , त्यांच्या कुटुंबियांना आणि देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा देतो. एकदा माझ्यासोबत पूर्ण शक्तीनिशी बोला-
भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
खूप - खूप धन्यवाद !