नमस्कार,
मध्य प्रदेशचे उर्जावान मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव जी, माजी लोकसभा अध्यक्ष आणि दीर्घकाळ इंदूरची सेवा करत असलेल्या आपणा सर्वांच्या ताई सुमित्रा ताई, संसदेतील माझे सहकारी, नव्या विधानसभेत निवडून आलेले आमदार, अन्य मान्यवर आणि माझ्या प्रिय श्रमिक बंधू आणि भगिनींनो,
आजचा हा कार्यक्रम आपल्या श्रमिक बंधू-भगिनींची अनेक वर्षांची तपस्या , त्यांची अनेक वर्षांची स्वप्ने आणि संकल्पांचे फलित आहे. आणि मला आनंद आहे की आज अटलजींची जयंती आहे, मात्र भारतीय जनता पक्षाचे हे नवे सरकार, नवे मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशातील माझा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आणि तोही माझ्या गरीब, कष्टकरी बंधू-भगिनींसाठी होणे आणि अशा कार्यक्रमात येण्याची मला संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप समाधानाची बाब आहे.
मला विश्वास आहे की दुहेरी इंजिन सरकारच्या नवीन टीमला आपल्या श्रमिक कुटुंबांचे भरपूर आशिर्वाद मिळतील. गरीबांचे आशीर्वाद, त्यांचा स्नेह , त्यांचे प्रेम काय कमाल करू शकते हे मला चांगलेच माहीत आहे. मला खात्री आहे की मध्य प्रदेशची नवी टीम आगामी काळात अशीच आणखी उत्तम कामगिरी करेल. हुकुमचंद मिलच्या कामगारांसाठी पॅकेज जाहीर झाले तेव्हा इंदूरमध्ये उत्सवाचे वातावरण तयार झाले होते असे मला सांगण्यात आले. या निर्णयामुळे आपल्या श्रमिक बंधू-भगिनींमध्ये सणाचा आनंद आणखी वाढला आहे.
आजचा कार्यक्रम देखील विशेष आहे कारण आज अटल बिहारी वाजपेयी जी यांची जयंती आणि सुशासन दिन आहे. अटलजींचे मध्य प्रदेशशी असलेले नाते, त्यांचा स्नेह आपणा सर्वांना माहीत आहे. सुशासन दिनी आयोजित या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबियांनो,
आज प्रतिकात्मक स्वरूपात 224 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. येत्या काही दिवसांमध्ये ही रक्कम श्रमिक बंधू-भगिनींपर्यंत पोहोचेल. मला माहीत आहे की तुम्ही अनेक आव्हानांचा सामना केला आहे. मात्र आता तुमच्यासमोर सोनेरी भविष्याची पहाट आहे. श्रमिकांना न्याय मिळाला तो दिवस म्हणून इंदूरची जनता 25 डिसेंबरचा दिवस नेहमीच स्मरणात ठेवेल. मी तुमच्या धैर्याला सलाम करतो. आणि तुमच्या मेहनतीला वंदन करतो.
मित्रांनो,
मी नेहमी म्हणतो की माझ्यासाठी देशातील 4 जाती सर्वात मोठ्या आहेत. या माझ्या चार जाती आहेत - माझे गरीब, माझे तरुण, माझ्या माता-भगिनी महिला आणि माझे शेतकरी बंधू-भगिनी. गरीबांचे जीवन बदलण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. गरीबांची सेवा, कामगारांचा सन्मान आणि वंचितांना मान याला आमचे प्राधान्य आहे. आमचा प्रयत्न आहे की देशातील श्रमिक सशक्त व्हावेत आणि समृद्ध भारताच्या उभारणीत आपले मोलाचे योगदान द्यावे.
कुटुंबियांनो,
स्वच्छतेसाठी आणि चवीसाठी प्रसिद्ध असलेले इंदूर अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. येथील वस्त्रोद्योगाने इंदूरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येथील 100 वर्ष जुन्या महाराजा तुकोजीराव क्लॉथ मार्केटच्या ऐतिहासिकतेशी आपण सर्व परिचित आहात. शहरातील पहिली सूतगिरणी होळकर राजघराण्याने स्थापन केली. मालवा येथील कापूस ब्रिटन आणि अनेक युरोपीय देशांमध्ये जायचा आणि तेथील गिरण्यांमध्ये कापड तयार केले जायचे. एक काळ असा होता की इंदूरच्या बाजारपेठा कापसाचे भाव ठरवत असत. इंदूरमध्ये बनवलेल्या कपड्यांना देश-विदेशात मागणी होती. येथील कापड गिरण्या हे रोजगाराचे मोठे केंद्र बनले होते. या गिरण्यांमध्ये काम करणारे अनेक कामगार परराज्यातून येऊन येथे स्थायिक झाले. हा तो काळ होता जेव्हा इंदूरची तुलना मँचेस्टरशी केली जायची. मात्र काळ बदलला आणि आधीच्या सरकारांच्या धोरणांचा फटका इंदूरलाही सहन करावा लागला.
इंदूरचे जुने वैभव परत आणण्यासाठी दुहेरी इंजिन सरकार प्रयत्नशील आहे. भोपाळ-इंदूर दरम्यान गुंतवणूक कॉरिडॉर बांधण्यात येत आहे. इंदूर-पिथमपूर आर्थिक कॉरिडॉर आणि मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचा विकास असेल, विक्रम उद्योगपुरीमध्ये मेडिकल डिव्हाईस पार्क असेल , जवळच्या धार जिल्ह्यातील भैसोला येथे पीएम मित्र पार्क असेल, यामध्ये सरकार कडून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे येथे नवीन रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या विकास प्रकल्पांमुळे येथील अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होईल.
मित्रांनो,
मध्यप्रदेशातील खूप मोठा परिसर नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. इंदूरसह मध्य प्रदेशातील अनेक शहरे विकास आणि पर्यावरण यांच्यातील संतुलनाची प्रेरणादायी उदाहरणे बनत आहेत. आशियातील सर्वात मोठा गोबरधन कारखाना देखील इंदूरमध्ये कार्यरत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी येथे ई-चार्जिंग पायाभूत सुविधा वेगाने विकसित केल्या जात आहेत.
आज मला जलूद सौर ऊर्जा संयंत्राचे आभासी भूमिपूजन करण्याची संधी मिळाली. या संयंत्रामुळे दरमहिन्याला 4 कोटी रुपयांची वीज बिलात बचत होणार आहे. दरमहा चार कोटी रुपयांची बचत होणार आहे.हरित रोखे जारी करून या संयंत्रासाठी लोकांकडून पैसे उभारले जात आहेत याचा मला आनंद आहे. हरित रोख्यांचा हा प्रयत्न पर्यावरण रक्षणासाठी देशातील नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणखी एक माध्यम बनेल.
माझ्या कुटुंबियांनो,
निवडणुकीदरम्यान आपण जे संकल्प केले आहेत, जी हमी दिली आहे , ती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार वेगाने काम करत आहे. सरकारी योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मध्यप्रदेशात प्रत्येक ठिकाणी पोहोचत आहे. निवडणुकीमुळे हा प्रवास काहीसा विलंबाने सुरू झाला आहे. मात्र उज्जैन येथून सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांतच त्याच्याशी संबंधित 600 हून अधिक कार्यक्रम झाले आहेत .
लाखो लोकांना या यात्रेचा थेट लाभ मिळत आहे. मी मध्य प्रदेशच्या सर्व जनतेला आवाहन करतो की, मोदी की गारंटी वाली गाडी जेव्हा तुमच्या इथे येणार आहे, तेव्हा तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या, त्याचा लाभ घ्या, सर्वांनी तिथे पोहोचा. सरकारी योजनांच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये हाच आमचा प्रयत्न आहे.
मोदींच्या गारंटीवर विश्वास ठेवून आम्हाला प्रचंड बहुमत दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील जनतेचे आभार मानतो. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना अनेक-अनेक शुभेच्छा देतो. आणि आज राज्य सरकारने मला गरीब आणि श्रमिकांशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली, असे क्षण माझ्या आयुष्यात मला नेहमीच ऊर्जा देतात. आणि म्हणूनच मी इंदूरच्या लोकांचा, मध्य प्रदेश सरकारचा आणि माझ्या श्रमिक बंधू-भगिनींचा आभारी आहे जे आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आले आहेत आणि जेव्हा मी त्यांच्या गळ्यात हार पाहतो तेव्हा मला वाटते की हा किती शुभ प्रसंग आला आहे ; इतक्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हा क्षण आला आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आणि तुमच्या गळ्यातल्या हाराचा सुगंध आम्हाला नक्कीच समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देईल. मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
धन्यवाद.