पंतप्रधानांनी हा पुरस्कार 140 कोटी देशवासियांना समर्पित केला
पुरस्काराची रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला देणगी म्हणून दिली
"लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे 'तिलक'आहेत"
"लोकमान्य टिळक हे एक महान संस्था निर्माते आणि परंपरांचे संवर्धन करणारे होते"
"टिळकांनी भारतीयांमधील न्यूनगंडाची भावना मोडून काढली आणि त्यांच्यातील क्षमतांबद्दल त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला"
"भारताने विश्वासाच्या तुटीकडून विश्वास संपन्नतेकडे वाटचाल केली आहे"
"जनसामान्यांमध्ये विश्वास वृद्धी हेच भारतातील लोकांच्या प्रगतीचे माध्यम आहे "

लोकमान्य टिळकांची,आज एकशे तीन वी पुण्यतिथी आहे.

देशाला अनेक महानायक देणार्‍या,महाराष्ट्राच्या भूमीला,

मी कोटी कोटी वंदन करतो.

कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय शरद पवार जी,राज्यपाल रमेश बैस जी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी,उपमुख्यमंत्री अजित पवार जी,ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक जी,माजी मुख्यमंत्री, माझे मित्र सुशील कुमार शिंदे जी,टिळक कुटुंबातले सन्माननीय सदस्य आणि उपस्थित बंधू-भगिनीनो !

आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. इथे येऊन मी जितका उत्साहित आहे तितकाच भावूकही आहे.आज आपणा सर्वांचे आदर्श आणि भारताचा  गौरव असलेले बाळ गंगाधर टिळक  यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच बरोबर अण्णाभाऊ साठे जी यांची जयंतीही आहे.लोकमान्य टिळक जी आपल्या स्वातंत्र्य इतिहासाच्या ललाटाचे टिळा आहेत.त्याच बरोबर अण्णाभाऊ यांनी समाज सुधारणेसाठी जे योगदान दिले आहे ते असामान्य  आहे.या दोन्ही महापुरुषांच्या चरणी मी श्रद्धापूर्वक नमन करतो.       

आज या महत्वाच्या दिवशी, मला पुण्याच्या या पावन भूमीवर, महाराष्ट्राच्या धरतीवर येण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. ही पुण्य भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची धरती आहे.ही चाफेकर बंधूंची पवित्र धरती आहे.या धरतीशी ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणा आणि आदर्श जोडले गेले आहेत.आता काही वेळापूर्वी मी दगडू शेठ मंदिरात श्री गणपतीचे आशीर्वादही घेतले.पुणे जिल्ह्याच्या इतिहासाचा हा सुद्धा एक आगळा पैलू आहे. टिळकांच्या  आवाहनानंतर गणेश मूर्तीच्या सार्वजनिक स्थापनेमध्ये सहभागी झालेले दगडूशेठ ही पहिली व्यक्ती होती. या धरतीला प्रणाम करत या सर्व थोर विभूतींना मी श्रद्धापूर्वक नमन करतो.

 

मित्रांनो, 

आज पुण्यात आपणा सर्वांमध्ये मला जो सन्मान प्राप्त झाला आहे तो माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय अनुभव आहे. जे स्थान,जी संस्था  टिळक जी यांच्याशी थेट संबंधित होती,त्यांच्याकडून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे.या सन्मानासाठी हिंद स्वराज्य संघाचे आणि आपणा सर्वांचे विनम्रतेने मनापासून आभार मानतो.मी हे ही सांगू इच्छितो,आपण वर वर जर नजर फिरवली तर आपल्या देशात काशी आणि पुणे  दोन्हींची एक विशेष ओळख आहे. इथे सदैव विद्वत्ता नांदते, विद्वत्तेची  दुसरी ओळख म्हणजे पुणे अशी ख्याती असलेल्या या नगराच्या भूमीवर सन्मानित होणे यापेक्षा जास्त अभिमान आणि संतोषाची बाब जीवनात असू शकत नाही. मात्र मित्रांनो,जेव्हा एखादा पुरस्कार प्राप्त होतो तेव्हा त्याच्या बरोबरच आपली जबाबदारीही वाढते.आज हा पुरस्कार टिळकांच्या नावाने प्राप्त होत आहे तेव्हा तर दायित्व अनेक पटीने वाढते. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मी 140 कोटी देशवासीयांच्या चरणी समर्पित करतो. देशवासियांना मी हा विश्वासही देतो की त्यांची सेवा,त्यांच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेमध्ये कोणतीही उणीव ठेवणार नाही. ज्यांच्या नावात गंगाधर आहे, त्यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्कारासमवेत जी रक्कम मला प्राप्त झाली आहे ती गंगा जी साठी समर्पित करत आहे.ही रक्कम नमामि गंगे प्रकल्पासाठी दान करण्याचा निर्णय मी घेतला आहे. 

मित्रांनो,

भारताच्या स्वातंत्र्यात लोकमान्य टिळक यांची  भूमिका,त्यांचे योगदान काही घटना किंवा शब्द इतक्यापुरतेच मर्यादित नाही.टिळकांच्या काळात आणि त्यानंतरही स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना आणि आंदोलने झाली, त्या काळातले क्रांतिकारक आणि नेते  या  सर्वांवर टिळकांचा प्रभाव होता, प्रत्यके ठिकाणी ही छाप होती. म्हणूनच खुद्द इंग्रजांनांही  टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणावे लागले. टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची संपूर्ण दिशाच बदलली. भारतीय देश चालवण्यायोग्य नाहीत असे जेव्हा इंग्रज म्हणत होते तेव्हा लोकमान्य टिळक यांनी सांगितले, ‘स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे’. भारताची श्रद्धा,संस्कृती हे सर्व मागासलेपणाचे प्रतिक आहे अशी इंग्रजांनी धारणा केली होती.मात्र टिळकांनी ही धारणा चुकीची असल्याचे सिद्ध केले.म्हणूनच भारतीय जनतेने स्वतः पुढाकार घेऊन टिळकांना लोकमान्यता तर दिलीच आणि लोकमान्य ही उपाधीही दिली.आताच दीपक जी यांनी सांगितले की महात्मा गांधी यांनी टिळकांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’म्हटले होते.टिळकांचे चिंतन किती व्यापक असेल याची,त्यांच्या दूरदृष्टीची आपण कल्पना करू शकतो.

 

मित्रांनो,

एखाद्या विशाल लक्ष्यासाठी स्वतःला वाहून घेतानाच ते लक्ष्य साध्य करण्यासाठी संस्था आणि व्यवस्थाही तयार करतो तो महान नेता असतो. त्यासाठी आपल्याला सर्वाना घेऊन वाटचाल करायची असते,सर्वांचा विश्वास वाढवायचा असतो.लोकमान्य टिळक यांच्या जीवनात आपल्याला या सर्व वैशिष्ट्यांचे दर्शन घडते.इंग्रजांनी त्यांना तुरुंगात टाकले, त्यांच्यावर अत्याचार केले.स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्याग आणि बलिदानाची पराकाष्ठा केली.त्याच बरोबर त्यांनी संघ भावना,सहभाग आणि सहयोग यांची अनुकरणीय उदाहरणेही घालून दिली. लाला लजपत राय आणि बिपीन चंद्र पाल यांच्यावरचा त्यांचा विश्वास,त्यांच्याप्रती आत्मीयता म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा  सुवर्ण अध्याय आहे.  आजही यासंदर्भात बोलताना लाल-बाल-पाल या तीनही नावांचे त्रिशक्तीच्या रूपाने स्मरण केले जाते.स्वातंत्र्याचा आवाज बुलंद करण्यासाठी पत्रकारिता आणि वर्तमानपत्र यांचे महत्व त्यांनी जाणले होते. टिळकांनी इंग्रजीमध्ये  ‘द मराठा’ हे साप्ताहिक सुरु केल्याचा उल्लेख  शरद जी यांनी  आताच केला आहे.  

स्वातंत्र्य चळवळ असेल किंवा राष्ट्र बांधणीचे मिशन, लोकमान्य टिळकांना ही गोष्ट माहीत होती की देशाच्या भवितव्याची जबाबदारी ही नेहमी युवकांच्या खांद्यावर असते. त्यामुळे भारताच्या भवितव्यासाठी युवकांना साक्षर आणि सक्षम करणे गरजेचे आहे असे त्यांना वाटत होते.  लोकमान्यांकडे  युवकांची प्रतिभा समजण्याइतकी दूरदृष्टी होती. वीर सावरकरांशी निगडित एक घटनाक्रम हे याचे उदाहरण आहे. त्यावेळी सावरकर तरूण होते. टिळकांनी त्यांची क्षमता ओळखली. सावरकरांनी परदेशात जाऊन उत्तम अभ्यास करून शिक्षण घ्यावे आणि परत मायदेशी येऊन स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा, असे टिळकांना वाटले. अशा युवकांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी इंग्लंडमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी दोन शिष्यवृत्त्या सुरू केल्या होत्या. पैकी एका शिष्यवृत्तीचे नाव होते छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती आणि दुसऱ्या शिष्यवृत्तीचे नाव होते महाराणा प्रताप शिष्यवृत्ती! वीर सावरकर यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी टिळकांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे शिफारस केली.  त्याचा लाभ घेऊन सावरकर लंडनमध्ये बॅरिस्टर झाले. अशा कितीतरी युवकांना टिळकांनी तयार केले. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एजुकेशन सोसायटी आणि फर्गुसन कॉलेज अशा संस्थांची स्थापना हा त्यांच्याच दृष्टिकोनाचा एक भाग होता. या संस्थांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक युवकांनी टिळकांचे मिशन पुढे नेत राष्ट्रबांधणीत आपली भूमिका बजावली. व्यवस्था तयार करताना संस्थेची स्थापना,  संस्थेची स्थापना करताना व्यक्ती घडवणे आणि व्यक्तींना घडवताना  राष्ट्राची उभारणी करणे ही दृष्टी राष्ट्राच्या भवितव्यासाठी दिशादर्शक आहे. याच मार्गावरून आज देश प्रभावीपणे पुढे जात आहे.

मित्रांनो

तसे बघायला गेले तर टिळक हे संपूर्ण भारताचे लोकमान्य नेता होते.  त्यांचे पुण्यातील आणि महाराष्ट्रातील लोकांच्या मनात जसे आगळेवेगळे स्थान होते तसेच त्यांचे गुजरातमधील लोकांशीही नाते होते. आज या विशेष प्रसंगी त्याच आठवणींना उजाळा देतो आहे.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात टिळक अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात सुमारे दीड महिना राहिले होते. त्यानंतर 1916 मध्ये टिळकजी अहमदाबादला आले. त्या काळात इंग्रजांकडून जनतेवर होत असलेले अत्याचार शिगेला पोहोचले होते आणि तरीही 40 हजारांहून अधिक लोक टिळकांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अहमदाबादला आले होते, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. टिळकांना ऐकण्यासाठी त्यावेळी श्रोत्यांमध्ये सरदार वल्लभभाई पटेलही उपस्थित होते हीदेखील आनंदाची बाब आहे. त्यांच्या भाषणाने सरदारसाहेबांच्या मनावर वेगळीच छाप पडली.

 

पुढे सरदार पटेल अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले, त्यांची विचारसरणी कशी होती, ते तुम्ही पाहा. त्यांनी अहमदाबादमध्ये टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला असे नाही तर सरदार साहेबांच्या या निर्णयामुळे त्यांच्यातील लोहपुरुषाची ओळख पटली कारण सरदार साहेबांनी पुतळ्यासाठी निवडलेली जागा म्हणजे व्हिक्टोरिया गार्डन!

ब्रिटीशांनी 1897 मध्ये राणी व्हिक्टोरियाची हीरक जयंती साजरी करण्यासाठी अहमदाबादमध्ये व्हिक्टोरिया गार्डन बांधले. सरदार पटेलांनी महान क्रांतिकारक लोकमान्य टिळकांचा पुतळा ब्रिटिश राणीच्या नावाने असलेल्या उद्यानातच बसवण्याचा निर्णय घेतला. निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये यासाठी त्या वेळी सरदार साहेबांवर दबाव आणला गेला, त्यांना रोखण्याचे प्रयत्न झाले.

पण सरदार हे सरदार होते. ते म्हणाले की, मी एकवेळ पद सोडेन पण पुतळा जिथे ठरवला आहे तिथेच बसवला जाईल. पुतळ्याची प्रतिष्ठापना तिथेच केली गेली आणि त्याचे उद्घाटन 1929 मध्ये महात्मा गांधींच्या हस्ते झाले. अहमदाबादमध्ये राहून त्या पवित्र स्थळाला भेट देण्याची आणि टिळकजींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्याची संधी मला अनेकदा मिळाली आहे. ती एक अप्रतिम मूर्ती आहे, टिळक विश्रांतीच्या मुद्रेत बसलेले आहेत.

जणू ते स्वतंत्र भारताचे उज्ज्वल भविष्य बघत आहेत. तुम्ही कल्पना करू शकता, गुलामगिरीच्या काळातही सरदार साहेबांनी आपल्या देशाच्या सुपुत्राच्या सन्मानार्थ संपूर्ण ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले होते. आणि आजची परिस्थिती पहा. आज एकाही रस्त्याचे नाव जिथे परदेशी नावाचे आक्रमण झाले आहे ते नाव बदलून भारतीय विभूतीचे नाव दिले तर काही लोक चवताळून उठतात, त्यांची झोप उडते.

मित्रहो,

लोकमान्य टिळकांच्या जीवनातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. लोकमान्य टिळक ही गीतेवर श्रद्धा ठेवणारी व्यक्ती होती. गीतेचा कर्मयोग जगणारी व्यक्ती होती. त्यांना रोखण्यासाठी इंग्रजांनी त्यांना भारतापासून दूर पूर्वेकडे मंडाले येथील तुरुंगात टाकले. पण तिथेही टिळकांनी गीतेचा अभ्यास सुरू ठेवला. 'गीता रहस्य' या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी देशाला, प्रत्येक आव्हानावर मात करण्यासाठी कर्मयोगाची सहज शिकवण दिली, कर्माच्या सामर्थ्याची ओळख करून दिली.

मित्रहो,

आज मला बाळ गंगाधर टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणखी एका पैलूकडे देशातील तरुण पिढीचे लक्ष वेधायचे आहे. टिळकजींचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे लोकांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, यासाठी ते खूप आग्रही होते आणि ते लोकांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिकवत असत, ते त्यांना आत्मविश्वासाने भारून टाकत. मागच्या शतकात जेव्हा भारताला गुलामगिरीच्या बेड्या तोडता येणार नाही, ही भावना लोकांच्या मनात घर करून होती, तेव्हा टिळकांनीच लोकांना स्वातंत्र्यप्राप्तीचा विश्वास दिला. त्यांचा आपल्या इतिहासावर विश्वास होता. त्यांचा आपल्या संस्कृतीवर विश्वास होता. त्यांचा आपल्या लोकांवर विश्वास होता. त्यांचा आपल्या कामगारांवर, उद्योजकांवर विश्वास होता, भारताच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. भारताचा विषय असला की इथले लोक असेच आहेत, आमचे काहीच होऊ शकणार नाही, असे म्हटले जात असे. पण टिळकांनी हीनभावनेचे हे मिथक नष्ट करण्याचा प्रयत्न केला, देशाला आपल्या सामर्थ्याबाबत विश्वास दिला.

 

मित्रहो,

अविश्वासाच्या वातावरणात देशाचा विकास शक्य होत नाही. कालच मी पाहत होतो, पुण्यातले एक गृहस्थ श्री. मनोज पोचाट यांनी मला ट्विट केले आहे. त्यांनी मला माझ्या 10 वर्षांपूर्वीच्या पुणे भेटीची आठवण करून दिली. त्यावेळी मी, टिळकांनी स्थापन केलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयात भारतातील विश्वासाच्या कमतरतेबद्दल बोललो होतो. आता मनोजजींनी मला देशाच्या ‘ट्रस्ट डेफिसिट ते ट्रस्ट सरप्लस’ या प्रवासाबद्दल बोलण्याचा आग्रह केला आहे! मनोजजींनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो.

बंधु आणि भगिनींनो,

आज भारतातील वाढलेला विश्वास, धोरणांमध्येही दिसतो आणि देशवासीयांच्या मेहनतीतही तो दिसून येतो! गेल्या 9 वर्षात भारतातील जनतेने मोठ्या बदलांचा पाया रचला आहे, मोठे बदल घडवून आणले आहेत. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कशी बनली? भारतातील जनतेने हे करून दाखवून दिले आहे. आज देश प्रत्येक क्षेत्रात स्वत:वर विश्वास ठेवतो आहे, आणि आपल्या नागरिकांवरही विश्वास ठेवतो आहे. कोरोनाच्या संकटात भारताने आपल्या शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी मेड इन इंडिया लस बनवून दाखवली. आणि त्यात पुण्याचाही मोठा वाटा होता. आम्ही आत्मनिर्भर भारताबद्दल बोलत आहोत, कारण आम्हाला विश्वास आहे की भारत हे करू शकतो.

देशातील सर्वसामान्य माणसाला आम्ही कोणत्याही हमीशिवाय मुद्रा कर्ज देत आहोत, कारण आमचा त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि कर्तव्यनिष्ठेवर विश्वास आहे. पूर्वी सर्वसामान्यांना लहान-सहान कामांसाठी काळजी करावी लागत होती. आज मोबाईलवरील एका क्लिकवर बहुतांश कामे होत आहेत. कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी सुद्धा सरकार तुमच्याच स्वाक्षरीवर विश्वास ठेवत आहे. त्यामुळे देशात वेगळे वातावरण निर्माण होत आहे, सकारात्मक वातावरण निर्माण होते आहे. आणि आपण पाहत आहोत की विश्वासाने भारलेले लोक देशाच्या विकासासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करत आहेत. लोकांच्या मनातील या विश्वासानेच स्वच्छ भारत चळवळीचे रूपांतर लोक चळवळीत केले आहे. लोकांच्या मनातील या विश्वासानेच बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेचे रूपांतर लोक चळवळीत केले आहे. जे सक्षम आहेत त्यांनी गॅसच्या अनुदानाचा त्याग करावा अशी हाक मी लाल किल्ल्यावरून एकदा दिली आणि त्याला प्रतिसाद देत लाखो लोकांनी गॅसच्या अनुदानाचा त्याग केला. काही काळापूर्वी अनेक देशांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्या देशाच्या नागरिकांचा आपल्या सरकारवर सर्वाधिक विश्वास आहे, त्या देशाचे नाव ‘भारत’ असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे बदलणारे जनमानस, लोकांचा हा वाढता विश्वास भारतातील लोकांच्या प्रगतीचे माध्यम होतो आहे.

 

मित्रहो,

आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देश आपल्या अमृतकाळाकडे कर्तव्याचा काळ म्हणून पाहत आहे. देशाची स्वप्ने आणि संकल्प डोळ्यासमोर ठेवून आपण देशवासी आपापल्या स्तरावर काम करत आहोत. त्यामुळेच आज जगालाही भारतामध्ये आपले भविष्य दिसते आहे. आमचे प्रयत्न आज संपूर्ण मानवजातीला आश्वस्त करत आहेत. लोकमान्यांचा आत्मा आज जिथे असेल, तिथून ते आपल्याला पाहत असतील, आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत असतील, असा विश्वास मला वाटतो. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या विचारांच्या सामर्थ्याने आपण आपले सशक्त आणि समृद्ध भारताचे स्वप्न नक्कीच साकार करू. हिंद स्वराज्य संघ यापुढेही पुढाकार घेऊन टिळकांचे आदर्श जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मला वाटतो. या सन्मानाबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. या धरतीला वंदन करून, हा विचार पुढे नेण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला वंदन करून मी माझे बोलणे थांबवतो. आपणा सर्वांचे खूप खूप आभार!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures

Media Coverage

India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister lauds the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948
December 03, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi lauded the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948 in Rajya Sabha today. He remarked that it was an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.

Responding to a post on X by Union Minister Shri Hardeep Singh Puri, Shri Modi wrote:

“This is an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.”