तेलंगणा प्रजालंदरकी ना अभिनंदनलू……(तेलंगणच्या नागरिकांना नमस्कार आणि अभिनंदन)
तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सौंदराजन जी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी नितीन गडकरी जी, जी किशन रेड्डी जी, संजय जी, इतर मान्यवर आणि माझ्या तेलंगणातील बंधू-भगिनींनो, नुकतीच तेलंगणच्या स्थापनेला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. तेलंगण राज्य हे नवीन असेल पण भारताच्या इतिहासात तेलंगणाचे योगदान, तेथील लोकांचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे. तेलगू भाषकांच्या बळाने भारताचे सामर्थ्य नेहमीच वाढवले आहे. म्हणूनच आज भारत जगातील पाचवी मोठी आर्थिक शक्ती बनला असताना, त्यातही तेलंगणातील लोकांचा मोठा वाटा आहे. आणि अशा परिस्थितीत, आज संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असताना, त्यासाठी पुढे येत असताना, विकसित भारताबद्दल एवढा उत्साह औत्सुक्य असताना, तेलंगणासमोरही अमाप संधी आहेत.
मित्रहो,
आजचा नवा भारत हा तरुण भारत आहे, उर्जेने सळसळलेला भारत आहे. एकविसाव्या शतकाच्या या तिसऱ्या दशकात हा सुवर्णकाळ आपल्यासमोर आला आहे. या सुवर्णकाळातील प्रत्येक सेकंदाचा आपल्याला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. गतिमान विकासाच्या कुठल्याही संधींपासून देशाचा कोणताही कानाकोपरा वंचित राहू नये. या संधींची व्यावहारीक पूर्तता करण्यासाठी गेल्या 9 वर्षांत, भारत सरकारने तेलंगणाच्या विकासावर, इथल्या दळणवळण, संपर्क व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले आहे. याच विकासकामांच्या साखळीत, तेलंगणातील दळणवळण, संपर्क आणि उत्पादनाशी संबंधित 6,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची आज पायाभरणी करण्यात आली. या सर्व प्रकल्पांसाठी मी तेलंगणातील जनतेचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
नवी उद्दिष्टे असतील तर नवीन मार्गही काढावे लागतात. भारताचा गतिमान विकास, जुन्या पायाभूत सुविधांच्या बळावर शक्य नव्हता. वाहतुकीत जास्त वेळ वाया गेला, मालवाहतूक महाग झाली तर त्याचा एकंदर व्यवसायालाही फटका बसतो आणि लोकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आमचे सरकार पूर्वीपेक्षा अधिक वेगाने अधिक दर्जेदार काम करत आहे. आज, प्रत्येक प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम केले जात आहे. आज देशभरात महामार्ग, दृतगती महामार्ग, आर्थिक पट्टे (इकॉनॉमिक कॉरिडॉर), औद्योगिक पट्टे (इंडस्ट्रियल कॉरिडॉर) यांचे जाळे विणले जात आहे. दुपदरी महामार्गाचे रूपांतर चौपदरी, तर चौपदरी महामार्गाचे सहा पदरी महामार्गात रूपांतर करण्यात येत आहे. तेलंगणात 9 वर्षांपूर्वी जे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे 2500 किलोमीटर लांबीचे होते, ते आज 5000 किलोमीटर लांबीचे झाले आहे. आज तेलंगणातील 2500 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प बांधकामाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. भारतमाला प्रकल्पां अंतर्गत देशभरात बांधण्यात येत असलेल्या डझनभर कॉरिडॉर्सपैकी अनेक तेलंगणातून जातात. हैदराबाद-इंदूर आर्थिक पट्टा, सुरत-चेन्नई आर्थिक पट्टा, हैदराबाद-पणजी आर्थिक पट्टा, हैदराबाद-विशाखापट्टणम आंतरपट्टा (इंटर कॉरिडॉर), अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. एक प्रकारे, तेलंगण आजुबाजुच्या आर्थिक केंद्रांना जोडत आहे, आर्थिक उलाढालींचे मोठे केंद्र बनत आहे.
मित्रहो,
आज नागपूर-विजयवाडा पट्ट्याच्या मंचेरियल ते वारंगळ या भागाची पायाभरणीही झाली आहे. या भागामुळे तेलंगण, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशशी आधुनिक दळणवळण व्यवस्थेने जोडला जाईल. यामुळे मंचेरियल आणि वारंगळमधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि वाहतूक कोंडीची समस्याही बऱ्यापैकी सुटेल. पट्ट्याच्या या भागात विशेषत: अशा क्षेत्राचा समावेश आहे, जे विकासापासून वंचित होते, जिथे आपल्या आदिवासी बंधुभगिनींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या कॉरिडॉरमुळे बहुपदरी दळणवळणाची संकल्पनाही खोलवर रुजायला मदत होईल. करीमनगर-वारंगळ विभागाच्या चौपदरीकरणामुळे हैदराबाद-वारंगळ आर्थिक पट्टा, काकतिया महा वस्त्रोद्योग केंद्र आणि वारंगळ सेझ(SEZ- विशेष आर्थिक क्षेत्र) ची संपर्क व्यवस्था गाढ होईल.
मित्रांनो,
भारत सरकार आज तेलंगणात वाढवत असलेल्या दळणवळण व्यवस्थेचा फायदा तेलंगणातील उद्योग आणि पर्यटनाला होत आहे. तेलंगणामध्ये असलेल्या अनेक वारसा स्थळांना, धार्मिक स्थळांना भेट देता येणे आता अधिक सोयीचे होत आहे. येथील शेतीशी संबंधित उद्योग, करीमनगरचा ग्रॅनाइट उद्योग, यांनाही भारत सरकारच्या या प्रयत्नांची मदत मिळत आहे. म्हणजेच शेतकरी असो वा श्रमिक, विद्यार्थी असो की व्यावसायिक, सर्वांनाच त्याचा फायदा होत आहे. यामुळे युवावर्गालाही त्यांच्या घराजवळच, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.
मित्रहो,
देशातील तरुणांसाठी उत्पादन क्षेत्र, मेक इन इंडिया मोहीम हे रोजगाराचे आणखी एक मोठे माध्यम बनत आहे. देशात उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही PLI (प्रॉडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह-उत्पादनानुसार प्रोत्साहन) योजना सुरू केली आहे. म्हणजे जो अधिक उत्पादन करेल, त्याला भारत सरकारकडून विशेष मदत मिळत आहे. या अंतर्गत तेलंगणात 50 हून अधिक मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. भारताने या वर्षी संरक्षण निर्यातीत नवा विक्रम केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. भारताची संरक्षण निर्यात 9 वर्षांपूर्वी एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी होती. आज ती 16 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. याचा फायदा हैदराबादस्थित भारत डायनॅमिक्स लिमिटेडलाही होत आहे.
मित्रांनो,
आज भारतीय रेल्वेसुद्धा, उत्पादनाच्या बाबतीत नवे विक्रम रचत आहे, नवे टप्पे गाठत आहे. सध्या, पूर्णपणे भारतीय निर्मिती असलेल्या वंदे भारत रेल्वे गाडीचा खूप बोलबाला आहे. गेल्या काही वर्षांत, भारतीय रेल्वेने हजारो आधुनिक रेल्वे डबे आणि इंजिने (लोकोमोटीव्ह) तयार केली आहेत. भारतीय रेल्वेच्या या कायापालटात आता काझीपेठही मेक इन इंडियाच्या नव्या ऊर्जेसह समाविष्ट होणार आहे. आता दर महिन्याला इथे डझनभर गाड्या तयार होणार आहेत. त्यामुळे या भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून, येथील प्रत्येक कुटुंबाला काही ना काही फायदा होणार आहे. हाच तर 'सबका साथ-सबका विकास' म्हणजेच सर्वांच्या सहकारातून सर्वांचा विकास आहे. विकासाच्या या मंत्रानेच तेलंगणाला पुढे न्यायचे आहे. या अनेक प्रागतिक उपक्रमांसाठी, आयोजनांसाठी, विकासाच्या नव्या प्रवाहासाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, भरपूर शुभेच्छा देतो! धन्यवाद !