प्रियमइना सोदरी, सोदरु-लारा नमस्कारम्।
आंध्र प्रदेशचे राज्यपाल, श्री बिश्व भूषण जी, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि आंध्र प्रदेशातील माझे बंधू आणि भगिनींनो,
काही महिन्यांपूर्वीच मला विप्लव वीरुडु अल्लूरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांना भेटण्याचं सद्भाग्य मिळालं होतं.आज पुन्हा मी अशाच एका प्रसंगाच्या निमित्तानं आंध्र प्रदेशाच्या भूमीवर आलो आहे. आज आंध्रप्रदेश आणि विशाखा पट्टणम साठी खूप मोठा दिवस आहे.विशाखापट्टणम भारताचे एक विशेष पट्टणम आहे, हे शहर खूप खास आहे.इथे कायमच व्यापाराची समृद्ध परंपरा राहिली आहे. विशाखापट्टणम प्राचीन भारतातील एक महत्वाचे बंदर होते.हजारो वर्षांपूर्वी देखील या बंदरावरुन पश्चिम आशिया आणि रोमपर्यंत व्यापार होत असे. आणि आजही विशाखापट्टणम भारताच्या व्यापाराचे केंद्र बिंदू ठरले आहे.
दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी, आंध्रप्रदेश आणि विशाखापट्टणमच्या आकांक्षा पूर्ण करणारे महत्वाचे माध्यम ठरेल. या योजना पायाभूत सुविधांपासून ते जनतेचे जीवनमान सुखकर करण्यापासून ते आत्मनिर्भर भारतापर्यंत विकासाचे कित्येक नवे आयाम खुले करणाऱ्या आहेत, विकासाला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या आहेत. यासाठी मी आंध्रप्रदेशच्या सर्व रहिवाशांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि या प्रसंगी आपल्या देशाचे माजी उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू गारु यांचे आणि श्री हरिबाबूंचे देखील आभार मानतो. ते जेव्हाही मला भेटतात, तेव्हा आंध्र प्रदेशाच्या विकासाबद्दल आमच्यात खूप चर्चा होते. आंध्रप्रदेशासाठी त्यांच्या मनात असलेले प्रेम आणि समर्पण अतुलनीय आहे.
मित्रांनो,
आंध्रप्रदेशच्या लोकांची एक खूप विशेष बाब आहे, ती म्हणजे ते स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि उद्यमशील असतात. आज जवळपास जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात, प्रत्येक कामात आंध्रप्लप्रदेशातील लोकांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. मी ते शिक्षणक्षेत्र असो,की उद्यमशीलता असो, तंत्रज्ञान असो की वैद्यकीय व्यवसायाचे क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात आंध्रप्रदेशच्या लोकांनी आपली विशेष ओळख बनविली आहे. ही ओळख केवळ व्यावसायिक गुणवत्तेमुळे नाही तर आंध्रप्रदेशच्या लोकांच्या मनमिळावू वृत्तीमुळेही ही ओळख निर्माण झाली आहे. आंध्रप्रदेशातील लोकांच्या आनंदी आणि दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे सगळे लोक त्यांच्यावर खुश असतात. तेलगु भाषक लोक नेहमीच अधिक चांगल्याचा शोध घेत असतात, नेहमी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात. मला अतिशय आनंद आहे की आज ज्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे, ते देखील आंध्रप्रदेशाच्या प्रगती आणि गती आणखी उत्तम करणार आहेत.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपला देश विकसित भारताचे उद्दिष्ट मनात ठेवून विकासाच्या मार्गावर जलद गतीने पुढे जात आहे. विकासाचा हा प्रवास बहुआयामी आहे.यात सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याशी संबंधित चिंतांचा देखील समावेश करण्यात आला आहे. तसेच यात सर्वात उत्तम अशा आधुनिक पायाभूत सुविधांचाही समावेश आहे. आजच्या या कार्यक्रमात देखील पायाभूत सुविधांविषयीचा आमचा दृष्टिकोन स्वच्छपणे दिसतो आहे. आमचा दृष्टिकोन आहे सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन. पायाभूत सुविधांबाबत आम्ही कधीही अशा प्रश्नांमध्ये अडकलो नाही की आपल्याला रेल्वेचा विकास करायचा की रस्ते दळणवळण सोयीचा विकास करायचा आहे. आमच्या मनात याबद्दल कधीही काहीच द्विधा मनःस्थिती नव्हती की आपल्याला बंदरावर लक्ष द्यायचं आहे की महामार्गावर. पायाभूत सुविधांबाबत अशा विभक्त, तुकड्या- तुकड्यात विचार करण्याच्या पद्धतीमुळे देशाला खूप नुकसान सहन करावे लागले आहे. यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आणि लॉजीस्टिक खर्चही वाढला.
मित्रांनो,
पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक बहु आयामी संपर्क व्यवस्थेवर अवलंबून आहोत. त्यासाठी आंबी आपल्या पायाभूत सुविधांबाबत नवा दृष्टिकोन स्वीकारला आहे.आम्ही विकासाच्या एकात्मिक दृष्टिकोनाला महत्त्व दिले. आज ज्या आर्थिक मार्गिकेची पायाभरणी केली गेली, त्यात सहा पदरी रस्त्यांचा समावेश आहे.तसेच बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी एक वेगळा मार्ग देखील बनवला जाईल. एकीकडे आपण विशाखापट्टणम रेल्वे स्थानकाचे सौन्दर्यीकरण करत आहोत तर दुसरीकडे मासेमारी बंदरही अत्याधुनिक बनवत आहोत.
मित्रांनो,
पायाभूत सुविधांविषयीचा हा एकात्मिक दृष्टिकोन पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यामुळे शक्य झाला आहे.गतिशक्ती प्रकल्पामुळे केवळ पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली तर त्यामुळे प्रकल्पावर होणारा खर्चही कमी झाला आहे. बहुपर्यायी दळणवळण व्यवस्था हेच आता सर्व शहरांचे भविष्य आहे आणि विशाखापट्टणम ने देखील याच दिशेने पाऊल टाकले आहे.मला कल्पना आहे की या प्रकल्पाची आंध्रप्रदेशातील लोक दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत होते. आणि आज जेव्हा ही प्रतीक्षा संपली आहे, तेवबा आंध्रप्रदेश आणि इथल्या किनारी प्रदेशातील लोक जलद गतीने विकासाच्या या स्पर्धेत पुढे जातील.
मित्रांनो,
आज संपूर्ण जग संघर्षाच्या नव्या, वेगळ्या काळातून जाते आहे.काही देशांमध्ये आवश्यक सामानाची कमतरता आहे, तर काही देश ऊर्जा संकटाचा सामना करत आहेत. जवळपास प्रत्येक देश आपल्या कोसळत्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंतीत आहेत. मात्र, त्याच काळात भारत अनेक क्षेत्रात यशाची नवनवी शिखरे गाठत आहे. भारत विकासाची नवी यशोगाथा लिहितो आहे. आणि हे केवळ तुम्हालाच जाणवते आहे असे नाही, तर जगातील अनेक देश अतिशय लक्षपूर्वक आपल्याकडे बघत आहेत.
आपण हे ही बघितले असेल की तज्ञ मंडळी आणि बुद्धिजीवी लोक भारताची कशी तारीफ करत आहेत. आज भारत संपूर्ण जगाच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू बनला आहे.आणि हे यामुळे शक्य झाले आहे कारण आज भारत आपल्या नागरिकांच्या आशा-आकांक्षा आणि गरजा यांना सर्वोच्च प्राधान्य देत काम करत आहे. आमचे प्रत्येक धोरण, प्रत्येक निर्णय सर्वसामान्य व्यक्तीचे आयुष्य अधिक उत्तम बनवणारे आहे. आज एकीकडे पीएलआय योजना, जीएसटी, आयबीसी, राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन, गतिशक्ती अशा धोरणांमुळे भारतात गुंतवणूक वाढते आहे. तर दुसरीकडे, गरिबांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा सातत्याने विस्तार केला जात आहे.
विकासाच्या या प्रवासात आज देशाचे ते भाग देखील सामील झाले आहेत, जे पूर्वी दुर्लक्षित होते. सर्वात मागास जिल्ह्यांत अकांक्षी जिल्हे कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाशी संबंधित योजना राबविल्या जात आहेत. देशातल्या कोट्यवधी गरिबांना गेल्या अडीच वर्षांपासून मोफत धान्य दिले जात आहे. गेल्या साडे तीन वर्षांत पंतप्रधान शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी थेट सहा हजार रुपये जमा केले जात आहेत. त्याचप्रमाणे उदयोन्मुख क्षेत्रांशी संबंधित आमच्या धोरणांमुळे तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. ड्रोन पासून गेमिंग पर्यंत, अवकाशा पासून स्टार्टअप्स पर्यंत प्रत्येक क्षेत्रात आमच्या धोरणांमुळे पुढे जाण्याच्या संधी मिळत आहेत.
मित्रांनो,
जेव्हा ध्येये स्पष्ट असतात, तेव्हा आकाशाची उंची असो, की समुद्राची खोली, आपण संधी तर शोधतोच, आणि नव्या संधी निर्माण देखील करतो. आज आंध्रप्रदेशात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डिप वॉटर एनर्जी निर्मितीला झालेली सुरुवात, याचंच एक मोठं उदाहरण आहे. आज देशात नील अर्थव्यवस्थेशी संबंधित अनंत शक्यता साकार करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. नील अर्थव्यवस्था पहिल्यांदाच इतकी मोठी प्राथमिकता बनली आहे. मत्स्यपालन करणाऱ्यांसाठी आता किसन क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. विशाखपट्टणम मासेमारी बंदराचे आधुनिकीकरण सुरू झाले आहे, यामुळे आपल्या मच्छीमार बंधू - भगिनींचे आयुष्य सुकर होईल. जस जसे गरिबांचे सशक्तीकरण होईल, आणि आधुनिक पायाभूत सुविधांशी संबंधित संधी त्यांच्या आवाक्यात येतील, विकसित भारताचे आपले स्वप्न देखील पूर्ण होईल.
मित्रांनो,
सागर शतकानुशतके भारतासाठी समृद्धी आणि संपन्नतेचा स्रोत राहीला आहे, आणि आपल्या समुद्र किनाऱ्यांनी या समृद्धीसाठी प्रवेशद्वाराचे काम केले आहे. आज देशात बंदर आधारीत विकासाच्या माध्यमातून ज्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू आहेत, भविष्यात त्यांचा अधिक विस्तार होणार आहे. विकासाच्या हा सर्वसमावेशक दृष्टिकोन 21व्या शतकातला भारत प्रत्यक्षात उतरवत आहे. मला विश्वास आहे, आंध्र प्रदेश, देशाच्या विकासाच्या या अभियानात याच प्रकारे मोठी भूमिका पार पाडत राहील.
या संकल्पा सोबतच, अपना सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!
माझ्या सोबत दोन्ही हात उंचावून, पूर्ण शक्तिनिशी म्हणा -
भारत माता की - जय
भारत माता की - जय
भारत माता की - जय
खूप खूप धन्यवाद!