समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या विविध महत्त्वाच्या भागांचे लोकार्पण
10 नव्या वंदे भारत गाड्यांच्या सेवेची सुरुवात
दहेज येथील पेट्रोनेट एलएनजीच्या पेट्रोकेमिकल्स संकुलाची कोनशीला ठेवली
“2024 मधील 75 दिवसांमध्ये, 11 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे किंवा त्यांची पायाभरणी करण्यात आली आहे तसेच 7 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प गेल्या 10 ते 12 दिवसांत सुरु करण्यात आले आहेत”
“हे 10 वर्षांत केलेले काम म्हणजे केवळ एक झलक आहे. मला अजून खूप काम करायचे आहे” ;
“रेल्वे सेवेचा कायापालट ही विकसित भारताची हमी आहे”
“या रेल्वे गाड्या, रेल्वेचे रूळ आणि स्थानके यांचे उत्पादन मेड इन इंडिया म्हणजेच स्वदेशी उत्पादनाची परिसंस्था निर्माण करत आहेत”
“आमच्यासाठी हे विकास प्रकल्प सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने केलेले कार्य नाही तर ती राष्ट्र उभारणीची मोहीम आहे”
“भारतीय रेल्वेला आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल या अभियानांचे माध्यम बनवण्यावर सरकारचा भर आहे”
“भारतीय रेल्वे आधुनिकतेच्या वेगासह प्रगती करत राहील. ही मोदींची गॅरंटी आहे”

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेलजी, संसदेतील माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सी.आर.पाटील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले सर्व राज्यपाल, आदरणीय मुख्यमंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, मंत्रीगण आणि मला माझ्यासमोर दिसत आहेत,ते 700 हून अधिक ठिकाणांहून तेथील खासदारांच्या नेतृत्वात, तेथील मंत्र्यांच्या नेतृत्वात लाखो लोक आज या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. कदाचित रेल्वेच्या इतिहासात एकाच वेळी भारताच्या कानाकोपऱ्यात इतका मोठा कार्यक्रम कधी झालेला नसेल. 100 वर्षांत पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत असेल. या भव्य प्रमाणातील आयोजनासाठी मी रेल्वे विभागाचे देखील खूप खूप अभिनंदन करतो.
विकसित भारताच्या उभारणीसाठी होत असलेल्या नव-निर्मिती कार्याचा विस्तार होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे, नवनव्या योजना सुरु होत आहेत. जर मी 2024 बद्दलच बोलायचे म्हटले तर, आत्ता या वर्षाचे आत्ता कुठे 75 दिवस पूर्ण होत आहेत. या सुमारे 75 दिवसांच्या कालावधीत, 11 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण तसेच पायाभरणी करण्यात आली आहे. आणि जर गेल्या 10 ते 12 दिवसांबद्दल बोलायचे झाले तर या 10 ते 12 दिवसांत 7 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे. या कार्यक्रमात आत्ता येथे एक लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे.   
आणि तुम्हीच बघा, आज फक्त आणि फक्त रेल्वेशीच संबंधित 85 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम सुरु झाले आहे. असे असले तरीही मला वेळेची टंचाई जाणवते. मी विकासाचा वेग कमी होऊ देणार नाही. आणि म्हणूनच आज रेल्वेच्याच कार्यक्रमात आणखी एक कार्यक्रम समाविष्ट झाला आहे आणि तो आहे पेट्रोलियम उद्योगाचा. आणि गुजरातेत दहेज येथे 20 हजार कोटी रुपये खर्चाच्या पेट्रोकेमिकल्स संकुलाच्या कार्याची कोनशीला बसवण्यात आली आहे. हा प्रकल्प देशातील हायड्रोजन उत्पादनासोबतच पॉलीप्रॉपिलीनची मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये आजच एकता मॉल्सची देखील  पायाभरणी झाली आहे. हे एकता मॉल्स भारतातील समृद्ध कुटिरोद्योग तसेच हस्त-शिल्पकला आणि सरकारची व्होकल फॉर लोकल ही जी मोहिम आहे तिला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतील आणि त्यायोगे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेला देखील बळकटी मिळालेली दिसून येईल.
मी या प्रकल्पांसाठी देशवासियांचे अभिनंदन करतो. मी माझ्या तरुण सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की, भारत एक तरुण देश आहे, आपल्या या देशात मोठ्या प्रमाणात तरुण आहेत. मी विशेष करून या माझ्या तरुण सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की, आज ज्या प्रकल्पांचे लोकार्पण झाले आहे ते प्रकल्प त्यांच्या वर्तमानकाळासाठी उपयुक्त आहेत तर आज ज्या कार्याची पायाभरणी झाली आहे ती कार्ये त्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देणारी आहेत. 

 

मित्रांनो,
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची सूत्रे हाती घेतलेल्या सरकारांनी ज्या प्रकारे राजकीय स्वार्थाला प्राधान्य दिले त्याचा सर्वात मोठा फटका भारतीय रेल्वेला बसला. वर्ष 2014 पूर्वीच्या 25-30  रेल्वे अर्थसंकल्पांवर जरा नजर टाका. तत्कालीन रेल्वे मंत्री देशाच्या संसदेत काय बोलत असत? आम्ही अमक्या गाडीला अमुक ठिकाणी थांबा देऊ. 6 डब्यांच्या गाडीचे डबे वाढवून 8 करून देऊ. मी बघत असे, संसदेत टाळ्यांचा कडकडाट होत असे. म्हणजे, केवळ एवढाच विचार होता की थांबा मिळाला की नाही मिळाला, अमक्या स्थानकापर्यंत ही गाडी येते मग पुढच्या स्थानकांपर्यंत  जाणार की नाही जाणार? पहा बरं, 21 व्या शतकात हीच विचारपद्धती राहिली असती तर देशाचे काय झाले असते? मी पहिले काम काय केले असेल तर रेल्वेसाठीचा वेगळा स्वतंत्र अर्थसंकल्प न ठेवता त्याचा केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश केला. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पातून रेल्वेच्या विकासासाठी निधीची तरतूद करणे शक्य झाले.  
काही काळापूर्वीच्या दशकांमध्ये गाड्यांच्या वक्तशीरपणाची स्थिती पाहिली होती ना तुम्ही? स्थानकावर लोक हे पाहण्यासाठी जात नसत की या फलाटावर कोणती गाडी येणार आहे, तर ते हे पाहण्यासाठी जात असत की गाडी किती उशिराने धावत आहे. त्या काळी तर मोबाईल फोन देखील नव्हते, त्यामुळे घरातून बाहेर पडून स्थानकावर जाऊन गाडीला किती उशीर होणार आहे ते पाहावे लागत असे. नातेवाईकांना सांगत असत की बाबांनो थांबा, गाडी कधी येईल माहित नाही, नाहीतर घरी जाऊन परत येऊया. रेल्वेतील स्वच्छतेची समस्या, सुरक्षितता, सोयीसुविधा अशा सर्व गोष्टी प्रवाशांच्या नशिबावर सोडून दिल्या होत्या.   
आजपासून 10 वर्षांपूर्वी, म्हणजे  वर्ष 2014 पूर्वी ईशान्य प्रदेशातील 6 राज्ये अशी होती की ज्यांच्या राजधानीची शहरे देशाच्या रेल्वे सेवेशी जोडलेली नव्हती. तसेच2014 मध्ये  देशभरात 10,000 हून अधिक रेल्वे फाटके कर्मचारी विरहित प्रकारची होती, तेथे सतत अपघात होत असत. आणि त्यामुळे आपल्याला आपली होतकरु मुले आणि तरुण गमवावे लागत होते. देशात केवळ 35% रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झालेले होते. आधीच्या सरकारांनी  रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण करण्याला कधीच प्राधान्य दिले नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक क्षणी अडचणी कोण सहन करत होते? त्रास कोणाला होत होता?... आपल्या देशातील सामान्य मनुष्य, मध्यमवर्गीय कुटुंबे, देशातील छोटे शेतकरी,देशातील लहान उद्योजक.. तुम्हीच आठवून बघा, रेल्वेच्या तिकीट आरक्षणाची देखील कशी स्थिती होती....लांबच लांब रांगा, दलाली,कमिशन,तासनतास वाट पाहणे...लोकांनी पण समजूत करून घेतली होती की असा त्रास होणारच, जाउद्या, दोन चार तासांचा प्रवास करायचा आहे, करुन टाकू. आणि आरडाओरडा कशाला करायचा..हेच आयुष्य होऊन गेले होते. आणि मी तर माझे आयुष्य रेल्वेच्या रुळांवरच सुरु केले आहे. त्यामुळे रेल्वेची काय परिस्थिती होती ती मला चांगलीच ठाऊक आहे.  

 

मित्रांनो,
भारतीय रेल्वेला त्या नरकमय परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जी इच्छाशक्ती आवश्यक होती ती इच्छाशक्ती आमच्या सरकारने दाखवली आहे. आता रेल्वेचा विकास ही सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांच्या बाबींपैकी एक बाब झाली आहे. आम्ही 10 वर्षांमध्ये रेल्वेच्या सरासरी अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये 6 पट वाढ केली आहे. येत्या 5 वर्षांत भारतीय रेल्वेमध्ये होणारा कायापालट देशवासीयांच्या कल्पनेच्या पलीकडचा असेल अशी गॅरंटी मी आज देशाला देतो. आजचा हा दिवस याच इच्छाशक्तीचा प्रत्यक्ष पुरावा आहे. देशातील तरुण ठरवतील की त्यांना कसा देश हवा आहे, कशी रेल्वे पाहिजे आहे.
ही 10 वर्षांची कामे हा तर ट्रेलर आहे, मला तर आणखी पुढे जायचे आहे. आज गुजरात, महाराष्ट्र, यूपी, उत्तराखंड, कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली, एमपी, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा या राज्यांना वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत. आणि याबरोबरच देशात वंदे भारत ट्रेन सेवांचे शतक देखील झाले आहे. वंदे भारत रेल्वेगाड्यांचे जाळे आता देशातील 250 पेक्षा जास्त जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहे. लोकभावनेचा आदर करत सरकार वंदे भारत रेल्वेगाड्यांचे मार्ग देखील सातत्याने वाढवत आहे.
अहमदाबाद-जामनगर वंदे भारत ट्रेन आता द्वारकेपर्यंत जाणार आहे. आणि मी तर अगदी अलीकडेच द्वारका येथे पाण्याखाली बुडी मारून आलो आहे. अजमेर- दिल्ली सराय रोहिल्ला वंदे भारत एक्सप्रेस आता चंडीगढ़ पर्यंत जाईल. गोरखपुर-लखनौ वंदे भारत एक्सप्रेस आता प्रयागराज पर्यंत धावेल. आणि या वेळी तर  कुंभ मेळा होणार आहे तर मग याचे महत्त्व आणखी वाढेल. तिरुवनंतपुरम-कासरगोड वंदे भारत एक्सप्रेसचा मंगळूरू पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. 


मित्रांनो, 
आपण जगात कुठेही पाहिले तर जे देश समृद्ध झाले, औद्योगिक दृष्ट्या सक्षम झाले, त्यामध्ये रेल्वेची भूमिका खूप मोठी आहे. म्हणूनच, रेल्वेचा कायापालट ही देखील विकसित भारताची हमी आहे. आज रेल्वेत अभूतपूर्व वेगाने सुधारणा होत आहे. जलद गतीने नव्या रेल्वे ट्रॅकची निर्मिती, 1300 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण,  वंदे भारत, नमो भारत, अमृत भारत सारख्या नेक्स्ट जनरेशन ट्रेन, आधुनिक रेल्वे इंजिने आणि कोच कारखाने हे सर्व 21 व्या शतकातील भारतीय रेल्वेची प्रतिमा बदलत आहेत.

 

मित्रांनो, 
गती शक्ती कार्गो टर्मिनल धोरणांतर्गत कार्गो टर्मिनलच्या उभारणीला गती दिली जात आहे . यामुळे कार्गो टर्मिनलच्या उभारणीचा वेग वाढला आहे . जमीन भाडेपट्टी धोरण आणखी सोपे करण्यात आले आहे . जमीन भाडेपट्टीची प्रक्रिया देखील ऑनलाईन करण्यात आली आहे, यामुळे कामात पारदर्शकता आली आहे. देशातील परिवहन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत गतीशक्ती विद्यापीठाचीही स्थापना करण्यात आली आहे . भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे जोडण्यात आम्ही सातत्याने काम करत आहोत.
आम्ही रेल्वे जाळ्यातून मानवरहित फाटके काढून टाकून स्वयंचलित सिग्नल प्रणाली बसवत आहोत. आम्ही रेल्वेचे शंभर टक्के विद्युतीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत , आम्ही सौरऊर्जेवर चालणारी स्थानके बांधत आहोत. आम्ही या स्थानकावर परवडणाऱ्या दरात औषधांची जनऔषधी केंद्रे उभारत आहोत.


आणि मित्रांनो,
या रेल्वे गाड्या, हे रुळ, ही स्थानकेच केवळ तयार केली जात नाही आहेत, तर यामुळे मेड इन इंडियाची एक संपूर्ण परिसंस्था बनत आहे. देशात तयार झालेली इंजिने असोत किंवा रेल्वेगाड्यांचे डबे असोत, भारतातून श्रीलंका, मोझांबिक, सेनेगल, म्यानमार, सुदान यांसारख्या देशांना आपली ही उत्पादने निर्यात केली जात आहेत. भारतात तयार झालेल्या अर्ध-जलद रेल्वे गाड्यांची मागणी जगात वाढली तर कित्येक नवे कारखाने येथे तयार होतील. रेल्वेत होत असलेले हे सर्व प्रयत्न, रेल्वेचा हा कायापालट, नवी गुंतवणूक आणि गुंतवणुकीने नव्या रोजगारांची देखील हमी देत आहे.


मित्रांनो, 
आमच्या या प्रयत्नांकडे काही लोक निवडणुकीच्या चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्यासाठी ही विकास कामे, सरकार बनवण्यासाठी नाही आहेत, ही विकास कामे केवळ आणि केवळ देश घडवण्याचे मिशन आहेत. पूर्वीच्या पिढ्यांनी जे काही भोगले, ते आपल्या युवा वर्गाला आणि त्यांच्या मुलाबाळांना भोगावे लागणार नाही. आणि ही मोदींची गॅरंटी आहे.

 

मित्रांनो,
भाजपाच्या 10 वर्षांच्या विकासकाळाचे आणखी उदाहरण, पूर्व आणि पश्चिमी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देखील आहे. दशकांपासून ही मागणी केली जात होती की मालगाड्यांसाठी वेगळा ट्रॅक असला पाहिजे. असे झाले असते तर मालगाड्या आणि प्रवासी गाड्या या दोघांचा वेग वाढला असता. शेती, उद्योग, निर्यात, व्यापार-व्यवसाय प्रत्येक कामात वेग आणण्यासाठी हे खूप गरजेचे होते. मात्र, काँग्रेसच्या राज्यात हे प्रकल्प प्रलंबित राहिले, भरकटत राहिले, अडकत राहिले. गेल्या 10 वर्षात पूर्व आणि पश्चिमेच्या किनारपट्टीला जोडणारा हा फ्रेट कॉरिडॉर आता जवळजवळ पूर्ण झाला आहे.  आज सुमारे साडे 600 किलोमीटर फ्रेट कॉरिडॉरचे लोकार्पण झाले आहे, अहमदाबादमध्ये ते  तुम्ही आता पाहत आहात. परिचालन नियंत्रण केंद्राचे लोकार्पण झाले आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे आता या कॉरिडोरवर मालगाडीचा वेग दुपटीपेक्षा जास्त झाला आहे. या कॉरिडॉरमध्ये आताच्या तुलनेत मोठ्या वॅगन चालवण्याची क्षमता आहे, ज्यामध्ये आपण जास्त माल वाहून नेऊ शकतो. संपूर्ण फ्रेट कॉरिडॉरवर आता औद्योगिक कॉरिडॉर देखील तयार केले जात आहेत. आज अनेक ठिकाणी रेल्वे गुड्स शेड, गतीशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल, डिजिटल नियंत्रण स्थानक, रेल्वे वर्कशॉप, रेल्वे लोकोशेड, रेल्वे डेपोचे देखील लोकार्पण झाले आहे. याचा देखील मालवाहतुकीवर सकारात्मक परिणाम होणारच आहे.

मित्रांनो,
भारतीय रेल्वेला आपण आत्मनिर्भर भारताचे देखील एक नवे माध्यम बनवत  आहोत. मी वोकल फॉर लोकलचा प्रचारक आहे, तर भारतीय रेल्वे वोकल फॉर लोकलचे एक सशक्त माध्यम आहे. आपले विश्वकर्मा सहकारी, आपले कारागीर, शिल्पकार, महिला बचत गटांच्या स्थानिक उत्पादनांची आता रेल्वे स्थानकांवर देखील विक्री होणार आहे. आतापर्यंत रेल्वे स्थानकांवर ‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ चे 1500 स्टॉल्स सुरू झाले आहेत. याचा लाभ आपल्या हजारो गरीब बंधू भगिनींना होत आहे. 

मित्रांनो, 
आज भारतीय रेल्वे "विरासत भी विकास भी" हा मंत्र साकार करत प्रादेशिक संस्कृती आणि श्रद्धेशी संबंधित पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे, याचा मला आनंद आहे. आज देशात भारत गौरवच्या गाड्या रामायण सर्किट, गुरु-कृपा सर्किट, जैन यात्रा या मार्गांवर धावत आहेत . एवढेच नव्हे , तर आस्था स्पेशल ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रीराम भक्तांना अयोध्येत घेऊन जात आहेत. आतापर्यंत सुमारे 350 'आस्था' गाड्या धावल्या आहेत आणि या गाड्यांद्वारे साडेचार लाखांहून अधिक भाविकांनी अयोध्येतील रामलल्लाला भेट दिली आहे .

मित्रांनो,
भारतीय रेल्वे, आधुनिकतेच्या गतीने अशाच प्रकारे वेगाने पुढे जात राहणार आहे. आणि ही मोदींची गॅरंटी आहे. सर्व देशवासियांच्या सहकार्याने विकासाचा हा उत्सव देखील निरंतर सुरू राहणार आहे. पुन्हा एकदा मी सर्व मुख्यमंत्र्यांचे, राज्यपालांचे, आणि या 700 पेक्षा जास्त स्थानांवर इतक्या मोठ्या संख्येने लोक उभे आहेत, बसलेले आहेत आणि सकाळी  9-9.30 वाजता हा कार्यक्रम आयोजित करणे काही सोपे काम नाही आहे. आणि म्हणूनच हे दृश्य पाहायला मिळत आहे. जे इतक्या मोठ्या संख्येने आज आले आहेत, या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. 700 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हा विकास, ही नवी लहर यांचा त्यांना अनुभव येत आहे.मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार मानत आहे आणि मी तुम्हा सर्वांचा निरोप घेत आहे. नमस्कार.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi