व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, इथल्या धरतीचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील श्री देवेंद्र जी, नीतीन जी,रावसाहेब दानवे,डॉ भारती ताई आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागपूरच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो,
आज संकष्टी चतुर्थी आहे.कोणतेही शुभ कार्य करताना आपण प्रथम गणेश पूजन करतो.आज नागपूरमध्ये आहोत तर टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन ! 11 डिसेंबरचा आजचा दिवस संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी 11 ताऱ्यांच्या महानक्षत्राचा उदय होत आहे.
पहिला तारा- ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’जो नागपूर आणि शिर्डी साठी तयार झाला आहे. दुसरा तारा – नागपूर एम्स आहे, ज्याचा लाभ विदर्भातल्या मोठ्या भागातल्या जनतेला होणार आहे. तिसरा तारा नागपूरमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थच्या स्थापनेचा आहे.चौथा तारा – रक्त विषयक रोग प्रतिबंधासाठी चंद्रपूरमध्ये उभारण्यात आलेले आयसीएमआर चे संशोधन केंद्र.पाचवा-पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी अतिशय महत्वाच्या सीपेट चंद्रपूरची स्थापना. सहावा तारा म्हणजे नागपूरमध्ये नाग नदीतले प्रदूषण कमी करण्यासाठी सुरु झालेला प्रकल्प. सातवा तारा – नागपूरमध्ये मेट्रो टप्पा एकचे लोकार्पण आणि दुसऱ्या टप्याचे भूमिपूजन. आठवा तारा – नागपूर ते विलासपूर दरम्यान आजपासून सुरु झालेली वंदे भारत एक्स्प्रेस. नववा तारा – नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना.दहावा तारा – अजनी इथे 12 हजार अश्वशक्तीच्या रेल्वे इंजिनांकरिता देखभालीसाठीच्या डेपोचे लोकार्पण. अकरावा तारा – नागपूर- इटारसी मार्गावरच्या कोहली-नरखेड मार्गाचे लोकार्पण.अकरा ताऱ्यांचे हे महानक्षत्र, महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देईल, नवी उर्जा देईल. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या अमृत महोत्सवात 75 हजार कोटी रुपयांच्या या विकास कार्यासाठी महाराष्ट्राचे,महाराष्ट्राच्या जनतेचे खूप-खूप अभिनंदन.
मित्रहो,
दुहेरी इंजिन सरकार महाराष्ट्रात किती वेगाने काम करत आहे याची प्रचीतीही आजच्या या आयोजनातून येते.समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई यांच्यातले अंतर तर कमी होईलच, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांना आधुनिक कनेक्टीव्हिटीशी हा मार्ग जोडत आहे. याचा कृषी क्षेत्राला, शेतकऱ्यांना, विविध धार्मिक ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना, उद्योग क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
मित्रहो,
आजच्या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आज ज्या योजनांचे लोकार्पण झाले आहे त्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचा समग्र दृष्टीकोन दिसून येत आहे. एम्स म्हणजे वेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा आणि समृद्धी महामार्ग दुसऱ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा आहेत. अशाच प्रकारे वंदे भारत एक्स्प्रेस आणि नागपूर मेट्रो दोन्ही वेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा मात्र त्या एकाच गुच्छात, एकाच पुष्प गुच्छात असलेल्या वेगवेगळ्या फुलाप्रमाणे, ज्याच्या विकासाचा सुगंध प्रत्येकापर्यंत पोहोचेल.
विकासाच्या या गुच्छामध्ये 8 वर्षाच्या मेहनतीने तयार केलेल्या बागेचेही प्रतिबिंब आहे.सर्वसामान्यांसाठी आरोग्य सुविधा असोत किंवा संपत्ती निर्मिती असो, शेतकरी सक्षमीकरण असो किंवा जल संरक्षण असो, देशात प्रथमच असे सरकार आहे ज्याने पायाभूत सुविधांना मानवी स्वरूप दिले आहे.
पायाभूत सुविधांना दिलेला हा मानवी स्पर्श आज प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे.गरिबाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्मान भारत योजना,आपल्या सामाजिक पायाभूत सुविधांचे उदाहरण आहे. काशी, केदारनाथ,उज्जैन पासून पंढरपूर पर्यंत आपल्या तीर्थ स्थळांचा विकास आपल्या सांस्कृतिक पायाभूत सुविधांचे उदाहरण आहे.
45 कोटीहून अधिक गरिबांना बँकिंग यंत्रणेशी जोडणारी जन धन योजना आपल्या वित्तीय पायाभूत सुविधांचे उदाहरण आहे. नागपूर एम्स सारखी आधुनिक रुग्णालये सुरु करण्याचे अभियान आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांचे उदाहरण आहे. या सर्वांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे मानवी संवेदनांचे तत्व, मानवी स्पर्श, संवेदनशीलता.पायाभूत सुविधांना आपण केवळ निर्जीव रस्ते आणि फ्लायओव्हर पर्यंत मर्यादित ठेवू शकत नाही याची व्यापकता यापलीकडे खूप आहे.
मित्रहो,
पायाभूत सुविधांच्या कामात संवेदना नसेल, मानवी स्वरूप नसेल तर केवळ विटा,दगड, चुना, सिमेंट दिसते आणि त्याचे नुकसान देशाच्या जनतेला सोसावे लागते. गोसीखुर्द धरणाचे उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो. तीस-पस्तीस वर्षापूर्वी या धरणाचा पाया घातला गेला त्यावेळी याचा अंदाजित खर्च सुमारे 400 कोटी रुपये होता. मात्र संवेदनशून्य कार्यशैलीमुळे अनेक वर्षे काम रखडले आणि आता या धरणाचा अंदाजित खर्च 400 कोटीवरून वाढून 18 हजार कोटी रुपये झाला आहे. 2017 मध्ये दुहेरी इंजिन सरकार सत्तेवर आल्यानंतर या धरणाच्या कामाला वेग आला, प्रत्येक समस्या सोडवण्यात आली.या वर्षी हे धरण पूर्णपणे भरू शकले याचा मला आनंद आहे. आपण कल्पना करू शकता तीन दशकांहून जास्त काळ लोटल्यानंतर याचा लाभ गावांना, शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.
बंधू- भगिनीनो,
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात, विकसित भारत हा विशाल संकल्प घेऊन भारत वाटचाल करत आहे. विकसित भारत निर्मितीचा मार्ग आहे. भारताचे सामुहिक सामर्थ्य. विकसित भारत घडवण्याचा मंत्र आहे – राष्ट्राच्या विकासासाठी राज्यांचा विकास. मागच्या दशकांचा अनुभव सांगतो की आपण विकास जेव्हा मर्यादित ठेवतो तेव्हा संधीही मर्यादितच राहतात. जेव्हा शिक्षण हे ठराविक लोकांपुरते, काही वर्गापुरते मर्यादित होते तेव्हा राष्ट्राची प्रतिभा संपूर्णपणे फुलून समोर आली नव्हती.बँकांचे व्यवहार काही लोकांपुरतेच मर्यादित होते तेव्हा व्यापारालाही मर्यादा होत्या. उत्तम कनेक्टीव्हिटी काही शहरांपुरती सीमित होती तेव्हा विकासही त्याच चौकटीपुरता राहिला होता. म्हणजेच विकासाचा लाभ देशाच्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचत नव्हता आणि भारताचे वास्तव सामर्थ्य दिसून येत नव्हते. गेल्या आठ वर्षात आम्ही हा विचार आणि दृष्टीकोन दोन्हींमध्ये परिवर्तन घडवले आहे. सबका साथ-सबका साथ-सबका विश्वास-सबका विकास और सबका प्रयास यावर आम्ही भर देत आहोत.सबका प्रयास असा उल्लेख मी जेव्हा करतो तेव्हा त्यात देशाचा प्रत्येक नागरिक आणि देशातले प्रत्येक राज्य सामावलेले असते. लहान-मोठे कोणीही असो,सर्वांचे सामर्थ्य वाढेल तेव्हाच भारत विकसित होईल. म्हणूनच आम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहोत.जे मागास राहिले आहेत, वंचित राहिले आहेत,ज्यांना छोटे मानले गेले अशा सर्वाना प्रोत्साहन देत आहोत. म्हणजेच जो पूर्वी वंचित होता त्याला आता सरकार प्राधान्य देत आहे.
त्यामुळेच आज छोट्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा मोठा लाभ झाला आहे. आमच्या सरकारनच पशुपालकांना प्राधान्य देत, त्यांनाही किसान क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आपले हातगाडी, रेल्वेस्थानक, ठेल्यांवर बसणारे तसच,रस्त्यावरचे फेरीवाले बंधू-भगिनी, यांचा यापूर्वी कधीच विचार केला गेला नव्हता, तेही वंचितच राहिले होते. आज अशा लाखो मित्रांना बँकांकडून प्राधान्यानं सहजरित्या कर्ज मिळत आहे.
मित्रहो,
आपले आकांक्षी जिल्हे हे सुद्धा 'वंचितांना प्राधान्य' याचं आणखी एक उदाहरण आहेत. देशात 100 हून जास्त जिल्हे, स्वातंत्र्य मिळाल्यापासून इतक्या दशकांनंतरही विकासाच्या बाबतीत अनेक बाबींमध्ये खूप मागे होते. यापैकी बहुतेक भाग हे आदिवासी क्षेत्र होते, हिंसाचारग्रस्त विभाग होते. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या 8 वर्षांपासून, आम्ही या वंचित भागांच्या जलद विकासासाठी, त्यांना ऊर्जा केंद्रांमध्ये रूपांतरित करण्यावर भर देत आहोत. आज उद्घाटन आणि लोकार्पण झालेले प्रकल्प सुद्धा याच विचार आणि दृष्टिकोनाचं दृश्य रुप आहेत.
मित्रांनो,
आज तुमच्याशी बोलत असताना, मला महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील जनतेला भारताच्या राजकारणात येत असलेल्या विकृतीबद्दल सावध करायचे आहे. ही विकृती आहे, शॉर्टकट राजकारणाची!ही विकृती आहे, राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटण्याची! ही विकृती आहे, करदात्यांच्या कष्टानं कमावलेल्या पैशाची उधळण करण्याची!
फायद्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करणारे हे राजकीय पक्ष, हे राजकीय नेते, देशातील प्रत्येक करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. ज्यांचं उद्दिष्ट केवळ सत्तेवर येणं आहे, ज्यांचं उद्दिष्ट केवळ खोटी आश्वासनं देऊन सत्ता बळकावणं हेच आहे, ते कधीही देश घडवू शकत नाहीत. भारत पुढील 25 वर्षांच्या उद्दिष्टांवर काम करत असतानाच्या अशा या आजच्या काळात, काही राजकीय पक्ष मात्र त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू पहात आहेत.
आपल्या सर्वांच्या लक्षात असेल, जेव्हा पहिली औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा भारताला त्याचा फायदा घेता आला नाही, दुसऱ्या-तिसऱ्या औद्योगिक क्रांतीतही आपण मागे राहिलो, मात्र आज चौथ्या औद्योगिक क्रांतीची वेळ आली असताना भारतानं ही संधी गमावता कामा नये. मी पुन्हा म्हणेन, अशी संधी कोणत्याही देशाला वारंवार मिळत नाही. कोणताही देश शॉर्टकटच्या मार्गानं चालू शकत नाही, देशाच्या प्रगतीसाठी, शाश्वत विकासासाठी, कायमस्वरूपी उपाययोजना राबवणं, दूरदृष्टी असणं, दीर्घकालीन दृष्टीकोन बाळगणं खूप आवश्यक आहे आणि पायाभूत सुविधा हा शाश्वत विकासाचा गाभा आहे.
एकेकाळी दक्षिण कोरिया हा सुद्धा गरीब देश होता,मात्र त्या देशानं पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आपलं नशीब पालटवून दाखवलं आहे. आज, आखाती देश खूप पुढे आहेत आणि लाखो भारतीयांना तिथे रोजगार मिळतोय, कारण त्यांनीही गेल्या तीन-चार दशकांमध्ये त्यांच्या पायाभूत सुविधा, समर्थ, आधुनिक आणि भविष्याच्या दृष्टीकोनातून पक्क्या केल्या आहेत.
तुम्हाला माहीत आहे की आज भारतातील लोकांना सिंगापूरला जावसं वाटतं. काही दशकांपूर्वी पर्यंत, सिंगापूर हा देखील एक सामान्य बेट असलेला देश होता, इथले बरेचसे लोक मच्छिमारी करुन उदरनिर्वाह करत असत. मात्र, सिंगापूरनं पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली, योग्य आर्थिक धोरणं राबवली आणि आज ते जगाच्या अर्थव्यवस्थेचं केवढं मोठं केंद्र बनले आहेत. या देशांतही जर शॉर्टकट राजकारण झालं असतं, करदात्यांच्या पैशांची लूट झाली असती, तर या देशांना आज त्यांनी गाठलेली उंची, कधीच गाठता आली नसती. उशिरा का होईना, भारताकडे सुद्धा आज ही संधी चालून आली आहे. आधीच्या सरकारच्या काळात आपल्या देशातील प्रामाणिक करदात्यांनी भरलेला पैसा एकतर भ्रष्टाचारात वाया गेला किंवा मतपेढी बळकट करण्यात खर्च झाला. आज ही काळाची गरज बनली आहे की सरकारी तिजोरीतील पै न पै, देशाची संपत्ती असलेल्या तरुण पिढीचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी खर्च झाली पाहिजे.
आज मी भारतातील प्रत्येक तरुण तरुणीला विनंती करेन, प्रत्येक करदात्याला विनंती करेन- त्यांनी अशा स्वार्थी राजकीय पक्षांचा, अशा स्वार्थी राजकीय नेत्यांचा बुरखा फाडून त्यांचा खोटेपणा उघड करावा. ‘कमाई आठ आणे आणि खर्च एक रुपया’ अशी भपकेबाज प्रवृत्ती बाळगणारे राजकीय पक्ष, हा देश आतून साफ पोखरून टाकतील. याच दुष्प्रवृत्तींमुळे जगातल्या अनेक देशांमधली संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आपण पाहिली आहे. आपण सर्वांनी मिळून भारताला अशा नीतीहीन दुष्प्रवृत्तींपासून वाचवायचं आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की, एकीकडे “उत्पन्न कमी, खर्च दुप्पट” ही दिशाहीन दुष्प्रवृत्ती आणि केवळ स्वार्थ आहे, तर दुसरीकडे, समर्पण आणि राष्ट्रहिताची भावना, हे कायमस्वरूपी विकासासाठीचा प्रयत्न आणि कायमस्वरूपी उपाय आहेत.
आज भारतातील तरुणाईकडे जी संधी चालून आली आहे, ती आपण अशीच हातातून निसटून जाऊ देता कामा नये.आणि मला आनंद आहे की आज देशात शाश्वत विकास आणि शाश्वत उपायांना सामान्य माणसांचाही प्रचंड पाठिंबा मिळत आहे. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आले आहेत, ते कायमस्वरूपी विकास आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या आर्थिक धोरणाचा आणि विकास धोरणांचा परिपाक आहेत. शॉर्टकटचा अवलंब करणाऱ्या राजकारण्यांना मी नम्रपणे आणि आदरपूर्वक विनंती करतो की शाश्वत विकासाची दृष्टी बाळगा, अशा विकासाचं महत्त्व पटवून घ्या. देशाला आज याची किती गरज आहे ते समजून घ्या. शॉर्टकट ऐवजी कायमस्वरूपी विकास साधूनही निवडणुका जिंकता येतात, पुन्हा पुन्हा निवडणुका जिंकता येतात, होय, पुन्हा पुन्हा निवडणुका जिंकता येतात! अशा राजकीय पक्षांना माझं सांगणं आहे, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. मला खात्री आहे, जेव्हा तुम्ही देशाचं हित हेच सर्वस्व मानाल, तेव्हा तुम्ही शॉर्टकट राजकारणाचा मार्ग नक्कीच सोडाल.
बंधू आणि भगिनींनो,
या प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचं, देशातील जनतेचं अभिनंदन करतो. आणि माझ्या युवा मित्रवर्गाला सांगतो- हे जे विकासाचे 11 तारे मी आज तुम्हाला दाखवले आहेत, जे 11 तारे आज मी तुमच्यासमोर मोजले आहेत, ते 11 तारे तुमचं भविष्य घडवणार आहेत, तुमच्यासाठी संधी निर्माण करणार आहेत आणि हाच एक मार्ग आहे, हाच मार्ग योग्य आहे – एष: पंथ:, एष: पंथ:, या मंत्राचं अनुसरण करत आपण स्वतःला पूर्णपणे झोकून देत झटूयात. मित्रांनो, येणाऱ्या 25 वर्षांची ही संधी आपण अजिबात सोडता कामा नये.
खूप खूप आभार !