भारत माता की जय,
भारत माता की जय,
तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, अश्विनी वैष्णव जी, तेलंगणाचे भूमीपुत्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी किशन रेड्डी जी, खूप मोठ्या संख्येने आलेले तेलंगणातील माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,
प्रिय-मइना, सोदरा सोइदरी-मणुलारा, मी अंदरिकी, न हृदयपुर्वक नमस्कार-मुलु।
महान क्रांतिकारकांची भूमी, तेलंगणाला माझे शत-शत वंदन. आज मला तेलंगणाच्या विकासाला आणखी गती देण्याचे सौभाग्य मिळाले आहे. थोड्या वेळापूर्वी तेलंगणा-आंध्र प्रदेश यांना जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही आधुनिक गाडी आता भाग्यलक्ष्मी मंदिर शहराला भगवान श्री व्यंकटेश्वर धाम तिरूपतीशी जोडणार आहे. म्हणजे एकप्रकारे ही वंदेभारत एक्सप्रेस, श्रद्धा, आधुनिकता, तंत्रज्ञान आणि पर्यटन यांना जोडणारी आहे. त्यासोबतच, आज इथे, 11 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे. हे तेलंगणाच्या रेल्वे आणि रस्ते जोडणीशी संबंधित प्रकल्प आहेत. आरोग्यविषयक पायाभूत सुविधांशी जोडलेले प्रकल्प आहेत. मी विकासाच्या या सर्व प्रकल्पांसाठी, आपल्याला, तेलंगणाच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
तेलंगणा हे वेगळे राज्य निर्माण होऊन, साधारणपणे तितकाच काळ झाला आहे, जेवढे दिवस, केंद्रात रालोआ सरकारला झाले आहेत. तेलंगणाच्या निर्मितीत, तेलंगणाच्या घडणघडणीत ज्या सर्वसामान्य लोकांनी योगदान दिले आहे, त्या सर्व कोट्यवधी लोकांना, मी आदरपूर्वक वंदन करतो.
तेलंगणाच्या विकासाविषयी, तेलंगणातील लोकांच्या विकासाविषयी जे स्वप्न आपण पहिले होते, तेलंगणाच्या नागरिकांनी पहिले होते, ते पूर्ण करणे, रालोआ सरकार आपले कर्तव्य समजते. आम्ही ‘सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास-सबका प्रयास’ हा मंत्र घेऊन, पुढे वाटचाल करत आहोत. भारताच्या विकासाचे जे मॉडेल गेल्या नऊ वर्षात विकसित झाले आहे, त्याचा लाभ तेलंगणालाही जास्तीत जास्त मिळायला हवा, यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत.याचे एक उदाहरण म्हणजे, आपल्या शहरांचा विकास हे आहे. गेल्या नऊ वर्षात हैद्राबाद शहरातच सुमारे 70 किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क विकसित केले गेले. तसेच या काळात, हैद्राबाद बहू-पर्यायी वाहतूक व्यवस्था- एमएमटीएस प्रकल्पाचे काम देखील जलद गतीने सुरु आहे. आज देखील इथे, 13 एमएमटीएस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. एमएमटीएसचा जलद गतीने विस्तार व्हावा, यासाठी, यंदाच्या वर्षात, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात, तेलंगणा राज्यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे हैद्राबाद-सिकंदराबादसह, आजूबाजूच्या जिल्ह्यात लाखो लोकांच्या सुविधा अधिक वाढणार आहे. यामुळे नवे औद्योगिक केंद्र तर तयार होतीलच; शिवाय, नव्या भागात गुंतवणूक येण्यासही सुरुवात होईल.
मित्रांनो,
100 वर्षांत एकदाच येणारी कोविड सारखी गंभीर महामारी आणि दोन देशांमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे आज जगभरातील अर्थव्यवस्थामध्ये अत्यंत वेगाने चढउतार होत आहेत. या अनिश्चिततेच्या काळात, भारत जगातील अशा देशांपैकी एक आहे, जो आपल्या पायाभूत सुविधा आधुनिक करण्यासाठी विक्रमी गुंतवणूक करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देखील 10 लाख कोटी रुपये आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी देण्यात आले आहेत. आजचा नवा भारत, 21व्या शतकातील नवा भारत आहे, त्यात अत्यंत वेगाने देशाच्या कानाकोपऱ्यात आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करत आहे. तेलंगणा इथे, गेल्या 9 वर्षात रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 17 पट विकास केला गेला आहे. मघाशी अश्विनीजी त्याचेच आकडे सांगत होते. यामुळे नवे रेल्वे मार्ग बांधण्याचे काम असो, रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणाचे काम असो, किंवा मग विद्युतीकरणाचे काम असो, सगळी कामे अत्यंत विक्रमी वेळेत पूर्ण केली जात आहेत.
आज ज्या सिकांदराबाद आणि मेहबूबनगर दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, ते याचेच एक उदाहरण आहे. यामुळे हैद्राबाद आणि बंगरूळू दरम्यान दळणवळणात अधिक सुधारणा होईल. देशभरातील मोठ्या रेल्वे स्थानकांचे अधुनिकीकरण करण्याची जी मोहीम सुरु झाली आहे, त्याचा लाभ देखील तेलंगणाला मिळत आहे. सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचा विकास देखील याच मोहिमेचा भाग आहे.
मित्रांनो,
रेल्वे सोबतच केंद्र सरकार तेलंगणामध्ये महामार्गांचे जाळे देखील वेगाने विकसित करत आहे. आज 4 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन इथे झाले आहे. 2300 कोटी रुपये खर्चाचा अक्कलकोट - कर्नुल भाग असो, 1300 कोटी रुपये खर्चाचे मेहबूबनगर - चिंचोली भागाचे काम असो, जवळजवळ 900 कोटी रुपये खर्चाचे कलवाकुर्ती-कोल्लापुर महामार्गाचे काम असो, 2700 कोटी रुपये खर्चाच्या खम्मम-देवरापेल्ले भागाचे काम असो, केंद्र सरकार पूर्ण ताकदीनिशी तेलंगणाममध्ये राष्ट्रीय महामार्गां निर्मितीचे काम करत आहे. केंद्र सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे आज तेलंगणामध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी दुप्पट झाली आहे. वर्ष 2014 मध्ये जेव्हा तेलंगणा राज्याची निर्मिती झाली तेव्हा इथे जवळपास 2500 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते. आज तेलंगणामध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी वाढून 5 हजार किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे. या वर्षांमध्ये केंद्र सरकारने तेलंगणामध्ये राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी जवळ जवळ 35 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या वेळी सुद्धा तेलंगणामध्ये 60 हजार कोटी रुपयांचे रस्त्यांचे प्रकल्प सुरु आहेत. यात शहराच्या रंगरूपाला कलाटणी देणाऱ्या हैद्राबाद रिंग रोड प्रकल्पाचा देखील समावेश आहे.
मित्रांनो,
केंद्र सरकार तेलंगणामध्ये उद्योग आणि शेती दोन्हीच्या विकासावर भर देत आहे. वस्त्रोद्योग असाच उद्योग आहे, ज्यामुळे शेतकरी आणि मजूर दोघेही सक्षम होतात. आमच्या सरकारने देशभरात 7 महा वस्त्रोद्योग पार्क बनवायचे ठरवले आहे. यात एक महावस्त्रोद्योग पार्क तेलंगणामध्ये देखील बनणार आहे. यात तरुणांसाठी नवे रोजगार निर्माण होतील. रोजगारासोबतच तेलंगणामध्ये शिक्षण आणि आरोग्य यावर देखील केंद्र सरकार खूप मोठी गुंतवणूक करत आहे. तेलंगणाला आपलं स्वतःचं 'एम्स' देण्याचे सौभाग्य आमच्या सरकारला मिळाले आहे. एम्स, बिबीनगरशी संलग्नित विविध सुविधांसाठी देखील आज कामे सुरु झाली आहेत. आजचे हे प्रकल्प तेलंगणामध्ये प्रवासाची सुलभता, जगण्याची सुलभता आणि व्यवसायाची सुलभता, तिन्हीला चालना देतील.
खरं म्हणजे मित्रांनो, केंद्र सरकारच्या या प्रयत्नात, मला एका गोष्टीचं फार दुःख आहे, खूप पिडा होते. केंद्राचे बहुतांश प्रकल्प राज्य सरकारचे सहकार्य न मिळाल्याने रखडत आहेत, त्यांना उशीर लागतो आहे.
त्यामुळे तेलंगणातील जनतेचे, तुम्हा लोकांचे नुकसान होत आहे. मी राज्य सरकारला विनंती करतो की, विकासाशी संबंधित कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ देऊ नका, विकास कामांना गती द्या.
बंधू आणि भगिनींनो,
आजच्या नव्या भारतात देशवासीयांच्या आशा-आकांक्षा आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत घेत आहोत. मात्र काही मूठभर लोक या विकास कामांमुळे प्रचंड नाराज झाले आहेत. असे लोक जे कुटुंबवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत, त्यांना प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा अडथळा वाटतो. अशा लोकांना देशहिताशी आणि समाजाच्या हिताशी काहीही देणेघेणे नसते. या लोकांना फक्त आपल्या कुळाची भरभराट होताना पहायला आवडते. प्रत्येक प्रकल्पात, प्रत्येक गुंतवणुकीत हे लोक आपल्या कुटुंबाचा स्वार्थ पाहतात. तेलंगणाने अशा लोकांपासून खूप सावध राहण्याची गरज आहे.
बंधू आणि भगिनींनो,
भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. जिथे कुटुंबवाद आणि घराणेशाही असते, तिथूनच सर्व प्रकारचा भ्रष्टाचार फोफावतो. कुटुंबवाद, घराणेशाही आणि वंशवादाचा मूलमंत्रच प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणे, हा आहे. कुटुंबवाद्यांना प्रत्येक व्यवस्थेवर आपले नियंत्रण ठेवायचे असते. जेव्हा कोणी त्यांच्या विरोधात आव्हान देतं तेव्हा त्यांना ते अजिबात आवडत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आज, केंद्र सरकारने थेट लाभ हस्तांतरण व्यवस्था विकसित केली आहे, आज शेतकरी, विद्यार्थी, छोटे व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना आर्थिक मदतीचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. आम्ही देशभरात डिजिटल पेमेंट प्रणालीचा विस्तार केला आहे.
हे आधी का होऊ शकले नाही? हे घडले नाही कारण वंशवादी शक्तींना व्यवस्थेवरील आपले नियंत्रण सोडायचे नव्हते. कोणत्या लाभार्थ्याला कोणता लाभ आणि किती मिळणार यावर नियंत्रण या कुटुंबवाद्यांना स्वतःकडे ठेवायचे होते. यावरून त्यांचे तीन स्वार्थ साधले जात असत. एक, त्यांच्याच कुटुंबाची स्तुती होत राहिली पाहिजे. दुसरे म्हणजे, भ्रष्टाचाराचा पैसा त्यांच्या कुटुंबाकडेच येत राहिला पाहिजे. आणि तिसरे म्हणजे, गरिबांना पाठवलेल्या पैशांचा उपयोग त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेत वितरित करण्यासाठी व्हायला हवा.
आज मोदींनी भ्रष्टाचाराच्या या खऱ्या मुळावरच प्रहार केला आहे. तेलंगणातील बंधू भगिनींनो मला सांगा, तुम्ही उत्तर द्याल का? तुम्ही उत्तर द्याल का? भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे की नाही? भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध लढायला हवे की नाही? देश भ्रष्टाचारमुक्त झाला पाहिजे की नाही? भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कायदेशीर पावले उचलली पाहिजेत की नाही? भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करू द्यावी की नाही? आणि त्यामुळेच हे लोक धास्तावले आहेत, भीतीपोटी काहीही केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच असे अनेक राजकीय पक्ष न्यायालयात गेले, आमच्या भ्रष्टाचाराची वहीखाती कोणी उघडणार नाही, अशी सुरक्षा आम्हाला द्यावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात गेले, तेथेही न्यायालयाने त्यांना चपराक दिली.
बंधू आणि भगिनींनो,
जेव्हा सबका साथ-सबका विकास या भावनेने काम केले जाते तेव्हा लोकशाही खर्या अर्थाने मजबूत होते, तेव्हा वंचित-शोषित-पीडितांना प्राधान्य मिळते आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते, हाच संविधानाचा खरा आत्मा आहे. जेव्हा केंद्र सरकार 2014 मध्ये कुटुंबव्यवस्थेच्या बंधनातून मुक्त झाले, तेव्हा त्याचा काय परिणाम झाला हे साऱ्या देशाचे पहिले आहे. गेल्या 9 वर्षात देशातील 11 कोटी माता, भगिनी आणि मुलींना शौचालयाची सुविधा मिळाली आहे. यामध्ये तेलंगणातील 30 लाखांहून अधिक कुटुंबातील माता-भगिनींनाही ही सुविधा मिळाली आहे. गेल्या 9 वर्षांत देशातील 9 कोटींहून अधिक भगिनी आणि मुलींना उज्ज्वला गॅस जोडणी मोफत मिळाली आहे. तेलंगणातील 11 लाखांहून अधिक गरीब कुटुंबांनाही याचा लाभ मिळाला आहे.
मित्रहो,
घराणेशाही तेलंगणासह देशातील कोट्यवधी गरीब सहकाऱ्यांचे रेशनही लुटत होते. आज आपल्या सरकारमध्ये 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. त्यामुळे तेलंगणातील लाखो गरीब लोकांनाही मोठी मदत झाली आहे. आमच्या सरकारच्या धोरणांमुळे तेलंगणातील लाखो गरीबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळाली आहे. पहिल्यांदाच तेलंगणातील 1 कोटी कुटुंबांची जनधन बँक खाती उघडण्यात आली आहेत. तेलंगणातील अडीच लाख लघु उद्योजकांना हमी शिवाय मुद्रा कर्ज मिळाले आहे. येथे 5 लाख फेरीवाल्याना प्रथमच बँकेकडून कर्ज मिळाले आहे. तेलंगणातील 40 लाखांहून अधिक छोट्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत सुमारे 9 हजार कोटी रुपयेही मिळाले आहेत. हा तो वंचित वर्ग आहे, ज्याला प्रथमच प्राधान्य मिळाले आहे.
मित्रहो,
जेव्हा देश तुष्टीकरणापासून दूर जाऊन सर्वांच्या संतुष्टिकरणाच्या दिशेने वाटचाल करतो, तेव्हा खरा सामाजिक न्याय जन्माला येतो. आज तेलंगणासह संपूर्ण देशाला संतुष्टिकरणाच्या मार्गावर चालायचे आहे, सर्वांच्या प्रयत्नाने विकास साधायचा आहे. आजही तेलंगणाला मिळालेले प्रकल्प संतुष्टिकरणाच्या भावनेने प्रेरित आहेत, सर्वांच्या विकासासाठी समर्पित आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारत घडवण्यासाठी तेलंगणाचा जलद विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. आगामी 25 वर्षे तेलंगणासाठीही खूप महत्त्वाची आहेत. तेलंगणातील जनतेचे तुष्टीकरण आणि भ्रष्टाचारात बुडलेल्या अशा सर्व शक्तींपासून दूर राहणे हेच तेलंगणाचे भवितव्य निर्धारित करेल. आपल्याला एकजुटीने तेलंगणाच्या विकासाची सर्व स्वप्ने पूर्ण करायची आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तेलंगणातील माझ्या प्रिय बंधू-भगिनींचे अभिनंदन करतो. तेलंगणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, तेलंगणाच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आलात ही माझ्यासाठी खूप समाधानाची बाब आहे. मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो.
म्हणा, भारत माता की जय
भारत माता की जय,
भारत माता की जय,
खूप खूप धन्यवाद.