कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी, सद्गुरु श्री मधुसूदन साईजी, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, स्त्री आणि पुरुषहो,
कर्नाटका दा एल्ला सहोदरा सहोदरियारिगे नन्ना नमस्कारागलु!
मोठ्या उमेदीने आणि उत्साहाने, तुम्ही सर्वजण अनेक स्वप्ने आणि नवीन संकल्पांसह सेवेच्या या विशाल कार्यामध्ये सामील झाला आहात. तुम्हाला भेटणे हे देखील माझ्यासाठी सौभाग्यच आहे . मी तुमचा अत्यंत आभारी आहे. चिक्क-बल्लापुरा हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक सर एम. विश्वेश्वरय्या यांचे जन्मस्थान आहे. आत्ताच मला सर विश्वेश्वरय्यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करण्याचे आणि त्यांच्या संग्रहालयाला भेट देण्याचे भाग्य लाभले. या पवित्र भूमीला मी नतमस्तक होऊन वंदन करतो. या पवित्र भूमीतून प्रेरणा घेऊन त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी नवनवीन संशोधन केले, उत्कृष्ट अभियांत्रिकी प्रकल्प निर्माण केले.
मित्रहो,
या भूमीने सत्यसाई ग्रामच्या रूपाने देशसेवेचा एक अद्भुत आदर्शही या देशाला दिला आहे. शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून येथे ज्या प्रकारे मानवसेवेचे कार्य सुरू आहे ते खरोखरच अद्भुत आहे. आज हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याने ही मोहीम अधिक बळकट झाली आहे. श्री मधुसूदन साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था दरवर्षी अनेक नवीन प्रतिभावान डॉक्टर देशाच्या कोट्यवधी लोकांच्या सेवेसाठी राष्ट्राला समर्पित करतील. मी या संस्थेला आणि चिक्क-बल्लापुरा येथील सर्व जनतेचे खूप खूप अभिनंदन करतो.
बंधू आणि भगिनींनो,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाने विकसित होण्याचा संकल्प केला आहे. अनेक वेळा लोक विचारतात की भारताचा विकास इतक्या कमी वेळात कारण मी म्हटलं 2047 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील तोवर, त्यावर लोक विचारतात की इतक्या कमी वेळात भारताचा विकास कसा होणार? खूप आव्हानं आहेत, इतकी कामे आहेत, ती कमी वेळेत कशी पूर्ण होणार? या प्रश्नाचे एकच उत्तर आहे, खंबीर उत्तर, दृढ निश्चयाने भरलेले उत्तर, उद्दिष्ट गाठण्याची ताकद असलेले उत्तर आणि ते उत्तर आहे सबका प्रयास, प्रत्येकाचे प्रयत्न. प्रत्येक देशवासीयांच्या संयुक्त प्रयत्नांनीच हे शक्य होईल. त्यामुळे भाजप सरकार सातत्याने सर्वांच्या सहभागावर भर देत आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात आपल्या सामाजिक संस्था, धार्मिक संघटनांची भूमिकाही मोठी आहे. कर्नाटकचे संत, आश्रम आणि मठांची महान परंपरा आहे. श्रद्धा आणि अध्यात्मासोबतच या धार्मिक आणि सामाजिक संस्था गरीब, दलित, मागास, आदिवासींना सक्षम बनवत आहेत. तुमच्या संस्थेमार्फत होत असलेले सामाजिक कार्यही प्रत्येकाच्या प्रयत्नाची भावनाच बळकट करते.
मित्रहो,
मी पाहत होतो, श्री सत्य साई विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे- "योग: कर्मसु कौशलम्". म्हणजेच कृतीमध्ये कार्यक्षमता हाच योग आहे. गेल्या 9 वर्षात भारतातही आपण अत्यंत निष्ठेने, अत्यंत कुशलतेने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. देशात वैद्यकीय शिक्षणाशी निगडीत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकार तसेच इतर संस्थांना रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणे सोपे झाले आहे. सरकारी असो, खाजगी क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक उपक्रम असो, सर्वांच्या प्रयत्नांचे फळ आज दिसून येत आहे. सन 2014 मध्ये आपल्या देशात 380 पेक्षाही कमी वैद्यकीय महाविद्यालये होती. 380 पेक्षाही कमी. आज देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढून 650 पेक्षाही अधिक झाली आहे. यापैकी 40 वैद्यकीय महाविद्यालये आकांक्षी जिल्ह्य़ांमध्ये स्थापन करण्यात आली आहेत, जे जिल्हे विकासाच्या सर्वच बाबतीत पिछाडीवर होते, तिथे वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत.
मित्रहो,
मागील 9 वर्षांत देशातील वैद्यकीय जागांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात देशात जितके डॉक्टर बनले, तितकेच डॉक्टर येत्या 10 वर्षात बनणार आहेत. देशात होत असलेल्या या कामाचा फायदा कर्नाटकलाही मिळत आहे. आज कर्नाटकात सुमारे 70 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षांत जी वैद्यकीय महाविद्यालये बांधले गेली आहेत, त्यापैकी एक चिक्क-बल्लापुरा येथेही बांधले गेले आहे. केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात 150 नर्सिंग संस्था उभारण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे नर्सिंग क्षेत्रातही तरुणांना अनेक संधी निर्माण होणार आहेत.
मित्रहो,
आज, मी तुमच्याकडे आलो आहे, तर मला भारतातील वैद्यकीय व्यवसायासमोरील एका आव्हानाचाही उल्लेख करावासा वाटतो. या आव्हानामुळे गावातील, गरीब, मागासलेल्या समाजातील तरुणांना डॉक्टर बनणे फार कठीण होते. आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही पक्षांनी मतपेढीसाठी भाषेचा खेळ केला. पण खऱ्या अर्थाने भाषा बळकट करण्यासाठी जेवढे प्रयत्न व्हायला हवे होते, तेवढे झाले नाहीत. कन्नड ही एक समृद्ध भाषा आहे, देशाचा गौरव वाढवणारी भाषा आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयक शिक्षण कन्नड भाषेत उपलब्ध व्हावे यासाठी यापूर्वीच्या सरकारांनी पावले उचलली नाहीत.
खेड्यापाड्यातील-गावातील गरीब, दलित, मागासलेल्या कुटुंबातील मुला-मुलींनी डॉक्टर, इंजिनीअर व्हावे, असे या राजकीय पक्षांना वाटत नव्हते. गरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या आमच्या सरकारने कन्नडसह सर्व भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यासाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
बंधू आणि भगिनींनो,
गरिबांना फक्त व्होट बँक समजल्या जाणाऱ्या देशात असे राजकारण फार पूर्वीपासून सुरू आहे. भाजप सरकारने मात्र गरिबांची सेवा करणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य मानले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आरोग्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. आम्ही देशात स्वस्त औषधांची दुकाने, जनऔषधी केंद्रे उघडली आहेत. आज देशभरात सुमारे 10,000 जनऔषधी केंद्रे आहेत, त्यापैकी एकट्या कर्नाटकातच एक हजाराहून अधिक केंद्रे आहेत. या केंद्रांमुळे कर्नाटकातील गरिबांचे औषधांवर खर्च होणारे हजारो कोटी रुपये वाचले आहेत.
मित्रांनो,
गरीब लोक उपचारांसाठी रुग्णालयात जाण्याची हिंमत करु शकत नव्हते ते जुने दिवस आठवा, असे मी तुम्हाला सांगतो. भाजप सरकारने गरिबांची ही चिंता समजून घेतली आणि त्यावर मार्ग काढला. आज आयुष्मान भारत योजनेने गरीब कुटुंबांसाठी चांगल्या रुग्णालयांची दारे खुली केली आहेत. भाजप सरकारने गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची हमी दिली आहे. कर्नाटकातील लाखो लोकांनाही या योजनेचा लाभ झाला आहे.
मित्रांनो,
पूर्वी हृदयाच्या शस्त्रक्रिया, गुडघा बदलणे, डायलिसिस या सर्व उपचारपद्धती खूप महाग होत्या. गरिबांचे सरकार असलेल्या भाजप सरकारने या सगळ्या उपचारपद्धतीही स्वस्त केल्या आहेत. डायलिसिसची सुविधा मोफत मिळत असल्यामुळे गरिबांचे हजारो कोटी रुपये वाचले आहेत.
मित्रांनो,
आरोग्यविषयक धोरणांमध्ये आम्ही माता-भगिनींना सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. आईचे आरोग्य उत्तम राहिले आणि तिचे पोषण चांगले झाले तर संपूर्ण पिढीचे आरोग्य सुधारते. त्यामुळे शौचालये बांधण्याची योजना असो, मोफत गॅस कनेक्शन देण्याची योजना असो, प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची योजना असो, मोफत सॅनिटरी पॅड देण्याची योजना असो किंवा पौष्टिक आहारासाठी थेट बँकेत पैसे जमा करण्याची योजना असो, हे सर्व काही या माता- बहिणींच्या आरोग्याचा विचार करून केले जात आहे. स्तनाच्या कर्करोगाबाबत भाजप सरकार विशेष दक्ष आहे.
आता गावोगावी आरोग्य केंद्रे सुरू केली जात आहेत. या आरोग्य केंद्रांत अशा आजारांची तपासणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच रोगाचे निदान व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे माता-भगिनींच्या जीवनावरील मोठे संकट टाळण्यात यश मिळत आहे. कर्नाटकातही 9,000 हून अधिक आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रे स्थापन झाल्याबद्दल मी बोम्मई जी आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन करतो. मुली स्वतःही तंदुरूस्त राहतील आणि भविष्यात त्यांची मुलेही निरोगी राहू शकतील अशा प्रकारचे जीवन देण्यासाठी सरकार कार्यरत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज मी आणखी एका कारणासाठी कर्नाटक सरकारचे कौतुक करतो. गेल्या काही वर्षांत भाजप सरकारने सहायक परिचारिका मिडवायफरी (ऑक्झिलिअरी नर्स मिडवायफरी एएनएम) आणि आशा भगिनींना अधिक सशक्त केले आहे. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह गॅजेट्स दिल्याने त्यांचे काम सोपे झाले आहे. कर्नाटकात आज सुमारे 50,000 आशा आणि एएनएम कर्मचारी, सुमारे एक लाख नोंदणीकृत परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी आहेत. या सगळ्या सेवक- सेविकांना शक्य त्या सर्व सोयीसुविधा देऊन त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा डबल इंजिन सरकारचा प्रयत्न आहे.
मित्रांनो,
माता, भगिनी आणि मुलींच्या आरोग्यासोबतच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे डबल इंजिन सरकार पूर्ण लक्ष देत आहे. ही भूमी दूध आणि रेशमाची भूमी आहे. आमच्या सरकारनेच पशुपालकांसाठी किसान क्रेडिट कार्डची सुविधा दिली आहे. सरकारने पशुधनाच्या आरोग्यासाठी सर्वात मोठी मोफत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेवर 12 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. दुग्धशाळा सहकारी संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचाही डबल इंजिन सरकारचा प्रयत्न आहे. खेड्यापाड्यातील महिला बचत गटांनाही सक्षम केले जात आहे.
मित्रांनो,
देश निरोगी असेल, विकासासाठी सर्व प्रयत्न करतील तेव्हाच विकसित भारताचे उद्दिष्ट अधिक वेगाने साध्य करता येईल. मानवसेवेच्या या महान प्रयत्नासाठी मी श्री मधुसूदन साई संस्थेशी संबंधित सर्व सहकाऱ्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन करतो. भगवान साईबाबांसोबत माझे खूप जवळचे नाते होते आणि आमचे श्रीनिवास जी यांच्याशीही खूप जवळचे नाते होते, या नात्याला जवळपास 40 वर्षे झाली आहेत. म्हणूनच मी येथे अतिथी म्हणूनही आलेलो नाही की पाहुणा म्हणून नाही, मी येथे आलो आहे कारण मी याच भूमीचा पुत्र आहे आणि मी जेव्हा जेव्हा येथे येतो तेव्हा तेव्हा तुमच्याशी असलेले नाते नव्याने तयार होते, जुन्या आठवणी ताज्या होतात आणि अधिक घट्टपणे हे नाते जोडले जावे असे माझ्या मनात येते. मला येथे आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा पुन्हा एकदा खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद.