गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई जी, गोव्याचे युवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, हरदीप सिंह पुरी जी, रामेश्वर तेली जी, वेगवेगळ्या देशांतून आलेले प्रतिनिधी, भगिनी आणि सद्गृहस्थ हो !
भारत ऊर्जा सप्ताहाच्या दुस-या आवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे अभिनंदन, स्वागत करतो. ‘इंडिया एनर्जी वीक‘ म्हणजेच भारत ऊर्जा सप्ताहाचे, आयोजन नेहमीच चैतन्याने, ऊर्जेने भरलेल्या गोव्यामध्ये होत आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट अशी आहे. गोव्यामध्ये केले जाणारे आदरातिथ्य, यामुळे हे राज्य ओळखले जाते. संपूर्ण जगामधून इथे येणारे पर्यटक इथले सौंदर्य आणि संस्कृती पाहून मोहित होतात. गोवा हे एक असेही राज्य आहे की, विकासाच्या नवनवीन परिमाणांना स्पर्श करीत आहे. आज पर्यावरणाविषयी संवेदनशीलतेची चर्चा करण्यासाठी आपण एकत्रित जमलो आहे, म्हणजेच ‘शाश्वत भविष्या‘विषयी चर्चा करण्यासाठी गोवा हे अतिशय योग्य स्थान आहे, असे म्हणता येईल. मला विश्वास आहे की, या शिखर परिषदेमध्ये आलेले सर्व परदेशी प्रतिनिधी, आपल्याबरोबर गोव्याच्या चिरस्मृती - कायम स्मरणामध्ये राहतील अशा घेवून आठवणी घेवून जातील.
मित्रांनो,
भारत ऊर्जा सप्ताहाचे हे आयोजन एका महत्वपूर्ण कालखंडामध्ये होत आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्येच भारताचा जीडीपी दर साडेसात टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. वैश्विक वृद्धीचा विचार करून जो अंदाज व्यक्त केला आहे, त्यापेक्षाही हा दर खूप जास्त आहे.आज जगामध्ये सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. आणि अलिकडेच आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भविष्यवाणी केली आहे की, आपण अशाच वेगाने पुढे जाणार आहोत. आज संपूर्ण दुनियेतील अर्थतज्ज्ञांना वाटते की, भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताच्या या विकास गाथेमध्ये ऊर्जा क्षेत्राला खूप मोठे महत्व आहे. त्यामुळे या क्षेत्राचे महात्म्यही स्वाभाविकपणे वाढत आहे.
मित्रांनो,
जगामध्ये सर्वाधिक ऊर्जेचा वापर करणारा, विजेचा सर्वात मोठा तिसरा उपभोक्ता असलेला भारत देश आहे. भारत विश्वातला तिसरा सर्वात मोठा तेल वापरकर्ता आणि तिसरा सर्वात मोठा एलपीजी वापरणारा देश आहे. आम्ही जगातील चौथे सर्वात मोठे एलएनजी आयात करणारे आहोत , तेल शुद्धीकरणाची प्रक्रिया करणारा सर्वात मोठा चौथा देश आहे आणि चौथी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ असलेला देश आहे. आज भारतामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीचे नवनवीन विक्रम होत आहेत. भारतामध्ये इव्हीएस मागणी सातत्याने वाढत आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, भारताची प्राथमिक ऊर्जा मागणी 2045 पर्यंत दुप्पट होईल. याचा अर्थ आज जर आम्हाला दररोज जवळपास 19 दशलक्ष बॅरल्स इतक्या तेलाची आवश्यकता असते, तर 2045 पर्यंत त्यामध्ये वाढ होवून, ती गरज 38 दशलक्ष बॅरल्सपर्यंत पोहोचेल.
मित्रांनो,
भविष्यातील या गरजांचा विचार करून, भारत आत्तापासूनच तयारी करीत आहे. वाढत्या ऊर्जेची मागणी लक्षात घेवून भारत, देशाच्या प्रत्येक कानाकोप-यामध्ये परवडणारी ऊर्जा कशी मिळेल, हे सुनिश्चित करीत आहे. भारत एक असा देश आहे की, जिथे अनेक वैश्विक घटना घडत असतानाही, गेल्या दोन वर्षांमध्ये पेट्रोल आणि डीजल यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. याशिवाय भारताने शंभर टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य प्राप्त करून कोट्यवधी घरांपर्यंत वीज पोहोचवली आहे. आणि असे प्रयत्न केल्यामुळेच आज भारत वैश्विक मंचावर ऊर्जा क्षेत्रामध्ये इतका पुढे जात आहे. भारत फक्त आपल्या गरजा पूर्ण करीत आहे असे नाही तर , अवघ्या विश्वाच्या विकासाची दिशाही निश्चित करीत आहे.
मित्रांनो,
आज भारत आपल्याकडे 21 व्या शतकातील आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करीत आहे. आम्ही पायाभूत सुविधा निर्मितीचे काम ‘मिशन’ म्हणून करीत आहोत. या आर्थिक वर्षामध्ये पायाभूत सुविधा निर्मितीसाठी जवळपास 10 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करीत आहोत. अलिकडेच एका आठवड्यापूर्वी जो अर्थसंकल्प सादर केला आहे, त्यामध्ये आम्ही आता पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च करण्याचा संकल्प केला आहे. याचा एक मोठा हिस्सा ऊर्जा क्षेत्रामध्ये खर्च होणार, हे निश्चित आहे. इतक्या प्रचंड निधीतून रेल मार्ग, रस्ते, जलमार्ग, हवाईमार्ग असो, त्याचबरोबर गृहनिर्माण अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांची निर्मिती देशामध्ये केले जाईल. सर्वांना ऊर्जेची आवश्यकता असणार आहे. आणि म्हणूनच, तुम्ही पाहत असणार की, भारत कशा पद्धतीने आपल्या ऊर्जा क्षमतेत सातत्याने वृद्धी करीत आहे.
आमच्या सरकारने ज्या सुधारणा घडवून आणल्या, त्यामुळे भारतामध्ये घरगुती गॅसचे उत्पादन वेगाने वाढत आहे. आम्ही ‘प्रायमरी एनर्जी मिक्स’मध्ये नैसर्गिक वायूचे प्रमाण सहा टक्क्यांवरून वाढवून 15 टक्क्यांपर्यंत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी आगामी 5-6 वर्षांमध्ये जवळपास 67 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. आम्ही आधीपासूनच जगातील सर्वात मोठे तेल शुद्धीकरणाचे काम करणा-यांपैकी आहोत. आज आमची शुद्धीकरणाची क्षमता 254 एमएमटीपीए पेक्षा जास्त आहे. आम्ही 2030 पर्यंत भारताची तेल शुद्धीकरणाची क्षमता 450 एमएमटीपीए पर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. भारत पेट्रोरसायने आणि इतर तेल रसायनांच्या तयार उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा निर्यातक म्हणून पुढे आला आहे.
मी तुम्हांला अशी अनेक उदाहरणे देऊ शकतो. पण या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा आहे की भारत सध्या उर्जा क्षेत्रात जेवढी गुंतवणूक करत आहे तेवढी यापूर्वी कधीच झाली नव्हती. आणि म्हणूनच आज तेल, वायू आणि उर्जा क्षेत्रातील प्रत्येक प्रमुख कंपनी भारतात गुंतवणूक करू इच्छित आहे. अशा कित्येक कंपन्यांचे नेते आत्ता माझ्या समोर बसलेले आहेत. आम्ही अत्यंत उत्साहाने तुमचे देखील स्वागत करतो आहोत.
मित्रांनो,
चक्राकार अर्थव्यवस्था भारताच्या प्राचीन परंपरेचा भाग आहे. पुनर्वापराची संकल्पना देखील आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये सामावलेली आहे. आणि ही बाब उर्जा क्षेत्राशी देखील तेवढीच जोडली गेली आहे.गेल्या वर्षी, जी-20 शिखर परिषदेत आपण जी जागतिक जैवइंधन आघाडी सुरु केली होती तिच्या स्थापनेमागे देखील हीच भावना आहे. या आघाडीने संपूर्ण जगातील सरकारे, संस्था तसेच उद्योगांना एकत्र आणले आहे. जेव्हापासून ही आघाडी स्थापन झाली आहे तेव्हापासून तिला व्यापक प्रमाणात समर्थन मिळू लागले आहे. अगदी कमी काळातच 22 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना या आघाडीशी जोडल्या गेल्या आहेत. यातून संपूर्ण जगभरात जैवइंधनांच्या वापराला प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच या उपक्रमामुळे 500 अब्ज डॉलर्स मूल्याच्या आर्थिक संधी निर्माण करण्यात मदत होणार आहे.
मित्रांनो,
आपल्याकडे इथे भारताने देखील या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात जैवइंधनांचा वापर वेगाने वाढला आहे.10 वर्षांपूर्वी आपल्याकडे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे ब्लेंडिंग म्हणजे मिश्रण केवळ दीड टक्का होते. वर्ष 2023 मध्ये हे प्रमाण वाढून 12 टक्क्याहून अधिक झाले आहे. या उपक्रमामुळे कार्बनचे सुमारे 42 दशलक्ष टन कमी उत्सर्जन झाले आहे.आम्ही वर्ष 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंग करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटत आहोत. तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल... गेल्या भारत उर्जा सप्ताहादरम्यान भारताने 80 हून अधिक किरकोळ दुकानांमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगची सुरुवात केली होती. आता आम्ही देशातील 9 हजार दुकानांमध्ये या पद्धतीचा अवलंब करत आहोत.
मित्रांनो,
टाकाऊतून संपत्ती निर्मिती व्यवस्थापन मॉडेलच्या मदतीने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी भारतात 5000 कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्रे बसवण्याच्या उद्देशासह काम सुरु आहे.
मित्रांनो,
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17 टक्के लोकसंख्या असणारा देश असूनही जगात भारताचा कार्बन उत्सर्जनाचा वाटा केवळ 4 टक्के आहे. असे असले तरीही, आपण आपल्या उर्जाविषयक मिश्रणाला अधिक उत्तम स्वरूप देण्यासाठी पर्यावरणाप्रती संवेदनशील उर्जा स्त्रोतांच्या विकासावर भर देत आहोत. वर्ष 2070 पर्यंत आपण शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करू इच्छितो. आज भारत नवीकरणीय उर्जेच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे.आपल्या स्थापित वीजनिर्मिती क्षमतेपैकी 40 टक्के क्षमता आपण बिगर जीवाश्म इंधन स्त्रोतांकडून मिळवतो आहोत. गेल्या दशकभरात भारतातील सौरउर्जेची स्थापित क्षमता 20 पटीहून जास्त वाढली आहे.
सौर उर्जेचा वापर सुरु करण्याचे अभियान भारतात जन आंदोलनाचे रूप घेत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतात आणखी एका मोठ्या अभियानाची सुरुवात झाली आहे. भारतात 1 कोटी घरांच्या छतांवर सौर उर्जा निर्मिती संयंत्रे बसवण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आपल्या देशातील एक कोटी कुटुंबे विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार आहेत. त्यांच्या घरात जी अधिकची वीज निर्माण होईल ती थेट ग्रीडपर्यंत वाहून नेण्याची देखील व्यवस्था करण्यात येत आहे. तुम्ही कल्पना करू शकता, भारतासारख्या देशात या योजनेचा किती मोठा परिणाम होणार आहे. या संपूर्ण सौर मूल्य साखळीमध्ये तुम्हा सर्वांसाठी देखील गुंतवणुकीच्या फार मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
मित्रांनो,
आज भारत हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात देखील वेगाने वाटचाल करत आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानामुळे भारत लवकरच हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनेल. भारताचे हरित उर्जा क्षेत्र गुंतवणूकदार आणि उद्योगक्षेत्र अशा दोन्हींना खात्रीने विजयी करेल असा विश्वास मला वाटतो.
मित्रांनो,
भारत उर्जा सप्ताहाचे हे आयोजन केवळ भारताने केलेले आयोजन नाही तर हे आयोजन ‘संपूर्ण जगासह भारत आणि संपूर्ण जगासाठी भारत’ या संकल्पनेचे प्रतिबिंब आहे. आणि म्हणूनच हा मंच आज उर्जा क्षेत्राशी संबंधित विचार विनिमय आणि अनुभव सामायिक करण्यासाठीचा मंच झाला आहे.
चला, एकमेकांकडून शिकण्यासाठी, तंत्रज्ञानाच्या सामायीकीकरणासाठी आणि शाश्वत उर्जेचे नवे मार्ग शोधण्यासाठी एकमेकांसोबत पुढील मार्गक्रमण करुया. आपण सर्वजण एकमेकांकडून शिकूया, अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी सहयोग देऊया आणि शाश्वत उर्जेच्या विकासाचे नवे मार्ग शोधूया.
जे समृध्द सुद्धा असेल आणि ज्यामध्ये पर्यावरणाचे संरक्षण देखील होत असेल असे भविष्य आपण सर्वजण एकत्र येऊन घडवू शकतो. हा मंच आपल्या प्रयत्नांचे प्रतीक होईल असा मला विश्वास वाटतो. या आयोजनाबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
खूप-खूप धन्यवाद।