आसामचे राज्यपाल श्री गुलाबचंद कटारिया जी, मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया जी आणि डॉ. भारती पवार जी, आसाम सरकारचे मंत्री केशब महंता जी, वैद्यकीय जगतातील सर्व मान्यवर व्यक्ती, विविध ठिकाणांहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडलेले सर्व मान्यवर आणि आसामच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.
माँ कामाख्या देवीच्या आशीर्वाद असलेल्या या पुण्यभूमीतल्या सर्व अहोम जनतेला, बंधू-भगिनींना विनम्र अभिवादन! तुम्हा सर्वांना रोंगली बिहूच्या खूप खूप शुभेच्छा! या शुभ प्रसंगी, आसाम आणि ईशान्येकडील आरोग्य पायाभूत सुविधांना आज नवी चालना मिळाली आहे. आज ईशान्यकेडील प्रदेशाला पहिले एम्स रुग्णालय प्राप्त झाले आहे आणि आसामला तीन नवीन वैद्यकीय महाविद्यालये मिळाली आहेत. आयआयटी (IIT) गुवाहाटीच्या सहकार्याने आधुनिक संशोधनासाठी 500 खाटांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणीही करण्यात आली आहे. आसाममधील लाखो मित्रांना आयुष्मान कार्ड वितरित करणे देखील मिशन मोडवर सुरू झाले आहे. आसाम व्यतिरिक्त, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोराम आणि मणिपूरमधील लोकांनाही या नवीन एम्स रुग्णालयाचा खूप फायदा होणार आहे. ईशान्येतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, या सर्व आरोग्याशी संबंधित प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
बंधू आणि भगिनींनो,
गेल्या नऊ वर्षांतील ईशान्येकडील कनेक्टिव्हिटीशी संबंधित पायाभूत सुविधांबद्दल बरीच चर्चा आहे. आज जो कोणी ईशान्येकडे येतो तो रस्ते, रेल्वे आणि विमानतळाशी संबंधित कामांची प्रशंसा करतो. तथापि, ईशान्येकडील आणखी एक पायाभूत सुविधा आहे जिथे प्रशंसनीय काम झाले आहे आणि ती म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधा. मित्रांनो, येथील शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा विस्तार खरोखरच अभूतपूर्व आहे. गेल्या वर्षी जेव्हा मी दिब्रुगडला गेलो होतो तेव्हा मला आसामच्या अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी अनेक रुग्णालयांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाली. आज एम्स आणि तीन वैद्यकीय महाविद्यालये तुमच्याकडे सोपवण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. गेल्या काही वर्षांत आसाममध्ये दंत महाविद्यालयांची सुविधाही विस्तारली आहे. ईशान्येतील सतत सुधारत असलेल्या रेल्वे-रोड कनेक्टिव्हिटीमुळेही येथील नागरिकांना मोठी मदत होत आहे. विशेषतः गरोदरपणात महिलांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागत होते त्या आता दूर झाल्या आहेत. परिणामी, आई आणि बाळाच्या जीवाला असलेला धोका खूप कमी झाला आहे.
आजकाल, एखाद्याला नवीन रोगाचा उदय झाल्याचे लक्षात येते. मी देशात कुठेही जातो, उत्तरेत, दक्षिणेत, ईशान्येत, तेव्हा गेल्या नऊ वर्षांतील विकासकामांची चर्चा करतो. मात्र यामुळे काही लोक खूप अस्वस्थ होतात. हा एक नवीन आजार आहे. त्यांनीही अनेक दशके देशावर राज्य केल्याची त्यांची तक्रार आहे, मग त्यांना श्रेय का मिळत नाही? श्रेय घेण्याची भूक असलेल्या या लोकांमुळे आणि जनतेवर राज्य करण्याच्या त्यांच्या भावनेमुळे या देशाचे खूप नुकसान झाले आहे. जनता ही ईश्वराचे रूप असते. ते केवळ श्रेय घेण्यासाठी भुकेले होते, त्यामुळे ईशान्य भाग त्यांना दूरचा वाटला आणि त्यांच्यात परकेपणाची भावना निर्माण झाली. सेवेच्या भावनेतून, तुमचा ‘सेवक’ होण्याच्या नात्याने आणि समर्पणाने आम्ही तुमची सेवा करत आहोत. आणि म्हणूनच ईशान्येकडचा भाग आपल्याला फार दूर वाटत नाही आणि आपलेपणाची भावना कधीही संकुचित राहत नाही.
मला आनंद आहे की आज ईशान्येतील जनतेने विकासाची सर्व सूत्रे स्वत: स्वीकारलेली आहेत. ईशान्येचा विकास हाच भारताचा विकास हा मंत्र घेऊन ते पुढे जात आहेत. विकासाच्या या नव्या वाटचालीत केंद्र सरकार सर्व राज्यांसोबत मित्र, ‘सेवक’ आणि भागीदार म्हणून काम करत आहे. आजची घटनाही याचे जिवंत उदाहरण आहे.
मित्रांनो,
आपला ईशान्येकडचा अनेक दशकांपासून अनेक आव्हानांचा सामना करत आहे. जेव्हा घराणेशाही, प्रादेशिकवाद, भ्रष्टाचार आणि अस्थिरतेचे राजकारण एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजवते, तेव्हा विकास होणे अशक्य होते आणि हेच आपल्या आरोग्य व्यवस्थेचे झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालय 50 च्या दशकात बांधले गेले. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दिल्लीतल्या एम्समध्ये उपचारासाठी येत असत. पण देशाच्या इतर भागातही एम्स रुग्णालयांची स्थापना व्हावी, असे अनेक दशकांपासून कुणालाच वाटले नव्हते. अटलजींच्या सरकारने यासाठी प्रथमच प्रयत्न केले. मात्र त्यांचे सरकार बदलल्यानंतर सर्व काही ठप्प झाले. त्याकाळी स्थापन झालेल्या एम्समध्येही सुविधांची दुरवस्था झाली. वर्ष 2014 नंतर आम्ही या सर्व उणीवा दूर केल्या. गेल्या काही वर्षांत आम्ही 15 नवीन एम्स रुग्णालयांचे काम सुरू केले. यापैकी बहुतांश एम्समध्ये उपचार आणि शिक्षण या दोन्ही सुविधा सुरू झाल्या आहेत. गुवाहाटी एम्स( AIIMS) हे देखील एक उदाहरण आहे की आपले सरकार जे काही ठराव करते, ते पूर्णही करते. आसाममधील लोकांची ही आपुलकीच मला येथे वारंवार येण्यास भाग पाडते. पायाभरणी समारंभाच्या वेळीही तुमच्या याच आपुलकीने मला येथे बोलावले आणि आज बिहूच्या पवित्र प्रसंगी त्याचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आहे.हे तुमचेच प्रेम आहे.
मित्रांनो,
पूर्वीच्या सरकारांच्या धोरणांमुळे आपल्याकडे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांची तीव्र कमतरता आहे. ही कमतरता भारतातील दर्जेदार आरोग्य सेवेतील एक मोठा अडथळा होती. त्यामुळे आमच्या सरकारने गेल्या नऊ वर्षांत वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय व्यावसायिक वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. वर्ष 2014 पूर्वीच्या 10 वर्षांत केवळ 150 वैद्यकीय महाविद्यालये बांधली गेली. गेल्या नऊ वर्षांत आमच्या शासन काळात सुमारे 300 नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधली गेली. देशात एमबीबीएसच्या जागाही गेल्या नऊ वर्षांत दुपटीने वाढून एक लाखांहून अधिक झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षात देशात वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या पदव्युत्तर जागांच्या संख्येत 110 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारासाठी आम्ही राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना केली आहे. मागासवर्गीय कुटुंबांनाही आम्ही आरक्षणाची सुविधा दिली आहे जेणेकरून त्यांची मुले डॉक्टर होऊ शकतील. दुर्गम भागातील मुलेही डॉक्टर होऊ शकतील यासाठी आम्ही प्रथमच भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दीडशेहून अधिक नर्सिंग (परिचारिका) प्रशिक्षण कॉलेज सुरू करण्याची घोषणाही यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. जर मला ईशान्येकडच्या भागाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या नऊ वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुपटीने वाढली आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम सुरू आहे. येथे अनेक नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार आहेत. गेल्या नऊ वर्षांत, ईशान्येकडील वैद्यकीय जागांची संख्याही पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज भारतात आरोग्य क्षेत्रात इतके काम होत आहे तर ते 2014 मध्ये तुम्ही एक स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन केल्यामुळेच. भाजप सरकारमधील धोरण, हेतू आणि निष्ठा कोणत्याही स्वार्थावर आधारित नसून आमची धोरणे 'राष्ट्र प्रथम, देशवासी प्रथम' या भावनेने प्रेरित आहेत. त्यामुळेच आम्ही व्होट बँकेकडे डोळे लावून बसण्यापेक्षा देशातील जनतेच्या समस्या कमी करण्यावर भर दिला आहे. आम्ही ठरवले आहे की आमच्या भगिनींना यापुढे उपचारासाठी फार दूर जावे लागणार नाही. आम्ही ठरवले आहे की पैशांअभावी कोणत्याही गरीबाला आपले उपचार पुढे ढकलावे लागणार नाहीत. आमच्या गरीब कुटुंबांनाही त्यांच्या घराजवळ चांगले उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
मित्रांनो,
उपचारासाठी पैसे नसल्यामुळे गरीबांना किती काळजी वाटते हे मला माहीत आहे. म्हणूनच आमच्या सरकारने 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार प्रदान करणारी आयुष्मान योजना सुरू केली आहे. महागड्या औषधांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक किती हैराण आहेत हे मला माहीत आहे. त्यामुळे आमच्या सरकारने 9,000 पेक्षा अधिक जनऔषधी केंद्रे उघडली आणि या केंद्रांवर स्वस्त दरातील शेकडो औषधे उपलब्ध करून दिली. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक हृदय आणि गुडघ्याच्या शस्त्रक्रियेवर किती खर्च करत होते हे मला माहीत आहे. त्यामुळेच आमच्या सरकारने स्टेंट आणि गुडघे प्रत्यारोपणाच्या किमती नियंत्रित केल्या. गरीबांना जेव्हा डायलिसिसची गरज असते तेव्हा त्यांना किती काळजी वाटते ते मला माहीत आहे. त्यामुळे आमच्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यात मोफत डायलिसिसची योजना सुरू केली आणि परिणामी लाखो लोकांना त्याचा लाभ झाला. गंभीर आजार वेळेत ओळखणे किती महत्त्वाचे आहे हे मला माहीत आहे. म्हणूनच आमच्या सरकारने देशभरात 1.5 लाखाहून अधिक आरोग्य आणि उपचार केंद्रे उघडली आहेत. या केंद्रात आवश्यक चाचण्या करण्याची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. मला माहीत आहे की क्षयरोग हा अनेक दशकांपासून गरिबांसाठी एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे आमच्या सरकारने प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान सुरू केले. आम्ही उर्वरित जगाच्या पाच वर्ष आधीच क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कोणताही आजार गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचा कसा नाश करतो हे मला माहीत आहे. त्यामुळे आमच्या सरकारने रोग होऊ नयेत याची काळजी घेऊन प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर भर दिला आहे. योग- आयुर्वेद आणि फिट इंडिया मोहिमेला लोकप्रिय करून आम्ही लोकांना आरोग्याबाबत सातत्याने जागरूक केले आहे.
मित्रांनो,
आज जेव्हा मी या सरकारी योजनांचे यश पाहतो तेव्हा मी स्वतःला धन्य समजतो कारण देवाने आणि जनतेने मला गरिबांची सेवा करण्याचा आशीर्वाद दिला आहे. आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आज देशातील करोडो गरीब लोकांसाठी मोठा आधार ठरली आहे. गेल्या काही वर्षांत आयुष्मान भारत योजनेने गरिबांना 80,000 कोटी रुपये खर्च करण्यापासून वाचवले आहे. जनऔषधी केंद्रांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे 20 हजार कोटी रुपये खर्च होण्यापासून वाचले आहेत. स्टेंट आणि गुडघा प्रत्यारोपणाच्या खर्चात कपात केल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांची दरवर्षी 13,000 कोटी रुपयांची बचत होत आहे. मोफत डायलिसिसच्या सुविधेमुळे मुत्रपिंड आजाराच्या गरीब रुग्णांची 500 कोटींहून अधिक रक्कम खर्च होण्यापासून वाचली आहे. आज आसाममधील एक कोटीहून अधिक नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देण्याची मोहीम सुरू झाली आहे. आसाममधील लोकांना या मोहिमेतून खूप मदत मिळणार असून त्यांच्या पैशांची बचत होणार आहे.
मित्रांनो,
मी अनेकदा देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांना भेटतो. या देवाणघेवाणीमध्ये आपल्या माता-भगिनी, मुलगे आणि मुली मोठ्या संख्येने सहभागी होतात. आधीच्या सरकारच्या काळात आणि आताच्या भाजप सरकारच्या काळात आरोग्य सुविधांमध्ये मोठी तफावत असल्याचे ते मला सांगतात. तुम्हाला आणि मला माहित आहे की जेव्हा आरोग्य आणि उपचारांचा मुद्दा येतो तेव्हा आपल्या स्त्रिया बरेचदा मागे राहतात. आपल्या माता-भगिनींना असे वाटते की आपल्या उपचारावर घरातील पैसे का खर्च करावे आणि इतरांना त्रास का द्यावा. साधनांची कमतरता आणि आर्थिक चणचण यामुळे देशातील करोडो महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे.
आमच्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या योजनांचा आपल्या माता -भगिनी आणि महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदा झाला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या कोट्यवधी शौचालयांनी महिलांना अनेक आजारांपासून वाचवले आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत मिळालेल्या गॅस कनेक्शनमुळे महिलांची जीवघेण्या धुरापासून सुटका झाली आहे. जल जीवन अभियानांतर्गत प्रत्येक घरात पाणी उपलब्ध झाल्याने करोडो महिला जलजन्य आजारांपासून वाचल्या आहेत. इंद्रधनुष मिशनने करोडो महिलांचे मोफत लसीकरण करून त्यांना गंभीर आजारांपासून दूर ठेवले आहे. आयुष्मान भारत योजने अंतर्गत महिलांना रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची हमी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेने गरोदरपणात महिलांना आर्थिक मदत मिळणे सुनिश्चित केले आहे. राष्ट्रीय पोषण अभियानामुळे महिलांना पौष्टिक आहार मिळण्यास मदत झाली आहे. जेंव्हा सरकार संवेदनशील असते आणि गरीबांप्रती सेवा भाव असतो तेंव्हा असेच काम केले जाते.
मित्रांनो,
आमचे सरकार 21 व्या शतकातील गरजांनुसार भारताच्या आरोग्य क्षेत्राचे आधुनिकीकरण करत आहे. आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत आज देशवासियांना डिजिटल आरोग्य ओळखपत्र दिले जात आहेत. देशभरातील रुग्णालये आणि आरोग्य व्यावसायिकांना एका व्यासपीठावर आणले जात आहे. या सुविधेमुळे देशातील नागरिकांची संपूर्ण आरोग्य नोंद फक्त एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात मदत होईल आणि योग्य डॉक्टरांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. मला आनंद आहे की या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 38 कोटी डिजिटल ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक आरोग्य सुविधा आणि दीड लाखांहून अधिक आरोग्य व्यावसायिकांची पडताळणी करण्यात आली आहे. आज लोकांसाठी घरबसल्या ई-संजीवनी हे उपचारासाठी पसंतीचे माध्यम बनत आहे. देशभरातील सुमारे 10 कोटी मित्रांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
भारताच्या आरोग्य व्यवस्थेतील बदलाचा प्रमुख आधार म्हणजे ‘सबका प्रयास’ (प्रत्येकाचा प्रयत्न). कोरोना संकटाच्या काळात ‘सबका प्रयास’ चे सामर्थ्य आपण पाहिले आहे. जगातील सर्वात मोठ्या, जलद आणि सर्वात प्रभावी कोविड लसीकरण मोहिमेचे जग आज कौतुक करत आहे. आम्ही मेड इन इंडिया मोहीमे अंतर्गत स्वदेशात लसी बनवल्या आणि अल्पावधीतच त्या दूरवर पोहोचवल्या. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य सेविकांपासून ते औषधनिर्माण क्षेत्रापर्यंत सर्वांनी अप्रतिम काम केले. एवढा मोठा महायज्ञ तेव्हाच सफल होतो जेव्हा ‘सबका प्रयास’ आणि ‘सबका विश्वास’ सोबत असतो. ‘सबका प्रयास’ या भावनेने आपल्याला पुढे जायचे आहे. चला, 'सबका प्रयास' भावनेसोबत निरोगी भारत आणि समृद्ध भारताचे ध्येय पुढे नेऊया. मी पुन्हा एकदा आसाममधील लोकांचे एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांसाठी अभिनंदन करतो. तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आणि तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमचा आभारी आहे. यासोबतच मी माझ्या भाषणाचा समारोप करतो.