एरो इंडियाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे केले प्रकाशन
“बेंगलुरूचे आकाश नव्या भारताच्या क्षमतांची साक्ष देत असून; ही नवी उंची म्हणजे नव्या भारताची सत्यता आहे”
“देशाला बळकट करण्यासाठी कर्नाटकच्या युवकांनी त्यांच्याकडील तांत्रिक कौशल्याचा वापर संरक्षण क्षेत्रात करायला हवा”
“नवी विचारधारणा आणि नव्या दृष्टीकोनासह जेव्हा देश प्रगती करतो तेव्हा देशातील यंत्रणा देखील त्या विचारधारणेनुसार बदलू लागतात”
“आज एरो इंडिया हे केवळ प्रदर्शन राहिलेले नाही, त्यात केवळ संरक्षण क्षेत्रातील उद्योगांच्या व्याप्तीचे दर्शन घडत नाही तर भारताच्या आत्म-विश्वासाचे देखील दर्शन घडते”
“21व्या शतकातील नवीन भारत कोणतीही संधी वाया घालवणार नाही आणि प्रयत्नांमध्ये कोणतीही कसूर देखील करणार नाही”
“संरक्षण विषयक सामग्रीचे सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट होण्यासाठी भारत वेगवान प्रयत्न करेल आणि आपले खासगी क्षेत्र तसेच गुंतवणूकदार यात फार मोठी भूमिका निभावतील”
“आजचा भारत जलदगतीने विचार करतो, दूरवरचा विचार करतो आणि त्वरेने निर्णय घेतो”
एरो इंडियाच्या कानठळ्या बसविणाऱ्या गर्जनेतून भारताच्या सुधारणा, कार्यप्रदर्शन आणि परिवर्तनाचा संदेश दुमदुमत आहे’’

आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित कर्नाटकचे राज्यपाल, मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी,  मंत्रिमंडळातले माझे सहकारी,देश-विदेशातून आलेले संरक्षण मंत्री,उद्योग क्षेत्रातले सन्माननीय प्रतिनिधी, अन्य मान्यवर, बंधू आणि भगिनींनो !

एरो इंडियाचे हे रोमहर्षक क्षण अनुभवण्यासाठी उपस्थित सर्वांचे मी अभिनंदन करतो. बंगळूरूचे आकाश आज नव भारताच्या  सामर्थ्याची प्रचीती देत आहे. बंगळूरूचे हे आकाश आज याची साक्ष देत आहे की नव-नवी शिखरे साध्य करणे हे नव भारताचे वास्तव आहे. आज देश नव-नवी शिखरे सर करत आहे.  

मित्रांनो,  

एरो इंडियाचे हे आयोजन भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे उदाहरण आहे. यामध्ये सुमारे 100 देशांची उपस्थिती, भारताप्रती जगभरात वाढलेल्या विश्वासाची साक्ष देत आहे. देश- विदेशातले 700 हून अधिक प्रदर्शनकर्ते यात सहभागी होत आहेत.याने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.यामध्ये भारतीय सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योगही आहेत,स्वदेशी स्टार्ट अप्स आहेत आणि जगभरातल्या मान्यवर कंपन्याही आहेत.म्हणजेच एरो इंडियाची ‘अब्जावधी संधीकरिता  झेप घेण्यासाठीचा रनवे’ ही संकल्पना जमिनीपासून आकाशापर्यंत सर्वत्र  दिसून येत आहे. आत्मनिर्भर होणाऱ्या भारताचे सामर्थ्य असेच वृद्धिंगत होवो अशीच माझी इच्छा आहे.

मित्रांनो,  

इथे एरो इंडियाच्या बरोबरच संरक्षण मंत्र्यांची परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. जगभरातील विविध देशांचा सहभाग, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सक्रीय भागीदारी यामुळे एरो इंडियाच्या जागतिक संधी आणखी वाढवण्यासाठी मदत होईल. मित्र देशांसमवेत विश्वसनीय भागीदारी वृद्धींगत करण्यासाठीही हे प्रदर्शन माध्यम ठरेल.या सर्व उपक्रमांसाठी मी संरक्षण मंत्रालय आणि उद्योग क्षेत्रातल्या  मित्रवर्गाचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

एरो इंडिया आणखी एका कारणामुळे खास आहे. भारतात तंत्रज्ञान जगतात निपुण असलेल्या कर्नाटक सारख्या राज्यात एरो इंडिया होत आहे. यामुळे एरो स्पेस आणि संरक्षण क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील.यातून कर्नाटकमधल्या युवकांसाठी नव्या संधी निर्माण होतील.तंत्रज्ञानामध्ये आपण जे नैपुण्य प्राप्त केले आहे , ते संरक्षण  क्षेत्रात देशाचे सामर्थ्य बनवावे,  असे आवाहन मी कर्नाटकमधल्या युवकांना करतो. या संधींचा  आपण जितका जास्तीत जास्त लाभ घ्याल तितका संरक्षण क्षेत्रात नवोन्मेषाचा मार्ग खुला होईल.

मित्रांनो,

जेव्हा एखादा देश नवा विचार,नवा दृष्टीकोन घेऊन,मार्गक्रमण करतो तेव्हा त्याची व्यवस्थाही नव्या विचारानुसार चालू लागते.एरो इंडियाच्या या  आयोजनातून  आज नव भारताचा नवा दृष्टीकोन प्रतिबिंबीत होतो . एक काळ होता हा केवळ एक प्रदर्शनाचा भाग किंवा एक प्रकारे भारताला सामुग्री विक्री करण्‍यासाठीचे हे एक आयोजन मानले जात असे. गेल्या काही वर्षात देशाने ही धारणा बदलली आहे. आज एरो इंडिया केवळ एक प्रदर्शन नाही तर हे भारताचे सामर्थ्यही आहे. भारतीय संरक्षण उद्योगामध्ये असलेल्या संधी आणि भारताचा आत्मविश्वास यावरही हे लक्ष केंद्रित करते. कारण आज जगभरातल्या संरक्षण  कंपन्यांसाठी भारत केवळ एक बाजारपेठ नाही तर भारत आज संभाव्य संरक्षण भागीदारही आहे. ही भागीदारी संरक्षण क्षेत्रात अग्रगण्य देशांसमवेत आहे. जे देश आज संरक्षण गरजांसाठी विश्वासार्ह साथीदाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी भारत आज उत्तम भागीदार म्हणून पुढे येत आहे. आपले तंत्रज्ञान या देशांसाठी किफायतशीरही आहे आणि विश्वासार्हही आहे. आपल्या इथे उत्तम नवोन्मेशही प्राप्त होईल आणि प्रामाणिक हेतूही आपल्यासमोर आहे.

मित्रांनो,

आपल्याकडे म्हटले जाते -  “प्रत्यक्षम् किम् प्रमाणम्” अर्थात,  जे प्रत्यक्ष आहे ते सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. आज भारतातल्या संधींचे, भारताच्या सामर्थ्याचे प्रमाण आपले यश देत आहे.  आकाशात रोरावणारी तेजस लढाऊ विमाने ‘मेक इन इंडिया’ च्या सामर्थ्याचे द्योतक आहेत.हिंदी महासागरातले विमानवाहू आयएनएस विक्रांत ‘मेक इन इंडिया’च्या व्याप्तीचे प्रमाण आहे. गुजरातमध्ये C-295ची निर्मिती असो किंवा तुमकुरू मध्ये एचएएलचे हेलिकॉप्टर युनिट असो,आत्मनिर्भर भारताचे हे वाढते सामर्थ्य आहे ज्यामध्ये  भारताबरोबरच जगासाठीही नव-नवे पर्याय आणि उतमोत्तम संधी आहेत.        

मित्रहो,

एकविसाव्या शतकातला भारत, आता एकही संधी गमावणार नाही, आणि आपल्या मेहनतीत कोणतीही कसर ठेवणार नाही. आम्ही आता कंबर कसली आहे. आम्ही सुधारणांच्या रस्त्यावर प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहोत. जो देश दशकांपासून संरक्षण सामुग्रीचा सर्वात मोठा आयातदार होता, तोच आता जगातल्या 75 देशांना संरक्षण उपकरणांची निर्यात करत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये देशाची संरक्षण क्षेत्राची निर्यात सहा पट वाढली आहे. सन 2021-22 मध्ये आपण, 1.5 अब्ज डॉलर्सचा पेक्षा जास्त, आतापर्यंतची विक्रमी निर्यात केली आहे.

मित्रहो,

आपण हे जाणता, की संरक्षण हे असं क्षेत्र आहे, ज्याचं तंत्रज्ञान, ज्याची बाजारपेठ, आणि ज्याचा व्यापार हा सर्वात क्लिष्ट स्वरूपाचा,गुंतागुंतीचा   मानला जातो. असं असूनही, भारताने अवघ्या आठ-नऊ वर्षांच्या कालावधीत आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्राचा कायापालट केला आहे. म्हणूनच, आम्ही सध्या याला एक सुरुवात समजत आहोत. 2024-25 पर्यंत निर्यातीची ही आकडेवारी दीड अब्जावरून पाच अब्ज डॉलर्सवर नेणं हे आमचं उद्दिष्ट आहे. या काळात केलेले परिश्रम हे भारतासाठी एका लाँच पॅड सारखं काम करतील. आता इथपासून भारत, जगातल्या सर्वात मोठ्या संरक्षण निर्यातदार देशांमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने वेगाने पावलं उचलणार आहे. आणि यात आपल्या खासगी क्षेत्राची आणि गुंतवणूकदारांची भूमिका महत्वाची राहणार आहे. आज मी भारतातल्या खासगी क्षेत्राला हे आवाहन करतो, की त्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करावी. भारताच्या संरक्षण क्षेत्रातली आपली प्रत्येक गुंतवणूक ही भारता व्यतिरिक्त जगातल्या अनेक देशांमध्ये आपल्या व्यापार-उद्योगासाठी एक प्रकारे नवीन मार्ग खुला करेल. नवीन शक्यता, नव्या संधी आपल्या समोर आहेत. भारताच्या खासगी क्षेत्राने ही संधी दवडता कामा नये.    

मित्रांनो,

अमृत काळातला भारत एका फायटर पायलट सारखा पुढे निघाला आहे. एक असा देश, ज्याला आकाशात नवी उंची गाठण्याची भीती वाटत नाही. जो सर्वात उंच भरारी घ्यायला उत्सुक आहे. आजचा भारत जलद विचार करतो, दूरवरचा विचार करतो, आणि तात्काळ निर्णय घेतो, अगदी तसंच, जसं आकाशात भरारी घेणारा एखादा वैमानिक करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, भारताचा वेग कितीही असो, तो कितीही उंचीवर असो, तो नेहमीच आपल्या मुळांशी घट्ट जोडलेला राहतो, त्याला जमिनीवरच्या परिस्थितीची नेहमीच जाणीव असते. हेच तर आपले वैमानिकही करतात.

एरो इंडियाच्या गगनभेदी गर्जनेतही भारताच्या रीफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कामगिरी) आणि ट्रान्सफॉर्मचा (परिवर्तन) प्रतिध्वनी आहे. आज भारतात जसं निर्णायक सरकार आहे, जशी स्थिर धोरणं आहेत, धोरणांमध्ये जसं स्वच्छ उद्दिष्ट आहे, ते अभूतपूर्व आहे. भारतातल्या या समर्थन देणाऱ्या परिस्थितीचा प्रत्येक कार्यक्रमाने पूर्ण,  पुरेपूर लाभ घ्यायला हवा. तुम्ही बघतच आहात, की व्यापार सुलभतेसाठी भारतात केल्या गेलेल्या सुधारणांची चर्चा संपूर्ण जगात आहे. जागतिक गुंतवणूक आणि भारतीय नवोन्मेष, यासाठी अनुकूल वातावरण बनवण्यासाठी आम्ही अनेक पावलं उचलली आहेत. भारताच्या संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला (एफडीए) मंजुरी देण्यासाठीचे नियम सोपे करण्यात आले आहेत. आता अनेक क्षेत्रांमध्ये एफडीए ला स्वयंचलित मार्गाने मंजुरी मिळत आहे. आम्ही उद्योगांना परवाने देण्याची प्रक्रिया सोपी केली आहे, त्याच्या वैधतेचा कालावधी वाढवला आहे, जेणे करून त्यांना एकच प्रक्रिया वारंवार करावी लागू नये. नुकताच 10-12 दिवसांपूर्वी भारताचा जो अर्थसंकल्प सादर झाला आहे, त्यामध्ये उत्पादन कंपन्यांना मिळणारी कर सवलत वाढवण्यात आली आहे. त्याचा फायदा संरक्षण क्षेत्राशी जोडलेल्या कंपन्यांनाही होणार आहे.

मित्रहो,

जिथे मागणी ही आहे, क्षमताही आहे, आणि अनुभवही आहे, नैसर्गिक तत्त्वानुसार, त्या ठिकाणी उद्योग दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. मी आपल्याला खात्री देतो, की भारतातल्या संरक्षण क्षेत्राला बळकट करण्याची प्रक्रिया भविष्यात आणखी वेगाने पुढे जाईल. आपल्याला एकत्र येऊन त्या दिशेने पुढे जायचं आहे. मला विश्वास आहे, की आगामी काळात आपण एरो इंडियाच्या आणखी भव्य आणि दिमाखदार कार्यक्रमांचं आयोजन करू. याबरोबरच मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो.

भारत माता की जय!   

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December

Media Coverage

Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government