भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी पुरुषोत्तम रुपाला जी, संसदेमधील माझे मित्र सी आर पाटील, अमूलचे अध्यक्ष श्यामल भाई, आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या बंधू-भगिनींनो! गुजरात मधील गावांनी मिळून 50 वर्षांपूर्वी जे रोप लावले होते ते आज विशाल वटवृक्ष बनले आहे आणि या विशाल वटवृक्षाच्या फांद्या आज देश परदेशात पसरल्या आहेत. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.गुजरात मधील दूध समितीशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक पुरुषाचे, प्रत्येक महिलेचे मी अभिनंदन करतो. याचबरोबर आपले एक आणखी मित्र आहेत जे दुग्ध व्यवसाय क्षेत्रातले सर्वात मोठे भागीदार आहेत. मी त्यांना सुद्धा नमस्कार करतो. हे भागीदार आहेत, आपले पशुधन. मी आज या प्रवासाला यशस्वी बनवण्यामध्ये पशुधनाच्या योगदानाला सुद्धा सन्मानित करत आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत आहे. त्यांच्या शिवाय दुग्ध व्यवसाय क्षेत्राची कल्पना सुद्धा केली जाऊ शकत नाही आणि यासाठीच माझ्या देशातल्या पशुधनाला सुद्धा माझा प्रणाम आहे.
बंधू आणि भगिनींनो,
भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशामध्ये खूप सारे ब्रँड निर्माण झाले मात्र अमूल सारखा कोणताच झाला नाही. आज अमूल भारतातील पशुपालकांच्या सामर्थ्याची सुद्धा ओळख बनलेले आहे.अमूल म्हणजे विश्वास.
अमूल म्हणजेच विकास, अमूल म्हणजे लोकसहभाग, अमूल म्हणजेच शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, अमूल म्हणजेच काळानुरूप आधुनिकतेचा समावेश, अमूल म्हणजेच आत्मनिर्भर भारताची प्रेरणा, अमूल म्हणजे मोठी स्वप्न, मोठे संकल्प आणि त्यापेक्षाही मोठी सिद्धी . आज जगातील 50 पेक्षा जास्त देशांमध्ये अमूलची उत्पादने निर्यात केली जात आहेत. 18 हजार पेक्षा जास्त दुग्ध सहकार गट, 36 लाख शेतकऱ्यांचे जाळे, प्रत्येक दिवशी साडेतीन कोटी लिटर पेक्षा जास्त दुधाचे संकलन, प्रत्येक दिवशी पशुपालकांना 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक ऑनलाइन पैसे, हे सर्व काही सोपे नाही. छोट्या छोट्या पशुपालकांची ही संस्था, आज ज्या प्रकारे मोठ्या स्वरूपात काम करत आहे, तीच तर संघटनेची ताकद आहे, सहकाराची ताकद आहे.
बंधू आणि भगिनींनो,
दूरगामी विचारांनी घेतले गेलेले निर्णय कित्येक वेळेला येणाऱ्या पिढ्यांचे भाग्य कसे बदलून टाकते, अमूल याचे सुद्धा एक उदाहरण आहे. आजच्या अमूलची पायाभरणी सरदार वल्लभ भाई पटेल जी यांच्या मार्गदर्शनाखाली खेडा दुग्ध संघटनेच्या रूपाने केली गेली होती. काळानुरूप दुग्ध सहकार क्षेत्र गुजरात मध्ये आणखीनच व्यापक होत गेले आणि त्यानंतर गुजरात दूध विपणन महासंघाची स्थापना झाली.
आजही हे सरकार आणि सहकार यांच्यातील ताळमेळाचे एक उत्तम उदाहरण आहे. अशाच प्रकारच्या कारणांमुळे आपण आज जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक देश बनलो आहोत. भारताच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्रामध्ये 8 कोटी लोक थेट जोडले गेले आहेत. जेव्हा मला मागच्या दहा वर्षातील झालेल्या कामाबद्दल बोलायचे झाले तर भारतामध्ये दूध उत्पादनामध्ये 60 टक्क्यांची वाढ झालेली आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता सुद्धा जवळजवळ 40% टक्क्यांनी वाढलेली आहे.जगामध्ये दुग्ध व्यवसाय क्षेत्र केवळ 2 टक्के दराने वाढत आहे, त्याच वेळेस भारतामध्ये दुग्ध व्यवसाय क्षेत्र 6 टक्क्याच्या दराने वाढ नोंदवत आहे.
मित्रांनो,
भारताच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या एका सर्वात मोठ्या वैशिष्ट्यावर पाहिजे तेवढी चर्चा होत नाही. आज या ऐतिहासिक प्रसंगी मी या विषयावर सुद्धा विस्ताराने चर्चा करू इच्छित आहे. भारतामध्ये 10 लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या डेअरी क्षेत्राची प्रमुख कर्ताधर्ता ही या देशातली नारीशक्ती आहे. आपल्या माता आहेत, आपल्या भगिनी आहेत, आपल्या मुली आहेत, आज देशांमध्ये धान, गहू आणि ऊस या तिन्ही पिकांना एकत्र केले तरी या पिकांची उलाढाल 10 लाख कोटी रुपये होत नाही. 10 लाख कोटी उलाढाल असलेल्या दुग्ध व्यवसाय क्षेत्रामध्ये 70 टक्के काम करणाऱ्या या आपल्या माता, भगिनी आणि मुलीच आहेत. भारतातल्या दुग्ध व्यवसाय क्षेत्राचा खरा आधार, खरा कणा या आपल्या महिलाशक्ती आहेत. आज अमूल ज्या यशाच्या उंचीवर पोहोचला आहे, तो केवळ आणि केवळ महिला शक्तीमुळेच आहे. आज जेव्हा भारत महिला नेतृत्वाखालील विकास हा मंत्र घेऊन पुढे चालत आहे तेव्हा भारतातल्या दुग्ध व्यवसाय क्षेत्राचे हे यश त्यासाठी एक खूप मोठी प्रेरणा ठरू शकते. मी असे समजतो की, भारताला विकसित बनवण्यासाठी भारतातल्या प्रत्येक महिलेची आर्थिक ताकद वाढवणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. यासाठीच आमचे सरकार आज स्त्रियांची आर्थिक ताकद वाढवण्यासाठी सर्वांगीण काम करत आहे. मुद्रा योजनेच्या अंतर्गत सरकारने जी 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत दिलेली आहे त्यापैकी जवळजवळ 70% लाभार्थी या भगिनी आणि मुलीच आहेत.सरकारच्या प्रयत्नामुळेच मागच्या 10 वर्षांमध्ये महिलांच्या स्वयंसहाय्यता बचत गटाशी संलग्न महिलांची संख्या 10 कोटी पेक्षा अधिक झालेली आहे. मागच्या 10 वर्षांमध्ये भाजपा सरकारने त्यांना 6 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत केलेली आहे. सरकारने पीएम आवास योजनेच्या माध्यमातून देशांमध्ये जी 4 कोटी पेक्षा अधिक घरे दिलेली आहेत त्यापैकी जास्तीत जास्त घरे ही महिलांच्याच नावावर आहेत. अशा प्रकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून आज समाजामध्ये महिलांची आर्थिक भागीदारी वाढत चालली आहे.तुम्ही नमो ड्रोन दीदी अभियानाबद्दल नक्कीच ऐकले असेल. या अभियानाच्या अंतर्गत सुरुवातीला गावामध्ये स्वयंसहाय्यता बचत गटांना 15 हजार आधुनिक ड्रोन दिले जात आहेत. हे आधुनिक ड्रोन उडवण्यासाठी नमो ड्रोन दीदी यांना प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे. आणि आता तो दिवस दूर नाही जेव्हा गावा गावामध्ये नमो ड्रोन दीदी या कीटकनाशक फवारणी करण्याबरोबर खत फवारणीमध्ये सुद्धा सर्वात पुढे राहतील.
मित्रांनो,
मला आनंद आहे की इथे गुजरात मध्ये सुद्धा आमच्या दूध सहकार समित्यांमध्ये सुद्धा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मला आठवत आहे, जेव्हा मी गुजरात मध्ये होतो, तेव्हा आम्ही दुग्ध व्यवसाय क्षेत्राशी निगडित महिलांसाठी एक आणखीन मोठे काम केले होते.
आम्ही हे सुनिश्चित केले होते की, दुग्ध व्यवसायातील पैसा आपल्या भगिनी, मुलींच्या बँक खात्यामध्ये थेट जमा झाला पाहिजे. मी आज या भावनेला अधिक दृढ केल्याबद्दल सुद्धा अमूलची प्रशंसा करतो. प्रत्येक गावांमध्ये सूक्ष्म एटीएम लावल्यामुळे पशुपालकांना पैसे काढण्यासाठी खूप दूर जाण्याची गरज भासणार नाही. येणाऱ्या काळात पशुपालकांना रुपे क्रेडिट कार्ड देण्याची सुद्धा योजना आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या रूपाने पंचमहाल आणि बनासकांठा इथे या योजनेची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे.
बंधू आणि भगिनींनो,
गांधीजी म्हणत असत की, भारताचा आत्मा गावांमध्ये वसतो. विकसित भारताच्या निर्मितीसाठी भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम होणे गरजेचे आहे. याआधी, केंद्रामध्ये जी सरकारे होती ती ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या गरजांना तुकड्यां-तुकड्यांमध्ये बघत होती.
आम्ही गावातील प्रत्येक पैलूला प्राधान्य देत काम पुढे नेत आहोत.
छोट्या शेतकऱ्यांचे जीवनमान आणखी कसे उंचावेल यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. पशुपालनाची व्याप्ती कशी वाढेल यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. जनावरांचे आरोग्य कसे चांगले होईल यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. गावांमध्ये पशुपालना सोबतच मत्स्यपालन आणि मधुमक्षिका पालन याला कसे प्रोत्साहित केले जावे यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. याच विचारसह आम्ही पहिल्यांदा पशुपालक आणि, मच्छीमारांना देखील किसान क्रेडिट कार्डची सुविधा दिली आहे. हवामान बदलाचा सामना करू शकतील असे आधुनिक बियाणे आम्ही शेतकऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय गोकुल अभियानासारख्या मोहिमांद्वारे दुभत्या प्राण्यांच्या जाती सुधारण्यासाठीही भाजप सरकार काम करत आहे. बऱ्याच काळापासून, लाळ्या खुरकत रोग - आपल्या पशुंसाठी मोठ्या संकटाचे कारण राहिले आहे. या महामारीमुळे तुम्हा सर्व पशुपालकांचे दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात मोफत लसीकरण मोहीम राबवली आहे. या मोहिमेवर 15 हजार कोटींहून अधिक रुपये खर्च केले जात आहेत. या अंतर्गत 60 कोटी लस मात्रा देण्यात आल्या आहेत. आम्ही 2030 पर्यंत लाळ्या खुरकूत रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी काम करत आहोत.
मित्रांनो,
पशुधनाच्या समृद्धीकरिता काल आमच्या मंत्रिमंडळाची बैठक होती. मंत्रिमंडळाची बैठक काल रात्री जरा उशिरापर्यंत चालली. कालच्या या बैठकीत भाजपा सरकारने मंत्रिमंडळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राष्ट्रीय पशुधन अभियानामध्ये सुधारणा करून देशी जातीच्या प्रजाती वाचवण्यासाठी नवीन उपायांची घोषणा झाली आहे. ओसाड जमिनीचा कुरण म्हणून वापर करता यावा यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जनावरांचा विमा काढताना शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा यासाठी हप्त्याची किंमत कमी करण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला आहे. हे निर्णय, जनावरांची संख्या वाढवण्यात, पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यात आणखी सहाय्यभूत ठरतील.
मित्रांनो,
पाण्याचे संकट काय असते हे आपल्या गुजरातमधील लोकांना ठाऊक आहे. सौराष्ट्रात, कच्छमधे, उत्तर गुजरातेत दुष्काळाच्या दिवसांमधे हजारो जनावरे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मैलोंन् मैल चालताना आपण पाहिली आहे. मृत जनावरांचे ढिग, ते चित्रही आपण पाहिले आहे. नर्मदेचे पाणी पोहचल्यानंतर अशा भागांचे भाग्यच बदलले आहे. भविष्यात अशा आव्हानांचा सामना करावा लागू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सरकारने जे 60 हजार पेक्षा अधिक अमृतसरोवरे बनवली आहेत, ती देखील देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला खूपच सहाय्यभूत ठरतील. गावातील छोट्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने जोडावे हा देखील आमचा प्रयत्न आहे. गुजरातमध्ये सूक्ष्म सिंचनाची व्याप्ती, ठिबक सिंचनाची व्याप्ती गेल्या काही वर्षांत अनेक पटींनी वाढली आहे, हे तुम्ही पाहिले आहे .ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. शेतकऱ्यांना गावाजवळच वैज्ञानिक तोडगा मिळावा यासाठी लाखो किसान समृद्धी केंद्रांची स्थापना आम्ही केली आहे. शेतकऱ्यांना सेंद्रीय खत बनवण्यात मदत व्हावी यासाठीही व्यवस्था उभारली जात आहे.
मित्रांनो,
अन्नदात्यास, ऊर्जादाता बनवण्यासोबतच खतदाता बनवण्यावरही आमच्या सरकारचा भर आहे. आम्ही शेतकऱ्यांना सौरपंप देत आहोत, शेताच्या बांधावरच छोटे छोटे सौर संयत्र बसवण्यासाठी मदत करत आहोत. याशिवाय, गोबरधन योजने अंतर्गत पशुपालकांकडून शेण खरेदी करण्याची व्यवस्था उभारली जात आहे. डेअरीच्या ठिकाणी शेणापासून वीजनिर्मिती केली जात आहे. त्यातून तयार होणारे सेंद्रीय खत शेतकऱ्यांना कमी किमतीत उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकरी आणि जनावरे, दोघांना फायदा तर होईलच, शेतजमीनीचाही कस वाढेल. अमूलचा बनासकांठा इथला गोबर गॅस प्रकल्प याच दिशेने एक मोठे पाऊल आहे.
मित्रांनो,
ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकाराची व्याप्ती आम्ही खूप अधिक विस्तारत आहोत. यासाठी, केन्द्रात आम्हीच पहिल्यांदा स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. देशात आज 2 लाखापेक्षा अधिक गावांमध्ये सहकारी समित्या बनवल्या जात आहेत. शेती असो, पशुपालन असो, मत्स्यपालन असो, या सर्वच क्षेत्रात या समित्या बनवल्या जात आहेत.
आम्ही तर, मेड इन इंडीया म्हणजे उत्पादन क्षेत्रातही सहकारी समित्यांना प्रोत्साहन देत आहोत. त्यांच्यासाठी कर देखील खूप कमी केले आहेत. देशात 10 हजार शेतकरी उत्पादक संघ म्हणजे एफपीओ तयार केले जात आहेत. यापैकी सुमारे 8 हजार तयारही झाले आहेत. या छोट्या शेतकऱ्यांच्या मोठ्या संघटना आहेत. छोट्या शेतकऱ्यांना उत्पादका सोबतच कृषी उद्योजक आणि निर्यातकही बनवण्याची ही मोहीम आहे.
भाजपा सरकार आज पॅक्सला, एफपीओंना, दुसऱ्या सहकारी समित्यांना कोट्यवधी रुपयांची मदत करत आहे. गावांमध्ये शेती संबंधित पायाभूत सुविधां करिता एक लाख कोटी रुपयांचा निधी देखील आम्ही उभारला आहे. या योजनेचा लाभही शेतकऱ्यांच्या सहकारी संघटनांना होत आहे.
मित्रांनो,
पशुपालनाशी संबंधित पायाभूत सुविधा आधुनिक बनवण्यावरही आमचे सरकार विक्रमी गुंतवणूक करत आहे. यासाठी 30 हजार कोटी रुपयांचा एक विशेषण निधी देखील तयार केला आहे. यात सहकारी दूध संस्थांना व्याजावर आधीपेक्षा अधिक सूट देण्याची तरतूद आहे. दूध प्रकल्पांच्या आधुनिकीकरणावरही हजारो कोटी रुपये सरकार खर्च करत आहे. या योजनेअंतर्गत आज साबरकांठा मिल्क यूनियनच्या दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे.
यात,दररोज 800 टन जनावरांचा चारा बनवणाऱ्या आधुनिक प्रकल्पाचाही समावेश आहे.
बंधू आणि भगिनींनो,
मी जेव्हा विकसित भारताबद्दल बोलतो, तेव्हा सबका प्रयास यावर माझा विश्वास आहे. भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्ष अर्थात 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचा संकल्प केला आहे. एक संस्था म्हणून अमूलचीही तेव्हा 75 वर्षे होणार आहेत. तुम्हालाही आज येथून नवीन संकल्प घेऊन जायचे आहेत. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी पौष्टिकतेच्या पूर्ती करीता तुम्हा सर्वांची मोठी भूमिका आहे. पुढल्या पाच वर्षात तुम्ही लोकांनी आपल्या प्रकल्पांची प्रक्रीया क्षमता दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे हे जाणून मला आनंद झाला.अमूल आज जगातली आठवी सर्वात मोठी डेअरी आहे. तुम्हाला या डेअरीला लवकरात लवकर जगातली सर्वात मोठी डेयरी बनवायचे आहे. सरकार सर्वोतोपरी तुमच्या सोबत उभे आहे. आणि ही मोदींची गॅरंटी आहे. पुन्हा एकदा 50 वर्षांचा टप्पा गाठल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देतो.
खूप-खूप धन्यवाद !