नमस्कार!
काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीमध्ये आपले स्वागत आहे. माझा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये तुमची बैठक होत आहे याचा मला आनंद होत आहे. काशी हे केवळ जगातील सर्वात जुने जिवंत शहर नाही. येथून सारनाथ फार दूर नाही, जिथे भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केला होता.काशीला ‘विज्ञान, धर्म आणि सत्यराशि’चे शहर असे म्हटले जाते. ज्ञान, कर्तव्य आणि सत्याचा खजिना. ही खरोखरच भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी आहे.मला आशा आहे की, तुम्ही तुमच्या कार्यक्रमातून गंगा आरती पाहण्यासाठी, सारनाथला भेट देण्यासाठी आणि काशीच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी थोडा वेळ ठेवला असेल.
महामहिम,
संस्कृतीत एकत्र येण्याची उपजत क्षमता असते. हे आपल्याला विविध पार्श्वभूमी आणि दृष्टीकोन समजून घेण्यास सक्षम करते. आणि म्हणूनच, तुमचे कार्य संपूर्ण मानवतेसाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला भारतातील आमच्या शाश्वत आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान आहे. आम्ही आमच्या अमूर्त सांस्कृतिक वारशालाही खूप महत्त्व देतो. आम्ही आमच्या वारसास्थळांचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. केवळ राष्ट्रीय स्तरावरच नाही तर भारतातील सर्व गावांच्या स्तरावरही आम्ही आमच्या सांस्कृतिक संपदा आणि कलाकारांचे मॅपिंग केले आहे. आम्ही आमची संस्कृती अधोरेखित करण्यासाठी अनेक केंद्रे देखील तयार करत आहोत. त्यातील प्रमुख म्हणजे देशाच्या विविध भागांतील आदिवासी संग्रहालये. नवी दिल्लीत आमच्याकडे पंतप्रधानांचे संग्रहालय आहे. भारताचा लोकशाही वारसा दाखवणारा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे. आम्ही ‘युगे युगीन भारत’ राष्ट्रीय संग्रहालयही बांधत आहोत. एकदा पूर्ण झाल्यानंतर, ते जगातील सर्वात मोठे संग्रहालय म्हणून उभे राहील. यात भारताचा 5000 वर्षांचा इतिहास आणि संस्कृती प्रदर्शित केली जाईल.
महामहिम,
सांस्कृतिक संपदेला पूर्वस्थितीत आणणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि, या संदर्भात तुमच्या प्रयत्नांचे मी स्वागत करतो. शेवटी, मूर्त वारसा केवळ भौतिक मूल्याचा नाही. तर हा राष्ट्राचा इतिहास आणि ओळखही आहे. प्रत्येकाला त्यांच्या सांस्कृतिक वारशापर्यंत पोहोचण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. 2014 पासून, भारताने अशा शेकडो कलाकृती परत आणल्या आहेत ज्या आपल्या प्राचीन संस्कृतीचे वैभव दर्शवतात.
‘जिवंत वारसा’ आणि ‘जीवनासाठी ’ यामधील तुमच्या योगदानाचीही मी प्रशंसा करतो. शेवटी, सांस्कृतिक वारसा म्हणजे केवळ दगडात बांधलेली गोष्ट नाही तर पिढ्यानपिढ्या सुपूर्द केलेल्या परंपरा, चालीरीती आणि सणही आहेत. मला विश्वास आहे की तुमचे प्रयत्न शाश्वत पद्धती आणि जीवनशैलीला चालना देतील.
महामहिम,
आमचा विश्वास आहे की ,आर्थिक वृद्धी आणि विविधतेसाठी वारसा ही एक महत्त्वाची संपत्ती आहे. ‘विकास भी विरासत भी’- विकासही आणि वारसाही या आमच्या मंत्रातही हे प्रतिबिंबित होत आहे. भारताला त्याच्या 2,000 वर्ष जुन्या हस्तकला वारशाचा अभिमान आहे, जवळजवळ 3,000 अद्वितीय कला आणि हस्तकला आहेत. आमचा ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रम आत्मनिर्भरता वाढवताना भारतीय कलाकुसरीचे वेगळेपण दाखवतो. सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगांना चालना देण्यासाठी तुमचे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत. हे सर्वसमावेशक आर्थिक विकास सुलभ करेल तसेच सर्जनशीलता आणि नवोन्मेषला पाठबळ देईल. येत्या महिन्याभरात भारतात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. 1.8 अब्ज डॉलर्सच्या प्रारंभिक खर्चासह, ही योजना पारंपरिक कारागिरांना सहाय्यकारी ठरणारी व्यवस्था तयार करेल. हे त्यांना त्यांची कलाकुसर समृद्ध करण्यास सक्षम करेल आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात योगदान देईल.
मित्रांनो,
संस्कृती साजरी करण्यासाठी तंत्रज्ञान हे महत्त्वाचे सहयोगी आहे. भारतात, आमच्याकडे राष्ट्रीय डिजिटल जिल्हा भांडार आहे. आमच्या स्वातंत्र्यलढ्याच्या कथा पुन्हा शोधण्यासाठी मदत होत आहे. आमच्या सांस्कृतिक खुणा चांगल्या प्रकारे जतन करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. आमची सांस्कृतिक ठिकाणे अधिक पर्यटक स्नेही बनवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.
महामहिम,
तुमच्या समूहाने ‘कल्चर युनिट्स ऑल’ ही मोहीम सुरू केली याचा मला आनंद आहे. हे वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या भावनेशी सुसंगत आहे.
मूर्त परिणामांसह जी20 कृती आराखड्याला आकार देण्यासाठी तुम्ही बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची मी प्रशंसा करतो. संस्कृती (Culture), सर्जनशीलता (Creativity), वाणिज्य (Commerce),आणि सहयोग (Collaboration) या चार 'सी'चे महत्त्व तुमचे कार्य प्रतिबिंबित करते. हे आपल्याला करुणामय, सर्वसमावेशक आणि शांततापूर्ण भविष्य निर्माण करण्यासाठी संस्कृतीच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यास सक्षम करेल.अत्यंत फलदायी आणि यशस्वी बैठकीसाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.
धन्यवाद!