“This is India’s Time”
“Every development expert group in the world is discussing how India has transformed in the last 10 years”
“World trusts India today”
“Stability, consistency and continuity make for the ‘first principles’ of our overall policy making”
“India is a welfare state. We ensured that the government itself reaches every eligible beneficiary”
“Productive expenditure in the form of capital expenditure, unprecedented investment in welfare schemes, control on wasteful expenditure and financial discipline - Four main factors in each of our budgets”
“Completing projects in a time-bound manner has become the identity of our government”
“We are addressing the challenges of the 20th century and also fulfilling the aspirations of the 21st century”
“White Paper regarding policies followed by the country in the 10 years before 2014 presented in this session of Parliament”

गुयानाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स, विनीत जैन, उद्योग क्षेत्रातील नेते, विविध मुख्य कार्यकारी अधिकारी गण , इतर माननीय, बंधू आणि भगिनींनो

मित्रांनो,

जागतिक व्यवसाय परिषदेच्या चमूने यावेळी शिखर परिषदेसाठी जी संकल्पना ठेवली आहे, ती संकल्पनाच खूप महत्त्वाची आहे असे मला वाटते. व्यत्यय, विकास आणि विविधीकरण हे आजच्या काळात अतिशय लोकप्रिय शब्द आहेत. आणि या व्यत्यय, विकास आणि विविधीकरणाच्या चर्चेत सर्वजण सहमत आहेत की ही भारताची वेळ आहे. आणि संपूर्ण जगाचा भारतावरचा विश्वास सतत वाढत आहे. दावोसमध्ये अशा लोकांचा कुंभमेळा आपण नुकताच पाहिला, तिथले पाणी काही वेगळेच आहे. तिथे गंगाजल नाही. दावोसमध्येही भारताप्रती अभूतपूर्व उत्साह दिसून आला. कोणीतरी म्हटले की भारत ही एक अभूतपूर्व आर्थिक यशोगाथा आहे. दावोसमध्ये जे बोललं जात होतं ते जगातील धोरणकर्ते  बोलत होते. कोणीतरी म्हंटलं की भारतातील डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधा नवीन उंचीवर आहेत. एका दिग्गजाने सांगितले की, आता जगात असे एकही ठिकाण नाही जिथे भारताचे वर्चस्व नाही. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तर भारताच्या क्षमतेची तुलना  ‘रेजिंग बुल’  शी केली. आज जगातील प्रत्येक विकास तज्ज्ञांच्या गटात चर्चा आहे की 10 वर्षात भारताचा कायापालट झाला आहे.  आता विनीत जी सांगत होते, त्यात अनेक गोष्टींचा उल्लेख होता. आज जगाचा भारतावर किती विश्वास आहे हे या गोष्टींवरून दिसून येते. भारताच्या क्षमतेबाबत जगात इतकी सकारात्मक भावना यापूर्वी कधीही नव्हती. भारताच्या यशाबद्दल इतकी सकारात्मक भावना जगात क्वचितच कोणी अनुभवली असेल. म्हणूनच मी लाल किल्ल्यावरून  म्हंटलं  आहे - हीच ती वेळ आहे, योग्य वेळ आहे

 

मित्रांनो,

कोणत्याही देशाच्या विकासाच्या प्रवासात एक वेळ अशी येते की सर्व परिस्थिती त्याच्या अनुकूल असते. जेव्हा तो देश पुढील अनेक शतके स्वत:ला मजबूत बनवतो. मला आज भारतासाठी तीच वेळ दिसत आहे. जेव्हा मी हजार वर्षांबद्दल बोलतो तेव्हा मी खूप विचार करून मग बोलतो. हे खरे आहे की जर एखाद्याने हजार शब्द कधीच ऐकले नाहीत, जर त्याने हजार दिवस ऐकले नाहीत, तर त्याला हजार वर्षे खूप मोठी वाटतात, परंतु काही लोक असे आहेत जे पाहू शकतात. हा कालावधी खरोखरच अभूतपूर्व आहे. एक प्रकारे ‘पुण्यचक्र’ सुरू झाले आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा आपला विकास दर सतत वाढत आहे आणि आपली वित्तीय तूट कमी होत आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा आपली निर्यात वाढत आहे आणि चालू खात्यातील तूट कमी होत आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा आमची उत्पादक गुंतवणूक विक्रमी उच्च पातळीवर आहे आणि महागाई नियंत्रणात  आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा संधी आणि उत्पन्न दोन्ही वाढत आहेत आणि गरिबी कमी होत आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा उपभोग आणि कॉर्पोरेट नफा दोन्ही वाढत आहेत आणि बँक एनपीएमध्ये विक्रमी घट झाली आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा उत्पादन आणि उत्पादकता दोन्ही वाढते. आणि... ही अशी वेळ आहे जेव्हा आमचे टीकाकार आजतागायत सर्वात कमी आहेत.

मित्रांनो,

यावेळी आमच्या अंतरिम अर्थसंकल्पाला तज्ञांकडून आणि आमच्या माध्यमांमधील मित्रांकडून खूप प्रशंसा मिळाली आहे. अनेक विश्लेषकांनीही त्याची प्रशंसा केली असून हा फक्त लोकांना आकर्षित करणारा अर्थसंकल्प नाहीये, हे पण स्तुतीचे एक कारण असल्याचेही म्हटले आहे. या पुनरावलोकनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मला त्याच्या मुल्यांकनात आणखी काही गोष्टी जोडायच्या आहेत... काही मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष वेधून घ्यायचे आहे. जर तुम्ही आमच्या अर्थसंकल्पावर किंवा एकूणच धोरणाबाबत चर्चा केली तर तुम्हाला त्यात काही प्राथमिक तत्त्वे दिसतील. आणि ती प्राथमिक तत्त्वे आहेत - स्थिरता, सातत्य, निरंतरता. हा अर्थसंकल्प देखील त्याचाच एक विस्तार आहे.

 

मित्रांनो,

जेव्हा एखाद्याची परीक्षा घ्यायची असते तेव्हा त्याची परीक्षा फक्त अडचणीच्या किंवा आव्हानाच्या वेळीच होऊ शकते. कोरोना महामारी आणि त्यानंतरचा संपूर्ण काळ जगभरातील सरकारांसाठी मोठी परीक्षाच ठरला. आरोग्य आणि अर्थव्यवस्थेच्या या दुहेरी आव्हानाला कसे सामोरे जायचे, याची कल्पना सुद्धा कोणाला नव्हती. या काळात भारताला सर्वाधिक… आठवा तो दिवस, मी सतत टीव्हीवर येऊन देशाशी संवाद साधत असे. आणि त्या संकटाच्या काळात मी प्रत्येक क्षणी छाती उंचावत देशवासियांसमोर उभा राहिलो.  त्यावेळी सुरुवातीच्या काळात मी सांगितले होते आणि त्यानुसार मी जीव वाचवण्याला प्राधान्य दिले होते. आमचे म्हणणे होते की , जीवन असेल तर जग आहे. तुम्हाला आठवत असेल. आम्ही आमची सर्व शक्ती जीवन वाचवणारी संसाधने गोळा करण्यात आणि लोकांना जागरूक करण्यात लावली होती. सरकारने गरिबांसाठी मोफत धान्य पुरविले. आम्ही मेड इन इंडिया लसीवर लक्ष केंद्रित केले. ही लस प्रत्येक भारतीयापर्यंत त्वरीत पोहोचेल याची आम्ही खात्री केली. या मोहिमेला गती मिळताच… आम्ही म्हणालो, " जान भी है, जहान भी है."

आम्ही आरोग्य आणि उपजीविकेच्या दोन्ही मागण्या पूर्ण केल्या. सरकारने थेट महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवले... रस्त्यावरील विक्रेते आणि छोट्या उद्योगपतींना आम्ही आर्थिक मदत केली, शेतीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आम्ही सर्व उपाययोजना केल्या. आपत्तीचे संधीत रूपांतर करण्याचा संकल्प आम्ही केला.माध्यम विश्वातील माझ्या मित्रांनो, तुम्ही त्यावेळची वर्तमानपत्रे काढा आणि बघा... त्यावेळी मोठ्या तज्ज्ञांचे मत असे होते की पैसे छापायचे, नोटा छापायच्या, त्यामुळे मागणी वाढते आणि मोठ्या उद्योगांना मदत होते. मी समजू शकतो की उद्योग जगताच्या लोकांनी माझ्यावर रुबाब घातला, ते आजही करतील. पण सर्व नोबेल पारितोषिक विजेतेही मला एकच सांगायचे, हेच चालले होते. जगातील अनेक सरकारांनीही हा मार्ग स्वीकारला होता. पण या पावलामुळे इतर काही जरी निष्पन्न झाले नाही, तरी ते आपल्या इच्छेनुसार देशाची अर्थव्यवस्था चालवू शकले.

इतर देशांमध्ये महागाई वाढली, त्या लोकांची अवस्था अशी झाली होती.त्यांनाही महागाई आटोक्यात आणता येत नव्हतं. त्यांनी निवडलेल्या मार्गाचे आजही दुष्परिणाम आहेत. आमच्यावरही दबाव टाकण्याचे अनेक प्रयत्न झाले. समोरचा सोपा मार्ग असा होता की जग जे काही म्हणतंय, जग जे काही करतंय, त्यातच वाहून जाऊया. पण आम्हाला जमिनी वास्तव माहीत होते...आम्ही समजत होतो ...आम्ही आमच्या अनुभवाच्या आधारे काही निर्णय घेतले. आणि त्यातून निघालेल्या निकालाचे आजही जगभरातून कौतुक होत आहे. आता सगळ जग त्याचे कौतुक करत आहे. ज्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, तीच आमची धोरणे योग्य असल्याचे सिद्ध झाले आणि म्हणूनच आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे.

 

मित्रांनो,

आपण एक कल्याणकारी राज्य आहोत. देशातील सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणे आणि त्याचे जीवनमान सुधारणे हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही नवीन योजना बनवणे स्वाभाविक आहे, परंतु या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे याची आम्ही काळजी घेतली.

आम्ही केवळ वर्तमान काळासाठी नव्हे, तर भविष्यासाठी देखील गुंतवणूक केली आहे. लक्षपूर्वक पहिले, तर आमच्या प्रत्येक अर्थसंकल्पात तुम्हाला चार प्रमुख घटक दिसतील. पहिला- भांडवली खर्चाच्या स्वरूपात उत्पादक खर्चाची विक्रमी नोंद, दुसरा- कल्याणकारी योजनांवरील अभूतपूर्व गुंतवणूक, तिसरा- अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणि चौथा- आर्थिक शिस्त. तुम्ही पहिले असेल, की आम्ही या चार घटकांमध्ये समतोल साधला आणि चारही घटकांमधील निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करून दाखवली. आज आम्हाला काही जण विचारतात, की आम्ही हे कसे साधले? त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने  उत्तर देता येईल. आणि त्यापैकी प्रमुख आहे- ‘पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमवणे’ हा मंत्र. उदाहरणार्थ, प्रकल्प लवकर पूर्ण करून आणि वेळेत पूर्ण करून आम्ही देशाचा खूप पैसा वाचवला. वेळेत प्रकल्प पूर्ण करणे ही आमच्या सरकारची ओळख बनली आहे. मी एक उदाहरण देतो. इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर 2008 मध्ये सुरू करण्यात आला. आधीच्या सरकारने जलद काम पूर्ण केले असते, तर त्यासाठीची गुंतवणूक 16,500 कोटी रुपये इतकी असती. पण हा प्रकल्प गेल्या वर्षी पूर्ण झाला, तोपर्यंत त्याचा खर्च 50 हजार कोटीच्या वर गेला. त्याचप्रमाणे तुम्हाला आसामचा बोगीबील पूलही माहीत आहे. याची सुरुवात 1998 साली झाली होती आणि तो 1100 कोटी रुपये खर्चाने पूर्ण करायचा होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या ठिकाणी मी अनेकदा भेट दिली आणि त्या कामाला गती दिली. हे काम 1998 पासून सुरु होते. आम्ही ते 2018 मध्ये पूर्ण केले. मात्र त्याचा खर्च 1100 कोटीवरून 5 हजार कोटीवर पोहोचला. अशा कितीतरी प्रकल्पांचे उदाहरण देता येईल. आधी जो पैसा फुकट जात होता, तो कोणाचा होता? तो पैसा कोणत्याही नेत्याच्या खिशातून येत नव्हता. तो पैसा देशाचा होता. देशाच्या कर दात्यांचा पैसा होता, तुमचा पैसा होता. आम्ही करदात्यांच्या पैशाचा मान राखला, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम किती वेगाने झाले ते तुम्ही पहिलेच आहे. कर्तव्य पथ असो... मुंबईचा अटल सेतू असो... या बांधकामाचा वेग देशाने पाहिला आहे. त्यामुळेच आज देश म्हणतो- मोदी ज्या योजनेची पायाभरणी करतात, त्याचे लोकार्पणही मोदीच करतात.

 

मित्रहो,

आमच्या सरकारने व्यवस्थेत पारदर्शकता आणून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून देशाचा पैसा वाचवला आहे. तुम्ही कल्पना करा...काँग्रेस सरकारच्या काळात कागदपत्रांमध्ये... तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की कागदपत्रांमध्ये अशा 10 कोटी नावांची नोंद होती, जे बनावट लाभार्थी होते, असे लाभार्थी, जे कधी जन्मालाच आले नव्हते. विधवा महिलांची अशीच नावे होती, ज्या मुली कधी जन्मालाच आल्या नव्हत्या. दहा कोटी. आम्ही अशी दहा कोटी बनावट नावे कागदपत्रांमधून हटवली. आम्ही थेट लाभार्थी योजना सुरु केली. आम्ही पैशाची गळती थांबवली. एक पंतप्रधान असे म्हणाले होते, जेव्हा एक रुपया मंजूर होतो, तेव्हा लाभार्थ्यांपर्यंत त्यापैकी केवळ 15 पैसे पोहोचतात. आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम थेट जमा केली. आणि एक रुपया जेव्हा दिला जातो, तेव्हा लाभार्थ्यांना 99 सुद्धा नाही, तर शंभर पैसे मिळतात. थेट लाभार्थी योजनेचा एक फायदा असा झाला आहे की, जवळजवळ 3 लाख कोटी रुपये चुकीच्या हातांमध्ये जाण्यापासून रोखले गेले आहेत. सरकार द्वारे केल्या जाणाऱ्या खरेदीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आमच्या सरकारने GeM हे पोर्टल सुरू केले, GeM द्वारे आम्ही केवळ वेळेची बचत केली नाही, तर गुणवत्ताही सुधारली आहे. बरेच लोक पुरवठादार बनले आहेत. आणि त्यात सरकारने सुमारे 65 हजार कोटी रुपयांची बचत केली, 65 हजार कोटी रुपयांची बचत… आम्ही तेल खरेदीमधेही वैविध्य आणले आणि त्यामुळे 25 हजार कोटी रुपयांची बचत झाली. तुम्हालाही याचा लाभ मिळत आहे, दर दिवशी मिळत आहे. गेल्या एका वर्षात आम्ही केवळ पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करून 24 हजार कोटी रुपयांची बचत केली. आणि एवढेच नाही तर ज्या स्वच्छता अभियानाची काही लोक खिल्ली उडवतात... या देशाचे पंतप्रधान स्वच्छतेबद्दलच  बोलत असतात. स्वच्छता अभियानांतर्गत सरकारी इमारतींमध्ये केलेल्या साफसफाईच्या कामातून निघालेले भंगार सामान विकून मी 1100 कोटी रुपये कमावले आहेत.

आणि मित्रांनो,

देशातील नागरिकांचे पैसे वाचतील अशा पद्धतीने आम्ही आमच्या योजना बनवल्या. आज जल जीवन मिशनमुळे गरिबांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे. त्यामुळे त्यांचा आजारपणावरील खर्च कमी झाला. आयुष्मान भारतने देशातील गरिबांचे 1 लाख कोटी रुपये वाचवले आणि त्यांना उपचार मिळवून दिले. पीएम जन औषधी केंद्रांवर 80 टक्के सवलत, आणि आपल्या देशात सवलत ही अशी एक ताकद आहे, कितीही मोठे दुकान असो, कितीही उत्तम माल असो, शेजारच्या दुकानदाराने दहा टक्के सवलतीची पाटी लिहिली, तर सर्व महिला त्या दुकानात गर्दी करतील. देशातील मध्यम वर्ग आणि गरीब कुटुंबांना आम्ही 80 टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देतो. जन औषधी केंद्रांमध्ये ज्यांनी औषधे खरेदी केली आहेत, त्यांच्या 30 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

मित्रांनो,

माझे उत्तरदायित्व केवळ आताच्या पिढीसाठीच नव्हे, तर भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी देखील आहे. मी केवळ आपले दैनंदिन जीवन जगण्यामध्ये जीवनाची सफलता मानत नसून, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करून जावे, असे मला वाटते.

 

मित्रहो,

तिजोरी रिकामी करून आणखी चार मते मिळवण्याच्या राजकारणापासून आम्ही दूर आहोत, आणि म्हणून आम्ही धोरणांमध्ये, निर्णयांमध्ये आर्थिक व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मी तुम्हाला एक छोटेसे उदाहरण देईन. विजेबाबत काही पक्षांचा दृष्टिकोन तुम्हाला माहीत आहे. तो दृष्टिकोन देशाच्या विद्युत व्यवस्थेला विनाशाकडे नेणारा आहे. माझी पद्धत त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. आमच्या सरकारने एक कोटी घरांसाठी रूफटॉप सोलर योजना आणली आहे हे तुम्हाला माहीतच आहे. या योजनेमुळे लोक वीज निर्मिती करून त्यांचे विजेचे बिल शून्यावर आणू शकतील आणि अतिरिक्त वीज विकून पैसेही कमवू शकतील. आम्ही उजाला योजना सुरू केली, जी स्वस्त एलईडी बल्ब देते… आमच्या आधीच्या सरकारच्या कार्यकाळात एलईडी बल्ब 400 रुपयांना मिळत होते. आम्ही इथे आलो, आणि परिस्थिती बदलली, आणि ते 40-50 रुपयांना मिळू लागले, तोच दर्जा, कंपनीही तीच. एलईडीमुळे लोकांच्या वीज बिलात जवळजवळ 20 हजार कोटी रुपयांची बचत झाली.

मित्रांनो,

तुम्ही सगळे इथे… मोठ्या संख्येने अनुभवी पत्रकारही इथे बसले आहेत… तुम्हाला माहिती आहे… सात दशकांपूर्वीपासून आपल्याकडे गरिबी हटावचे नारे रात्रंदिवस दिले जात आहेत. या घोषणांनी गरिबी तर हटली नाहीच, पण त्यावेळच्या सरकारांनी गरिबी हटवण्याच्या सूचना देणारे उद्योग मात्र नक्कीच निर्माण केले. त्यामधूनच त्यांची कमाई व्हायची. सल्लागार सेवा द्यायला निघाले होते. या उद्योगातील लोक दरवेळी गरिबी हटवण्यासाठी नवनवीन फॉर्म्युला सांगायचे आणि स्वतः करोडपती व्हायचे, पण त्यांना देशाची गरिबी कमी करता आली नाही. वर्षानुवर्षे एसी खोल्यांमध्ये बसून, वाईन आणि चीझ बरोबर गरिबी हटवण्याच्या फॉर्म्युला वर वादविवाद व्हायचे, आणि गरीब गरीबच राहिले. मात्र, 2014 नंतर जेव्हा त्या गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाला, तेव्हा गरिबीच्या नावावर सुरु असलेला हा उद्योग ठप्प झाला. मी गरिबीमधूनच इथवर पोहोचलो आहे, त्यामुळे मला गरिबीशी लढायचे कसे हे माहित आहे. आमच्या सरकारने गरिबी विरोधात लढा देण्यासाठी मोहीम सुरू केली. प्रत्येक दिशेने काम सुरू केले, तेव्हा त्याचा परिणाम असा झाला की, गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. यावरून आमच्या सरकारची धोरणे योग्य असल्याचे, आमच्या सरकारची दिशा योग्य असल्याचे दिसून येते. याच  दिशेने वाटचाल करून आम्ही देशाची गरिबी कमी करू आणि आपला देश विकसित करू.

मित्रांनो

आमच्या राज्यकारभाराचा रथ एकाच वेळी दोन आघाड्यांवर दौडत आहे.  एकीकडे आम्ही,आपल्याला वारसाहक्काने मिळालेल्या  20 व्या शतकातील आव्हानांना सामोरे जात आहोत आणि दुसरीकडे आम्ही 21 व्या शतकातील आकांक्षा पूर्ण करण्यात व्यग्र आहोत.  आम्ही कोणतेही काम लहान मानले नाही.  दुसरीकडे, आम्ही मोठ्या आव्हानांचा सामना केला आणि मोठी उद्दिष्टे साध्य केली.  आमच्या सरकारने 11 कोटी शौचालये बांधली, तर अंतराळ क्षेत्रातही नवे पर्याय  निर्माण केले आहेत.  आमच्या सरकारने गरिबांना 4 कोटी घरे दिली आहेत, तर त्याचबरोबरीने 10 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग लॅबही (नवंसंशोधन प्रयोगशाळा) उभारल्या आहेत.  आमच्या सरकारने 300 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये बांधली, तर फ्रेट कॉरिडॉर (रेल्वे द्वारे मालवाहतुकीचे जाळे) आणि डिफेन्स कॉरिडॉरचे (संरक्षण विषयक साहित्यनिर्मितीचा टापू) कामही वेगाने सुरू आहे.  आमच्या सरकारने वंदे भारत रेल्वेगाड्या कार्यान्वित केल्या आहेत आणि दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये सुमारे 10 हजार इलेक्ट्रिक बसेसही धावत आहेत.  आमच्या सरकारने कोट्यवधी भारतीयांना बँकिंगशी जोडले आहे आणि डिजिटल इंडिया तसेच फिनटेकच्या (अर्थविषयक तंत्रज्ञान) माध्यमातून सुविधांचा सेतूही उपलब्ध केला आहे.

 

मित्रहो,

सध्या या सभागृहात देशातील आणि जगातील सर्व विचारवंत आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर बसलेले आहेत.  तुम्ही तुमच्या संस्थेसाठी उद्दीष्ट कसे ठरवता, तुमच्यासाठी यशाची व्याख्या काय आहे?  बरेच लोक म्हणतील की आम्ही गेल्या वर्षी जिथे  होतो, तिथून आमचे लक्ष्य निश्चित करतो,आधी आम्ही 10 वर होतो, आता आम्ही 12, 13, 15 वर जाऊ.

जर 5-10 टक्के वाढ असेल तर ती चांगली मानली जाते.  मी तर म्हणेन की  एकप्रकारे ही "वाढ निश्चित करुन मर्यादा घालून घेणारी  विचारसरणी म्हणजे शाप" आहे.  हे चुकीचे आहे कारण तुम्ही स्वतःला मर्यादीत करत आहात.  कारण तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या गतीने पुढे जात नाही.  मला आठवतं, मी सरकारमध्ये आलो तेव्हा आमची नोकरशाहीही याच विचारात अडकली होती.  या विचारसरणीतून मी नोकरशाहीला बाहेर काढेन, तरच देश त्या विचारातून बाहेर पडू शकेल, असे मी ठरवले.  मी आधीच्या सरकारांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने काम करण्याचा निर्णय घेतला.  आणि आज त्याचे परिणाम जग पाहत आहे.  अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात गेल्या 70 वर्षात किंवा 7 दशकात जेवढे काम केले गेले त्यापेक्षा गेल्या 10 वर्षांत जास्त काम झाले आहे.  म्हणजेच, तुम्ही 7 दशके आणि 1 दशकाची तुलना करा… 2014 पर्यंत, 7 दशकात सुमारे 20 हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले, 7 दशकात 20 हजार किलोमीटर!  आमच्या सरकारच्या 10 वर्षात आम्ही 40 हजार किलोमीटरहून अधिक रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले आहे.  आता सांगा काही तुलना आहे का?  मी मे महिन्याबद्दल बोलत नाहीये.  2014 पर्यंत, 7 दशकात, चौपदरी किंवा त्याहून अधिक 18 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले….18 हजार! आमच्या सरकारच्या 10 वर्षात असे सुमारे 30 हजार किलोमीटरचे महामार्ग आम्ही बांधले आहेत.  70 वर्षात 18 हजार किलोमीटर... 10 वर्षात 30 हजार किलोमीटर... मी जर फक्त वाढीचे लक्ष्य मर्यादीत ठेवण्याच्या विचाराने काम केले असते तर मी कुठे पोहोचलो असतो बंधुंनो?

मित्रांनो,

2014 पर्यंत, 7 दशकात भारतात मेट्रो रेल्वेचे 250 किलोमीटरपेक्षा कमी जाळे तयार झाले होते.  गेल्या 10 वर्षात आम्ही मेट्रो रेल्वेचे, 650 किलोमीटरहून अधिक लांबीचे जाळे तयार केले आहे.  2014 पर्यंत 7 दशकांमध्ये, भारतातील 3.5 कोटी कुटुंबांकडे नळ जोडणी  होती…..3.5 कोटी! 2019 मध्ये, आम्ही जल जीवन मिशन सुरू केले.  गेल्या 5 वर्षात आम्ही ग्रामीण भागातील 10 कोटींहून अधिक घरांना नळाचे पाणी पुरवले आहे.

मित्रहो,

2014 पूर्वीच्या 10 वर्षांतील देशाची धोरणे खरे तर देशाला गरिबीकडे नेणारी होती.  या संदर्भात आम्ही संसदेच्या या अधिवेशनात भारताच्या आर्थिक स्थैर्याबाबत श्वेतपत्रिकाही मांडली आहे.  आज तिच्यावर चर्चाही सुरू आहे आणि मला….आज एवढा मोठा प्रेक्षकवृंद जमला आहे तर मी मनातील गोष्ट सांगून टाकतो.  आज मी जी श्वेतपत्रिका आणली आहे, ती मी 2014 मध्ये आणू शकलो असतो.  माझा राजकीय स्वार्थ असता तर मी हे आकडे 10 वर्षांपूर्वी देशासमोर मांडले असते.  पण 2014 मध्ये माझ्यासमोर जे आले ते पाहून मला धक्का बसला.  अर्थव्यवस्था अतिशय गंभीर स्थितीत होती.  यापूर्वी जगभरातील गुंतवणूकदार, घोटाळे आणि धोरणाच्या पांगुळगाड्या मुळे निराश झाले होते. त्या वेळी जर मी त्या गोष्टी उघडल्या असत्या तर थोडेसे नवे चुकीचे संकेतही गेले असते, तर कदाचित देशाचा आत्मविश्वास ढासळला असता, लोकांना वाटले असते  की आपण बुडालो आहोत आणि आता यातून बाहेर येताच येणार नाही.  ज्याप्रमाणे एखाद्या रुग्णाला आपल्याला एखादा गंभीर आजार झाल्याचे कळले, तर तो तिथेच गळपटून जातो,  देशाचीही तशीच स्थिती झाली असती.  त्या सर्व गोष्टी बाहेर आणणे मला तेव्हा राजकीयदृष्ट्या सहज शक्य होते.  राजकारण तर मला ते करायला उद्युक्त करत होते, पण राष्ट्रहित मला ते करू देत नव्हते आणि म्हणून मी राजकारणाचा मार्ग सोडून राष्ट्रकारणाचा मार्ग निवडला.  आणि गेल्या 10 वर्षांत जेव्हा सर्व स्थिती मजबूत झाली,कोणत्याही धक्क्याला तोंड देण्याइतपत आपण सक्षम झालो, तेव्हा देशासमोर सत्य सांगावे, असे मला वाटले.  आणि म्हणूनच मी काल संसदेत श्वेतपत्रिका मांडली आहे. ही श्वेतपत्रिका पाहिली तर कळते की आपण कुठे होतो आणि किती वाईट प्रसंगातून आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत.

मित्रांनो,

आज तुम्ही भारताच्या प्रगतीची नवी शिखरे पाहत आहात.  आमच्या सरकारने अनेक कामे केली आहेत.  आणि आता मी पाहत होतो की आमचे विनीतजी पुन्हा पुन्हा सांगत होते की जगातील तिसरी अर्थव्यवस्था, तिसरी अर्थव्यवस्था!  आणि कोणाला काही शंका नाही….मी पाहत होतो की विनीतजी अतिशय विनम्रपणे बोलतात, अतिशय मृदूभाषी आहेत.  पण तरीही तुम्हा सर्वांचा विश्वास आहे की हो मित्रा!  आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू, का?  मी शेजारीच बसलो होतो.  आणि मी तुम्हाला हमी देतो, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देश अर्थव्यवस्थेत जगात 3 ऱ्या क्रमांकावर पोहोचेल.  आणि मित्रांनो, तुम्हीही सज्ज राहा, मी काहीही लपवत नाही.  मी सर्वांना तयारीची संधीही देतो.  पण लोकांचे काय आहे की त्यांना वाटते…  राजकारणीच आहे तर आपला बोलतच राहतो.  पण आता तुम्हाला माझा अनुभव आलाच आहे की  मी काही आपला उगाचच  बोलत नसतो.  आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, तिसऱ्या कार्यकाळामध्ये… आणखी मोठे निर्णय घेतले जाणार आहेत.भारतातील गरिबी दूर करण्यासाठी आणि भारताच्या विकासाला नवी गती देण्यासाठी मी गेल्या दीड वर्षांपासून नवीन योजना तयार करत आहे.  आणि मी वेगवेगळ्या दिशेने कसे काम करायचे, कुठपर्यंत करायचे, मी त्याबाबत संपूर्ण रोड मॅप (कृती आराखडा) बनवत आहे. आणि मी जवळपास 15 लाखांहून अधिक लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे सूचना घेतल्या आहेत.  15 लाखांहून अधिक लोकांसोबत मी यावर काम करत आलो आहे.  मी तुम्हाला हे पहिल्यांदाच सांगत आहे की मी कधीही याबाबत कोणतीही प्रेस नोट दिली नाही. काम सुरू असून येत्या 20-30 दिवसांत ते अंतिम टप्प्यात येईल. नवा भारत आता अशा इतक्या वेगाने काम करेल... आणि ही मोदींची हमी आहे. मला आशा आहे की या शिखर परिषदेत सकारात्मक चर्चा होईल.  तयार होत असलेल्या रोड मॅपमध्ये उपयोग होईल अशा अनेक चांगल्या सूचना समोर येतील  पुन्हा एकदा, या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi