कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसावराज बोम्मई जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, संसदेतील आमचे वरिष्ठ सहकारी डॉ. विरेंद्र हेगडे जी, परमपूज्य स्वामी निर्मलानंद-नाथ स्वामी जी, परमपूज्य श्री श्री शिवरात्रि देशीकेन्द्र स्वामी जी, श्री श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी जी, श्री श्री नंजावधूता स्वामी जी, श्री श्री शिवमूर्ति शिवाचार्य स्वामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, खासदार, भाई सीटी रवि जी, दिल्ली-कर्नाटक संघातील सर्व सदस्य, बंधू आणि भगीनींनो, सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो. आज दिल्ली-कर्नाटक संघ एल्लादरु इरु, एँतादरु इरु, एँदेँदिगु नी कन्नड़ावागीरु’ असा गौरवशाली वारसा पुढे नेत आहे. 'दिल्ली कर्नाटक संघा'चा ७५ वर्षपूर्तीचा हा सोहळा अशा वेळी होत आहे, जेव्हा देशही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. जेव्हा आपण 75 वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहतो आणि त्यांचे मूल्यांकन करतो, तेव्हा आपल्याला या प्रयत्नात भारताचा अमर आत्मा दिसतो. दिल्ली-कर्नाटक संघाच्या स्थापनेवरून दिसून येते की, स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या टप्प्यातील लोक देशाला मजबूत करण्याच्या अभियानात कसे एकवटले होते.
मला आनंद आहे की, स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या पहिल्या प्रहरातही देशाची ती ऊर्जा आणि समर्पण तितकीच जिवंत दिसत आहे. या संघाचे स्वप्न ज्यांनी पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले त्या सर्व महान व्यक्तींना मी या निमित्ताने नमन करतो. आणि 75 वर्षांचा प्रवास सोपा नसतो. अनेक चढ-उतार येतात, अनेकांना सोबत घेऊन चालावे लागते. 75 वर्षे ज्यांनी हा संघ चालवला, पुढे नेला आणि विकसित केला, ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत. कर्नाटकच्या जनतेने राष्ट्र उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी मी त्यांना प्रणाम करतो.
मित्रांनो,
भारताची ओळख असो, भारताची परंपरा असो किंवा भारताची प्रेरणा असो, कर्नाटकशिवाय आपण भारतास परिभाषित करू शकत नाही. पौराणिक काळापासून भारतात कर्नाटकने हनुमानाची भूमिका बजावली आहे. हनुमानाशिवाय राम नसतात ना रामायण पूर्णत्वास जाते. युग परिवर्तनाचे कोणतेही अभियान जर अयोध्येपासून सुरू होऊन रामेश्वरमपर्यंत गेले, तर त्याला कर्नाटकातच बळ मिळते.
बंधू आणि भगिनींनो,
मध्ययुगीन काळातही, जेव्हा आक्रमकांनी भारताला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला आणि सोमनाथ सारखी शिवलिंगे तोडली गेली, तेव्हा देवरा दासिमय्या, मदारा चेन्नईय्या, दोहर कक्कय्या आणि कर्नाटकातील भगवान बसवेश्वरा सारख्या संतांनी लोकांना इष्टलिंगाशी जोडले. जेव्हा बाह्य शक्तींनी देशावर हल्ला केला, तेव्हा राणी अबक्का, ओनाके ओबाव्वा, राणी चेन्नम्मा आणि क्रांतिवीर सांगोली रायन्ना सारखे वीर त्यांच्यासमोर पहाडासारखे उभे राहिले. स्वातंत्र्यानंतरही, 'काशी हिंदू विद्यापीठ'चे पहिले कुलगुरू महाराजा कृष्णराजा अडैर ते फील्ड मार्शल केएम करिअप्पा आणि भारतरत्न एम विश्वेश्वरय्यापर्यंत, कर्नाटकने नेहमीच भारताला प्रेरणाही दिली आणि आकर्षितही केले आहे. आणि आता आपण पूज्य स्वामीजींकडून काशीचे अनुभव ऐकत होतो.
मित्रांनो,
कन्नड लोक नेहमीच 'एक भारत, श्रेष्ठ भारत' हा मंत्र जगले आहेत. कर्नाटकच्या भूमीतूनच त्यांनाही प्रेरणा मिळते. आत्ता आपण सर्वांनी राष्ट्रकवी कुवेंपू नाडा गीते यांची रचना ऐकली आणि पूज्य स्वामीजींनीही ते स्पष्ट केले. किती अप्रतिम शब्द आहेत - जय भारत जननिया तनु जाते, जय हे कर्नाटका माते. त्यांनी कर्नाटक मातेची किती आत्मीयतेने स्तुती केली आहे, त्यात त्यांनी भारत मातेची ‘तनु’ असल्याचे म्हटले आहे. हे गाणे संपूर्ण भारतातील संस्कृतीचे वर्णन करते आणि कर्नाटकचे महत्त्व तसेच भूमिका देखील नमूद करते. या गाण्याचा भाव जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा आपल्याला 'एक भारत श्रेष्ठ भारत'चा भावही कळतो.
मित्रांनो,
आज जेव्हा भारत G-20 सारख्या मोठ्या जागतिक समूहाचे अध्यक्षपद भूषवत आहे, तेव्हा लोकशाहीची जननी म्हणून आपले आदर्श आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. भगवान बसवेश्वरांचे 'अनुभव मंटप'द्वारे मांडलेले शब्द, त्यांची लोकशाहीची शिकवण, भारतासाठी प्रकाश दाखविणारे आहे. माझे भाग्य आहे की, मला लंडनमध्ये बसवेश्वरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. आपल्या या गौरवाचा विस्तार करण्याची संधी मिळाली. तसेच त्यांची वचने वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसिद्ध करण्याची संधी मला मिळाली. कर्नाटकची विचारपरंपराही अमर आहे, तिचा प्रभावही अमर आहे, हे यश याचाच पुरावा आहे.
मित्रांनो,
कर्नाटक ही परंपरांचीही भूमी आहे तशीच तंत्रज्ञानाचीही भूमी आहे. येथे ऐतिहासिक संस्कृती आहे तसेच आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. आज सकाळीच माझी जर्मन चॅन्सेलरांशी भेट झाली आणि उद्यापासून त्यांचा कार्यक्रम बेंगळुरूमध्ये होत आहे, याचा मला आनंद आहे. आज G20 गटाची बंगळुरूमध्ये एक मोठी बैठकही होत आहे.
मित्रांनो,
मी कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला भेटतो, तेव्हा माझा प्रयत्न असतो की, त्यांनी प्राचीन आणि आधुनिक भारताची असे दोन्ही चित्र, स्वरुप पाहावे. परंपरा आणि तंत्रज्ञान, हा आजच्या नव्या भारताचा स्वभावही आहे. आज देश विकास आणि वारसा, प्रगती आणि परंपरा यांना सोबत घेऊन पुढे जात आहे. आज, एकीकडे, भारत आपली प्राचीन मंदिरे आणि सांस्कृतिक केंद्रांचे पुनरुज्जीवन करत आहे, आणि त्याच वेळी, आपण डिजिटल पेमेंटमध्ये जगीत आघाडीवर देखील आहोत. आजचा भारत परदेशातून आपल्या शतकानुशतके चोरुन नेलेल्या मूर्ती आणि कलाकृती परत आणत आहे. आणि आजचा भारत परदेशातून थेट विक्रमी विदेशी गुंतवणूक आणत आहे. हा नवीन भारताचा विकास मार्ग आहे, जो आपल्याला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल.
मित्रांनो,
आज देशाचे आणि कर्नाटक सरकारचे कर्नाटकच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य आहे. याआधी एक काळ असा होता की सरकार स्थापन केल्यानंतर लोक कर्नाटकातून पैसे बाहेर घेऊन जायचे. पण, आज देशाचा पैसा, देशाची संसाधने कर्नाटकच्या विकासासाठी प्रामाणिकपणे समर्पित केली जात आहेत. तुम्ही बघा, 2009 ते 2014 या काळात केंद्राकडून कर्नाटक राज्याला दरवर्षी 11 हजार कोटी रुपये दिले जात होते. दरवर्षी. तर आमच्या सरकारच्या कार्यकाळात 2019 ते 2023 दरम्यान केंद्राकडून आतापर्यंत दरवर्षी 30 हजार कोटी रुपये पाठवले गेले आहेत.
2009 ते 2014 या काळात कर्नाटकमधल्या रेल्वे प्रकल्पांवर एकूण 4,000 कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च करण्यात आला आणि एक रेल्वे मंत्री तर कर्नाटकमधलेच होते. 4,000 कोटी रुपये. म्हणजे पाच वर्षांमध्ये 4 हजार कोटी रुपयांपेक्षा सुद्धा कमी. आणि आमच्या सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कर्नाटकच्या रेल्वेसंबंधी पायाभूत सुविधांसाठी सुमारे 7 हजार कोटी रुपये दिले आहेत. मी या वर्षाबद्दल बोलतो आहे. राष्ट्रीय महामार्गांसाठी सुद्धा मागच्या सरकारने कर्नाटकसाठी गेल्या 5 वर्षात एकूण 6 हजार कोटी रुपये दिले. आणि या 9 वर्षांत आमच्या सरकारने कर्नाटकमध्ये दरवर्षी 5 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. 5 वर्षात 6 हजार कोटी कुठे आणि दरवर्षी 5 हजार कोटी कुठे!
मित्रहो,
दीर्घ काळापासून होत असलेली उर्ध्व भद्रा प्रकल्पाची मागणीसुद्धा आमचे सरकार पूर्ण करीत आहे. तुमकुरू, चिकमंगळूर, चित्रदुर्ग आणि दावणगेरेसह मध्य कर्नाटकमधल्या मोठ्या दुष्काळी भागांना याचा फायदा होणार आहे, माझ्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे. विकासाच्या या नव्या वेगामुळे कर्नाटकचे चित्र झपाट्याने बदलते आहे. तुमच्यापैकी जे लोक दिल्लीत राहात आहेत, अनेक दिवस आपल्या गावी गेलेले नाहीत, जेव्हा तुम्ही तिथे जाणार तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि अभिमानही वाटेल.
मित्रहो,
दिल्ली कर्नाटक संघाच्या 75 वर्षांमध्ये प्रगतीचे, यशाचे आणि ज्ञानाच्या उत्कर्षाचे अनेक महत्त्वाचे क्षण आपल्यासमोर आले आहेत. आता येणारी 25 वर्षे आणखी महत्त्वाची आहेत. अमृत काळ आणि दिल्ली कर्नाटक संघाच्या पुढच्या 25 वर्षात तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी करू शकता. दोन गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता, कलिके मत्तू कले. म्हणजे ज्ञान आणि कला. कलिकेबद्दल बोलायचे झाले, तर आपली कन्नड भाषा किती सुंदर आहे आणि या भाषेतील साहित्य किती समृद्ध आहे, ते आपल्याला ठाऊक आहे. त्याचबरोबर कन्नड भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ही भाषा बोलणाऱ्यांना वाचनाची सवय हमखास असते. कन्नड भाषा वाचणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे. आज कन्नडमध्ये एखादे चांगले नवीन पुस्तक आले की प्रकाशकांना काही आठवड्यांतच त्याचे पुनर्मुद्रण करावे लागते. कर्नाटकातील भाषेला लाभलेले हे भाग्य इतर भाषांना सहसा लाभत नाही.
आपल्या मूळ राज्याबाहेर राहणाऱ्या नवीन पिढीसाठी भाषेच्या अडचणी किती वाढतात, हे तुमच्यापैकी जे दिल्लीत राहतात, त्यांना माहीती असेलच. म्हणूनच जगद्गुरू बसवेश्वरांचे शब्द असोत, हरिदासांची गाणी असोत, कुमार व्यासांनी लिहिलेली महाभारताची आवृत्ती असो किंवा कुवेंपू यांनी लिहिलेले रामायण दर्शनम असो, हा अनमोल वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे वाचनालय आहे, असेही मी ऐकले आहे. स्टडी सर्कल सेशन, साहित्याशी संबंधित चर्चा असे अनेक कार्यक्रम तुम्ही नियमितपणे आयोजित करता. हे कार्यक्रम आणखी प्रभावी करता येतील. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्ही दिल्लीतील कन्नडिगांच्या मुलांना कन्नड साहित्य वाचनाची सवय लावण्यासाठी मदत करू शकता. अशा प्रयत्नांमधून कालिके अर्थात ज्ञानाचा जो प्रसार होईल, तो दिल्लीतील कन्नड लोकांबरोबरच इतरांनाही प्रभावित करेल. कन्नडा कलियिरी म्हणजे कन्नड शिकणे आणि कन्नडा कलिसिरी म्हणजे कन्नड शिकणे, दोन्ही बाबी साध्य होतील.
मित्रहो,
कलिकेबरोबरच कलाक्षेत्रातही कर्नाटकनेही अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे. या कार्यक्रमात इतक्या कमी कालावधीत मला संपूर्ण कर्नाटकाच्या सांस्कृतिक दर्शनाची संधी मिळाली, याबद्दल मी कृतज्ञ आहे. कर्नाटक राज्य हे शास्त्रीय कला आणि जानपद कला या दोन्ही बाबतीत समृद्ध आहे. कंसालेपासून कर्नाटकी संगीत शैलीपर्यंत, भरतनाट्यमपासून यक्षगानापर्यंत, कर्नाटकी कलांचे सर्वच प्रकार आपल्याला भरभरून आनंद देतात. दिल्ली कर्नाटक संघाने गेल्या काही वर्षांत असे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. मात्र आता हे प्रयत्न पुढच्या स्तरावर नेण्याची गरज आहे. भविष्यात जेव्हा जेव्हा असा कार्यक्रम असेल तेव्हा दिल्लीतील प्रत्येक कन्नड कुटुंबाने आपल्यासोबत कन्नड नसलेल्या कुटुंबाला या कार्यक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा, असा आग्रह मी करेन. असे केल्यास त्यांनाही कर्नाटकच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडेल आणि कर्नाटकमधील समृद्ध कलांचा आनंद घेता येईल. कन्नड संस्कृतीचे चित्रण करणारे काही चित्रपट कन्नडेतर लोकांमध्येही चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. यामुळे कर्नाटक राज्याला जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची लोकांची उत्सुकता वाढली आहे. या कुतूहलाचा वापर आपण करून घेतला पाहिजे. त्याचबरोबर मला तुमच्याकडून आणखी एक अपेक्षा आहे. कर्नाटकमधील कलाकार, प्रबुद्ध लोक इथे आले आहेत, तुम्ही सर्वांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक, पीएम म्युझियम आणि कर्त्यव्यपथ अशा ठिकाणांना अवश्य भेट द्या, त्यानंतरच परत जा. तुम्हाला अभिमानास्पद वाटणाऱ्या अनेक गोष्टी बघता येतील. ही कामे फार पूर्वीच व्हायला हवी होती, असे तुम्हाला वाटेल. तुम्ही तुमच्या इथल्या अनुभवांबद्दल कर्नाटकातील लोकांना सांगावे, असे मला वाटते.
मित्रहो,
आज अवघे जग भारताच्या पुढाकारासह 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' साजरे करते आहे. कर्नाटक हे भारतीय भरड धान्याचे अर्थात सिरी धान्याचे मुख्य केंद्र आहे. तुमचे श्रीअन्न – नाचणी हा कर्नाटकच्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि तुमची सामाजिक ओळख सुद्धा आहे. आमच्या येडियुरप्पाजींच्या काळापासूनच कर्नाटकात 'सिरी धान्या'च्या प्रचारासाठी कार्यक्रमही सुरू झाले होते. आज संपूर्ण देश कन्नडिगांच्या मार्गावर चालतो आहे आणि भरड धान्यांना श्रीअन्न म्हणू लागला आहे. आज जेव्हा संपूर्ण जग श्रीअन्नाचे फायदे आणि त्याची गरज समजून घेत आहे आणि आगामी काळात त्यांची मागणीही वाढणार आहे. याचा मोठा फायदा कर्नाटकातील जनतेला, कर्नाटकातील छोट्या शेतकऱ्यांना होणार आहे.
मित्रहो,
2047 या वर्षात एक विकसित राष्ट्र म्हणून भारत आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीची 100 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा दिल्ली-कर्नाटक संघ सुद्धा शंभराव्या वर्षात प्रवेश करेल. त्यावेळी भारताच्या अमृतकाळाच्या गौरवातील तुमच्या योगदानाचीही चर्चा होईल. या भव्य सोहळ्यासाठी आणि 75 वर्षांच्या या वाटचालीसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय संतांनी आपल्यामध्ये येऊन आशीर्वाद दिले, आपल्या सर्वांना प्रेरणा दिली त्याबद्दल या आदरणीय संतांप्रतिही मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो की. या पूज्य संतांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान वाटतो. मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्यासोबत बोला, भारत माता की – जय, भारत माता की – जय, भारत माता की – जय!