जय स्वामीनारायण!
या पवित्र कार्यक्रमाला दिशा देणारे पूज्य देवकृष्ण दासजी स्वामी, महंत देवप्रसाद दासजी स्वामी, पूज्य धर्मवल्लभ स्वामी जी, कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व पूज्य संतमंडळी आणि इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय नवयुवा - मित्रांनो!
आपल्या सर्वांना जय स्वामीनारायण!!
पूज्य शास्त्रीजी महाराज धर्मजीवन दासजी स्वामींच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने राजकोट गुरूकुलाला 75 वर्ष होत आहेत. राजकोट गुरूकुलच्या 75 वर्षांच्या या प्रवासाबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी हृदयापासून अभिनंदन करतो. भगवान श्री स्वामी नारायण यांच्या नामःस्मरणानेच एका नवचैतन्याचा संचार होतो आणि आज तुम्हा सर्व संतांच्या सानिध्यामध्ये स्वामीनारायण यांचे नामःस्मरण करण्याची एक वेगळीच संधी मला मिळाली आहे. या ऐतिहासिक संस्थानाचे भविष्य अधिक उज्ज्वल असेल, ही संस्था अधिक उत्तम प्रकारे आपले योगदान देईल, असा मला विश्वास आहे.
मित्रांनो,
श्री स्वामीनारायण गुरूकुल राजकोटच्या प्रवासाची 75 वर्ष, अशा कालखंडामध्ये पूर्ण होत आहेत, ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. हा एक सुखद योगायोग आहे, आणि हा सुखद सुयोगही आहे. एक राष्ट्र म्हणून स्वतंत्र भारताचा जीवन प्रवास, अशा सुयोगांचा आहे. हजारो वर्षांची आपली महान परंपराही अशा सुयोगांनीच गतिमान राहिली आहे. हा सुयोग आहे, कर्मठता आणि कर्तव्याचा सुयोग! हा सुयोग आहे, संस्कृती आणि समर्पणाचा सुयोग! हा सुयोग आहे, आध्यात्म आणि आधुनिकतेचा सुयोग! ज्यावेळी देश स्वतंत्र झाला, त्यावेळी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये भारताचे प्राचीन वैभव आणि आपली महान गौरवशाली परंपरा पुनर्जीवित करण्याची आपल्यावर एक जबाबदारी होती; परंतु गुलामीच्या मानसिकतेच्या दडपणामध्ये सरकारांनी त्या दिशेने पुढे काम केलेच नाही आणि काही गोष्टींमध्ये तर उलट्या दिशेने वाटचाल त्यांनी केली. आणि या परिस्थितीमध्ये, पुन्हा एकदा आपल्या संतांनी, आचार्यांनी देशाविषयीचे हे कर्तव्य पार पाडण्याचा विडा उचलला आहे. स्वामीनारायण गुरूकुल या सुयोगाचे एक जीवंत उदाहरण आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच भारतीय मूल्ये आणि आदर्शांच्या पायावर या आंदोलनासाठी या संस्थानाची निर्मिती केली गेली. पूज्य धर्मजीवनदास स्वामीजी यांचे राजकोट गुरूकुलाचे जे ‘व्हिजन‘ होते, त्यामध्ये आध्यात्म आणि आधुनिकता यांच्यापासून ते संस्कृती आणि संस्कारापर्यंत सर्वकाही समाविष्ट करण्यात आले होते. आज त्याच विचाराचा, त्या पेरलेल्या बीजाचा हा विशाल वटवृक्ष आपल्या समोर आहे. मी गुजरातमध्ये आपल्या सर्वांबरोबर राहिलो आहे. तुमच्यामध्येच लहानाचा मोठा झालो आहे आणि माझे हे सौभाग्य आहे की, मला हा वटवृक्ष आकार घेत असताना पाहण्याची सुसंधी मिळाली.
या गुरूकुलाच्या मुळाशी भगवान स्वामीनारायण यांची प्रेरणा कायम आहे - ‘‘प्रवर्तनीया सद् विद्या भुवि यत् सुकृतं महत्’’! अर्थात्, चांगल्या विद्येचा प्रसार करणे, हे या विश्वामध्ये सर्वात पवित्र, सर्वात महत्वपूर्ण कार्य आहे. हेच तर ज्ञान आणि शिक्षण यांच्याविषयी भारताचे शाश्वत समर्पण आहे. यातूनच आपल्या सभ्यतेचा पाया रोवला आहे. याचा प्रभाव असा आहे की, कधी काळी राजकोटमध्ये अवघ्या सात विद्यार्थ्यांच्याबरोबर सुरू झालेल्या गुरूकुल विद्या प्रतिष्ठानच्या आज देश-विदेशामध्ये जवळपास 40 शाखा आहेत. दरवर्षी येथे हजारो संख्येने विद्यार्थी येतात. गेल्या 75 वर्षांमध्ये गुरूकुलाने विद्यार्थ्यांच्या मनावर उत्तम विचारांचे आणि मूल्यांचे सिंचन केले आहे. त्यांचा समग्र विकास व्हावा, असा विचार त्यामागे केला आहे. आध्यात्माच्या क्षेत्रामध्ये समर्पित युवकांना बरोबर घेऊन इस्रो (आयएसआरओ) आणि बार्क (बीएआरसी) मध्ये संशोधकांपर्यंत, आपल्या गुरूकुल परंपरेने प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाच्या प्रज्ञेला पोषित केले आहे आणि गुरूकुलाचे एक वैशिष्ट्य आपण सर्वजण जाणून आहोत आजच्या काळात तर हे वैशिष्ट्य प्रत्येक जणाला प्रभावित करते. खूपच कमी लोकांना माहिती आहे की, कठीण काळामध्येही आणि आजही हे गुरूकुल असे संस्थान आहे की, प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांकडून शिक्षणासाठी एका दिवसाला अवघा एक रूपया शुल्क आकारले जाते. यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्याचा मार्ग सोपा होत आहे.
मित्रांनो,
आपल्या सर्वजणांना माहिती आहे की, भारतामध्ये ज्ञान हाच जीवनाचा सर्वोच्च उद्देश्य कायम आहे. म्हणूनच ज्या कालखंडामध्ये दुनियेतल्या इतर देशांची ओळख तिथल्या राज्यांमुळे आणि राजकुलांमुळे तयार होत होती, त्यावेळी भारताला, भारतभूमीच्या गुरूकुलांमुळे ओळखले जात होते. गुरूकुल म्हणजे, गुरूचे कुल, ज्ञानाचे कुल! आपल्याकडील गुरूकुल अनेक युगांपासून समता, ममता, समानता आणि सेवाभावाची जणू वाटिका-उद्याने असल्याप्रमाणे आहेत. नालंदा आणि तक्षशिला यांच्यासारखी विद्यापीठे भारताच्या या गुरूकुल परंपरेचे वैश्विक वैभवाला पर्याय बनली होती. संशोधन आणि शोध घेण्याचे कार्य करणे, हे भारताच्या जीवन पद्धतीचा भाग होते. आज आपण भारताच्या कणा-कणामध्ये विविधता पहात आहोत, जी सांस्कृतिक समृद्धी पहात आहोत, ती सर्व त्यांच्याच शोधांमुळे आणि अन्वेषक वृत्तीचा परिणाम आहे. आत्म तत्वापासून ते परमात्म तत्वापर्यंत, आध्यात्मापासून ते आयुर्वेदापर्यंत, समाज शास्त्रापासून ते सौर शास्त्रापर्यंत, गणितापासून धातूशास्त्रापर्यंत, आणि शून्यापासून ते अनंतापर्यंत आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधन केले आहे. नवीन निष्कर्ष काढले आहेत. अंधःकाराने भरलेल्या त्या युगांमध्ये भारताने मानवतेच्या प्रकाशाची किरणे दिली, त्यामुळे आधुनिक विश्व आणि आधुनिक विज्ञानाचा प्रवास सुरू झाला; आणि या यशामध्ये आपल्या गुरूकुलांच्या आणखी एका शक्तीने विश्वाचा मार्ग प्रशस्त केला. ज्या कालखंडामध्ये विश्वामध्ये जेंडर इक्वॅलिटी अर्थात स्त्री-पुरूष समानता यासारख्या शब्दांचा जन्मही झालेला नव्हता, त्यावेळी आमच्याकडे गार्गी-मैत्रेयी यांच्यासारख्या महान विदुषी शास्त्रार्थ सांगत होत्या. महर्षि वाल्मिकींच्या आश्रमामध्ये लव-कुश यांच्याबरोबरच आत्रेयी सुद्धा अध्ययन करीत होती.
या प्राचीन परंपरेचा वारसा चालू ठेवण्यासाठी, आधुनिक भारताला पुढे नेण्यासाठी स्वामीनारायण गुरुकुल 'कन्या गुरुकुल' सुरू करत आहे, याचा मला आनंद आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, या अमृत काळात, या संस्थेकरिता ही अतिशय अभिमानाची मोठी कामगिरी असेल, आणि देशासाठीही महत्त्वाचे योगदान असेल.
मित्रांनो,
भारताच्या उज्ज्वल भविष्यात आपली आजची शिक्षण व्यवस्था आणि शैक्षणिक संस्थांचा किती मोठा वाटा आहे हे आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे. म्हणूनच, स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, मग त्या शैक्षणिक पायाभूत सुविधा असो की शैक्षणिक धोरण, प्रत्येक स्तरावर आपण अधिक वेगाने आणि अधिक व्यापक काम करत आहोत. आज देशात आयआयटी, ट्रिपल आयटी, आयआयएम, एम्स सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांची संख्या झपाट्याने वाढते आहे. 2014 नंतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 65 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. नवीन 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा'च्या माध्यमातून देश प्रथमच भविष्याचा वेध घेणारी, भविष्यात डोकावणारी शिक्षण व्यवस्था तयार करत आहे. जेव्हा नवीन पिढी लहानपणापासूनच चांगल्या शिक्षण पद्धतीत वाढेल आणि विकसित होईल, तेव्हा देशासाठी आदर्श नागरिकांची जडणघडण आपोआप होत राहील. हेच आदर्श नागरिक, आदर्श तरुण 2047 मध्ये, जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल, तेव्हा विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करतील; आणि यात श्रीस्वामीनारायण गुरुकुल सारख्या शैक्षणिक संस्थांचे प्रयत्न नक्कीच खूप महत्वाचे असतील.
मित्रांनो,
अमृतकाळाच्या पुढील 25 वर्षांच्या वाटचालीत तुम्हा संतांचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांची साथ खूप महत्त्वाचे आहेत. आज भारताचे संकल्पही नवीन आहेत, ते संकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्नही नाविन्यपूर्ण आहेत. आज देश डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल, प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत तलावनची निर्मिती, एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेसह पुढे जात आहे. समाजपरिवर्तन आणि समाजसुधारणेच्या या कामांमध्ये देखील सर्वांच्या प्रयत्नांचा परिणाम कोट्यवधी लोकांच्या जीवनावर होईल. स्वामीनारायण गुरुकुल विद्या प्रतिष्ठानम सारख्या संस्था या संकल्प यात्रेला अशीच उर्जा देत राहतील याची मला खात्री आहे; आणि आज जेव्हा मी तुम्हा सर्व संतांच्या सान्निध्यात आलो आहे, तेव्हा 75 वर्षांचा खूप मोठा प्रवास तुम्ही यशस्वीपणे पुढे नेला आहे. त्याचा आता देशातील तरुणांच्या हितासाठी विस्तार व्हायला हवा. मी आज स्वामीनारायण गुरुकुलांना एक प्रार्थना करू शकतो का? तुम्ही ठरवा की दरवर्षी किमान 100 युवक 15 दिवसांकरिता आपल्या ईशान्य भारतातील नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, सिक्कीम या राज्यांमध्ये जातील. 15 दिवस तिथं जाऊन तिथल्या तरुणांना भेटणं, त्यांच्याशी ओळख करून घेणं, तिथल्या गोष्टी जाणून घेणं, परत आल्यावर त्यावर लिखाण करणे, दरवर्षी किमान 150 तरुणांनी 15 दिवस तिथे जावं. 75 वर्षांपूर्वी आपल्या संतांनी किती अडचणींचा सामना करून हा प्रवास सुरू केला असेल ते तुम्ही पाहा, आपल्या ईशान्येत किती होतकरू तरुण आहेत हे तुम्हाला दिसेल. जर त्यांच्याशी आपले नाते निर्माण झाले, तर देशात ही एक नवीन ताकद निर्माण होईल, तुम्ही प्रयत्न करा.
तसंच मला आठवतंय, जेव्हा आपण बेटी बचाओ अभियान करत होतो, तेव्हा लहान-लहान मुली रंगमंचावर येऊन 7 मिनिटे, 8 मिनिटे, 10 मिनिटे अतिशय हृदयस्पर्शी आणि उत्तम अभिनयासह भाषण देत असत. सर्व प्रेक्षकांना त्या रडवायच्या; आणि त्या म्हणत असत कि मी आईच्या गर्भातून बोलत होते, आई मला मारू नकोस. स्त्री भ्रूणहत्येविरोधातील आंदोलनाचे खूप मोठे नेतृत्व गुजरातमधील आपल्या मुलींनीच केले होते. आपल्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी पृथ्वी मातेच्या रूपात लोकांना संबोधित करावे की मी तुझी आई आहे. मी तुमच्यासाठी अन्न, फळे, फुले सगळ्याची पैदास करते. ही खते, ही रसायने, ही औषधे यांच्या वापराने मला मारू नका, मला त्यांच्यापासून मुक्ती द्या. आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांमध्ये जाऊन पथनाट्य, शहरी नाट्य सादर करावीत. आपले गुरुकुल खूप मोठी मोहीम राबवू शकते. आपल्या गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी यांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक शेतीची एक मोठी मोहीम सुरू झाली आहे याचा मला आनंद आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मानवाला व्यसनमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत आहात, त्याचप्रमाणे या प्रकारच्या विषापासून पृथ्वी मातेला मुक्त करण्याचे व्रत घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचे काम तुम्ही करू शकता, कारण गुरुकुलमध्ये येणारे लोक मूळ गावातील, शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून ही शिकवण अगदी सहजपणे पोहोचू शकते. तर, स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात आपले गुरुकुल, आपले सुसंस्कृत सुशिक्षित तरुण उज्ज्वल भविष्यासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, एक भारत श्रेष्ठ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक नवीन विचार, आदर्श आणि संकल्पना, घेऊन वाटचाल करू शकतात; आणि स्वामीनारायण परंपरा माझ्यासाठी खूप मोठे भाग्य आहे असे मी मानतो की, स्वामीनारायण परंपरेत मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटलो तेव्हा तेव्हा तुम्ही सर्वांनी मी जे काही मागितले ते पूर्ण केले. आज जेव्हा मी या गोष्टी मागत आहे, मला खात्री आहे, तुम्ही त्या पूर्ण कराल; आणि गुजरातचे नाव तर उज्वल होईलच, भावी पिढ्यांचे जीवनही सुसह्य होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.
जय स्वामीनारायण.