जय गुरु रविदास.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, संपूर्ण भारतातून इथे आलेले आदरणीय संत, भक्तमंडळी आणि माझ्या बंधू-भगिनींनो,
गुरु रविदासजींच्या जयंतीनिमित्त मी तुम्हा सर्वांचे त्यांच्या जन्मभूमीत स्वागत करतो. रविदासजींच्या जयंतीनिमित्त तुम्ही सर्वजण कितीतरी दुरुन इथे येता. विशेषत: माझ्या पंजाबमधून इतके बंधू आणि भगिनी येतात की बनारस तर जणू 'मिनी पंजाब'च वाटतो. हे सर्व संत रविदासजींच्या कृपेनेच शक्य होत असते. मलादेखील रविदासजी पुन्हा पुन्हा त्यांच्या जन्मस्थानी बोलावतात. मला त्यांचे संकल्प पुढे नेण्याची आणि त्यांच्या लाखो अनुयायांची सेवा करण्याची संधी मिळते. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व गुरू अनुयायांची सेवा करणे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे.
आणि बंधूभगिनींनो,
येथील खासदार असल्याच्या नात्याने, काशीचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावरही विशेष जबाबदारी आहे. बनारसमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करणे आणि तुमच्या सुविधांची विशेष काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. आज या शुभदिनी मला या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. बनारसच्या विकासासाठी आज शेकडो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सोपा होणार आहे. याशिवाय संत रविदासजींच्या जन्मभूमीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. मंदिर आणि मंदिर परिसराचा विकास, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची बांधणी, इंटरलॉकिंग आणि गटारवाहिनीचे काम, भाविकांना सत्संग आणि साधना करण्यासाठी, प्रसाद घेण्यासाठी विविध व्यवस्था निर्माण करणे, या सर्व कामांमुळे लाखो भाविकांना मदत होणार आहे.
माघी पौर्णिमेच्या यात्रेत भाविकांना आध्यात्मिक आनंद तर मिळेलच शिवाय अनेक अडचणींतून सुटका होईल. आज मला संत रविदासजींच्या नवीन पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे सद्भाग्यही लाभले आहे. संत रविदास संग्रहालयाची पायाभरणीही आज करण्यात आली. या विकासकामांसाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. संत रविदासजींच्या जयंती आणि माघी पौर्णिमेनिमित्त मी देशभरातील आणि जगभरातील सर्व भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आज थोर संत आणि समाजसुधारक गाडगे बाबा यांची जयंती देखील आहे. संत रविदासांप्रमाणेच गाडगे बाबांनी समाजाला रूढींच्या बेड्यांमधून मुक्त करण्यासाठी आणि दलित आणि वंचितांच्या कल्याणासाठी खूप काम केले होते. खुद्द बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः त्यांचे मोठे प्रशंसक होते. गाडगे बाबांवरही बाबासाहेबांचा खूप प्रभाव होता. आज या निमित्ताने गाडगे बाबांच्या चरणी सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो.
मित्रांनो,
आत्ता व्यासपीठावर येण्यापूर्वी मी संत रविदासजींच्या मूर्तीला पुष्प अर्पण करायला आणि त्यांना अभिवादन करायला गेलो होतो. या वेळी माझे मन जेवढे श्रद्धेने भरले होते, तेवढीच कृतज्ञताही मनात येत होती. अनेक वर्षापूर्वी मी राजकारणात नव्हतो किंवा कोणतेही पद भूषवत नव्हतो, तेव्हाही मला संत रविदासजींच्या शिकवणीतून मार्गदर्शन मिळायचे. रविदासजींची सेवा करण्याची संधी मिळावी अशी माझ्या मनात भावना होती. आणि आज केवळ काशीतच नाही तर देशातील इतर ठिकाणीही संत रविदासजींशी संबंधित संकल्प पूर्ण होत आहेत. रविदासजींच्या शिकवणुकीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नवीन केंद्रेही स्थापन केली जात आहेत. काही महिन्यांपूर्वी मला मध्य प्रदेशातील सतना इथे संत रविदास स्मारक आणि कला संग्रहालयाची पायाभरणी करण्याचा बहुमान मिळाला. काशी मध्ये तर विकासाची संपूर्ण गंगाच वाहत आहे.
मित्रहो,
भारताचा इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा देशाला गरज असते तेव्हा कोणीतरी संत, ऋषी किंवा महान व्यक्तिमत्व भारतात जन्माला येते. रविदासजी तर अशा भक्ती चळवळीचे एक महान संत होते, ज्यांनी दुबळ्या आणि दुभंगलेल्या भारताला नवी ऊर्जा दिली. रविदासजींनी समाजाला स्वातंत्र्याचे महत्त्व देखील सांगितले होते आणि सामाजिक दुही सांधण्याचे कामही केले. त्यावेळी त्यांनी उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्यता आणि भेदभावाविरुद्ध आवाज उठवला होता. संत रविदास हे असे संत आहेत की ज्यांना धर्म, पंथ आणि विचारसरणीच्या सीमारेषेने बांधून ठेवता येत नाही. रविदासजी सर्वांचे आहेत, आणि सर्वजण रविदासजींचे आहेत. जगद्गुरू रामानंद यांचे शिष्य म्हणून वैष्णव समाजही त्यांना आपले गुरू मानतो. शीख बंधू भगिनी त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहतात. काशीत राहून त्यांनी ‘मन चंगा तो कठौती में गंगा’ (मन शुद्ध तर शुद्ध मनाने केलेले काम गंगेप्रमाणे पवित्र) ही शिकवण दिली होती. त्यामुळे काशीला मानणारे आणि गंगा मातेवर श्रद्धा ठेवणारे लोकही रविदासजींकडून प्रेरणा घेतात. मला आनंद आहे की आज आपले सरकार रविदासजींच्या विचारांनाच पुढे नेत आहे. भाजपाचे सरकार सर्वांचे आहे. भाजपा सरकारच्या योजना सर्वांसाठी आहेत. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ (सर्वांचे सहकार्य, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास, सर्वांचा प्रयत्न)हा मंत्र आज 140 कोटी देशवासीयांशी जोडण्याचा मंत्र बनला आहे.
मित्रांनो,
रविदासजींनी समता आणि सद्भाव-एकोप्याची शिकवण देखील दिली आणि नेहमी दलित आणि वंचितांची विशेष काळजी सुद्धा वाहिली. वंचित समाजाला प्राधान्य देऊनच समता येते. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत जे लोक वर्गविकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले, गेल्या दहा वर्षात अशा लोकांनाच केंद्रस्थानी ठेवून काम झाले आहे.
पूर्वी ज्या गरीबाला शेवटचे स्थान दिले जायचे, सर्वात छोटे मानले जायचे, आज सर्वात मोठ्या योजना त्यांच्यासाठी बनवल्या आहेत, आज या योजनांना जगातील सर्वात मोठ्या सरकारी योजना म्हटले जात आहे. तुम्ही पहा, कोरोनाचे एवढे मोठे संकट उभे ठाकले. आम्ही 80 कोटी गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याची योजना सुरू केली. कोरोना नंतरही आम्ही मोफत अन्नधान्य पुरवणे थांबवले नाही. कारण, स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या गरीबांनी मोठी प्रगती करावी असे आम्हाला वाटते. त्याच्यावर अतिरिक्त भार येऊ नये. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशी योजना जगातील कोणत्याही देशात नाही. आम्ही स्वच्छ भारत अभियान राबवले. देशातील प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबासाठी मोफत शौचालये बांधली. दलित मागास कुटुंबांना, विशेषतः आपल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , ओबीसी माता-भगिनींना याचा सर्वाधिक फायदा झाला. त्यांनाच बहुतांश वेळा उघड्यावर शौचास जावे लागत होते , त्रास सहन करावं लागत होता. आज देशातील प्रत्येक गावात स्वच्छ पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन अभियान सुरू आहे. 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 11 कोटींहून अधिक घरांना पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. कोट्यवधी गरीबांना मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड मिळाले आहे. कुठलाही आजार झाला तरी उपचाराअभावी आयुष्य संपणार नाही, हा दिलासा त्यांना प्रथमच मिळाला आहे. त्याचप्रमाणे जनधन खात्यांमुळे गरीबांना बँकेत जाण्याचा अधिकार मिळाला आहे. सरकार याच बँक खात्यांमध्ये थेट पैसे पाठवतं . या खात्यांमध्ये शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी दिला जातो, त्यापैकी सुमारे 1.5 कोटी लाभार्थी आपले दलित शेतकरी आहेत. पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दलित आणि मागासवर्गीय शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. युवकांसाठी देखील, 2014 पूर्वी जितक्या शिष्यवृत्ती दिल्या जायच्या , त्याच्या दुप्पट शिष्यवृत्ती आज आम्ही दलित युवकांना देत आहोत. तसेच 2022-23 मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दलित कुटुंबांच्या खात्यात हजारो कोटी रुपये पाठवण्यात आले, जेणेकरून त्यांनाही स्वतःचे पक्के घर मिळावे.
आणि बंधू आणि भगिनींनो,
दलित, वंचित, मागास आणि गरीब यांच्यासाठी आज सरकारचा हेतू स्वच्छ असल्यामुळेच भारत इतकी मोठी कामे करू शकत आहे. तुमची साथ आणि तुमचा विश्वास आमच्या पाठीशी असल्यामुळे भारत हे काम करू शकला आहे. संतांच्या विचारांनी प्रत्येक युगात आपले मार्गदर्शन केले आहे आणि वेळोवेळी आपल्याला सावध केले आहे .
रविदास जी म्हणायचे -
जात पात के फेर महि, उरझि रहई सब लोग।
मानुष्ता कुं खात हई, रैदास जात कर रोग॥
म्हणजेच बहुतांश लोक जात-पंथाच्या भेदात अडकून राहतात. जात-पंथाचा हाच रोग मानवतेला हानी पोहोचवतो. म्हणजेच जात-पंथाच्या नावावर जेव्हा कोणी एखाद्याची भेदभाव करते तेव्हा मानवतेची हानी होते. जात-पंथाच्या नावाखाली कोणी चिथावणी दिली तर त्यामुळेही मानवतेची हानी होते.
म्हणूनच बंधू -भगिनींनो,
आज देशातील प्रत्येक दलित आणि प्रत्येक मागास व्यक्तीने आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या देशात जातीच्या नावावर भडकवणे आणि भांडणे लावण्यावर विश्वास ठेवणारे इंडी आघाडीचे लोक दलित आणि वंचितांच्या हिताच्या योजनांना विरोध करतात. आणि सत्य हे आहे की हे लोक जातीच्या कल्याणाच्या नावाखाली आपल्या कुटुंबाच्या स्वार्थाचे राजकारण करतात. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा गरीबांसाठी शौचालय बांधायला सुरुवात झाली तेव्हा या लोकांनी त्याची खिल्ली उडवली . जन धन खात्याची त्यांनी खिल्ली उडवली होती.
त्यांनी डिजिटल इंडियाला विरोध केला होता. एवढेच नाही तर घराणेशाही पक्षांची आणखी एक ओळख आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबाबाहेरील कोणत्याही दलित किंवा आदिवासी व्यक्तीला पुढे जाऊ द्यायचे नाही. दलित , आदिवासींना उच्च पदावर बसवणे त्यांना सहन होत नाही. तुम्हाला आठवत असेल की महामहिम द्रौपदी मुर्मू जी देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनण्यासाठी निवडणूक लढवत होत्या, तेव्हा कुणी-कुणी त्यांना विरोध केला होता? त्यांचा पराभव करण्यासाठी कोणत्या पक्षांनी राजकीय जुळवाजुळव केली होती ?
ते सर्व घराणेशाही पक्ष होते, ज्यांना निवडणुकीच्या वेळी दलित, मागास आणि आदिवासी हे आपली वोट बँक आहे असे वाटू लागते. अशा विचारसरणीच्या लोकांपासून आपण सावध रहायला हवे. जातीयवादाची नकारात्मक मानसिकता टाळून रविदासजींची सकारात्मक शिकवण आपण आत्मसात करायला हवी.
मित्रहो,
रविदासजी म्हणायचे-
सौ बरस लौं जगत मंहि जीवत रहि करू काम।
रैदास करम ही धरम है करम करहु निहकाम॥
म्हणजे शंभर वर्षांचे आयुष्य असले तरी आयुष्यभर आपण काम केले पाहिजे. कारण, कर्म हाच धर्म आहे. निस्वार्थ भावनेने आपण काम केले पाहिजे. संत रविदासजींची ही शिकवण आज संपूर्ण देशासाठी आहे. देशाने आता स्वातंत्र्याच्या अमृत काळात प्रवेश केला आहे.
गेल्या काही वर्षांत अमृत काळात विकसित भारताच्या उभारणीचा भक्कम पाया रचला गेला आहे. आता पुढील 5 वर्षात या पायावर विकासाची भक्कम इमारत आपल्याला उभारायची आहे . 10 वर्षांमध्ये गरीब आणि वंचितांच्या सेवेसाठी जी मोहिम राबवली, तिचा पुढील 5 वर्षांत आणखी विस्तार केला जाणार आहे. हे सर्व 140 कोटी देशवासीयांच्या सहभागानेच शक्य होऊ शकेल. म्हणूनच देशातील प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य बजावणे गरजेचे आहे. आपण देशाचा विचार करायला हवा. फुटीरतावादी आणि विभाजनवादी विचारांपासून दूर राहून देशाची एकात्मता बळकट करायची आहे. मला विश्वास आहे की संत रविदासजींच्या कृपेने देशवासीयांची स्वप्ने नक्कीच साकार होतील. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना संत रविदास जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद!