उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, देश-परदेशातून आलेले औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी आणि माझ्या परिवारातील सदस्य! आज आपण इथे विकसित भारतासाठी विकसित उत्तर प्रदेश निर्मितीचा संकल्प करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. आणि मला असे सांगण्यात आले की, आत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याबरोबर उत्तर प्रदेशातील 400 पेक्षा जास्त विधानसभा मतदार संघातील लक्षावधी लोक या कार्यक्रमाबरोबर जोडले गेले आहेत. जे लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत, त्या सर्वांचेही मी अगदी मनापासून स्वागत करतो. 7-8 वर्षांपूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो की, उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणि नोकरीच्या संधी निर्माण होण्याविषयी असे वातावरण तयार होईल. त्या काळामध्ये जर कोणी म्हणाले असते की, उत्तर प्रदेश विकसित राज्य बनेल, तर कदाचित ते कोणी ऐकूनही घेतले नसते. त्यामुळे यावर कोणी विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. परंतु आज पहा, लक्षावधी कोटी रूपयांची गुंतवणूक उत्तर प्रदेशमध्ये केली जात आहे आणि मी उत्तर प्रदेशचा खासदार आहे. माझ्या उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी असे काही चांगले घडते, त्यावेळी सर्वात जास्त आनंद मला होतो. आज हजारो प्रकल्पांवर काम सुरू होत आहे. कारखान्यांची उभारणी केली जात आहे. हे सर्व उद्योग सुरू होत आहेत, त्यांच्यामुळे उत्तर प्रदेशचे चित्रच बदलून जाणार आहे. सर्व गुंतवणूकदारांचे आणि विशेषतः उत्तर प्रदेशातील सर्व युवकांचे मी आज विशेष अभिनंदन करतो.
मित्रांनो,
उत्तर प्रदेशमध्ये डबल इंजिन सरकार बनले, त्याला सात वर्ष झाली आहेत. गेल्या सात वर्षांमध्ये राज्यामध्ये जी ‘रेड टेप’ म्हणजे लाल फितीची संस्कृती होती, ती संपुष्टात आणून आता उद्योगांना लाल गालिचे अंथरले जाण्याची संस्कृती आली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. व्यावसायिक संस्कृतीचा विस्तार झाला आहे. गेल्या सात वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात व्यापार, विकास आणि विश्वास यांचे वातावरण तयार झाले आहे. डबल इंजिनच्या सरकारने दाखवून दिले आहे की, जर परिवर्तन घडवून आणण्याचा हेतू शुद्ध असेल तर, असे चांगले काम करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशातून होणारी निर्यात आता दुप्पट झाली आहे. वीजेची निर्मिती असो अथवा वीजेचे वितरण, आज उत्तर प्रदेशमध्ये अतिशय कौतुकास्पद काम होत आहे. आज देशामध्ये सर्वाधिक द्रुतगती मार्ग असलेले राज्य उत्तर प्रदेश आहे. देशाची पहिली वेगवान रेल्वे ज्या राज्यात धावते ते राज्य उत्तर प्रदेश आहे. मालवाहू समर्पित पश्चिम मार्गिका आणि मालवाहू समर्पित पूर्व मार्गिका यांचे व्यापक जाळे उत्तर प्रदेशातून जात आहे. उत्तर प्रदेशात असलेल्या नद्यांचे मोठे जाळे लक्षात घेवून त्यांच्या पात्रांचा वापर मालवाहू जहाजांसाठी राज्यात केला जात आहे. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मालाची वाहतूक सुकर बनत आहे. वाहतूक व्यवस्था वेगवान आणि स्वस्त झाली आहे.
मित्रांनो,
आज या कार्यक्रमाचे विश्लेषण, मी फक्त गुंतवणूकीच्या बाबतीत करतोय असे नाही. आज इथे उपस्थित असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये जो आशावाद दिसत आहे, गुंतवणूकीतून अधिक चांगला परतावा मिळणार, याविषयी जी आशा दिसून येत आहे, त्याला खूप व्यापक संदर्भ आहे. आज तुम्ही जगामध्ये कुठेही गेलात तर, भारताविषयी अभूतपूर्व सकारात्मकता दिसून येत आहे. चार-पाच दिवसांपूर्वीच मी यूएई आणि कतार या देशांचा दौरा करून आलो आहे. प्रत्येक देश, भारताची यशोगाथा पाहून आश्वस्त आहे, त्यांना भारताविषयी खूप विश्वास वाटू लागला आहे. आज देशामध्ये ‘मोदी यांची गॅरंटी’ या विषयावर खूप चर्चा सुरू आहे. मात्र आज संपूर्ण दुनियेमध्ये भारत हा चांगला परतावा देणारा देश असे मानले जात आहे. बहुतांशवेळा आपण पाहिले आहे की, निवडणुका जवळ आल्या की, लोक गुंतवणूक करण्यापासून थोडे लांब राहतात. मात्र आज भारताने ही धारणाही संपुष्टात आणली आहे. आज जगभरातील गुंतवणूकदारांना भारताच्या सरकारवर, सरकारच्या धोरणावर, सरकारच्या स्थैर्यावर संपूर्ण भरवसा आहे. हाच विश्वास इथे उत्तर प्रदेशमध्ये, लखनौमध्ये दिसून येत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
ज्यावेळी मी विकसित भारत याविषयी बोलत असतो, त्यावेळी यासाठी नवीन विचार करण्याचीही गरज आहे आणि नवी दिशाही पाहिजे. देशामध्ये ज्या प्रकारचा विचार स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत सुरू होता, त्याप्रमाणे पुढे जाणे अशक्य होते. काय होता तो विचार? तर विचार असा होता की, देशाच्या नागरिकांनी कसे-बसे जगावे, त्यांना प्रत्येक मूलभूत सुविधांसाठीही खूप वाट पहावी लागावी. आधीचे सरकार असा विचार करीत होते की, फक्त मोठ्या निवडक 2-3 शहरांमध्येच सुविधांची निर्मिती केली जावी. नोकरीच्या संधीही काही ठराविक, निवडक शहरांमध्येच निर्माण केल्या जाव्यात. असे करणे खूप सोपे होते. कारण यामध्ये परिश्रम फारसे करावेच लागत नाहीत. मात्र अशा विचारांमुळे देशाचा खूप मोठा भाग विकासापासून वंचित राहिला. उत्तर प्रदेशच्या बाबतीत भूतकाळात असेच घडले आहे. मात्र आमच्या डबल इंजिनाच्या सरकारने या जुन्या राजकीय विचारांना पूर्ण बदलून टाकले. आम्ही उत्तर प्रदेशातील प्रत्येक कुटुंबाचे जीवन कसे सुकर होईल, यासाठी सातत्याने कार्यरत आहोत. ज्यावेळी जीवन सोपे, सुकर होईल, त्यावेळी व्यवसाय करणे आणि उद्योग चालवणे आपोआपच सोपे होईल. आता आपणच पहा, आम्ही गरीबांसाठी 4 कोटी पक्की घरकुले बनवली आहेत. आणि त्याचबरोबर शहरांमध्ये वास्तव्य करणा-या मध्यम वर्गीय कुटुंबांना स्वतःच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जवळपास 60 हजार कोटी रूपयांची मदतही केली आहे. या निधीतून शहरांमध्ये वास्तव्य करणा-या 25 लाख मध्यम वर्गीय कुटुंबांना गृहकर्जावरील व्याजामध्ये सवलत मिळाली आहे. यामध्ये दीड लाख लाभार्थी परिवार माझ्या उत्तर प्रदेशातील आहेत. आमच्या सरकारने कमी केलेल्या प्राप्तीकराचा लाभही मध्यम वर्गाला मिळत आहे. 2014 च्या आधी फक्त 2 लाख रूपयांच्या उत्पन्नावर प्राप्तीकर लावला जात होता. मात्र भाजपा सरकारच्या काळामध्ये आता 7 लाख रूपयांपर्यंत उत्पन्न असेल तर कोणताही प्राप्तीकर द्यावा लागत नाही. त्यामुळे मध्यम वर्गाचे हजारो कोटी रूपये वाचले आहेत.
मित्रांनो,
आम्ही उत्तर प्रदेशमध्ये राहणीमान सुलभता आणि व्यवसाय सुलभता यांच्यावर सारखाच भर दिला आहे. डबल इंजिन सरकारचा उद्देश आहे की, एकही लाभार्थी, कोणत्याही सरकारी योजनेपासून वंचित राहू नये. अलिकडेच विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे, त्यामध्येही उत्तर प्रदेशमधील लक्षावधी लाभार्थींना त्यांच्या घराजवळ पोहोचून विविध योजनांमध्ये सहभागी करून घेतले आहे. ‘मोदी की गॅरंटी’वाली गाडी, प्रत्येक गावां-गावांमध्ये, शहरा-शहरांमध्ये पोहोचली आहे. संपृक्ततेपर्यंत म्हणजेच अगदी पात्र लोकांना शंभर टक्के लाभ योजनेचा मिळावा, यासाठी ज्यावेळी सरकार स्वतःहून लाभार्थींपर्यंत पोहोचते, त्यावेळी त्याला ख-या अर्थाने सामाजिक न्याय साधला गेला, असे म्हणता येते. हीच खरी धर्मनिरपेक्षता आहे. भ्रष्टाचार आणि भेदभाव, यांचे एक मोठे कारण कोणते आहे, याविषयी तुम्ही थोडा विचार करावा. आधीच्या सरकारच्या काळामध्ये लोकांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळविण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या. एका खिडकीतून- दुस-या खिडकीपर्यंत कागदपत्रे घेवून धावपळ करावी लागत होती. आता आमचे सरकार स्वतःहून गरीबांच्या दारापर्यंत जात आहे. आणि जोपर्यंत प्रत्येक लाभार्थीला त्याच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत, तोपर्यंत आमचे सरकार शांत बसणार नाही, आणि ही ‘मोदी ची गॅरंटी’ आहे. जोपर्यंत म्हणजे, यामध्ये मोफत अन्नधान्य असो, मोफत औषधोपचार असो, पक्के घरकूल असो, वीज-पाणी- गॅस जोडणी, या सर्व गोष्टी लाभार्थींना मिळत राहतील.
मित्रांनो,
ज्यांना यापूर्वी कोणी प्रश्न विचारला नव्हता त्यांना देखील मोदी आज विचारत आहे. शहरांमध्ये आपले जे हातगाडीवरुन, फुटपाथवर किंवा फिरते विक्रेते बंधू भगिनी असतात त्यांना मदत करावी असा विचार पूर्वीच्या एकाही सरकारने केला नाही. या लोकांसाठी आमचे सरकार पंतप्रधान स्वनिधी योजना घेऊन आले आहे. या योजनेतून आतापर्यंत हातगाडीवर-फुटपाथवर-फिरत्या विक्रेत्यांना सुमारे 10 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. येथे उत्तर प्रदेशात देखील 22 लाख हातगाडीवर-फुटपाथवर-फिरत्या विक्रेत्या मित्रांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेचा जो परिणाम झाला आहे तो असे दर्शवतो की जेव्हा गरीब माणसाला बळ मिळते तेव्हा तो काहीही करू शकतो. पंतप्रधान स्वनिधी योजनेचा अभ्यास केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे ती अशी की, स्वनिधी योजनेची मदत घेणाऱ्या नागरिकांच्या सरासरी उत्पन्नात 23 हजार रुपयांची अतिरिक्त वाढ झाली आहे. तुम्ही मला सांगा, अशा मित्रांना हे अतिरिक्त उत्पन्न किती मोठी शक्ती देत असेल. पंतप्रधान स्वनिधी योजनेने हातगाडीवर-फुटपाथवर-फिरत्या विक्रेत्यांची क्रयशक्ती देखील वाढवली आहे. आणखी एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 75 टक्के लाभार्थी दलित, मागासलेले आणि आदिवासी बंधू भगिनी आहेत. त्यातही निम्मे लाभार्थी आपल्या भगिनी आहेत. पूर्वी यांना बँकांकडून कोणतीही मदत मिळत नसे कारण यांच्याकडे बँकांना गॅरंटी देण्यासाठी कोणतेही तारण उपलब्ध नव्हते. पण आज यांच्याकडे मोदींची गॅरंटी आहे आणि म्हणून यांना बँकांकडून देखील मदत मिळू लागली आहे. यालाच सामाजिक न्याय असे म्हणतात, ज्याचे स्वप्न एकेकाळी जेपी यांनी पाहिले, कधी काळी हेच स्वप्न लोहीयाजींनी देखील पाहिले होते.
मित्रांनो,
आमच्या दुहेरी इंजिनच्या सरकारचे निर्णय आणि योजनांनी सामाजिक न्याय आणि अर्थव्यवस्था दोन्हींचा फायदा होतो. तुम्ही लखपती दीदी बाबतच्या सरकारच्या निर्धाराबद्दल नक्कीच ऐकले असेल. गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही देशभरात 10 कोटी भगिनींना स्वयंसहाय्यता बचत गटांशी जोडले आहे. यापैकी आतापर्यंत, तुम्ही उद्योग जगतातील लोकांनी जरा हा आकडा ऐका, आतापर्यंत 1 कोटी भगिनी लखपती दीदी झाल्या आहेत. आणि आता सरकारने 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशात सुमारे अडीच लाख ग्राम पंचायती आहेत.तुम्ही कल्पना करा की 3 कोटी लखपती दीदी तयार झाल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीची क्रयशक्ती किती वाढेल. यामुळे या भगिनींच्या जीवनासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर देखील खूप सकारात्मक परिणाम होत आहे.
बंधुंनो आणि भगिनींनो,
आपण जेव्हा विकसित उत्तर प्रदेशचा उल्लेख करतो तेव्हा याच्या पाठीमागे आणखी एक शक्ती आहे. ही शक्ती आहे येथील एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची शक्ती. दुहेरी इंजिनचे सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेशात एमएसएमईचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. येथील एमएसएमईना हजारो कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही जी संरक्षण मार्गिका तयार होत आहे, ज्या नव्या आर्थिक मार्गिका उभारण्यात येत आहेत त्यांच्यापासून देखील एमएसएमईना लाभ होणार आहे.
मित्रांनो,
उत्तर प्रदेशातील जवळ जवळ प्रत्येक जिल्ह्यात कुटीर उद्योगांची फार जुनी परंपरा आहे. कुठे कुलुपे तयार केली जातात, कुठे पितळेच्या कलाकुसरीचे काम होते, कुठे गालिचे तयार होतात, कुठे मातीची कलाकारी बनते, काही ठिकाणी चिकनकारीचे काम केले जाते. या परंपरेला आम्ही एक जिल्हा एक उत्पादन योजनेतून बळकटी देत आहोत. तुम्ही रेल्वे स्थानकांवर देखील पाहू शकाल की एक जिल्हा एक उत्पादन योजनेला कशा प्रकारे प्रोत्साहन दिले जाते आहे, या योजनेचा कसा प्रचार होतो आहे. आता आम्ही 13 हजार कोटी रुपयांची पंतप्रधान विश्वकर्मा योजना देखील घेऊन आलो आहोत. उत्तर प्रदेशात पारंपरिकतेने हस्तकला-शिल्पकला यांच्याशी संबंधित लाखो विश्वकर्मा परिवारांना ही योजना आधुनिकतेशी जोडणारी आहे. त्यांना त्यांच्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी बँकांकडून किफायतशीर व्याजदरात विनाहमी कर्ज मिळवून देण्यात ही योजना मदत करेल.
बंधू आणि भगिनींनो,
आमचे सरकार कसे काम करते याची झलक तुम्हाला खेळणी उत्पादन क्षेत्रात देखील मिळेल. आणि मी तर काशीहून संसदेवर निवडून गेल्याने तेथे तयार होणाऱ्या लाकडी खेळण्यांची जाहिरात करतच असतो.
मित्रांनो,
भारत काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातील मुलांसाठीची बहुतांश खेळणी परदेशातून आयात करत असे. भारतात खेळणी बनवण्याची एक समृद्ध परंपरा असूनही ही स्थिती होती. पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील लोक खेळणी बनवण्यात पारंगत होते. मात्र भारतीय खेळण्यांना कधीच प्रोत्साहन देण्यात आले नाही, आधुनिक जगानुसार बदल घडवण्यासाठी आपल्या कारागिरांना मदत दिली गेली नाही. आणि या कारणाने भारताच्या बाजारपेठा तसेच घरांमध्ये परदेशी खेळण्यांचा वरचष्मा राहिला. मी ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला आणि देशभरातील खेळणी उत्पादकांसोबत उभे राहणे, त्यांची मदत करणे या गोष्टी केल्या आणि मी त्यांना पुढे जाण्याचा आग्रह केला. त्यामुळे आता स्थिती अशी आहे की आपली खेळण्यांची आयात खूप कमी झाली आणि भारतीय खेळण्यांची निर्यात अनेक पटींनी वाढली.
मित्रांनो,
भारताचे सर्वात मोठे पर्यटन केंद्र होण्याची क्षमता उत्तर प्रदेशामध्ये आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला आता वाराणसी आणि अयोध्येला यायची इच्छा आहे. दर दिवशी लाखो लोक या स्थळांकडे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आहेत. यामुळे उत्तर प्रदेशातील लहान उद्योजक, विमान कंपन्या तसेच हॉटेल-उपाहारगृहाचे मालक यांच्यासाठी अभूतपूर्व संधी निर्माण होत आहेत. मी देशातील सर्व पर्यटकांना एक आग्रह करू इच्छितो, देशातील सर्व प्रवाशांना मी विनंती करतो की तुम्ही जेव्हा कोणत्याही प्रवासाला जाण्याचे अंदाजपत्रक आखाल तेव्हा त्यातील 10 टक्के रक्कम जेथे जात आहात तेथून काही ना काही खरेदी करण्यासाठी बाजूला ठेवा. तुमच्यासाठी ही काही तितकीशी कठीण बाब नाही कारण तुम्ही अशा प्रवासासाठी हजारो रुपये खर्च करण्याची तयारी ठेवता. त्यातील 10 टक्के रक्कम तुम्ही जेथे जात आहात तेथील स्थानिक वस्तू खरेदी कराल तर तेथील अर्थव्यवस्था गगनाला भिडू लागेल. मी आजकाल आणखी एक गोष्ट सांगत असतो, हे मोठमोठे श्रीमंत लोक येथे बसले आहेत ना त्यांना ही गोष्ट जरा टोचेलच, तरीही मी सवयीने सांगत राहतो. दुर्दैवाने आजकाल देशात फॅशन सुरु झाली आहे, श्रीमंती म्हणजे परदेशात जा, मुलांची लग्ने परदेशात करा. इतका मोठा आपला देश आहे, तुमची मुले हिंदुस्तानात लग्न नाही करू शकत? यातून किती लोकांना रोजगार मिळेल याचा विचार करा. आणि जेव्हापासून मी वेड इन इंडिया मोहीम सुरु केली आहे, तेव्हापासून मला पत्रे येत आहेत....साहेब आम्ही पैसे जमवले होते, परदेशात लग्न करणार होतो, पण तुम्ही सांगितले म्हणून ते रद्द केले, आता आम्ही हिंदुस्तानात लग्न करणार. देशासाठी भगतसिंगांसारखे फाशीवर लटकले तरच देशाची सेवा होते असे नाहीये. मित्रांनो, देशासाठी चांगले काम करून सुद्धा देशसेवा होऊ शकते. आणि म्हणून मी म्हणतो, अधिक उत्तम स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संपर्क सेवेमुळे उत्तर प्रदेशात येणेजाणे खूपच सोपे झाले आहे. आम्ही वाराणसी मार्गे जगातील सर्वाधिक लांबीची क्रुझ सेवा देखील सुरु केली आहे. वर्ष 2025 मध्ये उत्तर प्रदेशात कुंभ मेळ्याचे देखील आयोजन होणार आहे. हे आयोजन देखील उत्तर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे असेल. येत्या काळात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात इथे मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होणार आहेत.
मित्रहो,
आपले जे सामर्थ्यआहे त्याला आधुनिकतेची जोड देत सशक्त करून नव्या क्षेत्रात सुद्धा मोठी कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि हरित ऊर्जा यावर अधिक लक्ष्य केंद्रित करत आहे. भारताला अशा तंत्रज्ञानात, अशा उत्पादनात आम्ही जागतिक केंद्र करू इच्छितो. देशातले प्रत्येक घर, प्रत्येक कुटुंब सौर ऊर्जेची निर्मिती करणारे ठरावे असा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही पीएम-सूर्य घर –मोफत वीज योजना सुरु केली आहे.या योजने अंतर्गत 300 युनिट वीज मोफत मिळेल आणि लोक अतिरिक्त वीज सरकारला विकूही शकतील. सध्या ही योजना 1 कोटी कुटुंबांसाठी आहे.यामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यात थेट 30 हजार रुपयांपासून सुमारे 80 हजार रुपयांपर्यंत जमा केले जातील.म्हणजे दर महा 100 युनिट वीज निर्मिती करू इच्छिणाऱ्यासाठी 30 हजार रुपयांचे सहाय्य मिळेल. जो 300 युनिट किंवा त्यापेक्षा जास्त वीज निर्मिती करू इच्छितो त्यांना सुमारे 80 हजार रुपये मिळतील.याशिवाय बँकांकडून अतिशय स्वस्त आणि सहज कर्जही उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे या कुटुंबाना मोफत वीज तर मिळेलच वर्षाला 18 हजार रूपयांपर्यंतची वीज विकून ही कुटुंबे अतिरिक्त कमाईही करू शकतात. इतकेच नव्हे तर ही यंत्रणा बसवणे, पुरवठा साखळी आणि देखभाल याच्याशी संबंधित क्षेत्रातही लाखो रोजगार निर्माण होतील.यातून लोकांना 24 तास वीज पुरवठा, निश्चित केलेल्या युनिट पर्यंत मोफत वीज पुरवणेही सुलभ होईल.
मित्रहो,
सौर उर्जेप्रमाणे आम्ही इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातही मिशन मोड वर काम करत आहोत. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्यांना पीएलआय योजनेचा लाभ देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर करात सुट देण्यात आली आहे. परिणामी गेल्या 10 वर्षात सुमारे साडे 34 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे.आम्ही अतिशय वेगाने इलेक्ट्रिक बस उपयोगात आणत आहोत. म्हणजेच सौर आणि इलेक्ट्रिक वाहने, दोन्ही क्षेत्रात उत्तर प्रदेशात मोठ्या संधी निर्माण होत आहेत.
मित्रहो ,
काही दिवसांपूर्वीच आमच्या सरकारला शेतकऱ्यांचे देवदूत चौधरी चरणसिंह जी यांना भारत रत्न देण्याचे भाग्य लाभले. उत्तर प्रदेशाचे भूमीपुत्र चौधरी साहेब यांचा सन्मान करणे म्हणजे देशाचे कोट्यवधी मजूर, देशाचे कोट्यवधी शेतकऱ्यांचा सन्मान आहे. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे ही गोष्ट काँग्रेस आणि आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समजत नाही.आपण पाहिले असेल संसदेत चौधरी चरण सिंह जी यांच्या विषयी बोलताना काँग्रेसच्या लोकांनी चौधरी साहेबांविषयी बोलणेही कसे अवघड केले होते. काँग्रेसचे लोक भारत रत्न म्हणजे एकाच कुटुंबाचा हक्क मानत आहेत.म्हणूनच काँग्रेसने दशकांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांनाही भारतरत्न दिला नाही. हे लोक आपल्याच कुटुंबातल्या लोकांना भारतरत्न देत राहिले. काँग्रेस खरे तर गरीब, मागास, शेतकरी, मजूर यांचा सन्मान करू इच्छित नाही, ही त्यांची मानसिकता आहे. चौधरी चरण सिंह जी यांच्या जीवनकाळातही काँग्रेसने त्यांच्याशी सौदेबाजी करण्याचा भरपूर प्रयत्न केला होता, मात्र चौधरी साहेब यांनी पंतप्रधान पदाच्या खुर्चीचा त्याग केला पण आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. राजकीय सौदेबाजीचा त्यांना तिटकारा होता.त्यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या तमाम राजकीय पक्षांनी चौधरी साहेब यांचे म्हणणे मानले नाही ही मात्र खेदाची बाब आहे.चौधरी साहेब यांनी छोट्या शेतकऱ्यांसाठी जे कार्य केले ते देश कधीच विसरू शकत नाही. आज चौधरी साहेब यांच्यापासून प्रेरणा घेत आम्ही देशाच्या शेतकऱ्याला अखंड सक्षम करत आहोत.
मित्रहो,
देशाची शेती एका नव्या मार्गावर नेण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मदत करत आहोत, प्रोत्साहन देत आहोत.नैसर्गिक शेती आणि भरड धान्य यावर लक्ष केंद्रित करण्यामागे हाच विचार आहे. आज गंगा नदीच्या किनारी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेती होऊ लागली आहे. कमी खर्चात शेतकऱ्यांना जास्त लाभ देणारी ही शेती आहे. यातून गंगा मातेसारख्या आपल्या पवित्र नद्यांचे पाणी दुषित होण्यापासूनही वाचले आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबंधित उद्योगांनाही आज मी विशेष आवाहन करत आहे. झिरो इफेक्ट, झिरो डीफेक्ट हा मंत्र अनुसरत आपण काम करायला हवे. जगभरातल्या देशांमध्ये जेवणाच्या टेबलावर मेड इन इंडिया अन्नाचे एक तरी पॅकेट नक्कीच असले पाहिजे हे एकमेव उद्दिष्ट घेऊन आपण काम केले पाहिजे.आपल्या प्रयत्नानीच सिद्धार्थ नगर इथले काळे मीठ,चंदौली इथला काळा तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागला आहे. विशेषकरून भरड धान्य, श्री अन्नाबाबत एक नवा कल आपल्याला दिसत आहे.या सुपर फूड संदर्भात गुंतवणूक करण्यासाठीही हा योग्य काळ आहे. म्हणूनच कृषी मालाची मूल्य वृद्धी,जगाच्या बाजारपेठेसाठी पॅकेजिंग कसे असावे, शेतकरी जे पिक घेतो ते या बाजारपेठांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी आपण पुढे यायला हवे. आज सरकारही छोट्या-छोट्या शेतकऱ्यांना बाजाराची मोठी ताकद बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकरी उत्पादन संघ- एफपीओ आणि सहकारी समित्या आम्ही सशक्त करत आहोत.या संघटनांसमवेत मूल्य वर्धन कसे होईल,आपण त्यांना तंत्रज्ञानाची माहिती कशी देऊ शकता, त्यांचा कृषी माल खरेदी करण्याची हमी आपण त्यांना कशी देऊ शकता, शेतकऱ्याचा जितका फायदा होईल, भूमीचा जितका फायदा होईल तितकाच फायदा आपल्या व्यापाराचाही होईल. भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी आधारित अर्थव्यवस्था यांना प्रोत्साहन देण्यात उत्तर प्रदेशाने नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे. म्हणूनच या संधीचा आपण जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. आपल्या उत्तर प्रदेशच्या परिवारांचे सामर्थ्य आणि दुहेरी इंजिन सरकारचे परिश्रम यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आज जे भूमिपूजन झाले आहे ते प्रकल्प उत्तर प्रदेश आणि देशाच्या प्रगतीचा पाया ठरतील. योगी जी, आणि उत्तर प्रदेश सरकारचे मी विशेष अभिनंदन करतो. एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचा प्रण उत्तर प्रदेश सरकारने केला आहे हे ऐकल्यानंतर प्रत्येक हिंदुस्तानी नागरीकाला अभिमान वाटतो. मी देशातल्या सर्व राज्य सरकारांना आवाहन करतो की राजकारण एका बाजूला राहू दे, उत्तर प्रदेशाकडून शिकून आपल्या राज्याची अर्थव्यवस्था आपण किती ट्रिलियन डॉलरची करू शकतो हा संकल्प घेऊन मैदानात या जरा, तेव्हाच देश आगेकूच करेल. उत्तर प्रदेशाप्रमाणे प्रत्येक राज्याने मोठी स्वप्ने, मोठे संकल्प घेऊन पुढे जावे. उद्योग जगतातल्या माझ्या मित्रांनो, अपार संधींचा हा काळ आहे. चला पुरेपूर प्रयत्न करूया, आम्ही सज्ज आहोत.
मित्रांनो,
लाखो लोक उत्तर प्रदेशमधले आजचे हे संबोधन ऐकत आहेत.400 ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक बसले आहेत, मी त्यांनाही भरवसा देऊ इच्छितो, आपण कधी विचारही केला नसेल अशा वेगाने उत्तर प्रदेश आपल्या सर्व संकल्पांची पूर्तता करेल.चला आपण सर्वजण मिळून पुढे जाऊया. याच सदिच्छेसह आपण सर्वांचे खूप-खूप अभिनंदन, खूप-खूप धन्यवाद !