श्री रामकृष्ण परमहंस, माता श्री सारदा देवी, स्वामी विवेकानंद, तामिळनाडूचे राज्यपाल श्री. आर एन रवी जी,चेन्नई रामकृष्ण मठाचे संत आणि तामिळनाडूतील माझी प्रिय जनता यांना प्रणाम, आपणा सर्वाना माझा नमस्कार!
मित्रहो,
आपणा सर्वांना भेटून आनंद झाला. रामकृष्ण मठ या संस्थेचा मी अतिशय आदर करतो. माझ्या जीवनात या संस्थेची महत्वाची भूमिका आहे. ही संस्था चेन्नईत आपल्या सेवेची 125 वर्षे साजरी करत आहे याचाही मला आनंद आहे. आज मी तमिळ लोकांमध्ये आहे, ज्यांच्याविषयी मला अपार स्नेह आहे. तमिळ भाषा, तमिळ संस्कृती आणि चेन्नईचे सळसळते वातावरण याबद्दल मला आपुलकी आणि प्रेम आहे. आज विवेकानंद हाऊसला भेट देण्याची संधी मला मिळाली. स्वामी विवेकानंद यांच्या प्रसिद्ध पावलेल्या पश्चिम भेटीनंतर त्यांचे इथे वास्तव्य होते. इथे ध्यानाची आगळीच अनुभुती मला मिळाली. अधिक उत्साह आणि प्रेरणा मी अनुभवतो आहे. इथे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्राचीन कल्पना युवा पिढीपर्यंत पोहचत आहेत हे पाहून मला आनंद झाला.
मित्रहो,
संत तिरुवल्लूवर यांनी एका श्लोकात म्हटले आहे:
पुत्तेळ् उलगत्तुम् ईण्डुम् पेरळ् अरिदे ओप्पुरविन् नल्ल पिर| म्हणजे इथल्या जगात आणि देवलोकातही दयाळूपणासारखे दुसरे काहीच नाही. रामकृष्ण मठ, शिक्षण, ग्रंथालये आणि पुस्तक पेढ्या, कुष्ठरोग विषयक जनजागृती आणि पुनर्वसन, आरोग्य सेवा आणि सुश्रुषा, ग्रामीण विकास यासारख्या विविध क्षेत्रात तामिळनाडूतल्या लोकांची सेवा करत आहे.
मित्रहो,
तामिळनाडूवरच्या रामकृष्ण मठाच्या प्रभावाविषयी मी आताच सांगितले, पण हा नंतरचा मुद्दा आहे. पहिले म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्यावरचा तामिळनाडूचा प्रभाव; कन्याकुमारी इथल्या प्रसिद्ध खडकावर स्वामीजींना जीवनाचा अर्थ उमगला. यामुळे त्यांच्यात परिवर्तन घडले आणि शिकागो इथे त्याचा प्रभाव अनुभवता आला. त्यानंतर स्वामीजी पश्चिमेकडून परतले तेव्हा त्यांनी पहिले पाऊल तामिळनाडूच्या पवित्र भूमीवर ठेवले. रामनादच्या राजाने त्यांचे अतीव आदराने स्वागत केले. स्वामीजींचे चेन्नई इथे आगमन खास होते. थोर फ्रेंच लेखक आणि नोबेल पारितोषिक विजेते रोमेन रोलँड यांनी याचे वर्णन केले आहे. सतरा विजय कमानी उभारण्यात आल्या होत्या. आठवडाभर चेन्नईचे जनजीवन जणू थबकले होते. जणू काही एखादा उत्सवच आहे.
मित्रहो,
स्वामी विवेकानंद बंगालचे होते. एखाद्या विभूतीप्रमाणे त्यांचे तामिळनाडूमध्ये स्वागत करण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या खूप आधी हे घडत होते. हजारो वर्षापासून भारत हे एक राष्ट्र म्हणून असलेली संकल्पना देशभरातल्या लोकांच्या मनात अगदी स्पष्ट होती. हीच 'एक भारत श्रेष्ठ भारत'ची भावना आहे. याच भावनेने रामकृष्ण मठ कार्य करत आहे. भारतभर त्यांच्या अनेक संस्था निःस्वार्थ वृत्तीने जनतेची सेवा करत आहेत. 'एक भारत श्रेष्ठ भारत' विषयी बोलताना आपण काशी-तमिळ संगममचे यश पाहतच आहोत. आता सौराष्ट्र-तमिळ संगममही होणार असल्याचे समजते. भारताची एकता दृढ करणारे असे सर्व प्रयत्न अतिशय यशस्वी ठरावेत, अशी माझी कामना आहे.
मित्रहो,
आपली शासन व्यवस्थाही स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित आहे. जेव्हा विशेषाधिकार मोडले जातात आणि समानता सुनिश्चित केली जाते, तेव्हा समाज प्रगती करतो. सरकारच्या महत्वाच्या सर्व योजनांमध्ये आपल्याला या दृष्टीकोनाची प्रचीती येईल. याआधी मुलभूत सुविधाही विशेषाधिकार असल्याप्रमाणे मानल्या जात. विकासाच्या लाभापासून अनेकजण वंचित राहत. केवळ मुठभर लोक किंवा छोट्या गटांना याचा लाभ घेण्याची संधी होती. मात्र आता प्रत्येकासाठी विकासाची द्वारे खुली झाली आहेत.
आमच्या सर्वाधिक यशस्वी योजनांपैकी एक असलेली मुद्रा योजना आज आठवा वर्धापन दिन साजरा करत आहे. तामिळनाडूतल्या छोट्या उद्योजकांनी मुद्रा योजनेत आपल्या राज्याला आघाडीचे राज्य केले आहे. छोट्या उद्योजकांना सुमारे 38 कोटी तारण विरहीत कर्जे देण्यात आली आहेत. यामध्ये महिला आणि समाजातल्या वंचित वर्गातल्या लोकांची संख्या मोठी आहे. व्यवसायासाठी बँक कर्ज मिळवणे हा पूर्वी विशेषाधिकार मानला जाई, मात्र आता कर्ज पोहोचण्याची व्याप्ती व्यापक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे घर, वीज, एलपीजी कनेक्शन, स्वच्छतागृहे यासारख्या मुलभूत गोष्टी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचत आहेत.
मित्रहो,
स्वामी विवेकानंद यांचे भारतासाठी विशाल स्वप्न आणि दृष्टीकोन होता, व तो साकारण्यासाठी भारत सध्या करत असलेले कार्य ते अभिमानाने पाहत असतील याची मला खात्री आहे. स्वतःवरचा आणि देशावरचा दृढ विश्वास हा त्यांचा महत्वाचा संदेश होता. हे शतक भारताचे शतक असेल असे अनेक तज्ज्ञ आज सांगत आहेत. प्रत्येक भारतीयालाही हा काळ आपला काळ असल्याचे वाटत आहे आणि हे सर्वात महत्वाचे आहे. परस्पर आदर आणि आत्मविश्वासाने आपण जगाशी संवाद साधत आहोत. महिलांना मदत करणारे आपण कोणीच नव्हे, त्यांना योग्य संधी मिळाल्यावर त्या समाजाचे नेतृत्व करतील आणि आपले प्रश्न स्वतःच सोडवतील, असे स्वामीजी म्हणत असत. आजचा भारत महिला नेतृत्वाखालील विकासाचा उपासक आहे. स्टार्ट अप्स असो किंवा क्रीडा जगत, सशस्त्र दले असोत की उच्च शिक्षण महिला सर्व अडथळे भेदत विक्रम करत आहेत.
चरित्र विकासासाठी क्रीडा आणि तंदुरुस्ती महत्वाची आहेत, असे स्वामीजी मानत. आज समाज, क्रीडा क्षेत्राकडे फावल्या वेळेतली बाब म्हणून न पाहता व्यावसायिक पर्याय म्हणून पाहत आहे. योग आणि फिट इंडिया या आता लोक चळवळ ठरल्या आहेत. शिक्षण हे माणसाला सक्षम करते असे स्वामीजी म्हणत. तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण हवे यावर त्यांचा भर होता. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे जगातल्या सर्वोत्तम पद्धती भारतात आणणाऱ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. कौशल्य विकासाला अभूतपूर्व पाठबळ लाभत आहे. आपण जगातल्या सर्वात उर्जावान तंत्र आणि वैज्ञानिक परीसंस्थेपैकी एक आहोत.
मित्रांनो,
स्वामी विवेकानंद यांनी तामिळनाडूमध्येच आजच्या भारतासाठी महत्वाचे असे विचार व्यक्त केले. पाच विचार आत्मसात करत ते आचरणात आणणे हे सामर्थ्याचे आहे, असे ते म्हणत. नुकतीच आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली. पुढची 25 वर्षे अमृत काळ करण्याचे उद्दिष्ट देशाने ठेवले आहे. पाच संकल्पना, 'पंच प्रण' आत्मसात करून ही महान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अमृत काळाचा उपयोग करता येईल. ती अशी आहेत : विकसित भारताचे उद्दिष्ट, वसाहतवादी मानसिकतेच्या खुणा पुसून टाकणे, आपल्या वारश्याचा गौरव, एकता भक्कम करणे आणि आपल्या कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करणे; ही पाच तत्वे अनुसरण्याचा निर्धार आपण सामूहिक आणि वैयक्तिकरित्या करू शकतो का? 140 कोटी लोकांनी हा निर्धार केला तर विकसित, आत्मनिर्भर आणि समावेशक भारताची आपण 2047 पर्यंत उभारणी करू शकतो. आपल्या या अभियानासाठी स्वामी विवेकानंद यांचे आपल्याला आशीर्वाद आहेत याची मला खात्री आहे.
धन्यवाद. वणक्कम.