नमस्कार!
आपल्या सर्वांचे ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’ च्या आयोजनाबद्दल खूप खूप अभिनंदन! पुढच्या 25 वर्षांत भारत ज्या उंचीवर असेल, त्यात भारताच्या वैज्ञानिक शक्तीची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. विज्ञानात आवडी सोबतच जेव्हा देशसेवेचा संकल्प जोडला जातो, तेव्हा त्याचे अभूतपूर्व परिणाम मिळतात. मला विश्वास आहे, भारतातील वैज्ञानिक समूह, भारताला 21 व्या शतकात त्या ठिकाणी घेऊन जातील, जो नेहमीच भारताचा अधिकार राहिला आहे. मी याच विश्वासातून आपणाला सांगू इच्छितो. आपणही जाणताच की निरीक्षण हा विज्ञानाचा मूळ आधार आहे. निरीक्षणातून तुम्ही वैज्ञानिक कल बघू शकता, त्यांचा मागोवा घेऊ शकता, मग विद्यार्थ्यांचा कल कुठे आहे, ते बघून, त्याचे विश्लेषण करून त्यानुसार कुठल्याही निष्कर्षावर पोहचू शकता.
या काळात एका वैज्ञानिकासाठी प्रत्येक पावलावर माहिती जमा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे अतिशय महत्वपूर्ण असते. 21 व्या शतकातील आजच्या भारतात आपल्याकडे दोन गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. पहिली - माहिती आणि दुसरी - तंत्रज्ञान. या दोन्हीत भारताच्या विज्ञानाला शिखरावर नेण्याची शक्ती आहे. माहिती विश्लेषणाचे क्षेत्र, वेगाने विकसित होत आहे. यामुळे माहितीतून अंतर्ज्ञान आणि विश्लेषणातून कृतीयोग्य ज्ञान मिळविण्यात मदत होते. मग ते पारंपारिक ज्ञान असो की आधुनिक तंत्रज्ञान, या दोन्हीची वैज्ञानिक संशोधनात मदत होते. आणि म्हणूनच, आपण आपली वैज्ञानिक प्रक्रिया अधिक शक्तिशाली करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञाना विषयी संशोधक वृत्ती विकसित केली पाहिजे.
मित्रांनो,
आज भारत जो वैज्ञानिक दृष्टीकोन घेऊन पुढे जात आहे, आपण त्याचे परिणाम बघत आहोत. विज्ञान क्षेत्रात भारत वेगाने जगातील अग्रगण्य देशांच्या पंक्तीत जात आहे. आपण 2015 पर्यंत 130 देशांच्या जागतिक नवोन्मेष निर्देशांकात 81 व्या क्रमांकावर होतो. मात्र, 2022 मध्ये आपण मोठी झेप घेऊन 40 व्या क्रमांकावर पोचलो आहोत. आज भारत आज पीएचडीच्या बाबतीत जगातील आघाडीच्या तीन देशांपैकी एक आहे. आज भारत स्टार्टअप व्यवस्थेच्या बाबतीत जगातील आघाडीच्या 3 देशांत आहे.
मित्रांनो,
मला आनंद आहे, की या वेळी भारतीय विज्ञान काँग्रेसची संकल्पना अशा विषयावर आधारीत आहे, ज्याची जगात सर्वात जास्त चर्चा होत आहे. जगाचं भविष्य शाश्वत विकासासोबतच सुरक्षित आहे. आपण शाश्वत विकासाचा विषय महिला सक्षमीकरणाशी जोडला आहे. मला असं वाटतं की, व्यावहारिक जगात देखील हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. आज देशात केवळ हाच विचार नाही की विज्ञानाच्या आधारे महिला सक्षमीकरण करावे. तर, आपण महिलांच्या सहभागाने विज्ञानाचे देखील सक्षमीकरण व्हावे, विज्ञान आणि संशोधनाला गती मिळावी, हे आमचे ध्येय आहे. आता भारताला जी 20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. जी 20 च्या मुख्य विषयांत देखील महिलांच्या नेतृत्वातील विकास हा मोठ्या प्राधान्याचा विषय आहे. गेल्या 8 वर्षांत भारताने राज्यकारभारापासून तर समाज आणि अर्थव्यवस्थेपर्यंत, या दिशेने अनेक असाधारण कामं केली आहेत, ज्यांची आज चर्चा होत आहे. आज भारतात मुद्रा योजनेच्या माध्यमातून लहान उद्योग आणि व्यवसायांत भागीदारी असो अथवा स्टार्टअप जगात नेतृत्व, महिला प्रत्येक ठिकाणी आपली शक्ती दाखवून देत आहेत. गेल्या 8 वर्षांत बहिःशाल संशोधन आणि विकासात महिलांचा सहभाग दुप्पट झाला आहे. महिलांचा हा वाढता सहभाग याचा पुरावा आहे की समाज देखील पुढे जात आहे आणि देशात विज्ञान देखील पुढे जात आहे.
मित्रांनो,
कुठल्याही वैज्ञानिकासाठी खरं आव्हान हेच असतं की ते आपलं ज्ञान अशा रीतीने वापरात आणू शकेल, ज्यामुळे जगाची मदत केली जाऊ शकेल. जेव्हा वैज्ञानिक आपले प्रयोग करत असतात, तेव्हा त्यांच्या मनात हेच प्रश्न असतात की, यामुळे लोकांचं आयुष्य सुकर होईल का? त्यांच्या शोधामुळे जगाच्या गरजा पूर्ण होतील का? वैज्ञानिक प्रयोग मोठी उपलब्धी तेव्हाच बनू शकतात, जेव्हा ते प्रयोगशाळेतून निघून प्रत्यक्ष जमिनीवर जातात, जेव्हा त्यांचा प्रभाव जागतिक स्तरापासून ते तळागाळापर्यंत पडतो, जेव्हा त्यांचा विस्तार अहवालांपासून प्रत्यक्ष वापरापर्यंत होतो, जेव्हा प्रयोगांमुळे होणारे बदल संशोधनापासून प्रत्यक्ष आयुष्यात दिसायला लागतात.
मित्रांनो,
जेव्हा विज्ञानाच्या मोठ्या उपलब्धी प्रयोगांपासून लोकांच्या अनुभवांपर्यंतचा प्रवास पूर्ण करतात, तेव्हा त्यातून एक महत्वाचा संदेश जातो. ही गोष्ट तरुणांना फार प्रभावित करते. ते विचार करतात, की विज्ञानाच्या माध्यमातून ते संपूर्ण जगावर प्रभाव पडू शकतात. अशा तरुणांना पुढे जाण्यासाठी संस्थात्मक आराखडा देण्याची गरज असते. जेणेकरून त्यांच्या आकांक्षा विस्तारित केल्या जाऊ शकतील, त्यांना नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतील. माझी इच्छा आहे, की इथे उपस्थित वैज्ञानिकांनी असा एक संस्थात्मक आराखडा विकसित करावा, जो प्रतिभावंत तरुणांना आकर्षित करेल आणि त्यांना पुढे जाण्याची संधी देईल. उदाहरणार्थ, कौशल्य शोध आणि हॅकेथॉनचे आयोजन करून वैज्ञानिक विचार असलेल्या मुलांचा शोध घेतला जाऊ शकतो. यात वरिष्ठ वैज्ञानिक त्यांची मदत करू शकतात. आज आपण बघत आहोत की क्रीडा क्षेत्रात भारत नवनवी शिखरं पादाक्रांत करत आहे. यामागे दोन महत्वाची कारणे आहेत. पहिले म्हणजे क्रीडा नैपुण्य विकसित करण्यासाठी देशात संस्थात्मक ढाचा मजबूत करण्यात आला.दुसरे म्हणजे क्रीडा जगतातले गुरू - शिष्य परंपरेचे अस्तित्व आणि प्रभाव.जिथे प्रतिभाशाली युवक ओळखून त्यांना वाव दिला जातो. जिथे शिष्याच्या यशाला गुरू आपले यश मानतो.ही परंपरा विज्ञान क्षेत्रातही यशाचा मंत्र ठरू शकते.
मित्रांनो,
आज आपल्यासमोर असे काही विषय मांडू इच्छितो जे भारतातली विज्ञानाची दिशा निश्चित करण्यासाठी सहाय्य करतील. भारताच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी भारतात विज्ञानाचा विकास ही आपल्या वैज्ञानिक समुदायाची मूळ प्रेरणा असली पाहिजे. भारतातले विज्ञान हे भारताला आत्मनिर्भर करणारे हवे. आज जगातली 17-18 टक्के लोकसंख्या भारतात राहते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. असे विज्ञान कार्य ज्यातून भारताच्या गरजा पूर्ण होतील, त्यातून जगातल्या 17-18 टक्के लोकसंख्येला गती प्राप्त होईल आणि त्याचा संपूर्ण मानवतेवर प्रभाव पडेल. म्हणूनच आज आपण अशा विषयांवर काम केले पाहिजे जे संपूर्ण मानव जगतासाठी आवश्यक आहे. उदाहरणादाखल आपण ऊर्जा हा विषय घेऊया. झपाट्याने विकास करणाऱ्या भारताच्या ऊर्जाविषयक गरजा सातत्याने वाढणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या वैज्ञानिक समुदायाने ऊर्जा आवश्यकतेशी संबंधित नवोन्मेष निर्मिती केल्यास त्याचा देशाला मोठाच फायदा होईल. विशेषकरून हायड्रोजन ऊर्जेच्या अपार शक्यतांसाठी देश राष्ट्रीय हायड्रोजन मिशन वर काम करत आहे. हे अभियान यशस्वी ठरण्यासाठी इलेक्ट्रोलाइझर सारख्या महत्वाच्या घटकांची देशातच निर्मितीची गरज आहे. या दिशेने नवे पर्याय संभवत असतील तर त्या दिशेनेही संशोधन व्हायला हवे. आपले वैज्ञानिक आणि उद्योग क्षेत्राने यासाठी एकत्रित काम करायला हवे
मित्रांनो,
मानवतेवर नव –नव्या आजारांची संकटे घोंघावत आहेत अशा काळात आपण सर्वजण आहोत. नव्या लसी तयार करण्यासाठी संशोधन आणि विकासाला आपण चालना द्यायला हवी. ज्याप्रमाणे भूकंप किंवा पूर यासारख्या संकटाना तोंड देण्यासाठी आज आपण पूर्व तयारीने सज्ज असतो. त्याच प्रमाणे एकात्मिक रोग निरीक्षण याद्वारे रोग ओळखून त्यावर मात करण्यासाठी उपाय करायला हवेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या मंत्रालयानी एकत्रित काम करायला हवे. ‘ LiFE ‘ म्हणजे पर्यावरण पूरक जीवनशैली याविषयी आपणा सर्वाना माहिती आहेच. आपला वैज्ञानिक समुदाय या दिशेने मोठी मदत करू शकतो.
मित्रांनो,
भारताच्या आवाहनानुसार संयुक्त राष्ट्रांनी हे वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. प्रत्येक भारतवासीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. भारताची भरड धान्ये आणि त्यांचा वापर अधिक उत्तम रित्या करण्याच्या दिशेने काम करता येईल. जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने कापणीनंतर पिकांचे होणारे नुकसान किंवा वाया जाणारे धान्य कमी करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जाऊ शकतात.
मित्रांनो,
आज टाकाऊ किंवा कचरा व्यवस्थापन क्षेत्रातही वैज्ञानिक संशोधनाच्या अपार शक्यता आहेत. घन कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, जैव -वैद्यकीय कचरा, कृषी क्षेत्रातले टाकाऊ ही अशी क्षेत्रे आहेत जी सातत्याने विस्तारत आहेत.म्हुणुनच मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात चक्राकार अर्थव्यवस्थेवर मोठा भर देण्यात आला आहे. मिशन चक्राकार अर्थव्यवस्था आता आपल्याला अधिक बळकट करायचे आहे. यासाठी आपल्याला अशा नवोन्मेषावर काम करायचे आहे ज्यातून धातू आणि प्लास्टिक कचऱ्याचा उत्तम उपयोग होऊ शकेल. प्रदूषण कमी करण्याबरोबरच आपल्याला भंगार उपयोगात आणण्यासाठीही काम करावे लागेल.
मित्रांनो,
आज भारत अंतराळ क्षेत्रात नव -नवी शिखरे गाठत आहे. कमी खर्चाच्या उपग्रह प्रक्षेपक यानामुळे आपली क्षमता वृद्धींगत होईल आणि आपल्या सेवांना जगभरातून मागणी येईल. खाजगी कंपन्या आणि स्टार्ट अप्स या संधीचा लाभ घेऊ शकतील. संशोधन आणि विकास प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संस्था यांच्याशी संलग्न स्टार्ट अप्सना आगेकूच करण्यासाठी नवा मार्ग मिळू शकेल. असाच एक विषय आहे क्वांटम कॉम्प्युटिंग . या क्षेत्रात क्वांटम फ्रंटियर म्हणून आज भारत जगभरात आपली ओळख निर्माण करत आहे. क्वांटम कंप्यूटर्स, क्वांटम केमिस्ट्री, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम सेंसर्स, क्वांटम क्रिप्टोग्राफी आणि न्यू मटेरियल्स या दिशेने भारत झपाट्याने पुढे जात आहे. आपले युवा संशोधक आणि वैज्ञानिकांनी क्वांटम क्षेत्रात निपुणता प्राप्त करावी आणि या क्षेत्रात नेतृत्व करावे असे मला वाटते.
मित्रांनो,
जो पुढाकार घेतो तोच विज्ञानात आघाडी घेतो हे आपण जाणताच.म्हणूनच जगभरात काय घडामोडी सुरू आहेत याचा कानोसाही आपण घेतला पाहिजे.त्याचबरोबर ज्या भविष्यवेधी कल्पना आहेत त्यांच्यावरही लक्ष केंद्रित करायला हवे.आज जगभरात कृत्रिम बुध्दीमत्ता, एआर,आणि व्हीआर यांच्याबाबत बोलले जाते.हे विषय आपल्या प्राधान्य क्रमात आपल्याला समाविष्ट करायला हवेत.सेमी कंडक्टर चिप्सच्या दिशेने देश अनेक महत्वाची पाऊले उचलत आहे.काळानुसार सेमी कंडक्टर चिप्स मध्येही नवो न्मेशाची आवश्यकता भासेल.देशातले सेमी कंडक्टर क्षेत्र भविष्याच्या दृष्टीने सज्ज राखण्याच्या दिशेने आपण आतापासूनच विचार करायला हवा.देश या क्षेत्रात पुढाकार घेईल तेव्हाच आपण औद्योगिक क्रांती 4.0 चे नेतृत्व करण्यासाठी सक्षम होऊ.
मित्रांनो,
भारतीय विज्ञान काँग्रेसच्या या अधिवेशनात विविध रचनात्मक बाबींवर भविष्यासाठी स्पष्ट पथदर्शी आराखडा तयार होईल असा मला विश्वास आहे. अमृत काळात आपल्याला भारताला आधुनिक विज्ञानाची सर्वात अत्याधुनिक प्रयोगशाळा बनवायची आहे.या कामनेसह आपणा सर्वांना खूप- खूप धन्यवाद आणि या परिषदेसाठी माझ्या अनेक- अनेक शुभेच्छा!नमस्कार! !