11,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचा अयोध्या आणि सभोवतालच्या भागांना मिळणार लाभ
“जग 22 जानेवारीची अधीरतेने प्रतीक्षा करत आहे, मी सुद्धा त्याच प्रतीक्षेत आहे”
“विकसित भारत मोहिमेला अयोध्येमधून नवी ऊर्जा प्राप्त होत आहे”
“आजचा भारत प्राचीन आणि आधुनिक या दोहोंना सामावून पुढे जात आहे”
“केवळ अवध प्रदेशच नव्हे तर अयोध्या संपूर्ण उत्तर प्रदेशच्या विकासाला एक नवी दिशा देईल”
“महर्षी वाल्मिकी रामायण हा आपल्याला श्री रामासोबत जोडणारा मार्ग आहे”
“गरिबांच्या सेवेची भावना आधुनिक अमृत भारत ट्रेनमधून दर्शवला जात आहे”
“22 जानेवारीला प्रत्येक घरात श्री राम ज्योती प्रज्वलित करा”
“सुरक्षा आणि लॉजिस्टिक्सच्यादृष्टीकोनातून तुम्ही हा सोहळा संपल्यानंतर २२ जानेवारीनंतर अयोध्येला भेट देण्याचे नियोजन करा”
“14 जानेवारी या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सर्व तीर्थस्थानांवर अतिशय मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमांचे आयोजन करून भव्य राम मंदिराचा आनंद साजरा करा”
“आज देशाचा मोदींच्या हमीवर विश्वास आहे कारण मोदी जी हमी देतात ती पूर्ण करण्यासाठी त्यांचे संपूर्ण प्रयत्न पणाला

अयोध्येच्या सर्व लोकांना माझे नमस्कार. आज सर्व जग उत्सुकतेने 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशावेळी अयोध्यावासीयांमध्ये असलेला हा उत्साह, उत्सुकता अगदी साहजिक आहे. मी भारताच्या मातीच्या कणाकणाचा आणि व्यक्ती व्यक्तीचा पुजारी आहे आणि आपल्या प्रमाणे मीसुद्धा तितकाच उत्सुक आहे. आपल्या सर्वांचा हा उत्साह, ही उत्सुकता थोड्या वेळापूर्वी अयोध्येच्या रस्त्यांवर देखील दिसून येत होती. असं वाटत होतं की संपूर्ण अयोध्या नगरीच रस्त्यावर उतरली आहे. हे प्रेम, हा आशीर्वाद यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो. माझ्याबरोबर म्हणा सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, मंत्रीमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्यजी, अश्विनी वैष्णव जी, व्ही के सिंह जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या जी, बृजेश पाठक जी, उत्तर प्रदेश सरकारचे इतर मंत्री, सर्व खासदार आणि आमदार, आणि मोठ्या संख्येने जमलेले माझे कुटुंबीय!!!

देशाच्या इतिहासात 30 डिसेंबरची ही तारीख अगदी ऐतिहासिक आहे. आजच्या दिवशी 1943 मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी झेंडा फडकावत भारताच्या स्वातंत्र्याचा जयघोष केला होता. स्वातंत्र्य आंदोलनाशी नातं असलेल्या अशा पवित्र दिवशी आज आम्ही स्वातंत्र्याच्या अमृत काळातील संकल्प पुढे नेत आहोत. विकसित भारताच्या निर्माणाला गती देण्याच्या मोहिमेला अयोध्या नगरीतून नवी ऊर्जा मिळत आहे. येथे 15,000 कोटी रुपयांहून अधिक विकास कामांचा शिलान्यास आणि लोकार्पण झाले. पायाभूत सुविधांशी संलग्न असणारी ही कामे देशाच्या नकाशावर पुन्हा एकदा आधुनिक अयोध्येचे गौरवपूर्ण स्थान निर्माण करतील. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या दरम्यान झालेले हे काम अयोध्यावासीयांच्या अथक परिश्रमाचा परिपाक आहे. मी सर्व अयोध्यावासीयांचे या परियोजनांसाठी अनेक अनेकवार अभिनंदन करतो.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

जगातील कोणताही देश ज्याला विकासाची नवीन उंची गाठायची आहे त्याने आपला वारसा सांभाळायला हवा. आपला वारसा आपल्याला प्रेरणा देतो, आपल्याला योग्य मार्ग दाखवतो म्हणून आजचा भारत पुरातन आणि नूतन दोन्हीला आपलेसे करत पुढे जात आहे. एक काळ होता जेव्हा अयोध्येत राम तंबूमध्ये विराजमान होते. आज केवळ राम ललालाच पक्के घर मिळाले असे नाही तर देशातील चार कोटी गरिबांना सुद्धा पक्के घर मिळाले आहे. आज भारत आपली तीर्थे सुशोभित करत आहे तसेच डिजिटल टेक्नॉलॉजीच्या विश्वातदेखील आपल्या देशाचे नाव करत आहे. भारत आज काशी विश्वनाथ धामच्या पुनर्निर्माणाबरोबरच देशात तीस हजारहून जास्त पंचायत भवन सुद्धा निर्माण करत आहे. आज देशात फक्त केदारधामचाच पुनरुद्धार झालेला नाही तर 315हून जास्त नवीन मेडिकल महाविद्यालयेसुद्धा तयार झाली आहेत. आज देशात फक्त महाकाल महालोक निर्माण झालेले नाहीत तर प्रत्येक घरी पाणी पोहोचवण्यासाठी पाण्याच्या दोन लाखांहून जास्त टाक्या सुद्धा बनवल्या गेल्या आहेत. आपण चंद्र, सूर्य आणि समुद्र यांची खोलीसुद्धा मोजत आहोत तर आपल्या पौराणिक मूर्ती सुद्धा विक्रमी संख्येने भारतात पुन्हा आणत आहोत. आज भारताचे स्थान इथे अयोध्येत स्पष्ट दिसून येते. इथे आज प्रगतीचा उत्सव आहे तर काही दिवसानंतर इथे परंपरेचा उत्सव सुद्धा होईल. आज इथे विकासाची भव्यता दिसत आहे, तर काही दिवसानंतर इथे वारशाची भव्यता आणि दिव्यत्व दिसणार आहे. हाच तर भारत आहे विकास आणि वारसा यांची योग्य ताकद भारताला एकविसाव्या शतकाळात सर्वात पुढे घेऊन जाईल.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

 प्राचीन काळात अयोध्या नगरी कशी होती याचं वर्णन खुद्द वाल्मिकींनी सविस्तर केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे, कोसलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान्। निविष्ट सरयूतीरे प्रभूत-धन-धान्यवान्। म्हणजेच वाल्मिकी म्हणतात, महान अयोध्यापुरी धन धान्याने परिपूर्ण होती. समृद्धीच्या शिखरावर होती आणि आनंदमय होती म्हणजेच अयोध्येत विज्ञान आणि वैराग्य तर होतेच पण ती वैभवाच्या शिखरावरही होती अयोध्या नगरीची जुनी ओळख आपण आधुनिकतेसह पुन्हा आणायची आहे.

 

मित्रांनो,

येत्या काळात अयोध्या नगरी अवध भागातच नाही पण संपूर्ण यूपीच्या विकासाला आपली अयोध्या दिशा देणार आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर तयार झाल्यानंतर इथे येणाऱ्या लोकांच्या संख्येत खूप मोठी वाढ होईल हे लक्षात ठेवून आमचे सरकार अयोध्येमध्ये हजारो कोटी रुपयांची विकासकामे करत आहे. अयोध्या स्मार्ट बनवत आहे. रस्त्यांचे रुंदीकरण होत आहे,नवीन फुटपाथ बनत आहेत. आज अयोध्येत नवीन फ्लायओवर्स बनत आहेत, नवीन पूल तयार होत आहेत. अयोध्येच्या आसपासच्या जिल्ह्यांना जोडण्यासाठी सुद्धा प्रवासाची साधने सुधारली जात आहेत.

 

मित्रहो,

आज अयोध्या धाम एअरपोर्ट आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशन लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभले आहे. अयोध्या एअरपोर्टचे नाव महर्षी वाल्मिकींच्या नावावर ठेवले गेले याचा मला संतोष झाला. महर्षी वाल्मिकींनी आम्हाला रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीराम यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून दिला. महर्षी वाल्मिकीना उद्देशून प्रभू श्रीराम म्हणाले होते की "तुम त्रिकालदर्शी मुनिनाथा, विस्व बदर जिमि तुमरे हाथा।" अर्थात, हे मुनिनाथ! आपण त्रिकालदर्शी आहात. संपूर्ण विश्व आपल्यासाठी हाताच्या तळव्यावर ठेवलेल्या बोरासारखे आहे. अशा त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकीजींच्या नावावर अयोध्याधाम विमानतळाचे नाव, या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला धन्य वाटायला लावेल. महर्षी वाल्मिकीने रचलेले रामायण हा असा ज्ञान मार्ग आहे जो आपल्याला प्रभू श्रीरामाच्या जवळ नेतो. आधुनिक भारतातला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्याधाम आपल्याला भव्य दिव्य नव्या मंदिराशी जोडेल. हा जो नवीन विमानतळ तयार झाला आहे. दरवर्षी दहा लाख यात्रेकरुंची सोय करण्याची त्याची क्षमता आहे. जेव्हा या विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामसुद्धा पुर्ण होईल, तेव्हा महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्येक वर्षी साठ लाख यात्रेकरु येऊ शकतील. आता अयोध्याधाम रेल्वे स्थानकाची क्षमता दररोज दहा-पंधरा हजार लोकांचे सेवा करण्याची आहे. स्टेशनचा पूर्ण विकास झाल्यानंतर अयोध्याधाम रेल्वे स्थानकावर दररोज 60000 लोक येऊ शकतील.

 

मित्रांनो,

एअरपोर्ट रेल्वे स्थानकांशिवाय आज इथे अनेक रस्त्यांचे, मार्गांचे सुद्धा लोकार्पण झाले आहे. रामपथ, भक्तीपथ, धर्मपथ आणि श्रीराम जन्मभूमीपथा वरून प्रवास अजूनच सुगम होईल. अयोध्येमध्ये आजच पार्किंग स्थळांचे ही लोकार्पण केले गेले आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालयामुळे इथे आरोग्य सुविधा आणि त्यांचा विस्तार मिळेल. शरयूची निर्मलता तशीच राहावी म्हणूनही डबल इंजिन सरकार पूर्णपणे समर्पित आहे. शरयूमध्ये येणारे दूषित पाणी रोखण्याचे काम सुद्धा सुरू झाले आहे. राम की पोडीला एक नवीन स्वरूप दिले गेले आहे. शरयूच्या किनाऱ्यावर नवीन नवीन घाटांचा विकास होत आहे. येथील सर्व प्राचीन कुंडांचा पुनरुत्थानसुद्धा केला जात आहे. लता मंगेशकर चौक असो किंवा रामकथा स्थळ, अयोध्येच्या ओळखीत भर घालत आहे अयोध्येत तयार होत असलेली नवीन टाऊनशिप इथल्या लोकांचे जीवन अजूनच सुलभ करेल . या विकास कामांमुळे अयोध्येत रोजगार आणि स्व-रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. त्यामुळे इथे टॅक्सीवाले, रिक्षावाले, प्रसादवाले, फुलं विक्रेते, पूजेची सामग्री विकणारे, या सर्व छोट्या मोठ्या दुकानदार भाऊंची कमाई वाढेल.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

आज इथे आधुनिक रेल्वेच्या निर्माणाच्च्या दिशेने एक मोठे पाऊल देशाने टाकले आहे. वंदे भारत आणि नमो भारत नंतर आज अजून एक आधुनिक ट्रेन देशाला मिळत आहे. या नव्या ट्रेन सिरीजचे नाव अमृतभारत ट्रेन ठेवले आहे. म्हणजे वंदेभारत, नमो भारत आणि अमृतभारत रेल्वे गाड्यांची ही त्रिशक्ती भारतीय रेल्वेचा कायापालट करणार आहे. यापेक्षा आनंदाची दुसरी बाब कोणती की ही पहिली अमृतभारत ट्रेन अयोध्येमधून जात आहे. दिल्ली-दरभंगा अमृतभारत एक्सप्रेस गाडी दिल्ली युपी बिहारच्या लोकांचा प्रवास आधुनिक करेल. यामुळे बिहारच्या लोकांसाठी भव्य राम मंदिरात स्थापन होणाऱ्या रामललाचे दर्शन अधिक सुगम बनवेल. या आधुनिक अमृत भारत एक्सप्रेस गाड्या, गरीब कुटुंबे आमचे श्रमिक साथीदार यांना खूप मदत करेल. श्रीराम चरित्र मानसमध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी म्हटलं आहे, पर हित सरिस धर्म नही भाई पर पिडासम नही अधमाई. म्हणजेच दुसऱ्यांची सेवा करण्यापेक्षा मोठा कोणताही धर्म, कोणतेही कर्तव्य नाही. आधुनिक अमृतभारत ट्रेन गरिबांची सेवा या भावनेने सुरू केल्या गेल्या आहेत. जी माणसे आपल्या कामासाठी नेहमी मोठे प्रवास करतात पण त्यांचे उत्पन्न फार नाही त्यांनाही आधुनिक सुविधा आणि आरामदायक प्रवासाचा हक्क आहे गरीबांच्या जीवनाला सुद्धा काही महत्त्व आहे, याच ध्येयानुसार या ट्रेन डिझाईन केल्या गेल्या आहेत. आजच पश्चिम बंगाल आणि कर्नाटकलासुद्धा त्यांच्या राज्यातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे .  अमृत भारत रेल्वे गाड्यांसाठी मी या राज्यांचेही अभिनंदन करतो.

 

माझ्या कुटुंबियांनो,

वंदे भारत एक्सप्रेस विकास आणि वारसा जोडण्यात मोठी भूमिका बजावत आहे. देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे काशीला रवाना झाली होती. आज वंदे भारत एक्सप्रेस गाड्या देशातील 34 मार्गांवर धावत आहेत. आता वंदे भारत गाड्या  श्रद्धेची मोठी केंद्रे असलेले काशी, कटरा, उज्जैन, पुष्कर, तिरुपती, शिर्डी, अमृतसर, मदुराई, वैष्णोदेवी  अशी स्थळे जोडत आहे. याच मालिकेत आज अयोध्येला ही वंदे भारत रेल्वेची भेट मिळाली आहे. आज अयोध्या धाम जंक्शन ते आनंद विहार वंदे भारत  एक्सप्रेस  सुरू झाली आहे. याशिवाय आज कटरा ते दिल्ली, अमृतसर ते दिल्ली, कोईम्बतूर ते बेंगलोर, मंगळुरू ते मडगाव, जालना ते मुंबई या शहरांदरम्यान वंदे भारतच्या नवीन सेवा सुरू झाल्या आहेत. वंदे भारतामध्ये गती आहे, वंदे भारतामध्ये आधुनिकता आहे आणि स्वावलंबी भारतासाठी वंदे भारताचा अभिमानही आहे. अल्पावधीत दीड कोटींहून अधिक प्रवाशांनी वंदे भारत मध्ये प्रवास केला आहे. विशेषत: तरुण पिढी या रेल्वेला खूप पसंती देत आहे.

 

मित्रांनो,

आपल्या देशात प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्रांना स्वतःचे महत्त्व आणि गौरवशाली इतिहास आहे. बद्री विशाल ते सेतुबंध रामेश्वरम प्रवास, गंगोत्री ते गंगासागर,

द्वारकाधीश ते जगन्नाथपुरी यात्रा, बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा, चार धामची यात्रा, कैलास मानसरोवर यात्रा, कंवर यात्रा, शक्तिपीठांची यात्रा, पंढरपूर यात्रा अशा आजही भारताच्या कानाकोपऱ्यात कुठल्या ना कुठल्या यात्रा काढल्या जातात, लोक श्रद्धेने यासोबत जोडले जातात.  तमिळनाडूतही अनेक यात्रा प्रसिद्ध आहेत. शिवस्थल पाद यात्तिरै, मुरुगनुक्कु कावडी यात्तिरै, वैष्णव तिरुप-पदि यात्तिरै, अम्मन तिरुत्तल यात्तिरै, केरळमधील सबरीमाला यात्रा, आंध्र-तेलंगणामधील मेदारममधील सम्मक्का आणि सरक्काची यात्रा असो, नागोबा यात्रा असो यात लाखोंच्या संख्येने भक्त जमतात. केरळमध्ये भगवान राम आणि त्यांचे भाऊ भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्या निवासस्थानाचीही तीर्थयात्रा आहे हे इथे फार कमी लोकांना माहीत असेल. हा प्रवास नालंबलम् यात्रा म्हणून ओळखला जातो. याशिवाय देशात अनेक परिक्रमाही सुरू असतात. गोवर्धन परिक्रमा, पंचकोसी परिक्रमा, चौरासीकोसी परिक्रमा, अशा प्रवास आणि परिक्रमा प्रत्येक भक्ताचा भगवंताशी संबंध दृढ करतात. बौद्ध धर्मात भगवान बुद्ध यांच्याशी निगडीत  गया, लुंबिनी, कपिलवस्तु, सारनाथ, कुशीनगर या ठिकाणांच्या सहली होतात. बिहारमध्ये राजगीर येथे बौद्ध अनुयायांची परिक्रमा होते. जैन धर्मियांची पावागडची यात्रा असो, सम्मेद शिखरजी, पालिताना किंवा  कैलास यात्रा असो, शीखांची पंच तख्त यात्रा आणि गुरु धाम यात्रा असो, अरुणाचल प्रदेशातील ईशान्येकडील परशुराम कुंडाची विशाल यात्रा असो, यात भक्तगण पूर्ण श्रद्धेने सहभागी होतात. त्याचप्रमाणे शतकानुशतके देशभरात होणाऱ्या या यात्रांसाठी योग्य व्यवस्था सुद्धा केली जाते. आता अयोध्येत सुरू असलेल्या या बांधकामांमुळे अयोध्या धामचा प्रवास आणि येथे येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला देवाचे दर्शन घेणे सोपे होणार आहे.

 

मित्रांनो,

हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आला आहे. आपल्याला देशासाठी नवा संकल्प घ्यायचा आहे, नव्या ऊर्जेने स्वत:ला भरायचे आहे. यासाठी 22 जानेवारीला तुम्ही सर्वजण आपापल्या घरात, या अयोध्येच्या पवित्र भूमीतून मी संपूर्ण देशाच्या 140 कोटी देशवासियांना प्रार्थना करत आहे, मी प्रभू रामाच्या अयोध्या नगरीतून प्रार्थना करत आहे, मी 140 कोटी देशवासियांना प्रार्थना करत आहे, हात जोडून मी प्रार्थना करत आहे की 22 जानेवारीला जेव्हा प्रभू राम अयोध्येत विराजमान आहेत, तेव्हा तुम्ही घरोघरी श्री रामज्योती लावा आणि दिवाळी साजरी करा. 22 जानेवारीची संध्याकाळ भारतभर लखलखणारी असावी. पण त्याचबरोबर माझ्या सर्व देशवासियांना माझी आणखी एक हात जोडून विनंती सुद्धा आहे. 22 जानेवारीला होणार्‍या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाला स्वतः अयोध्येत येण्याची इच्छा आहे, परंतु तुम्हाला हे देखील माहित आहे की प्रत्येकाला येणे शक्य नाही. प्रत्येकासाठी अयोध्येला पोहोचणे खूप कठीण आहे आणि म्हणून मी हात जोडून सर्व राम भक्तांना, देशभरातील राम भक्तांना, विशेषतः उत्तर प्रदेशातील राम भक्तांना माझी विनंती आहे की 22 जानेवारीला औपचारिक कार्यक्रम झाल्यावर 23 तारखेनंतर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार अयोध्येत यावे पण 22 तारखेला अयोध्येला येण्याची इच्छा बाळगू नका. प्रभू रामाला आम्ही भक्त कधीही त्रास देऊ शकत नाही. प्रभू रामजी  यांनी 550 वर्षे वाट पाहिली आणि आता ते येत आहेत, तर आपणही काही दिवस वाट पाहू या. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की कृपया काही दिवस वाट पहा. कारण आता अयोध्येतील रामाचे नवीन, भव्य-दिव्य मंदिर शतकानुशतके दर्शनासाठी उपलब्ध आहे. तुम्ही जानेवारीत या, फेब्रुवारीत या, मार्चमध्ये या, एक वर्षांनी या, दोन वर्षांनी या, मंदिर इथेच असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारीला इथे पोहोचण्यासाठी गर्दी टाळावी, जेणेकरून इथली व्यवस्था, मंदिराचे प्रशासक, मंदिराचे विश्वस्त, ज्यांनी आमच्यासाठी एवढं पवित्र काम केलं आहे आणि त्यांनी हे काम  खूप कष्टानं केलं आहे.  गेली 3-4 वर्षे रात्रंदिवस काम केले आहे, त्यांना आमच्या बाजूने कोणतीही अडचण येता कामा नये. म्हणून मी सर्व भक्तांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की 22 तारखेला येथे पोहोचण्याचा प्रयत्न करू नका. सोयीच्या दृष्टीकोणातून मोजक्याच लोकांना आमंत्रित केले गेले आहे, ते येतील आणि 23 तारखेनंतर मात्र सर्व देशवासियांना येणे सोपे होईल.

 

मित्रांनो,

आज माझी माझ्या अयोध्येतील बंधू भगिनींना विनंती आहे. तुम्हाला देशभरातील आणि जगभरातील असंख्य पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयारी करावी लागेल. आता देशभरातून आणि जगभरातून लोक अयोध्येत येत राहतील, लाखो लोक येणार आहेत. ते त्यांच्या सोयीनुसार येतील, काही एका वर्षात येतील, काही दोन वर्षात येतील, काही दहा वर्षांत येतील पण लाखो लोक येतील. ही मालिका आता अनंतकाळ चालणार,अनंतकाळ टिकणार. त्यामुळे अयोध्यावासियांनो, तुम्हीही एक संकल्प घ्यावा आणि हा संकल्प अयोध्या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनवण्याचा आहे. ही स्वच्छ अयोध्या ही अयोध्यावासीयांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी प्रत्येक पाऊल एकत्रच टाकावे लागेल. आज मी देशातील सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांना माझ्या विनंतीचा पुनरुच्चार करेन. देशभरातील जनतेला ही माझी प्रार्थना आहे. भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी, 14 जानेवारीच्या एक आठवडा आधी मकर संक्रांतीच्या दिवसापासून देशभरातील सर्व लहान-मोठ्या तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. मकर संक्रांती दरम्यान 14 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत प्रत्येक मंदिर आणि भारताच्या कानाकोपऱ्यात ही स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे. प्रभू राम संपूर्ण देशाचे आहेत आणि जेव्हा प्रभू रामजी येत असतील तेव्हा आमचे एकही मंदिर, आमचा एकही तीर्थक्षेत्र आणि परिसर अस्वच्छ असता कामा नये, कुठेही अस्वच्छता असता कामा नये.

मित्रांनो,

काही काळापूर्वी अयोध्या शहरातच मला आणखी एक सौभाग्य लाभले. आज मला सांगताना आनंद होत आहे की उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या 10 कोटी या क्रमांकाची लाभार्थी बहिणीच्या घरी जाऊन चहा पिण्याची संधी मिळाली. 1 मे 2016 रोजी आम्ही उत्तर प्रदेशातील बलिया येथून उज्ज्वला योजना सुरू केली तेव्हा ही योजना यशाच्या इतक्या उंचीवर पोहोचेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. या योजनेने कोट्यवधी कुटुंबांचे, करोडो माता-भगिनींचे आयुष्य कायमचे बदलून टाकले, त्यांना कायमचे लाकडाच्या धुरातून मुक्त केले.

 

मित्रांनो,

आपल्या देशात गॅस कनेक्शन देण्याचे काम 60-70 वर्षांपूर्वी सुरू झाले होते. म्हणजे  6-7 दशकांपूर्वी. पण 2014 पर्यंत परिस्थिती अशी होती की 50-55 वर्षात केवळ 14 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले होते. म्हणजे पाच दशकात 14 कोटी. तर आमच्या सरकारने एका दशकात 18 कोटी नवीन गॅस कनेक्शन दिले आहेत.  या 18 कोटींपैकी 10 कोटी गॅस कनेक्शन उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत देण्यात आले आहेत. जेव्हा गोरगरिबांची सेवा करण्याची भावना असते, जेव्हा हेतू चांगला असतो, तेव्हा त्याच पद्धतीने कार्य केले जाते आणि त्याच पद्धतीने फळ मिळते. आजकाल काही लोक मला विचारतात की मोदींच्या हमीभावाला एवढी ताकद का आहे?

 

मोदींच्या हमीमध्ये एवढी ताकद आहे कारण मोदी जे बोलतात ते करण्यासाठी आयुष्य घालवतात. आज देशाचा मोदींच्या हमीवर विश्वास आहे... कारण मोदी जी हमी देतात ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. अयोध्या नगरीही याची साक्षीदार आहे.  आज मी अयोध्येतील जनतेला पुन्हा एकदा आश्वासन देतो की या पवित्र स्थानाच्या विकासात आम्ही कोणतीही कसूर ठेवणार नाही. श्री राम आपल्या सर्वांचे कल्याण करोत, या इच्छेने मी माझे भाषण संपवतो. प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुम्हा सर्वांचे मी विकास कार्यासाठी   अभिनंदन करतो. माझ्याबरोबर बोला  -

 

जय सिया राम!

जय सिया राम!

जय सिया राम!

भारत माता चिरंजीवी हो!

भारत माता  चिरंजीवी हो!

भारत माता  चिरंजीवी हो!

खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi