सन्माननीय स्त्रीपुरुषहो, नमस्कार !
ऐतिहासिक आणि चैतन्यमयी इंदौर शहरात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. हे असे शहर आहे जे आपल्या समृद्ध पाककला परंपरांचा अभिमान बाळगते. मला आशा आहे की तुम्हाला या शहराचे सर्व रंग आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद लुटता येईल.
मित्रांनो,
तुमचा गट रोजगार या सर्वात महत्त्वाच्या आर्थिक आणि सामाजिक घटकांपैकी एक असलेल्या घटकावर चर्चा करत आहे. आपण रोजगार क्षेत्रातील काही मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर आहोत आणि, या वेगवान बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला जबाबदार आणि प्रभावी धोरणे तयार करण्याची गरज आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या या युगात, तंत्रज्ञान हे रोजगाराचे मुख्य साधन बनले आहे आणि पुढेही ते राहील. तंत्रज्ञानप्रणीत परिवर्तनादरम्यान मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाशी संबंधित रोजगार निर्माण करण्याचा अनुभव असलेल्या या देशात ही बैठक होत आहे, ही भाग्याची बाब आहे. आणि तुमचे यजमान इंदौर शहर, अशा अनेक परिवर्तनांच्या नवीन लाटेचे नेतृत्व करणाऱ्या अनेक स्टार्टअप्सचे घर आहे.
मित्रांनो,
प्रगत तंत्रज्ञान आणि प्रक्रियांच्या वापरामध्ये आपण सर्वांनी आपल्या कार्यदलाला कुशल करणे आवश्यक आहे. . कौशल्य विकास , पुनः कौशल्य आणि कौशल्य वर्धन हे भविष्यातील कार्यदलासाठीचे मंत्र आहेत. भारतात, आमचे 'स्किल इंडिया मिशन' हे या वास्तवाशी जोडण्याची मोहीम आहे. आमच्या 'प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने' अंतर्गत, आतापर्यंत आमच्या 12.5 दशलक्षाहून अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ड्रोन यांसारख्या उद्योगांच्या ''फोर पॉइंट ओ'' क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.
मित्रांनो,
कोविड काळात भारतातील आघाडीच्या फळीतील आरोग्य आणि इतर कार्यदलाने केलेल्या आश्चर्यकारक कार्यांमधून त्यांचे कौशल्य आणि समर्पण दिसून आले. यातून सेवा आणि करुणेची संस्कृतीदेखील प्रतिबिंबित झाली. जगातील सर्वात मोठ्या कुशल कामगार पुरवठादारांपैकी एक होण्याची क्षमता भारतामध्ये आहे. भविष्यात जागतिक स्तरावर मोबाईल वर्कफोर्स हे वास्तव बनणार आहे. त्यामुळे खर्या अर्थाने कौशल्यांचा विकास आणि आदानप्रदान यांचे जागतिकीकरण करण्याची हीच वेळ आहे. यामध्ये जी 20 ने अग्रणी भूमिका बजावली पाहिजे. कौशल्ये आणि पात्रता आवश्यकतांनुसार व्यवसायांचे आंतरराष्ट्रीय संदर्भ सुरू करण्याच्या तुमच्या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो. यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य व समन्वय आणि स्थलांतर व गतिशीलता भागीदारीची नवीन प्रारूपे आवश्यक आहेत. यामध्ये नियोक्ते आणि कार्यदलाबद्दल आकडेवारी, माहिती आणि डेटा सामायिक करणे हा याची सुरुवात करण्याचा एक चांगला मार्ग ठरू शकतो. यामुळे जगभरातील देश, उत्तम कौशल्य, कार्यदल नियोजन आणि फायदेशीर रोजगारासाठी पुराव्यावर आधारित धोरणे तयार करण्यास सक्षम होतील.
मित्रांनो,
आणखी एक परिवर्तनीय बदल म्हणजे 'गिग अँड प्लॅटफॉर्म' अर्थव्यवस्थेत कामगारांची नवी श्रेणी विकसित झाली आहे . महामारीच्या काळात अत्यंत कौशल्यपूर्ण आधारस्तंभ म्हणून तो समोर आला. त्यातून लवचिक कामकाजाची व्यवस्था उपलब्ध होते आणि उत्पन्नस्त्रोतांसाठी देखील ती पूरक आहे. यामध्ये विशेषत: तरुणांसाठी फायदेशीर रोजगार निर्माण करण्याची अफाट क्षमता आहे. महिलांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी हे एक परिवर्तनकारी साधन देखील असू शकते. ही क्षमता वास्तवात उतरवण्यासाठी , आम्हाला या नवीन-युगाच्या कामगारांसाठी नव्या युगाची धोरणे आणि हस्तक्षेप तयार करणे आवश्यक आहे. नियमित आणि पुरेशा कामाच्या संधी निर्माण करण्यासाठी आपल्याला शाश्वत उपाय शोधण्याची गरज आहे. त्यांची सुरक्षा व आरोग्य आणि त्यांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध व्हावी यासाठी नव्या प्रारूपांचीदेखील आवश्यकता आहे. भारतात, आम्ही ‘ई श्रम पोर्टल’ तयार केले आहे ज्याचा या कामगारांकरिता लक्ष्यित हस्तक्षेपासाठी उपयोग केला जात आहे. केवळ एका वर्षात या पोर्टलवर जवळपास 280 दशलक्ष कामगारांनी आपली नोंदणी केली आहे. आता, कामाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपासह, प्रत्येक देशासाठी समान उपाय स्वीकारणे महत्वाचे आहे. आमचा अनुभव सामायिक करण्यात आम्हाला आनंद होईल.
मित्रांनो,
लोकांना सामाजिक संरक्षण प्रदान करणे हे 2030 च्या अजेंडाचा प्रमुख पैलू आहे. मात्र आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे स्वीकारलेला सध्याचा आराखडा केवळ विशिष्ट संकुचित मार्गांनी संरचित केलेल्या फायद्यांचा विचार करणारा आहे. वेगळ्या स्वरूपात प्रदान करण्यात येणारे अनेक लाभ या आराखड्याअंतर्गत समाविष्ट नाहीत. आमच्याकडे सार्वत्रिक सार्वजनिक आरोग्य, अन्न सुरक्षा, विमा आणि निवृत्तीवेतन उपक्रम आहेत ज्यांचा विचार केला जात नाही. आपण या लाभांचा पुनर्विचार केला पाहिजे, जेणेकरून सामाजिक सुरक्षा व्याप्तीचे योग्य चित्र समोर येऊ शकेल. आपण प्रत्येक देशाच्या वैशिष्ठ्यपूर्ण आर्थिक क्षमता, सामर्थ्य आणि आव्हानांचा विचार केला पाहिजे. सामाजिक सुरक्षेच्या शाश्वत वित्तपोषणासाठी एकाच प्रकारचा संकुचित दृष्टिकोन स्वीकारणे योग्य नाही. विविध देशांनी केलेले असे प्रयत्न अचूकपणे प्रतिबिंबित करणार्या प्रणालीचा विचार करण्यासाठी तुम्ही तुमच्या कौशल्याचा उपयोग कराल, अशी आशा मला आहे.
सन्माननीय उपस्थित जनहो !
या क्षेत्रातील काही अत्यंत तातडीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो. जगभरातील सर्व कामगारांच्या कल्याणासाठी एक ठोस संदेश तुम्ही आज द्याल, असा विश्वास मला वाटतो. मी तुम्हा सर्वांना फलदायी आणि यशस्वी संमेलनासाठी शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद!