आजचा दिवस जम्मू-काश्मीरच्या होतकरू तरुणांसाठी, आपल्या मुला-मुलींसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये 20 वेगवेगळ्या ठिकाणी 3,000 तरुणांना सरकारमध्ये काम करण्यासाठी नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. या तरुणांना सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पशुसंवर्धन, जलशक्ती, शिक्षण-संस्कृती अशा विविध विभागांमध्ये सेवेची संधी मिळणार आहे. आज नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्व तरुणांचे मी अभिनंदन करतो. आणि या रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल मी मनोज सिन्हा जी आणि त्यांच्या संपूर्ण चमुचे अभिनंदन करतो. मला सांगण्यात आले की, येत्या काही दिवसांत इतर विभागांमध्येही 700 हून अधिक नियुक्तीपत्रे देण्याची तयारी जोमाने सुरू आहे. ज्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे आणि तो ही येत्या काही दिवसांतच मिळणार आहे, त्यांना मी आधीच शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
21 व्या शतकातील हे दशक जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे दशक आहे. जुनी आव्हाने मागे टाकून नव्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्याची हीच वेळ आहे. मला आनंद आहे की, जम्मू-काश्मीरमधील तरुण त्यांच्या प्रदेशाच्या विकासासाठी, जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या विकासासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची नवी गाथा आपली तरुणाईच लिहिणार आहे. त्यामुळे आज या प्रदेशातील रोजगार मेळाव्याचे आयोजन अत्यंत खास आहे.
मित्रांनो,
वेगवान विकासासाठी आपल्याला नव्या दृष्टिकोनासह, नव्या विचाराने काम करावे लागते. जम्मू आणि काश्मीर आता नव्या व्यवस्थांच्या माध्यमातून, पारदर्शक आणि संवेदनशील व्यवस्थांच्या माध्यमातून सतत विकास करत वाटचाल करत आहे.मला सांगण्यात आले की, 2019 पासून आतापर्यंत राज्यात सुमारे 30 हजार सरकारी पदांची भरती करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 20 हजार नोकऱ्या गेल्या दीड वर्षात देण्यात आल्या आहेत.
हे स्वागतार्ह आहे, कौतुकास्पद आहे. मी राज्य प्रशासनाच्या संपूर्ण चमुचे, विशेषत: जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे मनापासून आभार मानतो. 'योग्यतेनुसार रोजगार' हा मंत्र घेऊन ते वाटचाल करत आहेत, ते प्रदेशातील तरुणांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करत आहे.
मित्रांनो,
गेल्या 8 वर्षांत केंद्र सरकारने रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. 22 ऑक्टोबरपासून देशाच्या विविध भागात आयोजित करण्यात येणारा 'रोजगार मेळावा' हा त्याचाच एक भाग आहे. या अभियाना अंतर्गत पहिल्या टप्प्यात येत्या काही महिन्यांत केंद्र सरकारकडून 10 लाखांहून अधिक नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. जम्मू-काश्मीरसारखी विविध राज्येही या अभियानाशी जोडलेली असल्याने ही संख्या आणखी वाढणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये रोजगार वाढवण्यासाठी आम्ही इथे पोषक व्यावसायिक वातावरणही व्यापक केले आहे.आपले नवीन औद्योगिक धोरण आणि व्यवसाय सुधारणा कृती आराखड्याने व्यवसाय सुलभतेचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे येथे गुंतवणुकीला मोठी चालना मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढल्याने तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. विकासाशी संबंधित प्रकल्पांवर ज्या गतीने काम सुरू आहे, त्यामुळे इथली संपूर्ण अर्थव्यवस्था बदलणार आहे. त्यामुळे आम्ही काश्मीरपर्यंत ट्रेन कनेक्टिव्हिटीच्या दिशेने वेगाने काम करत आहोत. श्रीनगर ते शारजाह अशी आंतरराष्ट्रीय उड्डाणे यापूर्वीच सुरू झाली आहेत. जम्मू-काश्मीरमधून रात्रीही विमानांनी उड्डाण करायला सुरुवात केली आहे. कनेक्टिव्हिटी वाढल्याने येथील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा झाला आहे.
जम्मू-काश्मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन बाहेर पाठवणे आता सोपे झाले आहे. ड्रोनद्वारे वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ज्या प्रकारे काम करत आहे, त्यामुळे इथल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही विशेष मदत मिळणार आहे.
मित्रांनो,
जम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रकारे पायाभूत सुविधांचा विकास होत आहे, कनेक्टिव्हिटी वाढत आहे, त्याने पर्यटन क्षेत्रालाही बळकटी दिली आहे. यंदा जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कशी विक्रमी वाढ झाली हे आपण पाहिले आहे. राज्यात आज ज्या प्रकारे रोजगार-स्वयंरोजगाराच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत, त्याचा काही वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल.
कोणताही भेदभाव न करता शासकीय योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. विकासाचे समान लाभ सर्व घटकांपर्यंत, सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसमावेशक विकासाच्या या मॉडेलमुळे सरकारी नोकऱ्यांसोबतच रोजगाराचे इतर पर्यायही तयार होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आरोग्य आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठीही प्रयत्न निरंतर सुरू आहेत. 2 नवीन एम्स, 7 नवीन वैद्यकीय महाविद्यालये, 2 राज्य कर्करोग संस्था आणि 15 नर्सिंग महाविद्यालये सुरू झाल्यानंतर इथल्या प्रतिभावंतांसाठी अधिक नवीन संधी निर्माण होतील.
मित्रांनो,
जम्मू-काश्मीरच्या जनतेने नेहमीच पारदर्शकतेवर भर दिला आहे, पारदर्शकतेची प्रशंसा केली आहे. आज जी मुले मुली आपली तरुणाई सरकारी सेवेत येत आहे, त्यांना पारदर्शकतेला प्राधान्य द्यावे लागेल. याआधी मी जेव्हा कधी जम्मू-काश्मीरच्या लोकांना भेटायचो तेव्हा मला त्यांच्या वेदना जाणवत असत. ती व्यथा होती - व्यवस्थेतील भ्रष्टाचार. जम्मू-काश्मीरमधील लोक भ्रष्टाचाराचा तिरस्कार करतात. ते त्रासले आहेत. मी मनोज सिन्हा जी आणि त्यांच्या चमूची यासाठी स्तुती करेन की ,ते भ्रष्टाचाराचा रोग संपवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. आता राज्य सरकारचा भाग बनलेल्या तरुणांची जबाबदारी आहे की त्यांनी मनोज सिन्हाजींचे खरे सहकारी बनून पारदर्शकतेच्या प्रयत्नांना, प्रामाणिक कारभाराच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा द्यावी. मला विश्वास आहे की, आज ज्या तरुणांना नियुक्ती पत्र मिळत आहे ते ही नवीन जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि झोकून देऊन पार पाडतील. जम्मू-काश्मीर हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. जम्मू-काश्मीरला सर्वांनी मिळून नव्या उंचीवर नेले पाहिजे. 2047 च्या विकसित भारताचे मोठे उद्दिष्टही आपल्यासमोर आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला दृढ निश्चयाने देश उभारणीत सहभागी व्हायचे आहे. पुन्हा एकदा, मी जम्मू-काश्मीरच्या मुला-मुलींना त्यांच्या आयुष्याच्या या नव्या प्रारंभासाठी, नवीन सुरुवातीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.