आपल्या सर्वांशी संवाद साधून मला खूप आनंद झाला.खरे तर आज सर्वांशीच बोलता आलं नाही. मात्र, आपली उमेद, उत्साह संपूर्ण देशाला जाणवत आहे. या कार्यक्रमात माझ्यासोबत उपस्थित असलेले देशाचे क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर जी, आता काही दिवसांपूर्वी पर्यंत ज्यांनी क्रीडामंत्री पदाची जबाबदारी सांभाळतांना आपल्या सर्वांसोबत खूप काम केले, असे आपले सध्याचे कायदा मंत्री श्री किरेन रिजीजु जी, क्रीडा राज्यमंत्री, आमच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री असलेले, श्री निशीथ प्रामाणिक जी , खेळाशी संबंधित संस्थांचे सर्व प्रमुख, संस्थांचे सर्व सदस्य आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे माझे सर्व खेळाडू मित्र, सर्व खेळाडूंचे कुटुंबीय आणि आप्त.. आज आपल्यात आभासी पद्धतीने संवाद झाला. मात्र, जर मी तुम्हा सर्वांचे इथे दिल्लीत माझ्या घरी स्वागत करु शकलो असतो, आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधू शकलो असतो, तर मला अधिक आनंद झाला असता. याआधी मी
नेहमीच असं केलं आहे. आणि माझ्यासाठी, तुमच्याशी संवाद हा अत्यंत उत्साहाचा प्रसंग असतो. आणि यावेळी अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडूंचे परदेशात आधीच प्रशिक्षण सुरु आहे. मात्र, या स्पर्धेनंतर परत आल्यावर मी आपल्या सगळ्यांच्या सोयीच्या वेळी आपल्याला नक्की भेटेन, असे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो.
सध्या कोरोनाने आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अनेक बदल केले आहेत. ऑलिम्पिकचे वर्ष बदलले, आपली तयारीची, प्रशिक्षणाची पद्धत बदलली, बरेच काही बदलले. आता तर ऑलिम्पिक सुरु व्हायला केवळ दहाच दिवस शिल्लक आहेत. टोक्योमध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल.
मित्रांनो,
आज आपल्याशी संवाद साधतांना, संपूर्ण देशाला कळले की इतक्या कठीण काळातही आपण सर्वांनी देशासाठी किती मेहनत घेतली आहे, किती घाम गाळला आहे. गेल्या महिन्यात ‘मन की बात’ मध्ये मी आपल्यापैकी काही खेळाडूंशी या मेहनतीबद्दल चर्चा देखील केली होती. देशबांधवांना आग्रहही केला होता की त्यांनी देशातल्या आपल्या सर्व खेळाडूंना चीअर करावे, त्यांचे मनोधैर्य वाढवावे. अलीकडेच, हॅशटॅग ‘चीअर फॉर इंडिया’ वर मी कितीतरी फोटो पहिले. सोशल मिडीयापासून ते देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात संपूर्ण देश आपल्यासाठी उभा आहे. 135 कोटी भारतीयांच्या या शुभेच्छा म्हणजे, खेळाच्या मैदानात उतरण्यापूर्वीच आपल्याला मिळालेला देशाचा आशीर्वाद आहे. मी सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना अनेकानेक शुभेच्छा देतो. आपल्या सर्व देशबांधवांकडून, आपल्याला सातत्याने शुभेच्छा मिळत राहाव्यात, यासाठी नमो ॲपवरही खास व्यवस्था करण्यात आली आहे. नमो ॲपवर जाऊनही लोक तुम्हा सर्व खेळाडूंचा उत्साह वाढवूत आहेत, शुभेच्छा देत आहेत, आपले संदेश पाठवत आहेत, आपले मनोधैर्य वाढवण्याचे काम करत आहेत. मला आज हे बघून अत्यंत आनंद होत आहे की सगळा देश आपला उत्साह वाढवत आहे. 135 कोटी भारतीयांचा हा तुम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे. मी माझ्याकडून तुम्हा सर्वांना भरपूर शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
संपूर्ण देशाच्या भावना आज तुमच्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. आणि मी जेव्हा तुम्हा सर्वांना बघतो, तेव्हा मला काही गोष्टी समान दिसत आहेत. आपल्या सगळ्यांची धाडसी वृत्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक भावना आगदी समान आहे. आणखी काही समान गुणवैशिष्ट्ये तुमच्यात मला आढळतात. ती म्हणजे शिस्त, समर्पण आणि दृढनिश्चय. आपल्या सर्वांमध्ये कटिबद्धता आहे, स्पर्धात्मक भावनाही आहे. आपल्या नव्या भारताच्याही याच भावना आहेत. आणि
म्हणूनच, आपण सगळे एकप्रकारे नव्या भारताचे प्रतिबिंब आहात. देशाच्या भविष्याचे प्रतीक आहात.