
भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
छत्तीसगड महतारी की जय!
रतनपूरवाली माता महामाया की जय!
कर्मा माया की जय! बाबा गुरू घासीदास की जय!
जम्मो संगी- साथी -जहुंरिया,
महतारी-दीदी-बहिनी अउ सियान-जवान,
मन ला जय जोहार!
छत्तीसगडचे राज्यपाल रमेन डेका, इथले लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री विष्णुदेव साय, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल, या मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रातील मंत्री तोखन साहू, छत्तीसगड विधानसभेचे सभापती आणि माझे परम मित्र रमण सिंह, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, अरूण साहू, छत्तीसगड सरकारमधील सर्व मंत्री, इथले सर्व खासदार आणि आमदार तसेच दूर -दूरवरून इथे आलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो !
आजपासून नवीन वर्षाला प्रारंभ होत आहे. आज नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि ही तर माता महामायेची भूमी आहे. छत्तीसगड माता कौसल्याचे माहेरघर आहे. सध्याचे दिवस मातृशक्तीच्या उत्सवासाठी समर्पित आहेत. या नऊ दिवसांचे छत्तीसगडसाठी खूप विशेष महत्व आहे. आणि माझे खूप मोठे सद्भाग्य आहे की, नवरात्राच्या पहिल्याच दिवशी मी येथे आलो आहे. अलिकडे म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी भक्त शिरोमणी माता कर्मा यांच्या नावे टपाल तिकिटाचे अनावरण केले गेले. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अभीष्टचिंतन करतो.
मित्रांनो,
नवरात्राचा हा पावन काळ रामनवमीच्या उत्सवाने समाप्त होईल आणि छत्तीसगडची रामभक्ती तर अद्भूत म्हणावी अशी आहे. आपल्याकडे जो रामनामी समाज आहे, त्यांनी तर आपले अवघे शरीर राम नामासाठी समर्पित केले आहे. प्रभू रामचंद्रांच्या आजोळ घरांतील तुम्हा सर्व मंडळींना मी आजच्या पवित्र दिनी खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्रीराम!
मित्रांनो,
आजच्या या पवित्र दिनी मला मोहभट्टा स्वयंभू शिवलिंग महादेवाच्या आशीर्वादाने छत्तीसगडच्या विकासाला अधिक गती देण्याची संधी मिळाली आहे. थोड्या वेळापूर्वीच 33 हजार 700 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण करण्यात आले आहे. यामध्ये गरीबांसाठी घरकुलांचा समावेश आहे. शाळांच्या बांधकामांचा समावेश, रेल्वे आहे, वीज आहे, स्वयंपाकाच्या गॅसच्या वाहिनीचे काम आहे. याचा अर्थ हे सर्व प्रकल्प छत्तीसगडच्या नागरिकांना सुविधा देणारे आहेत. इथल्या नवयुवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणारे आहेत. तुम्हा सर्वांचे या विकास प्रकल्पांसाठी खूप खूप अभिनंदन!
मित्रांनो,
आपल्या परंपरेमध्ये कोणालाही आश्रय देण्याचे काम करणे हे एक खूप मोठे, पुण्याचे काम मानले जाते. परंतु ज्यावेळी एखाद्याचे घरकुल बनण्याचे स्वप्न पूर्ण होते, त्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकेल? आज नवरात्राच्या शुभदिनी, नवीन वर्षाच्या पहिल्या दिनी छत्तीसगडमधील तीन लाख गरीब कुटुंबे आपल्या नवीन घरकुलामध्ये प्रवेश करीत आहेत. मला आत्ताच इथे घरकुलाचा लाभ मिळालेल्या तीन परिवारांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता. एक माता तर आपल्या आनंदाला सीमा नाही, असे म्हणत होती, ते त्यांच्या चेह-यावरून दिसतही होते. या सर्व कुटुंबांना, तीन लाख परिवारातील सदस्यांना, एका नवीन जीवनासाठी मी खूप -खूप शुभेच्छा देतो. या गरीब परिवाराच्या डोक्यावर हक्काचे पक्के छत आले, हे सगळे तुम्हा सगळ्यांमुळे शक्य झाले आहे. तुम्ही लोकांनी मोदींच्या हमीवर विश्वास ठेवला, म्हणून हे घडू शकले आहे. छत्तीसगडमधील लाखों कुटुंबांना पक्की घरकुले मिळाली, त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले. आधीच्या सरकारने या गरीब परिवारांच्या घरकूल प्रकल्पांच्या फायली हरवून टाकल्या होत्या. आणि त्याचवेळी आम्ही हमी दिली होती की, आमचे सरकार तुमचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करेल. आणि म्हणूनच विष्णुदेव यांचे सरकार बनल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच 18 लाख घरे बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. आज त्यापैकी तीन लाख घरे बनून तयार आहेत. मला आनंद या गोष्टीचाही आहे की, यामध्ये बहुसंख्य घरे आपल्या आदिवासी क्षेत्रांमध्ये बनली आहेत. बस्तर आणि सरगुजा इथल्या अनेक कुटुंबांना आता पक्की घरकुले मिळाली आहेत. ज्या कुटुंबांच्या अनेक पिढ्यांनी झोपडीमध्ये नाइलाजाने आयुष्य काढले, त्यांच्यासाठी ही पक्की घरे किती मोठी भेट आहे, हे आपण समजू शकतो. आणि ज्या लोकांना या घराचे मोल समजू शकत नाही, त्यांना मी समजावून सांगू इच्छितो. तुम्ही जर रेल्वे किंवा बसने प्रवास करीत असाल आणि गर्दीमुळे प्रवासात बसण्यासाठी जागा नसेल, तर उभे राहूनच प्रवास करावा लागतो. अशावेळी कुणी थोडेसे बाजूला सरकून काही वेळ थोडीशी जागा बसायला दिली तर, आपल्याला किती मोठा आनंद होतो , याचा अनुभव घेतला आहे ना? एक,दोन, तीन तासांच्या प्रवासामध्ये बसण्यासाठी जागा मिळाली तर, आपला आनंद अनेकपटींनी वाढतो. आता तुम्ही कल्पना करा की, या कुटुंबांनी पिढ्यांन पिढ्या झोपड्यांमध्ये आपले आयुष्य काढले आहे. आज ज्यावेळी त्यांना पक्के स्वमालकीचे घर मिळाल्यामुळे तर त्यांच्या जीवनात किती मोठी आनंदाची गोष्ट घडली आहे, याची तुम्हीच कल्पना करावी. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे किती तरी रंग भरले आहेत. त्यांना जगण्याचा उत्साह आला असणार आहे. आणि ज्यावेळी हा विचार माझ्या मनात येतो, त्यांचे आनंदी चेहरे मी पाहतो, त्यावेळी माझ्यामध्येही नवीन ऊर्जा निर्माण होते. मलाही खूप आनंद होतो. देशवासियांसाठी रात्रं-दिवस काम करण्यासाठी माझे मन अधिक मजबूत बनते.
मित्रांनो,
या घरांना बनविण्यासाठी भलेही सरकारने मदत केली आहे. मात्र घर कसे असावे, ते कसे बनावे, ही गोष्ट काही सरकारने निश्चित केली नाही, या गोष्टी लाभार्थींनीच ठरवल्या आहेत. हे तुमच्या स्वप्नातले घरकूल आहे आणि आमच्या सरकारने फक्त चार भिंती बनवून दिलेल्या नाहीत. तर या घरांमध्ये जे कोणी वास्तव्य करणार आहेत, त्यांचे जीवनही घडवले आहे. या घरांमध्ये शौचालय, वीज, उज्ज्वला योजनेतून स्वयंपाकाचा गॅस, नळाव्दारे पाणी, अशा सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. इथे मी पाहतोय की, खूप मोठ्या संख्येने माता- भगिनी आलेल्या आहेत. या पक्क्या घरकुलांचे मालकी हक्क बहुतांश आमच्या माता-भगिनींना दिले आहेत. ज्यांच्या नावांवर पहिल्यांदाच एखाद्या मालमत्तेची नोंदणी झाली आहे, अशा हजारो भगिनी आहेत. माझ्या माता -भगिनींनो, तुमच्या चेह-यावर आज हा जो आनंद मला दिसतो आहे, तो आनंदच मला तुमच्याकडून मिळालेला आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद म्हणजे, माझी खूप मोठी पूंजी आहे.
मित्रांनो,
ज्यावेळी इतक्या मोठ्या संख्येने घरकुलांची निर्मिती केली जाते, लाखो संख्येने घरे बनवली जातात, त्यामुळे आणखी एक मोठे काम होत असते. आता तुम्ही विचार करा की ही घरे कोण बांधते, या घरांमध्ये वापरले जाणारे साहित्य कुठून येते, हे छोटे-मोठे साहित्य दिल्ली-मुंबईतून थोडेच येते! जेव्हा इतकी घरे बांधली जातात, तेव्हा आमचे गवंडी, मिस्त्री, गावातील कामगार मित्र, सर्वांना काम मिळते आणि स्थानिक लहान दुकानदारांनाही येणाऱ्या साहित्याचा फायदा होतो. जे गाडीतून, ट्रक मधून साहित्य आणतात त्यांना लाभ होतो. याचा अर्थ छत्तीसगडमध्ये लाखो घरांच्या बांधकामामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे.
मित्रांनो,
भाजप सरकार छत्तीसगडच्या जनतेला दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करत आहे. आणि आत्ताच मुख्यमंत्री सांगत होते की अलिकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्रिस्तरीय निवडणुका आणि त्यातही तुम्ही ज्या प्रकारे भाजपला आशीर्वाद दिलात, त्याबद्दल मी आज आलो आहे, म्हणून त्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो.
मित्रांनो,
विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने येथे आले आहेत. आपले सरकार किती लवकर त्यांना दिलेल्या हमी पूर्ण करत आहे हे तुम्ही सर्वांनी अनुभवले असेल. छत्तीसगडच्या बहिणींना दिलेले वचन आम्ही पूर्ण केले. धान उत्पादक शेतकऱ्यांना 2 वर्षांचा प्रलंबित बोनस मिळाला आहे, वाढीव एमएसपीवर धान खरेदी करण्यात आली आहे. यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना हजारो कोटी रुपये मिळाले आहेत.
काँग्रेस सरकारच्या काळात भरती परीक्षांमध्ये अनेक घोटाळे झाले होते, भाजप सरकारने भरती परीक्षांमधील घोटाळ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. आणि आमचे सरकार पूर्ण पारदर्शकतेने येथे परीक्षा घेत आहे. या प्रामाणिक प्रयत्नांचा परिणाम म्हणून आज लोकांचा भाजपवरील विश्वास वाढत आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीतही भाजपचा झेंडा फडकला आहे. छत्तीसगडमधील जनता भाजप सरकारच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देत आहे.
मित्रांनो,
छत्तीसगड राज्याच्या निर्मितीला 25 वर्षे झाली आहेत, हे वर्ष छत्तीसगडचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, योगायोगाने हे वर्ष अटलजींचे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. छत्तीसगड सरकार 2025 हे वर्ष अटल निर्माण वर्ष म्हणून साजरे करत आहे. आमचा संकल्प आहे – ‘हमने बनाया है, हम ही संवारेंगे’ (आम्ही तयार केले आहे आणि याचा विकास देखील आम्हीच करू). ज्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी झाली आणि ज्यांचे उद्घाटन आज झाले ते सर्व या संकल्पाचा एक भाग आहेत.
मित्रांनो,
विकासाचे फायदे येथे पोहोचत नसल्याने छत्तीसगडला वेगळे राज्य करावे लागले. काँग्रेसच्या राजवटीत येथे कोणतेही विकासकाम होऊ शकले नाही आणि जे काही काम झाले त्यात काँग्रेसच्या लोकांनी घोटाळे केले. काँग्रेसला तुमची कधीच काळजी नव्हती. आम्ही तुमच्या आयुष्याची, तुमच्या सुविधांची आणि तुमच्या मुलांची कायम काळजी घेतली आहे.
आम्ही छत्तीसगडमधील प्रत्येक गावात विकास योजना पोहचवत आहोत. तिथे, एका मुलीने एक चित्र बनवून आणले आहे; ती बिचारी मुलगी बराच वेळ हात वर करून उभी आहे. मी सुरक्षा दलाच्या लोकांना सांगेन की त्यांनी त्या मुलीला, कृपया तिने काढलेल्या चित्राच्या मागे नाव आणि पत्ता लिहायला सांगावे, मी तिला नक्की पत्र पाठवेन. कोणीतरी हे चित्र घेऊन आणि मला पोचते करा. खूप खूप धन्यवाद बेटा, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही पाहता, येथील दुर्गम आदिवासी भागातही चांगले रस्ते तयार झाले आहेत. पहिल्यांदाच अनेक भागात रेल्वे गाड्या पोहोचत आहेत, मी नुकतेच येथे एका ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे.
इथे अनेक ठिकाणी पहिल्यांदाच वीज पोहोचत आहे, तर कुठे पाईपद्वारे पाणी पोहोचत आहे, काही ठिकाणी पहिल्यांदाच नवीन मोबाईल टॉवर बसवला जात आहे. नवीन शाळा-महाविद्यालये-रुग्णालये बांधली जात आहेत. याचा अर्थ आपल्या छत्तीसगडचे चित्र बदलत आहे, आणि त्याचे नशीबही बदलत आहे.
मित्रांनो,
छत्तीसगड हे देशातील अशा राज्यांच्या यादीत सामील झाले आहे जिथे 100% रेल्वे नेटवर्क विजेवर चालते. ही एक मोठी उपलब्धी आहे. सध्या छत्तीसगडमध्ये सुमारे 40 हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांवर काम सुरू आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पातही छत्तीसगडसाठी 7 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे छत्तीसगडच्या अनेक भागात चांगल्या रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी पूर्ण होईल. यामुळे शेजारील राज्यांशी संपर्क वाढेल.
मित्रांनो,
विकासासाठी बजेटसोबतच चांगला हेतू देखील महत्वाचा असतो. जर काँग्रेसप्रमाणे मन आणि मेंदू अप्रामाणिकतेने भरलेले असेल तर सर्वात मोठी तिजोरी देखील रिकामी होईल. काँग्रेसच्या राजवटीत आपण अशीच परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे आदिवासी भागात विकास पोहोचू शकला नाही. आपल्यासमोर कोळशाचे उदाहरण आहे. छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा आहे. पण इथे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पुरेशी वीज मिळू शकली नाही. काँग्रेसच्या काळात विजेची स्थिती खूपच वाईट होती, येथील वीज प्रकल्पांवर फारसे काम झाले नव्हते. आज आमचे सरकार येथे नवीन वीज प्रकल्प उभारत आहे.
मित्रांनो,
आम्ही येथे सौरऊर्जेपासून वीज निर्मितीवरही खूप भर देत आहोत. आणि मी तुम्हाला आणखी एका उत्तम योजनेबद्दल सांगेन. मोदीने अशी योजना सुरू केली आहे ज्यामध्ये तुमचे वीज बिल शून्य होईल आणि तुम्ही घरी वीज निर्मिती करून पैसे कमवू शकाल. या योजनेचे नाव आहे- पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना. यासाठी, आमचे सरकार प्रत्येक घराला सौर पॅनेल बसवण्यासाठी 70- 80 हजार रुपयांची मदत देत आहे. छत्तीसगडमध्येही 2 लाखांहून अधिक कुटुंबांनी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. जर तुम्हीही या योजनेत सामील झालात तर तुम्हाला खूप फायदे मिळतील.
मित्रांनो,
चांगल्या हेतूचे आणखी एक उदाहरण म्हणजे गॅस पाइपलाइन. छत्तीसगड समुद्रापासून खूप दूर आहे. त्यामुळे येथे गॅस पुरवठा करणे इतके सोपे नाही. पूर्वीचे जे सरकार होते, त्यांनी गॅस पाईपलाईन वर देखील आवश्यक असलेला.खर्च केला नव्हता. आम्ही या आव्हानाचे देखील समाधान शोधत आहोत.
आमचे सरकार येथे गॅस पाईपलाईन टाकत आहे. यामुळे पेट्रोलियम संबंधित उत्पादनांची ट्रक किंवा टँकरद्वारे वाहतूक करण्याची गरज राहणार नाही. ही उत्पादने तुम्हाला कमी किमतीत मिळू लागतील. गॅस पाईपलाईन आल्यामुळे येथे सीएनजीचा वापर करून गाड्या चालू लागतील. याचा आणखी एक फायदा होईल, घरात स्वयंपाक करण्यासाठी लागणारा गॅस आता पाईपलाईन द्वारे मिळू शकेल. स्वयंपाक घरात ज्याप्रमाणे नळाद्वारे पाणी येते त्याचप्रमाणे आता गॅस देखील येऊ लागेल. सध्या आम्ही दोन लाखाहून अधिक घरांमध्ये थेट पाईप द्वारे गॅस पोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
गॅस उपलब्ध झाल्यामुळे येथे छत्तीसगडमध्ये नवे उद्योग सुरू करणे शक्य होईल. म्हणजेच येथे मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होईल.
मित्रांनो,
गेल्या अनेक दशकात काँग्रेसच्या धोरणामुळे छत्तीसगड सह देशातील अनेक राज्यांमध्ये नक्षलवादाला प्रोत्साहन मिळाले. देशात जिथे जिथे सुविधांचा अभाव होता, जे प्रदेश विकासात मागे पडले तेथे नक्षलवाद फोफावत राहिला. मात्र ज्या पक्षाने 60 वर्ष सरकार चालवले त्यांनी काय केले? त्यांनी अशा जिल्ह्यांना मागास जिल्हे म्हणून घोषित केले आणि जबाबदारीतून अंग काढून घेतले. यामुळे आपल्या युवकांच्या अनेक पिढ्यांना मृत्यूला कवटाळावे लागले. अनेक मातांना आपल्या लाडक्यांना गमवावे लागले. अनेक भगिनींनी आपले बंधू गमावले.
मित्रांनो,
त्या काळातील सरकारची ही उदासीनता या आगीत तेल ओतण्यासारखी होती. तुम्ही तर हे सगळे स्वतः सहन केले आहे, पाहिले आहे. छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अति मागास आदिवासी कुटुंबे राहत होती. काँग्रेस सरकारने त्यांची कधीही वास्तपुस्त केली नाही. आम्ही गरीब आदिवासींच्या उपचाराची चिंता केली आणि पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्मान भारत योजना सुरू केली. आम्ही माफक दरात औषधे पुरवण्याची चिंता केली. औषधांच्या दरात 80% सवलत देणारी प्रधानमंत्री जन औषधि केंद्रे सुरू केली. आम्ही गरीब आदिवासींच्या शौचालयाची चिंता केली, स्वच्छ भारत अभियान चालवले.
मित्रांनो,
जे लोक सामाजिक न्यायाच्या नावावर खोटे बोलत असतात त्यांनीच आदिवासी समाजाची दिशाभूल केली होती. म्हणूनच तर मी म्हणतो, ‘ज्यांची कोणीही विचारपूस केली नाही त्यांची पूजा मोदी करत आहे’. आम्ही आदिवासी समाजाच्या विकासासाठी देखील विशेष अभियान चालवत आहोत. आणि आदिवासी समाजासाठी धरती आबा आदिवासी उत्कर्ष अभियान सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात सुमारे 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेमुळे छत्तीसगडमधील सुमारे सात हजार आदिवासी गावांना लाभ मिळणार आहे. आदिवासी समाजात देखील अति मागास आदिवासी जमाती आहेत हे तुम्हाला देखील ठाऊक असेल. अशा अति मागास आदिवासींसाठी आमच्या सरकारने प्रथमच प्रधानमंत्री जनमन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत छत्तीसगडमधील 18 जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक वस्त्यांमध्ये काम केले जात आहे. देशभरातील मागास आदिवासी वस्त्यांमध्ये सुमारे 5 हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीला मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी जवळपास अर्ध्या लांबीचे रस्ते छत्तीसगडमध्ये तयार केले जाणार आहेत म्हणजे सुमारे अडीच हजार किलोमीटर लांबीचे रस्ते छत्तीसगडमध्ये प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत बनवले जाणार आहेत. याच योजनेच्या अंतर्गत आज जिथे अनेक आदिवासी मित्रांना पक्की घरे मिळत आहेत.
मित्रांनो,
आज डबल इंजिनचे सरकार छत्तीसगडची स्थिती जलद गतीने सुधारत आहे. जेव्हा सुकमा जिल्ह्यातील एका आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळते तेव्हा लोकांमध्ये नवा विश्वास जागृत होतो. जेव्हा अनेक वर्षानंतर दंतेवाडामध्ये आरोग्य केंद्र पुन्हा सुरू होते तेव्हा लोकांमध्ये नवा विश्वास जागृत होतो. अशाच प्रयत्नांमुळे नक्षल प्रभावित क्षेत्रांमध्ये कायमस्वरूपी शांततेचा नवा काळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आत्ताच डिसेंबर महिन्यात जेव्हा मन की बात कार्यक्रम झाला तेव्हा त्या कार्यक्रमात मी बस्तर ऑलिंपिक बद्दल चर्चा केली होती. तुम्ही सर्वांनी देखील मन की बात कार्यक्रमाचा तो भाग नक्कीच ऐकला असेल, बस्तर ऑलिंपिक मध्ये ज्या प्रकारे हजारो युवक युवतींनी भाग घेतला होता, तो छत्तीसगडमध्ये होत असलेल्या परिवर्तनाचा पुरावा आहे.
मित्रांनो,
मी छत्तीसगडच्या युवा वर्गाचे एक दिमाखदार भविष्य आपल्या नजरेसमोर पाहत आहे. छत्तीसगड मध्ये ज्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण लागू केले जात आहे, ते खूपच चांगले काम होत आहे. देशभरात 12 हजाराहून अधिक आधुनिक प्रधानमंत्री श्री विद्यालये सुरू करण्यात आली आहेत. यापैकी सुमारे साडेतीनशे विद्यालये छत्तीसगडमध्ये आहेत. ही प्रधानमंत्री श्री विद्यालये इतर शाळांसाठी आदर्श ठरतील. या विद्यालयांमुळे राज्यातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा स्तर उंचावेल. छत्तीसगडमध्ये अनेक एकलव्य मॉडेल शाळा पूर्वीपासूनच चांगले काम करत आहेत. नक्षलग्रस्त भागात देखील अनेक शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. आज छत्तीसगड मध्ये विद्या समीक्षा केंद्राची देखील सुरुवात करण्यात आली आहे. हे देखील देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे शाळांमध्ये शिक्षणाचा स्तर आणखी सुधारेल, वर्गात शिक्षकांची विद्यार्थ्यांची रियल टाइमिंग मध्ये मदत होऊ शकेल.
मित्रांनो,
आम्ही तुम्हाला दिलेले आणखी एक वचन पूर्ण केले आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत येथे हिंदी माध्यमातून देखील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण सुरू केले जात आहे. आता माझ्या गावातील, गरीब आदिवासी कुटुंबातील युवक युवतींची स्वप्न पूर्ण करण्यात भाषा अडसर बनणार नाही.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षात माझे मित्र रमण सिंह जी यांनी जो मजबूत पाया निर्माण केला होता त्यामुळेच वर्तमानातील सरकार आणखी सशक्त बनत आहे. आगामी 25 वर्षांमध्ये या भक्कम पायावर आपल्याला विकासाची एक भव्य इमारत बांधायची आहे. छत्तीसगड राज्य संसाधनांनी परिपूर्ण आहे, छत्तीसगड स्वप्नांनी परिपूर्ण आहे, छत्तीसगड सामर्थ्याने देखील परिपूर्ण आहे. 25 वर्षानंतर जेव्हा आपण छत्तीसगड स्थापनेची 50 वर्षे साजरी करू तेव्हा छत्तीसगड देशातील अग्रणी राज्यांमध्ये सामील असेल, हे उद्दिष्ट आम्ही नक्कीच साध्य करू. येथे विकासाचा लाभ छत्तीसगडमधील प्रत्येक परिवारापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाही, असा विश्वास मी तुम्हाला देतो. तुम्हा सर्वांना या विविध विकास कामांसाठी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खूप मोठ्या स्वप्नपूर्तीचा जो प्रवास सुरू झाला आहे, यासाठीही मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
खूप खूप आभार!