नअनैवरुक्कुम् वणक्कम्
ऊँ नम: शिवाय, शिवाय नम:!
हर हर महादेव!
सगळ्यात आधी मी विविध अधीनमशी (तामिळनाडूमधील मंदिरांतील अनुवांशिक विश्वस्त/ शिवभक्त) जोडल्या गेलेल्या तुम्हा सर्व पूज्यनीय संतांपुढे नतमस्तक होतो. तुमचे पाय माझ्या घराला लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. भगवान शिवाच्याच कृपेमुळे एकाच वेळी तुम्हा सगळ्या शिवभक्तांच्या दर्शनाची संधी मला मिळाली. नव्या संसद भवनाचे लोकार्पण करताना तुम्ही सगळे समक्ष आशीर्वाद देणार आहात याचाही मला आनंद आहे.
आदरणीय संत,
आपल्या स्वातंत्र्यलढ्यात तामिळनाडूने बजावलेली महत्त्वाची भूमिका आपल्या सर्वांना माहीत आहे. वीरमंगाई वेलू नचियारपासून ते मरुडू बंधू यांच्यापर्यंत, सुब्रह्मण्य भारती यांच्यापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना साथ देणाऱ्या अनेक तामिळांपर्यंत ही यादी आहे. तामिळनाडू हा भारतीय राष्ट्रवादाचा बालेकिल्ला आहे. तामिळ लोकांमध्ये नेहमीच भारतमातेची, भारताच्या कल्याणाची भावना असते.
असे असूनही भारताच्या स्वातंत्र्यालढ्यात तामिळ लोकांच्या योगदानाला जे महत्त्व द्यायला हवे होते ते दिले गेले नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आता भाजपने हा मुद्दा ठळकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. महान तामिळ परंपरा आणि देशभक्तीचे प्रतीक असलेल्या तामिळनाडूचे काय झाले हे आता देशातील जनतेलाही जाणवू लागले आहे.
स्वातंत्र्याची वेळ समीप आली तेव्हा सत्ता हस्तांतरणाच्या चिन्हाबाबत प्रश्न निर्माण झाला. यासाठी आपल्या देशात वेगवेगळ्या परंपरा आहेत. वेगवेगळ्या प्रथाही आहेत. पण त्यावेळी राजाजी आणि अधीनम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन तामिळ संस्कृतीतून एक सदाचारी, पवित्र मार्ग सापडला होता.
हा मार्ग होता - सेंगोलद्वारे (राजदंड) सत्तेचे हस्तांतरण. तामिळ परंपरेत, सेंगोल राज्यकर्त्याला दिला जातो. ज्या व्यक्तीकडे सेंगोल असतो त्याच्याकडे देशाच्या कल्याणाची जबाबदारी असते आणि त्याने कर्तव्याच्या मार्गापासून दूर जाऊ नये याची जाणीव सेंगोल करून देतो. 1947 मध्ये थिरुवदुथुराई अधिनम यांनी खास सेंगोल तयार केला. आधुनिक लोकशाही म्हणून तमिळ संस्कृती आणि भारताच्या नशिबात किती उत्कट आणि जिव्हाळ्याचे नाते आहे याची त्या काळातील चित्रे आज आपल्याला आठवण करून देतात. आज त्या खोलवर रूजलेल्या संबंधांची गाथा दडपलेल्या इतिहासाच्या पानांमधून बाहेर पडून पुन्हा जिवंत झाली आहे, यावरून त्या काळातील घडामोडींना योग्य दृष्टीकोनातून पाहण्याची दृष्टी मिळते. या पवित्र प्रतीकालाही कशी वागणूक दिली गेली आहे याची जाणीवही आपल्याला झाली आहे.
माझ्या देशवासीयांनो
राजाजी आणि इतर विविध अधिनमांच्या दूरदृष्टीला मी सलाम करतो. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीची आठवण असलेल्या प्रत्येक प्रतीकापासून मुक्त करून देशाच्या स्वातंत्र्याची सुरुवात सेंगोलने केली. सेंगोलनेच स्वतंत्र भारताला गुलामगिरीपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या राष्ट्राच्या युगाशी जोडले आणि देश स्वतंत्र झाल्यावर 1947 मध्ये सत्तेचे हस्तांतरण सूचित केले. भारताची भूतकाळातील गौरवशाली वर्षे आणि परंपरा याला सेंगोलने स्वतंत्र भारताच्या भविष्याशी जोडले आहे, हे सेंगोलचे आणखी एक महत्त्व आहे.
स्वातंत्र्यानंतर या पूज्य सेंगोलला पुरेसा सन्मान मिळाला असता, अभिमानाचे स्थान दिले गेले असते तर बरे झाले असते. पण हे सेंगोल प्रयागराजमध्ये, आनंद भवनात प्रदर्शनासाठी ठेवले होते, त्याला 'चालताना आधार देणारी काठी' असे हिणवले जायचे. मी म्हणजेच तुमच्या आणि सरकारच्या सेवकाने आता त्या सेंगोलला आनंद भवनातून बाहेर काढले आहे.
नवीन संसद भवनात राजदंड प्रस्थापित करताना स्वातंत्र्याचा तो पहिला क्षण पुन्हा जिवंत करण्याची संधी आज आम्हाला मिळाली आहे. लोकशाहीच्या मंदिरात आज राजदंडाला योग्य स्थान मिळते आहे. भारताच्या महान परंपरेचे प्रतीक असलेल्या राजदंडाची स्थापना नवीन संसद भवनात होणार आहे, याचा मला मनापासून आनंद होतो आहे. आपण कर्तव्याच्या मार्गावर चालत राहायचे आहे आणि जनतेला उत्तरदायी राहायचे आहे, याची आठवण हा राजदंड करून देत राहील.
आदरणीय संतगण,
आदिनामची महान प्रेरणादायी परंपरा ही खऱ्या सात्विक ऊर्जेचे प्रतीक आहे. तुम्ही सर्व संत शैव पंथाचे अनुयायी आहात. तुमच्या तत्वज्ञानातील एक भारत श्रेष्ठ भारताची भावना आहे, ती भारताच्याच एकात्मतेचे आणि अखंडतेचे प्रतिबिंब आहे. तुमच्या अनेक आदिनामांच्या नावांवरून हे दिसून येते. तुमच्या काही आदिनामांच्या नावात कैलासाचा उल्लेख आहे. हा पवित्र पर्वत तामिळनाडूपासून खूप दूर हिमालयात आहे, तरीही तो तुमच्या हृदयाच्या जवळ आहे. शैव पंथातील प्रसिद्ध संत असणारे तिरुमूलर हे शिवभक्तीचा प्रसार करण्यासाठी कैलास पर्वतावरून तामिळनाडूत आले होते, असे म्हटले जाते. आजही शिवस्मृत्यर्थ, त्यांची रचना असणाऱ्या तिरुमंदिरमच्या श्लोकांचे पठण केले जाते.
अप्पर, संबंदर, सुंदरर आणि माणिक्का वासगर अशा अनेक महान संतांनी उज्जैन, केदारनाथ आणि गौरीकुंडाचा उल्लेख केला आहे. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आज मी महादेवाची नगरी असलेल्या काशीचा खासदार आहे, त्यामुळे मी तुम्हाला काशीबद्दलही सांगेन. धर्मपुरम आदिनामचे स्वामी कुमारगुरुपरा तामिळनाडूहून काशीला गेले होते. त्यांनी वाराणसीच्या केदार घाटावर केदारेश्वर मंदिराची स्थापना केली होती. तमिळनाडूतील तिरुप्पनन्दाळ येथील काशी मठाचे नाव सुद्धा काशीवरून ठेवण्यात आले आहे. या मठाबद्दल मला एक रंजक माहिती सुद्धा कळली आहे. असे म्हणतात की तिरुप्पनन्दाळ येथील काशी मठ यात्रेकरूंना बँकिंग सेवा पुरवत असे. तामिळनाडूच्या काशी मठात पैसे जमा केल्यानंतर ते यात्रेकरू काशी येथे प्रमाणपत्र दाखवून पैसे काढू शकत असत. अशा प्रकारे, शैव पंथाच्या अनुयायांनी केवळ शिवभक्तीचाच प्रसार केला नाही तर आपल्याला एकमेकांच्या जवळ आणण्याचे कामही केले.
आदरणीय संतगण,
शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतरसुद्धा तामिळनाडूची संस्कृती आजही जिवंत आणि समृद्ध आहे, त्यात आदिनामसारख्या महान आणि दैवी परंपरेचाही मोठा वाटा आहे. ही परंपरा जिवंत ठेवण्याची जबाबदारी संतांनीच पार पाडली आहे, त्याचबरोबर सर्व पीडित, शोषित, वंचितांनाही याचे श्रेय जाते, ज्यांनी या परंपरेचे रक्षण केले आणि जतनही केले. राष्ट्रासाठी योगदान देण्याच्या कामी तुमच्या सर्व संस्थांचा इतिहास गौरवशाली आहे. आता तो भूतकाळ पुढे नेण्याची, त्यातून प्रेरणा घेण्याची आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी काम करण्याची वेळ आहे.
आदरणीय संतगण,
पुढच्या 25 वर्षांसाठी देशाने काही उद्दिष्टे निर्धारित केली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीची 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत एक मजबूत, स्वावलंबी आणि सर्वसमावेशक विकसित भारत निर्माण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. 1947 सालातील तुमच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची ओळख लाखो देशवासीयांना पुन्हा झाली आहे. आज देश 2047 साठीची मोठी उद्दिष्टे घेऊन पुढे जातो आहे, अशा वेळी तुमची भूमिका आणकी महत्त्वाची झाली आहे. तुमच्या संस्थांनी नेहमीच सेवेची मुल्ये रूजवली आहेत. लोकांना परस्परांशी जोडण्याचे, त्यांच्यात समानतेची भावना निर्माण करण्याचे उत्तम उदाहरण तुम्ही घालून दिले आहे. भारत जितका अखंड असेल तितका तो मजबूत असेल. म्हणूनच आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे आपल्यासमोर वेगवेगळी आव्हाने उभी करतील. ज्यांना भारताची प्रगती खटकते, ते सर्वात आधी आपली एकता भंग करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या संस्थांकडून देशाला मिळालेल्या अध्यात्मिकतेच्या आणि सामाजिकतेच्या बळावर आम्ही प्रत्येक आव्हानाला तोंड देऊ, अशी खात्री मला वाटते. तुम्ही येथे आलात, तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिलेत, हे माझे सौभाग्य आहे, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो, मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त तुम्ही सर्वजण येथे आलात आणि आम्हाला आशीर्वाद दिला आहे. यापेक्षा मोठे भाग्य असूच शकत नाही आणि म्हणून मी कितीही आभार मानले तरी ते पुरेसे असणार नाहीत. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो.
ऊँ नम: शिवाय!
वणक्कम!