नमस्कार!
कोन्नीचीवा।
कसे आहात ?
झेन उद्यान आणि कायझेन अकादमीच्या लोकार्पणाचा हा प्रसंग भारत आणि जपान या देशांच्या परस्पर संबंधातील सरलता आणि आधुनिकता यांचे प्रतिक आहे. जपानी झेन उद्यान आणि कायझेन अकादमीची स्थापना भारत आणि जपान या देशांदरम्यान असलेले संबंध अधिक दृढ करतील आणि या दोन्ही देशांतील नागरिकांना एकमेकांच्या अधिक जवळ आणतील असा मला विश्वास आहे. ह्योगो प्रांताचे नेते आणि माझे परममित्र गव्हर्नर ईदो तोशिजो यांचे मी या प्रसंगी विशेष आभार मानत आहे. गव्हर्नर ईदो 2017 मध्ये स्वतः अहमदाबादला आले होते. अहमदाबादमध्ये झेन उद्यान आणि कायझेन अकादमीच्या स्थापनेत त्यांनी आणि ह्योगो आंतरराष्ट्रीय संघटनेने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. याप्रसंगी मी गुजरातच्या भारत-जपान मैत्री संघटनेतील सहकाऱ्यांचे देखील अभिनंदन करतो. भारत आणि जपान या देशांतील परस्पर संबंधांना अधिक सशक्त करण्यासाठी त्यांनी अथकपणे उल्लेखनीय काम केले आहे. जपान माहिती आणि अभ्यास केंद्र देखील या कार्याचेच एक उदाहरण आहे.
मित्रांनो,
भारत आणि जपान हे देश जितके बाह्य प्रगती आणि उन्नती साधण्यासाठी समर्पितपणे कार्यरत आहेत तितकेच महत्त्व त्यांनी आंतरिक शांती आणि प्रगती प्राप्त करण्यालादेखील दिले आहे. जपानी झेन उद्यान म्हणजे शांतीच्या याच शोधाचा आणि साधेपणाचा एक सुंदर आविष्कार आहे. भारतातील लोकांनी योग आणि अध्यात्म यांच्या माध्यमातून शतकानुशतके ज्या शांती, सहजभाव आणि सरलतेच्या मूल्यांची शिकवण घेतली, या मूल्यांना समजून घेतले त्याचीच एक झलक त्यांना इथे देखील बघायला मिळेल. आणि तसं पाहायला गेलं तर जपानमध्ये जी ‘झेन’ संकल्पना आहे त्यालाच भारतात ‘ध्यान’ म्हटले आहे. भगवान बुद्धांनी ‘ध्यान’ हेच बुद्धीतत्व जगाला शिकवले. तर, कायझेनची संकल्पना म्हणजे वर्तमानकाळातील आपल्या निश्चयांच्या दृढतेच्या आणि सदैव प्रगती करत राहण्याच्या आपल्या इच्छाशक्तीचा जागजिवंत पुरावा आहे.
तुमच्यातील अनेकांना हे माहित असेल की ‘कायझेन’चा शब्दशः अर्थ होतो ‘सुधारणा’, मात्र या शब्दाचा गाभार्थ आणखीनच व्यापक आहे. यात केवळ ‘सुधारणा’च नाही तर अविरत सुधारणेच्या संकल्पनेचा जास्त अंतर्भाव आहे.
मित्रांनो,
मी जेंव्हा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली, त्यानंतर काहीकाळाने गुजरातमध्ये कायझेन संदर्भात प्रथमच गांभीर्याने प्रयत्न सुरु झाले. आम्ही कायझेन संकल्पनेचा रीतसर अभ्यास करून घेतला, त्या कल्पनेची अंमलबजावणी केली आणि सन 2004 च्या सुमारास प्रशासकीय प्रशिक्षणादरम्यान पहिल्यांदा कायझेन संकल्पना स्वीकारण्याबाबत खूप आग्रही भुमिका घेण्यात आली. मग नंतरच्या वर्षी, 2005 मध्ये गुजरातच्या नागरी सेवा क्षेत्रातील सर्वोच्च अधिकाऱ्यांचे चिंतन शिबीर घेतले गेले तेंव्हा सर्व उपस्थितांना आम्ही कायझेनचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर आम्ही या संकल्पनेला गुजरातच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, अनेक सरकारी कार्यालयांच्या कामकाजात अंतर्भूत केले. मी मघाशी ज्या अविरत सुधारणेचा उल्लेख केला ती प्रक्रिया देखील अखंडितपणे सुरु राहिली. आम्ही सरकारी कार्यालयांतून ट्रकच्या ट्रक भरून अनावश्यक सामान बाहेर काढून टाकले, कार्यपद्धतींमध्ये सुधारणा केल्या आणि त्यांना आणखीनच सुलभ रूप दिले.
याच प्रकारे, कायझेनपासून स्फूर्ती घेऊन आरोग्य विभागाच्या परिचालनात देखील खूप मोठे मोठे बदल करण्यात आले. रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना देखील कायझेन मॉडेलचे प्रशिक्षण देण्यात आले. आम्ही विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष कार्यशाळा घेतल्या, कार्यपद्धतींमध्ये सुधारणा केल्या, सामान्य नागरिकांना जबाबदाऱ्या देऊन त्यांना यात सहभागी करून घेण्यात आले. सरकारी कारभारावर त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम दिसून आला.
मित्रांनो,
आपणा सर्वांनाच माहित आहे की, समाजाच्या प्रगतीमध्ये प्रशासनाला खूप महत्त्व असते. व्यक्तिगत विकास असो, संस्थेचा विकास असो, समाज किंवा देशाचा विकास असो, या सर्वात प्रशासन हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि म्हणून, मी जेंव्हा गुजरातहून इथे दिल्लीत आलो, तेंव्हा कायझेनच्या वापरातून मिळालेले अनुभव मी माझ्यासोबत घेऊन आलो. आम्ही पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये देखील या संकल्पनेचा वापर सुरु केला. यामुळे, कित्येक प्रणाली आणखी सुलभ झाल्या, कार्यालयातील बहुतेक उपलब्ध जागेचा आम्ही जास्तीजजास्त योग्य उपयोग करून घेतला. आजही केंद्र सरकारच्या अनेक नव्या विभागांमध्ये, संस्थांमध्ये तसेच योजनांमध्ये कायझेन संकल्पनेचा स्वीकार करून वापर केला जात आहे.
मित्रांनो,
जपान देशासोबत व्यक्तिगत पातळीवर माझे किती जवळचे संबंध आहेत हे या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या आमच्या जपानहून आलेल्या पाहुण्यांना चांगलेच माहित आहे. जपानी लोकांचा स्नेह, जपानी लोकांची कार्यशैली, त्यांचे कौशल्य, त्यांचे शिस्तपालन नेहमीच प्रभावशाली असते. आणि म्हणूनच, मी जेंव्हा जेंव्हा म्हणतो की, मला गुजरातमध्ये छोट्या जपानची उभारणी करायची आहे तेंव्हा त्यामागे अशी भावना असते की जपानी लोक गुजरातमध्ये येतील तेंव्हा त्यांना त्यांच्या देशासारखाच उत्साह, तसाच आपलेपणा इथे अनुभवायला मिळावा. मला आठवतंय की व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेच्या सुरुवातीपासूनच, एक भागीदार राष्ट्र म्हणून जपान या कार्यक्रमाशी जोडला गेला. आजच्या घडीला देखील व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेसाठी येणाऱ्या विविध देशांच्या सर्वात मोठ्या प्रतिनिधीमंडळांपैकी एक मंडळ जपान देशाचे असते. जपान सरकारने गुजरातच्या भूमीबद्दल, इथल्या लोकांच्या सामर्थ्याबद्दल दाखविलेला विश्वास पाहून आम्हां सर्वांना अत्यंत समाधान वाटते आहे.
जपानमधल्या एकापेक्षा चांगल्या कंपन्या आज गुजरातमधे काम करत आहेत. त्यांची संख्या 135 पेक्षाही जास्त आहे असं मला सांगण्यात आलं. वाहन उद्योगापासून ते बॅंकिंग पर्यंत, बांधकाम उद्योगापासून ते औषध निर्माण उद्योगापर्यंत, प्रत्येक क्षेत्रातल्या जपानी कंपनीने गुजरातमधे काम उभारलं आहे. सुझूकी मोटर्स असो, होन्डा मोटरसायकल, मित्शुबिशी, टोयोटा, हिताची, अशा अनेक कंपन्या गुजरातमधे उत्पादन घेत आहेत. आणखी एक चांगली बाब म्हणजे या कंपन्या गुजरातमधल्या तरुणांच्या कौशल्य विकासासाठीही सहाय्यभूत ठरत आहे.
गुजरातमधे तीन, जपान-इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मॅन्युफॅक्चरींग संस्था, दरवर्षी शेकडो तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देत आहेत. अनेक कंपन्यांनी गुजरात मधल्या तांत्रिक विद्यापीठं आणि आयटीआय बरोबरही करार केले आहेत.
मित्रांनो,
जपान आणि गुजरातच्या संबंधांबाबत बोलायला इतकं काही आहे की वेळ कमी पडेल. आत्मीयता, स्नेह आणि एकमेकांच्या भावना, गरजा समजून घेताना हे संबंध अधिक मजबूत झाले आहेत. गुजरातने नेहमीच जपानला विशेष महत्व दिलं आहे. जेट्रोने (JETRO) सुरु केलेल्या अहमदाबाद व्यापार सहाय्य केंद्रात एकाचवेळी पांच कंपन्यांना प्लग अँड प्ले वर्क स्पेस फॅसिलीटीची सुविधा दिली आहे. जपानच्या अनेक कंपन्यांनी याचा लाभ घेतला आहे. मी जेंव्हा गतकाळाचा विचार करतो, तेव्हा वाटतं गुजरातच्या लोकांनी किती बारकाईनं छोट्या छोट्या बाबींवर लक्ष दिलं आहे. मला आठवतं मुख्यमंत्री असताना एकदा जपानच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करताना एक अनौपचारिक विषय पुढे आला. हा विषय खूपच रोचक होता. जपानच्या लोकांना गोल्फ खेळणं खूप आवडतं, पण गुजरातमधे गोल्फ कोर्स इतकं प्रचलित नव्हतं. या बैठकीनंतर गुजरातेतही गोल्फ कोर्सेसचा विस्तार व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. मला आनंद आहे की आज गुजरातमधे अनेक गोल्फ कोर्सेस आहेत. जपानी खाद्यपदार्थ हे वैशिष्टय असलेली अनेक रेस्तराँ आहेत. जपानी लोकांना गुजरातमधे अगदी घरासारखं वाटावं असा प्रयत्न सुरु आहे. गुजरातमधे जपानी बोलणाऱ्यांची संख्या वाढावी यावरही आम्ही खूप काम केलं आहे. गुजरातमधल्या व्यावसायिक जगतात जपानी सहजतेने बोलू शकणारे आज अनेक लोक आहेत. राज्यातलं एक विद्यापीठ जपानी शिकवण्यासाठी एक अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचं मला सांगण्यात आलं. ही एक चांगली सुरुवात असेल.
मला तर वाटतं, गुजरातमधे, जपानच्या शालेय शिक्षणाचंही एक मॉडेल बनावं.
आधुनिकता आणि नैतिक मूल्यांवर भर दिला जाणाऱ्या जपानी शालेय शिक्षण व्यवस्थेचा मी प्रशंसक आहे. जपानमधल्या ताईमेई शाळेत जाण्याची संधी मला मिळाली होती. तिथल्या भेटीतले क्षण माझ्यासाठी संस्मरणीय आहेत. त्या शालेय विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद अनमोल संधी होती असंही मला आजही वाटतं.
मित्रांनो,
आपल्याकडे शतकानुशतकं प्राचीन सांस्कृतिक संबंधांचा मजबूत विश्वासही आहे आणि भविष्यासाठीचा समान दृष्टिकोनही! यात आधारावर, गेल्या अनेक वर्षांपासून परस्परांतील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी सातत्यानं दृढ करत आहोत. यासाठी पंतप्रधान कार्यालयात जपान-प्लसची एक विशेष व्यवस्थाही आम्ही केली आहे. जपानचे माजी पंतप्रधान आणि माझे मित्र श्रीमान शिंजो अबे गुजरातमधे आले होते तेंव्हा भारत-जपान नात्याला नव्यानं गती मिळाली. बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरु होणार म्हणून ते खूपच उत्साहित होते. त्यांच्यांशी आजही बोलणं होतं तेंव्हा ते गुजरात दौऱ्याची आठवण काढतातच.
जपानचे वर्तमान पंतप्रधान श्रीमान योशिहिदे सुगाही सरळ आणि परिपक्व व्यक्तीमत्व आहेत. पंतप्रधान सुगा आणि मला विश्वास आहे की, कोविड महामारीच्या या काळात भारत आणि जपानची मैत्री, आमची भागीदारी, जागतिक स्थैर्य तसेच समृद्धीसाठी आणखी अधिक प्रासंगिक ठरली आहे. जागतिक आव्हानं आज आमच्या समोर उभी ठाकली असताना, आमची ही मैत्री, आमचं नातं दिवसेंदिवस अधिक मजबूत व्हावं हीच वेळेची मागणी आहे. कायझेन अकादमी सारखा प्रयत्न याचंच खूप सुंदर प्रतिबिंब आहे. कायझेन अकादमीनं जपानी कार्यसंस्कृतीचा भारतात प्रचार-प्रसार करावा, जपान आणि भारतात व्यापार संबंध वाढावेत अशी माझी इच्छा आहे. या दिशेनं आधीपासूनच सुरु असलेल्या प्रयत्नांना आपल्याला नवी उर्जा द्यायची आहे. उदारहणच द्यायचं झालं तर, गुजरात विद्यापीठ आणि ओसाका इथल्या ओतेमोन गाकुइन विद्यापीठ यांच्यात भारत- जपान विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम. हा कार्यक्रम गेल्या पाच दशकांपासून आपलं नातं भक्कम करत आहे. याचा आणखी विस्तार केला जाऊ शकतो. उभय देश आणि संस्थांमधे याप्रकारची भागीदारी केली जाऊ शकते.
मला विश्वास आहे, आपले हे प्रयत्न याचप्रकारे निरंतरतेनं सुरु राहतील, आणि भारत-जपान मिळून विकासाची नवी शिखरं पार करतील. मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून, जपान, जपानच्या नागरिकांना टोकियो ऑलम्पिकच्या आयोजनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद!