उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पुरुषोत्तम रुपाला जी, अन्य मंत्रीगण, खासदार, आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघाचे अध्यक्ष पी. ब्रजाले जी, आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघाच्या महासंचालक कैरोलिन एमंड जी, इथे उपस्थित अन्य मान्यवर, महिला आणि पुरुष गण,
दुग्धव्यवसाय क्षेत्राशी संबंधित जगभरातील तज्ञ आणि संशोधक या परिषदेसाठी एकत्र आले आहेत, याचा मला आनंद होत आहे. जागतिक डेअरी शिखर परिषदेमध्ये विविध देशांतून आलेल्या सर्व मान्यवरांचे भारतातील कोट्यवधी प्राण्यांच्या वतीने, भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या वतीने, भारत सरकारच्या वतीने मी मनःपूर्वक स्वागत करतो. “दुग्धव्यवसाय क्षेत्राचे खरे सामर्थ्य केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देत नाही तर जगभरातील कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचे देखील प्रमुख साधन आहे. मला विश्वास आहे, ही शिखर परिषद कल्पना, तंत्रज्ञान , कौशल्य आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राशी संबंधित परंपरांच्या बाबतीत एकमेकांचे ज्ञान वाढवण्यात आणि एकमेकांकडून शिकण्यात मोठी भूमिका बजावेल.
मित्रांनो,
भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली असताना आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा देखील योगायोग आहे की आजच्या कार्यक्रमासाठी भारतातील 75 लाखाहून अधिक दूध उत्पादक शेतकरी देखील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अशा प्रकारची शिखर परिषद आणि त्यातही देशाच्या कानाकोपऱ्यातील लाभार्थी आपले शेतकरी बंधू आणि भगिनी असतात. जागतिक डेअरी शिखर परिषदेत माझ्या शेतकरी बांधवांचे मी स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
पशुधन आणि दुधाशी संबंधित व्यवसाय भारताच्या हजारो वर्ष जुन्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत . आपल्या या वारशाने भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्राला काही वैशिष्ट्यांसह सक्षम बनवले आहे. या शिखर परिषदेमध्ये अन्य देशांमधून आलेल्या तज्ज्ञांसमोर मी या वैशिष्ट्यांचा विशेष उल्लेख करू इच्छितो.
मित्रांनो,
जगातील इतर विकसित देशांच्या तुलनेत,भारतात हा व्यवसाय चालवणारा मोठा वर्ग, हे छोटे शेतकरी आहेत. भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्राची ओळख "‘बहु-उत्पादने’ पेक्षाही ‘बहुसंख्यांनी तयार केलेली उत्पादने” अशी आहे." भारतातील दुग्धव्यवसायाशी संबंधित बहुतेक शेतकऱ्यांकडे एक, दोन किंवा तीन गुरे आहेत. या छोट्या शेतकऱ्यांची मेहनत आणि त्यांच्या पशुधनामुळे आज भारत संपूर्ण जगात सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. आज भारतातील 8 कोटींहून अधिक कुटुंबांना हे क्षेत्र रोजगार देते. भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्राचे हे वेगळेपण तुम्हाला अन्यत्र क्वचितच पाहायला मिळेल. आज मी जागतिक डेअरी शिखर परिषदेत याचा उल्लेख यासाठी करत आहे कारण ते जगातील अनेक गरीब देशांतील शेतकऱ्यांसाठी व्यवसायाचे हे एक आदर्श उदाहरण ठरू शकेल .
मित्रांनो,
भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या या वैशिष्ट्याला आणखी एका वेगळेपण लाभले आहे. आपल्या दुग्धव्यवसाय क्षेत्राचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे भारताची दुग्धव्यवसाय सहकार प्रणाली. आज भारतात दुग्धव्यवसाय सहकार क्षेत्राचे जे भव्य जाळे पसरले आहे, ते देखील तुम्हाला इतर कोणत्याही देशांत बघता येणार नाही. दुग्धव्यवसाय सहकारी संस्थेचे लोक, दोन लाखांपेक्षा अधिक गावातील 2 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून दिवसातून दोन वेळा दूध संकलित करतात आणि ते ग्राहकांपर्यंत पोहचवतात. ह्या संपूर्ण प्रक्रियेत कोणीही मध्यस्थ नसतो आणि त्यामुळे ग्राहकांकडून जे पैसे मिळतात, त्यातले 70 टक्क्यांपेक्षा अधिक थेट शेतकऱ्यांच्या खिशात जातात. एवढेच नाही , गुजरात राज्याबद्दल बोलायचे तर हा सर्व पैसा थेट महिलांच्या बँक खात्यात जातो. संपूर्ण जगात इतर कोणत्याही देशात इतके उच्च गुणोत्तर नाही. आता तर भारतात होत असलेल्या डिजिटल क्रांतीमुळे, डेअरी क्षेत्रातील बहुतेक व्यवहार अतिशय वेगाने होऊ लागले आहेत. भारतातील डेअरी सहकार व्यवस्थेचा अभ्यास, त्यांच्याविषयीची माहिती, डेअरी क्षेत्रात विकसित झालेली डिजिटल पेमेंट प्रणाली जगातील अनेक देशांतील शेतकऱ्यांना खूप उपयुक्त ठरू शकते.
म्हणूनच भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राची आणखी एक मोठी ताकद आहे, आणखी एक वेगळेपण आहे , आपल्या देशी जाती. भारतामध्ये गायी, म्हशींच्या ज्या स्थानिक जाती आहेत, त्या अत्यंत कठीण हवामानातही टिकून राहण्यासाठी ओळखल्या जातात. मी तुम्हाला गुजरातच्या बन्नी म्हशीचे उदाहरण देऊ इच्छितो. ही बन्नी म्हैस कच्छच्या वाळवंटात आणि तिथल्या परिस्थितीशी इतकी एकरूप झाली आहे की अनेकदा पाहिल्यावर आश्चर्य वाटते. दिवसा खूप ऊन असते, खूप गरम होते ,कडक ऊन असते. त्यामुळे ही बन्नी म्हैस रात्रीच्या कमी तापमानात चरायला बाहेर पडते.
परदेशातून आलेल्या आमच्या मित्रमैत्रिणींना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, त्यावेळी बन्नी म्हशींबरोबर तिचा कोणीही पालक नसतो, तिचा शेतकरी तिच्यासोबत नसतो, ती स्वतः गावाजवळच्या कुरणात जाते. वाळवंटात पाणी खूप कमी असते, त्यामुळे अगदी कमी पाण्यातही बन्नी म्हैस तग धरते . रात्री 10-10, 15-15 किलोमीटर दूर जाऊन चारा खाल्य्यावर देखील सकाळी स्वतः घरी परत येते. कुणाची बन्नी म्हैस हरवली किंवा चुकून दुसऱ्या घरी गेली असे क्वचितच ऐकायला मिळते. मी तुम्हाला केवळ बन्नी म्हशीचे उदाहरण दिले आहे, मात्र भारतात मुर्राह, मेहसाणा, जाफराबादी, नीली रवि, पंढरपुरी यांसारख्या म्हशीच्या अनेक जाती अजूनही त्यांच्या पद्धतीने विकसित होत आहेत. त्याचप्रमाणे गीर गाय, साहिवाल, राठी, कांकरेज, थारपारकर, हरियाणा अशा किती तरी गायीच्या जाती आहेत, ज्या भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राला एकमेवाद्वितीय बनवतात. भारतीय जातीचे हे बहुतांश प्राणी अनुकूल हवामानात राहतात आणि प्रतिकूल हवामानातही जुळवून घेतात.
मित्रांनो,
आत्तापर्यंत मी तुम्हाला भारतातील डेअरी क्षेत्राची तीन वैशिष्ट्ये सांगितली, जी त्याची ओळख आहे. लहान शेतकऱ्यांची शक्ती, सहकाराची शक्ती आणि भारतीय जातीच्या प्राण्यांची शक्ती मिळून एक वेगळी शक्ती निर्माण होते. मात्र भारताच्या डेअरी क्षेत्राचे एक चौथे वेगळेपण आहे, ज्याची तितकीशी चर्चा होत नाही, ज्याला तितकीशी मान्यता मिळत नाही. परदेशातून आलेल्या आमच्या पाहुण्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्रात 70 % मनुष्यबळाचे प्रतिनिधित्व महिला शक्ती करते. भारताच्या दुग्ध व्यवसायाच्या खऱ्या नेत्या महिला आहेत. एवढेच नाही तर भारतातील दुग्ध सहकारी संस्थांमध्ये एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य महिलाच आहेत. तुम्ही अंदाज बांधू शकता, भारतातील डेअरी क्षेत्र जे साडेआठ लाख कोटी रुपयांचे आहे, ज्याचे मूल्य धान आणि गव्हाच्या एकूण उत्पादनापेक्षा जास्त आहे, त्याची प्रेरक शक्ती , भारताच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला आहेत , आपल्या माता, आपल्या मुली आहेत. मी जागतिक दुग्ध व्यवसाय शिखर परिषदेशी संबंधित सर्व मान्यवरांना भारताच्या स्त्री शक्तीची ही भूमिका ओळखून ती विविध जागतिक व्यासपीठांवर नेण्याचे आवाहन करतो.
2014 नंतर आमच्या सरकारने भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राचे सामर्थ्य वाढवण्यासाठी निरंतर प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम आज दुग्धोत्पादनापासून ते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यामध्येही दिसून येत आहे.
2014 मध्ये भारतात 146 दशलक्ष टन दूध उत्पादन होत असे.आता यात वाढ होऊन ते 210 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले आहे.म्हणजे सुमारे 44 टक्के वाढ. आज जगभरात दूध उत्पादन 2 टक्क्याने वाढत आहे तर भारतात याचा वेग 6 टक्क्यापेक्षाही जास्त आहे.भारतात दुधाची दरडोई उपलब्धता संपूर्ण जगातल्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे.गेल्या 3-4 वर्षात भारतातल्या छोट्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आमच्या सरकारने सुमारे 2 लाख कोटी रुपये थेट हस्तांतरित केले आहेत.यातला मोठा भाग दूध क्षेत्राशी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
मित्रहो,
देशात आज संतुलित दूध परिसंस्था निर्माण करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.एक अशी व्यवस्था ज्यामध्ये आमचे लक्ष दूध आणि त्याच्याशी संबंधित गुणवत्तेवर तर आहेच त्याच बरोबर दुसऱ्या समस्यांच्या निराकरणावरही आहे. शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न,गरिबांचे सबलीकरण, स्वच्छता, रसायन मुक्त शेती, स्वच्छ ऊर्जा,पशुधनाची काळजी या सर्व बाबी परस्परांशी जोडलेल्या आहेत.
म्हणजेच दुध व्यवसाय क्षेत्र, पशुपालनाला भारताच्या गावांमध्ये हरित आणि शाश्वत विकासाचे एक मोठे माध्यम करत आहोत. राष्ट्रीय गोकुल मिशन,गोबरधन योजना, दुध क्षेत्राचे डिजीटायझेशन आणि पशुधनाचे सार्वत्रिक लसीकरणया दिशेने प्रयत्न सुरु आहेत.इतकेच नव्हे तर भारतात एकल वापराचे प्लास्टिक बंद करण्याचे जे अभियान सुरु आहे ते पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे तर आहेच त्याचबरोबर भूत दयेवर ज्यांचा विश्वास आहे, पशुधन, त्यांच्या कल्याणाचा दृष्टीकोन बाळगणाऱ्या व्यक्तींना, प्लास्टिक जनावरांसाठी किती धोकादायक आहे हे माहित आहे. गायी,म्हशींसाठी प्लास्टिक किती नुकसानकारक ठरत आहे. असे एकल वापराचे प्लास्टिक बंद करण्याच्या प्रयत्नांची आम्ही सुरवात केली आहे.
मित्रहो,
भारताच्या दुध क्षेत्राच्या व्यापकतेची विज्ञानासमवेत सांगड घालत त्याचा विस्तार करण्यात येत आहे. दुध क्षेत्रातल्या पशुधनाचा सर्वात मोठा डाटाबेस भारत तयार करत आहे.या क्षेत्रातल्या प्रत्येक जनावराचे टॅगिंग करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जनावरांची बायोमेट्रिक ओळख ठेवण्यात येत आहे. त्याला पशु आधार असे नाव देण्यात आले आहे. पशु आधाराच्या द्वारे पशूंची डिजिटल ओळख ठेवण्यात येत आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याबरोबरच दुध उत्पादनाशी निगडीत बाजारपेठ विस्तारण्यासाठीही मदत होणार आहे.
मित्रहो,
पशुपालन क्षेत्रात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यावर भारताने मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे.दुध क्षेत्राशी संबंधित छोट्या शेतकऱ्यांची ताकद, शेतकरी उत्पादक संघटना आणि महिला स्वयं सहाय्यता गटांच्या माध्यमातून आम्ही एकत्र आणत आहोत. युवा प्रतिभेचा उपयोग कृषी आणि दुध क्षेत्रात स्टार्ट अप्स निर्माण करण्यासाठीही आम्ही करत आहोत. भारतात गेल्या 5- 6 वर्षात कृषी आणि दुध क्षेत्रात 1 हजाराहून अधिक स्टार्ट अप्स निर्माण झाले आहेत हे ऐकून आपल्याला आनंद होईल.
मित्रहो,
भारताच्या अनोख्या प्रयत्नांचे एक उदाहरण म्हणजे गोबरधन योजना आहे.आपले रुपालाजी यांनी अर्थव्यवस्थेत शेणाच्या वाढत्या महत्वाबाबत सांगितले.आज भारतात शेणापासून बायोगॅस आणि जैव-सीएनजीनिर्मितीचे मोठे अभियान सुरु आहे. दूध सयंत्रानी आपल्या गरजेपैकी बरीचशी वीज शेणाद्वारे पूर्ण करावी, असा आमचा प्रयत्न आहे. यातून शेतकऱ्यांना शेणाचा पैसा मिळण्याचा मार्गही तयार झाला आहे. या प्रक्रियेत जे सेंद्रिय खत तयार होते,त्यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी एक स्वस्त माध्यम मिळेल.यामुळे शेतीचा खर्च ही कमी होईल आणि मृदा संरक्षणही साध्य होईल. भारतात आज नैसर्गिक शेतीवर अभूतपूर्व भर दिला जात आहे ज्यामध्ये पशूंची भूमिका मोठी आहे.
मित्रहो,
शेतीमध्ये एकच पिक सातत्याने घेण्याऐवजी पिक वैविध्य अतिशय आवश्यक आहे असे मी नेहमीच सांगत आलो आहे. पशुपालनालाही हे तत्व लागू होते. म्हणूनच भारतात आज देशी आणि संकर अशा दोन्ही प्रजातींवर लक्ष दिले जात आहे. हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीचा धोका यामुळे कमी होऊ शकतो.
मित्रहो,
जनावरांना होणारे रोग हे मोठ्या संकटांपैकी एक आहे. पशुला आजार झाला तर त्याचा परिणाम शेतकऱ्यावर होतो, त्याच्या मिळकतीवर होतो. पशुंची क्षमता,दुध आणि त्याच्याशी संबंधित इतर उत्पादनांच्या गुणवत्तेवरही त्याचा परिणाम होतो.म्हणूनच भारतात जनावरांच्या सार्वत्रिक लसीकरणावर आम्ही भर देत आहोत. 2025 पर्यंत शंभर टक्के पशूना लाळ्या खुरकत आणि ब्रुसलॉसिस प्रतिबंधक लस देण्याचा आमचा निर्धार आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत या रोगांपासून संपूर्ण मुक्ततेचे उद्दिष्ट घेऊन आमची वाटचाल सुरु आहे.
मित्रहो,
आज आपल्याशी चर्चा करताना दुध क्षेत्रासमोर नुकत्याच आलेल्या समस्येबाबत मी बोलू इच्छितो.भारतातल्या अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात लंपी या रोगामुळे पशुधनाचे नुकसान झाले आहे. विविध राज्यसरकारांशी समन्वय राखत तो नियंत्रणात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहेत. लंपी रोगावर आपल्या संशोधकांनी स्वदेशी लसही तयार केली आहे. लसीकरणा बरोबरच पशु तपासणीला वेग,त्यांची ये-जा यावर नियंत्रण राखून या रोगाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मित्रहो,
पशुंचे लसीकरण असो किंवा दुसरे तंत्रज्ञान,जगभरातल्या दुध क्षेत्रात योगदान देण्यासाठी आणि सर्व सहकारी देशांकडून नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी भारत नेहमीच तत्पर राहिला आहे. भारताने आपल्या अन्न सुरक्षा मानकांवरही अतिशय वेगाने काम केले आहे. पशुधन क्षेत्रासाठी भारत आज अशा प्रकल्पावर काम करत आहे, जो या क्षेत्रातल्या संपूर्ण घडामोडींची दखल ठेवेल. यातून या क्षेत्रातल्या सुधारणांसाठी आवश्यक माहिती प्राप्त होईल. अशा अनेक तंत्रज्ञानाबाबत जगभरात जे कार्य होत आहे ते या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्यात येईल. याच्याशी संबंधित तज्ञ सल्ला आपण कसा सामायिक करू शकतो याचे मार्ग सुचवेल. भारतातला दुध उद्योग बळकट उद्योगाच्या जागतिक धुरिणांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी करतो. उत्तम काम आणि योगदान यासाठी मी आंतरराष्ट्रीय दुध महासंघाचीही प्रशंसा करतो. आपणा सर्वांचे, परदेशातून आलेल्या अतिथींचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो त्यांचे अभिनंदन करतो. प्रदीर्घ काळानंतर साधारणपणे 5 दशकानंतर भारतात आपणा सर्वांचे स्वागत करण्याची संधी प्राप्त झाली, आपणा सर्वांसमवेत विचार विनिमय करण्याची संधी मिळाली आहे.या विचारमंथनातून जे अमृत प्राप्त होईल, ते आमच्या देशाच्या अमृतकाळात देशाच्या ग्रामीण भागातले अर्थकारण विकसित करण्यात, देशाच्या पशुधनाचे सामर्थ्य अधिक बळकट करण्यात आणि देशामधल्या गरीबातल्या गरिबाचे सबलीकरण करण्यातही मोठे योगदान देईल या अपेक्षा आणि आशेसह आपणा सर्वांचे खूप-खूप आभार.
खूप-खूप शुभेच्छा. धन्यवाद.