नमस्कार!
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माझे सहकारी, आपले युवा मित्र, खासदार हरीश द्विवेदी, विविध खेळांचे खेळाडू, राज्य सरकारचे मंत्रीगण, आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी, सर्व ज्येष्ठ, सन्माननीय व्यक्ती, आणि मी बघत आहे, सगळीकडे मोठ्या संख्येने जमलेला युवा समुदाय. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आपली बस्ती, ही महर्षी वसिष्ठ यांची पवित्र भूमी आहे, श्रम आणि साधना, तपश्चर्या आणि त्यागाची भूमी आहे. आणि एका खेळाडूसाठी त्याचा खेळही एक साधनाच आहे, एक तपश्चर्या आहे आणि ज्यामध्ये तो स्वतः तप करत असतो. आणि यशस्वी खेळाडूचं लक्ष देखील नेमक्या ठिकाणी केंद्रित असतं, आणि तेव्हाच तो प्रत्येक नवीन टप्प्यावर विजयश्री मिळवून यश संपादन करत पुढे जात असतो. आपले खासदार बंधू हरीश द्विवेदी यांच्या परिश्रमांनी बस्तीमध्ये एवढा मोठा खेल महाकुंभ आयोजित होत आहे, याचा मला आनंद आहे. या खेल महाकुंभमुळे भारतीय खेळांमध्ये पारंपरिक-पारंगत असलेल्या स्थानिक खेळाडूंना नवी संधी मिळणार आहे. मला सांगण्यात आलं आहे की भारतातल्या सुमारे 200 खासदारांनी आपापल्या ठिकाणी अशाच प्रकारच्या एमपी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत, ज्यामध्ये हजारो तरुणांनी भाग घेतला आहे. मीही एक खासदार आहे, काशीचा खासदार आहे. त्यामुळे माझ्या काशी या लोकसभा मतदारसंघातही अशा क्रीडा स्पर्धांची मालिका सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी असे खेल महाकुंभ आयोजित करून आणि खासदार क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून सर्व खासदार नव्या पिढीचं भविष्य घडवण्याचं काम करत आहेत. खासदार खेल महाकुंभमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रांमधील पुढील प्रशिक्षणासाठी निवडही करण्यात येत आहे. देशाच्या युवा शक्तीला याचा मोठा लाभ मिळेल. या ‘महाकुंभ’मधेच 40 हजारांपेक्षा जास्त युवा सहभागी होत आहेत. आणि मला असं सांगण्यात आलं आहे की, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या तीन पट जास्त आहे. मी आपल्या सर्वांना, माझ्या सर्व युवा मित्रांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आत्ताच मला खो-खो चा खेळ बघण्याची संधी मिळाली. आपल्या कन्या किती हुशारीने आणि आपल्या संघाबरोबर सांघिक भावनेने खेळत होत्या. खरोखरच, खेळ पाहून खूप आनंद वाटत होता. मला माहीत नाही, माझ्या टाळ्या तुम्हाला ऐकू येत होत्या की नाही, पण एक चांगला खेळ खेळल्याबद्दल आणि मलाही खो-खो च्या खेळाचा आनंद घ्यायची संधी दिल्याबद्दल मी या सर्व कन्यांचं अभिनंदन करतो.
मित्रांनो,
सांसद खेल महाकुंभचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. यामध्ये आपल्या कन्या मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. आणि मला विश्वास आहे, की बस्ती, पूर्वांचल, उत्तरप्रदेश, संपूर्ण देशाच्या कन्या अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपलं कर्तृत्व सिध्द करतील. काही दिवसांपूर्वीच, आपल्या देशाची कर्णधार शेफाली वर्माने महिलांच्या अंडर-19, टी-20 विश्वचषक स्पर्धेत किती दिमाखदार कामगिरी केली, हे आपण पाहिलं आहे. कन्या शेफालीने सलग पाच चेंडूंत पाच चौकार मारले आणि त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत एकाच षटकात 26 धावा केल्या. अशी किती तरी प्रतिभा देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. या क्रीडा प्रतिभांचा शोध घेऊन त्यांना जोपासण्यामध्ये अशा प्रकारच्या सांसद खेल महाकुंभची मोठी भूमिका आहे.
मित्रांनो,
एक काळ होता, जेव्हा खेळ हा अवांतर उपक्रम म्हणून गणला जायचा, म्हणजेच त्याला अभ्यासाव्यतिरिक्त केवळ वेळ घालवण्याचे साधन म्हणून समजलं जायचं. मुलांनाही हेच सांगितलं आणि शिकवलं गेलं. त्यामुळे पिढ्यानपिढ्या समाजात अशी मानसिकता रुजवली गेली, की खेळ हे तितकेसे महत्त्वाचे नाहीत, ते जीवनाचा आणि भविष्याचा भाग नाहीत. या मानसिकतेमुळे देशाचं मोठं नुकसान झालं. किती कर्तृत्ववान युवा, किती प्रतिभा या क्षेत्रापासून दूर राहिली. गेल्या 8-9 वर्षांत देशाने ही जुनी विचारसरणी मागे टाकून खेळांसाठी चांगलं वातावरण निर्माण करण्याचं काम केलं आहे. त्यामुळेच आता अधिकाधिक मुलं आणि आपले युवा खेळाकडे करिअरचा पर्याय म्हणून पाहत आहेत. सुदृढतेपासून ते आरोग्यापर्यंत, सांघिक बंधापासून ते तणाव दूर करण्याच्या साधनांपर्यंत, व्यावसायिक यशापासून ते वैयक्तिक सुधारणेपर्यंत, असे खेळाचे वेगवेगळे फायदे लोकांना दिसू लागले आहेत. आणि पालकही आता खेळाला गांभीर्याने घेत आहेत ही आनंदाची बाब आहे. हा बदल आपल्या समाजासाठी तसंच खेळासाठीही चांगला आहे. खेळांना आता सामाजिक प्रतिष्ठा मिळू लागली आहे.
आणि मित्रांनो,
लोकांच्या विचारसरणीत झालेल्या या बदलाचा थेट फायदा क्रीडा क्षेत्रात देशाच्या उंचावलेल्या कामगिरीमधून दिसून येत आहे. आज भारत सातत्याने नवनवीन विक्रम रचत आहे. ऑलिम्पिकमध्ये आपण आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पॅरालिम्पिकमधेही आपण आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचं प्रदर्शन केलं.
वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमधली भारताची कामगिरी आता चर्चेचा विषय ठरली आहे. मित्रहो, माझ्या युवा मित्रांनो,ही तर केवळ सुरवात आहे. आपल्याला अजून बरच पल्ला गाठायचा आहे, नवी उद्दिष्टे साध्य करायची आहेत. नवे विक्रम घडवायचे आहेत.
मित्रहो,
क्रीडाप्रकार म्हणजे एक कौशल्य आहे आणि हा एक स्वभावही आहे. खेळ म्हणजे प्रतिभा आहे आणि हा एक संकल्पही आहे.खेळांच्या विकासात प्रशिक्षणाचे महत्व आहे त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा,सामने सातत्याने सुरु राहणेही आवश्यक आहे. यामुळे खेळाडूना आपले प्रशिक्षण सातत्याने जोखण्याची संधी मिळते.वेगवेगळ्या भागात, विविध स्तरांवर होणाऱ्या क्रीडा स्पर्धा खेळाडूंसाठी अतिशय उपयुक्त ठरतात.यातून खेळाडूंना आपले सामर्थ्य उमगते आणि आपले स्वतःचे तंत्र ते विकसित करू शकतात.आपल्या शिष्याला आपण जे ज्ञान दिले आहे त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या आहेत, कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, समोरच्या खेळाडूचे कोणत्या बाबींमध्ये पारडे जड आहे हे प्रशिक्षकाच्याही लक्षात येते. म्हणूनच संसद महाकुंभ ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धापर्यंत क्रीडापटूंना जास्तीत जास्त संधी दिली जात आहे. म्हणूनच आज देशात जास्तीत जास्त युवा क्रीडा स्पर्धा होत आहेत, विद्यापीठ स्पर्धा, हिवाळी क्रीडा स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांमध्ये दर वर्षी हजारो क्रीडापटू सहभागी होत आहेत. खेलो इंडिया अभियाना अंतर्गत आमचे सरकार खेळाडूंना आर्थिक सहाय्यही पुरवत आहे. देशात सध्या 2500 पेक्षा जास्त खेळाडूंना खेलो इंडिया अभियानाअंतर्गत दर महा 50 हजार रुपयांपेक्षा जास्त सहाय्य पुरवले जात आहे. ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम स्कीम – टॉप्स मुळेही मोठी मदत होत आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला सुमारे 500 खेळाडूंना आर्थिक मदत दिली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही खेळाडूंची गरज लक्षात घेऊन अडीच कोटी ते 7 कोटी रुपयांपर्यंत सहाय्य देण्यात आले आहे.
मित्रहो,
आजचा नव भारत, क्रीडा क्षेत्रातल्या प्रत्येक आव्हानाचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.खेळाडूंकडे पुरेशी संसाधने असावीत, प्रशिक्षण असावे,तांत्रिक ज्ञान असावे,आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना संधी मिळावी,त्यांच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता असावी या सर्व बाबींवर भर दिला जात आहे. आज बस्ती आणि अशाच दुसऱ्या जिल्ह्यात क्रीडा विषयक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत, स्टेडियम बांधण्यात येत आहेत, प्रशिक्षणाची व्यवस्था केली जात आहे. देशभरात एक हजार पेक्षा जास्त खेलो इंडिया जिल्हा केंद्र उभारण्यात येत आहेत. यापैकी 750 पेक्षा जास्त केंद्रे तयार आहेत.देशभरातल्या सर्व मैदानांचे जिओ- टॅगिंग करण्यात येत आहे ज्यामुळे खेळाडूंना प्रशिक्षण मिळण्यासाठी अडचण येऊ नये.
सरकारने ईशान्येकडच्या युवकांसाठी मणिपूर मध्ये क्रीडा विद्यापीठ उभारले आहे आणि उत्तर प्रदेशातल्या मेरठ मध्येही क्रीडा विद्यापीठ बांधण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात अनेक नवे स्टेडियम तयार झाले आहेत अशी माहिती मला देण्यात आली आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर प्रदेशात अनेक जिल्ह्यात क्रीडा वसतिगृहेही चालवण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या सुविधा आता स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. माझ्या युवा मित्रांनो,आपल्याकडे अपार संधी आहेत.आपल्याला विजयाचा झेंडा फडकवायचा आहे. देशाचे नाव उज्वल करायचे आहे.
मित्रहो,
प्रत्येक खेळाडू तंदुरुस्त राहण्याचे महत्त्व जाणतो आणि यामध्ये फिट इंडिया उपक्रमाची भूमिका मोठी राहिली आहे. तंदुरुस्तीवर लक्ष देण्यासाठी आपण सर्वांनी एक काम नक्की करा. आपल्या जीवनशैलीत योगाभ्यासाचा नक्की समावेश करा. योगामुळे आपले शरीर तंदुरुस्त तर राहिलच आणि मनही जागृत राहील. त्याचा लाभ आपल्याला, आपल्या खेळाला नक्कीच होईल.अशाच प्रकारे प्रत्येक क्रीडापटूला पौष्टिक आहारही तितकाच आवश्यक असतो.यामध्ये आपली भरड धान्ये आहेत, साधारणपणे आपल्या गावागावात प्रत्येक घरात यांचा आहारात वापर केला जातो. या भरड धान्यांची भोजनात अतिशय मोठी भूमिका आहे. भारताच्या शिफारसीवरून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आपल्या आहारात भरड धान्यांचा समावेश केल्यास त्याचाही आपले आरोग्य राखण्यासाठी उपयोग होईल.
मित्रहो,
आपले सर्व युवक खेळांमधून, मैदानातून बरेच काही शिकतील,जीवनातही बोध घेतील खेळाच्या मैदानातली आपली ही उर्जा विस्तारत जाऊन देशाची उर्जा बनेल.हरीश जी यांचे मी अभिनंदन करतो. ते अतिशय निष्ठेने हे कार्य करत आहेत.या कार्यक्रमासाठी मागच्या वेळी संसदेत येऊन त्यांनी मला निमंत्रण दिले होते. बस्ती इथल्या युवकांसाठी अखंड काम करण्याच्या त्यांच्या स्वभावाचे क्रीडांगणावरही दर्शन घडत आहे.
आपणा सर्वाना मी अनेक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद !