व्यासपीठावर उपस्थित ओदिशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनायक महोदय, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री धर्मेंद्र प्रधान, श्री किरण रिजीजू, ओदिशा सरकारमधील मंत्री श्री. अरुण कुमार साहू, श्री तुषारकांती बेहेरा आणि देशभरातून आलेल्या माझ्या युवा मित्रांनो, मी तुमच्याशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपर्क साधत आहे, पण तिथे जे वातावरण आहे, उत्साह आहे, खेळाविषयीची जी ओढ आहे, उर्जा आहे, त्याची मी कल्पना करू शकतो.
आज ओदिशामध्ये नवा इतिहास घडला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांची आजपासून सुरुवात होत आहे.
भारताच्या क्रीडा इतिहासातील हा एक ऐतिहासिक टप्पा तर आहेच, पण भारताच्या क्रीडा क्षेत्राच्या भवितव्यासाठी देखील हे एक मोठे पाऊल आहे.
आज भारत जगातील त्या देशांच्या समुदायामध्ये सहभागी झाला आहे, ज्या देशांमध्ये विद्यापीठ स्तरावर अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
ओदिशाची जनता आणि येथील सरकारला या सर्व आयोजनासाठी आणि देशभरातून आलेल्या तीन हजारपेक्षा जास्त युवा खेळाडूंना या स्पर्धांसाठी खूप-खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
मित्रांनो,
आगामी काळात तुमच्या समोर दोनशेपेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकण्याचे उद्दिष्ट तर आहेच, त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्या कामगिरीत सुधारणा करणे आणि आपल्या स्वतःच्या सामर्थ्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाणे.
भुवनेश्वरमध्ये तुम्ही एकमेकांशी स्पर्धा तर करत आहातच, पण तुमची स्वतःशी देखील स्पर्धा सुरू आहे.
लक्षात ठेवा,
भुवनेश्वरमध्ये तुम्ही केलेले कष्ट, तुमच्या स्वप्नांना, तुमच्या कुटुंबियांच्या स्वप्नांना साकार करणार आहेत.
तुमच्या समोर या स्पर्धांची मशालवाहक असलेली दुती चंदसारखी अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. तुम्ही पदके देखील जिंकण्याच्या आणि देशाला तंदुरुस्तीसाठी प्रेरित करण्याच्या भावनेने मैदानात उतरायचे आहे.
मित्रांनो,
आजचा हा दिवस केवळ एका स्पर्धेचा प्रारंभ नसून भारताच्या क्रीडा क्रांतीच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात खेळांविषयी आकर्षण निर्माण करण्यामध्ये आणि युवा गुणवत्तेची निवड करण्यामध्ये खेलो इंडिया अभियानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या या देशव्यापी अभियानाला आणखी एक स्तर वर नेत विद्यापीठाच्या पातळीवर या स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत.
खेलो इंडिया अभियानामुळे देशात कोणत्या प्रकारचे परिवर्तन होत आहे ते गेल्या महिन्यात गुवाहाटीमध्ये पाहायला मिळाले होते.
मित्रांनो,
2018 मध्ये जेव्हा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाली होती तेव्हा केवळ 3500 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. पण केवळ तीन वर्षांत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या 6000 पेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ दुप्पट झाली आहे.
केवळ खेळाडूंच्या संख्येतच वाढ होत नसून, खेळाडू आणि खेळाचा दर्जा, पायाभूत सुविधांचा दर्जा यात सातत्याने सुधारणा होत आहे. या वर्षी खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये 80 विक्रम मोडीत निघाले. त्यापैकी 56 विक्रम तर निव्वळ आपल्या कन्यांच्या नावावर होते.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या अभियानाच्या माध्यमातून जी गुणवत्ता उदयाला येत आहे ती गुणवत्ता लहान गावांमधली आहे, लहान शहरांमधली आहे, गरीब घरांमधली आहे, तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणीच्या शहरांमधली आहे.
ही जी गुणवत्ता आहे ती एकेकाळी संसाधनांच्या कमतरतेमुळे, त्यांना योग्य वाव मिळत नसल्याने जगासमोर येत नव्हती.
आता या गुणवत्तेला संसाधने देखील उपलब्ध होऊ लागली आहेत आणि अतिशय कमी वयात राष्ट्रीय पातळीवर वाव देखील मिळू लागला आहे.
मित्रांनो,
गेल्या पाच-सहा वर्षात भारतात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यातला सहभाग वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत. गुणवत्तेची ओळख असो,प्रशिक्षण असो किंवा मग निवड प्रक्रिया असो, प्रत्येक बाबतीत पारदर्शकतेला प्रोत्साहन दिले जात आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधल्या भारताच्या कामगिरीतूनही दिसत आहे.
खेलो इंडिया अभियान तर युवा गुणवत्ता ओळखण्याचे एक मोठे माध्यम बनले आहे.यात निवड झालेल्या खेळाडूंना दरवर्षी सुमारे सव्वा सहा लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. याशिवाय त्यांना देशातल्या 100हून जास्त अकादमींमध्ये प्रशिक्षण देण्यात येते.
आतापर्यंत अशा प्रकारच्या सुमारे तीन हजार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. अलीकडेच खेलो इंडिया ऍप देखील सुरू करण्यात आला आहे.
अशाच प्रकारे ऑलिंपिक पोडियम योजने अंतर्गत देशातील प्रतिभावंत खेळाडूंना उच्च स्तराच्या स्पर्धांसाठी सज्ज करण्यात येत आहे. याच योजनेंतर्गत आता देशातील आघाडीच्या 100 ऍथलीट्सना मदत देण्यात येत आहे.
मित्रांनो,
हे ते खेळाडू आहेत जे टोकियो ऑलिंपिकच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियायी क्रीडा स्पर्धा, आशियायी पॅरा स्पर्धा, यूथ ऑलिंपिक्स सारख्या स्पर्धांमध्ये देशाला 200हून जास्त पदके मिळवून दिली आहेत. इतकेच नाही तर विशेष गुणवत्ताप्राप्त खेळाडूंसाठी हयातभर निवृत्तीवेतनाची तरतूद देखील करण्यात आली आहे.
मित्रांनो,
खेळाडूंनी आपले लक्ष केवळ सर्वोत्तम कामगिरी करण्यावर केंद्रित करावे, बाकी इतर गोष्टींची काळजी देश घेत आहे. यामध्ये हेतू हा आहे की शिक्षणाबरोबरच खेळामध्येही प्रगती होत राहील आणि शारीरिक तंदुरुस्ती देखील वाढेल. आपला तरुण क्रीडापटू प्रत्येक प्रकारच्या करियरसाठी तंदुरुस्त राहावा, यासाठी राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासारख्या संस्था स्थापन केल्या जात आहेत.
मित्रांनो,
देशातील युवकांची तंदुरुस्ती असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा दबदबा निर्माण करण्याचे उद्दिष्ट असो, या सर्वांसाठी आपल्याला पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करायचे आहेत.
आता मी पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणा करत आहे.
तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा
श्रीयुत नवीन पटनायक यांचा, ओदिशा सरकारचा मी आभारी आहे. इतक्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे अभिनंदन करतो आणि जय जगन्नाथ करत, जगन्नाथाच्या आशीर्वादाने आपण जग जिंकण्यासाठी वाटचाल सुरू करा, या माझ्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आहेत.
खूप खूप धन्यवाद!