ओम शांती!
आदरणीय राजयोगिनी दादी रतन मोहिनी जी, ब्रह्माकुमारीचे सर्व ज्येष्ठ सदस्य, आणि या कार्यक्रमासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!
हे माझे सौभाग्य आहे, मला अनेकदा आपल्याला भेटण्याची संधी मिळते. मी जेव्हा जेव्हा इथे येतो, आपल्यामध्ये येतो, तेव्हा तेव्हा नेहमी मला एक आध्यात्मिक अनुभूती होते. आणि गेल्या काही महिन्यांत असं दुसऱ्यांदा होत आहे, की मला ब्रह्माकुमारीजच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या पूर्वी, आत्ता फेब्रुवारी महिन्यातच आपण मला 'जल जीवन अभियानाचे' उद्घाटन करण्यास आमंत्रित केले होते. मी तेव्हा माझा आणि ब्रह्माकुमारीज संस्थेचा कसा सातत्यपूर्ण स्नेह आहे यावर विस्ताराने बोललो आहे. याच्यामागे परमपिता परमात्म्याचा आशीर्वाद देखील आहे आणि राजयोगिनी दादीजींनी दिलेलं प्रेम देखील आहे. आज इथे सुपर स्पेशालिटी धर्मदाय ग्लोबल हॉस्पिटलचे भूमिपूजन झाले आहे. आज शिवमणी होम्स आणि नर्सिंग महाविद्यालयाच्या विस्तारीकरण देखील सुरू झाले आहे. मी या सर्व कामांसाठी ब्रह्माकुमारीज संस्था आणि याच्या सर्व सदस्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात भारताच्या सर्व सामाजिक आणि धार्मिक संस्थांची फार मोठी भूमिका आहे. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ, देशाच्या प्रत्येक नागरिकाचा कर्तव्य काल काळ आहे. या कर्तव्य काळाचा अर्थ असा आहे - आपण ज्या भूमिकेत आहोत, ती शंभर टक्के निभावणे! आणि त्या सोबतच समाज हितासाठी, देश हितासाठी आपले विचार आणि जबाबदाऱ्या यांचा विस्तार! म्हणजे आपण जे करत आहोत, ते पूर्ण निष्ठेने करत असताना हा देखील विचार करायचा आहे की आपण देशासाठी आणखी काय अधिकचे करू शकतो?
आपण सर्व या कर्तव्य काळात प्रेरणापुंज आहात. ब्रह्माकुमारीज संस्था एक अध्यात्मिक संस्था म्हणून समाजात नैतिक मूल्ये सुदृढ करण्यासाठी काम करत आहे. मात्र त्यासोबतच, आपण समाजसेवेपासून तर विज्ञान, शिक्षणाला प्रोत्साहन देणे, समज जागृती करण्यात देखील पूर्णपणे समर्पित आहात.
माउंट अबू मध्ये आपले ग्लोबल हॉस्पिटल संशोधन केंद्र खरोखरच याचे एक फार मोठे उदाहरण आहे. आणि मला सांगण्यात आले आहे, या संस्थेच्या माध्यमातून इथल्या जवळपासच्या गावांत आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात, रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. आता ज्या सुपर स्पेशालिटी ग्लोबल धर्मार्थ दवाखान्याचा संकल्प आपण केला आहे, त्यामुळे देखील या भागात आरोग्य सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात मदत मिळेल. या अतिशय मानवीय प्रयत्नांसाठी आपले अभिनंदन करायला हवे.
मित्रांनो,
आज आपला संपूर्ण देश आरोग्य सेवांच्या परिवर्तनाच्या काळातून जात आहे. गेल्या 9 वर्षात पहिल्यांदाच देशातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला देखील कळून चुकले आहे, की देशातली रुग्णालये आता त्यांच्यासाठी सहजतेने उपलब्ध आहेत. आणि यात आयुष्यमान भारत योजनेची मोठी भूमिका आहे. आयुष्यमान भारत योजनेत सरकारीच नव्हे तर खाजगी रुग्णालयांचे दरवाजे देखील गरिबांसाठी उघडले गेले आहेत.
आता एखाद्या कुटुंबात वयोवृध्द व्यक्ती असेल, कोणी मधुमेही रुग्ण असेल तर त्यांच्या औषधांसाठी जो खर्च होतो तो अनेकदा 1200,1500 किंवा 2000 रुपयापर्यंतही होऊ शकतो. मात्र जर जन औषधी केंद्रातून औषधे घेतली तर हा खर्च 100 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप मोठी मदत होऊ शकेल. म्हणूनच, ही माहिती आपण दूर दूरपर्यंत पोहचवली पाहिजे.
मित्रांनो,
आपण सर्व इतक्या वर्षांपासून आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहात. त्यामुळे आपल्याला नीटच माहिती आहे की डॉक्टर , नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचारी यांची संख्या कमी असणे ही देखील आरोग्य क्षेत्रासमोरील एक मोठी समस्या आहे. गेल्या नऊ वर्षात ही कमतरता दूर करण्यासाठी देशभरात अभूतपूर्व काम करण्यात आले आहे. गेल्या नऊ वर्षात सरासरी दर महिना एक नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. 2014 च्या आधीच्या दहा वर्षात तर दीडशे पेक्षा कमी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली होती.
आपल्याला देखील माहीत आहे की या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत उपचारांचा खर्च सरकार करते. या योजनेचा लाभ देशातल्या 4 कोटी पेक्षा जास्त गरिबांना झाला आहे. जर आयुष्यमान भारत योजना नसती, तर याच उपचारांसाठी त्यांना 80 हजार कोटी रुपये त्यांच्या खिशातून खर्च करावे लागले असते. याच प्रमाणे जन औषधी केंद्रांवर मिळणाऱ्या स्वस्त औषधांमुळे देखील गरीब आणि मध्यमवर्गाची 20 हजार कोटी रुपयांची बचत होईल.
आणि मी आपल्या ब्रह्माकुमारीज संस्थेच्या जितक्या शाखा देशाच्या गावोगावी आहेत, जर आपण लोकांना ही माहिती दिली की सरकारतर्फे अशी जन औषधी केंद्रे चालवली जातात, उत्तम दर्जाची औषधे असतात, मात्र बाहेर ज्या औषधांना 100 रुपये खर्च होतात, तीच औषधे इथे 10-15 रुपयांत मिळतात. आपल्याला कल्पना येऊ शकते, गरिबांची किती सेवा होत आहे, तर आपल्या सर्व शाखा, आपल्या सर्व ब्रह्माकुमार असोत अथवा ब्रह्माकुमारी असोत, त्यांनी लोकांमध्ये जागरूकता आणावी आणि देशात ठिकठिकाणी ही जन औषधी केंद्रे बनली आहेत. आपल्या संपर्कात आलेले लोक आपल्याला नेहमी आशीर्वाद देतील.
गेल्या 9 वर्षांत देशात 300 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. 2014 पूर्वी आपल्या संपूर्ण देशात एमबीबीएसच्या सुमारे 50 हजार जागा होत्या. 50 हजार विद्यार्थ्यांसाठी जागा होत्या. आज देशात एमबीबीएसच्या जागा एक लाखांहून अधिक झाल्या आहेत. 2014 पूर्वी, पीजी म्हणजेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या केवळ 30 हजार जागा होत्या. आता पीजीच्या जागांची संख्याही वाढून 65 हजारांहून अधिक झाली आहे. जेव्हा हेतू चांगला असतो, समाजसेवेची भावना असते, तेव्हा असे संकल्प केले जातात आणि आणि ते संकल्प पूर्णही केले जातात .
मित्रांनो,
भारत सरकार आज आरोग्य क्षेत्रात जे प्रयत्न करत आहे, त्याचा आणखी एक मोठा प्रभाव येत्या काळात दिसून येईल.स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकात देशात जितके डॉक्टर बनले, तितकेच डॉक्टर येत्या दशकात बनतील आणि आमचे लक्ष केवळ वैद्यकीय महाविद्यालये किंवा डॉक्टरांपुरते मर्यादित नाही. आजच येथे परिचर्या महाविद्यालयाच्या विस्ताराचे काम सुरू झाले आहे.भारत सरकारही परिचर्या क्षेत्रात तरुणांना नवीन संधी देत आहे. अलीकडेच, सरकारने देशात 150 हून अधिक नवीन परिचर्या महाविद्यालयांना मान्यता दिली आहे.या अभियाना अंतर्गत राजस्थानमध्ये 20 हून अधिक नवीन परिचर्या महाविद्यालये बांधली जातील. याचा फायदा तुमच्या सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल रुग्णालयालाही नक्कीच होणार आहे.
मित्रांनो,
भारतात हजारो वर्षांपासून, आपल्या अध्यात्मिक आणि धार्मिक संस्थांनी शिक्षणापासून ते समाजातील गरीब आणि असहाय्य लोकांची सेवा करण्यापर्यंत सर्व गोष्टींची जबाबदारी घेतली आहे. गुजरातच्या भूकंपाच्या काळापासून आणि त्याआधीपासूनच तुमची निष्ठा आणि आपल्या भगिनींच्या मेहनतीचा मी स्वतः साक्षीदार आहे.तुमची काम करण्याची पद्धत खूप जवळून पाहिली आहे. मला आठवते की, कच्छच्या भूकंपाच्या संकटाच्या वेळी तुम्ही ज्या सेवाभावाने काम केले ते आजही प्रेरणादायी आहे.
त्याचप्रमाणे तुमच्या व्यसनमुक्तीसाठीच्या मोहिमा असोत, ब्रह्माकुमारीचे पर्यावरण रक्षणाच्या दिशेने केलेले प्रयत्न असोत किंवा जल-जन अभियान सारखी अभियाने असोत एखादी संस्था प्रत्येक क्षेत्रात लोकचळवळ कशी निर्माण करू शकते हे ब्रह्माकुमारीने दाखवून दिले आहे. विशेषत: मी जेव्हा-जेव्हा तुमच्यामध्ये आलो, तेव्हा देशासाठी मी तुमच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात तुम्ही कोणतीही कसर सोडली नाही.
ज्या प्रकारे तुम्ही देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासंबंधी कार्यक्रम आयोजित केलेत, जेव्हा तुम्ही जगभरात योग शिबिरे आयोजित केली , जेव्हा दीदी जानकीजी स्वच्छ भारत अभियानाच्या सदिच्छादूत झाल्या , जेव्हा सर्व भगिनींनी स्वच्छ भारताची जबाबदारी स्वीकारली यामुळे अनेकांना देशासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
तुमच्या अशा कार्यामुळे माझा ब्रह्माकुमारीवरचा विश्वास वाढला आहे. पण, तुम्हाला माहीत आहे की ,जेव्हा विश्वास वाढतो तेव्हा अपेक्षाही वाढतात. आणि त्यामुळे तुमच्याबद्दलच्या माझ्या अपेक्षाही थोड्या वाढल्या असणे स्वाभाविक आहे. आज भारत श्री अन्न म्हणजेच भरडधान्याबाबत जागतिक चळवळ पुढे नेत आहे.आज देशात आपण नैसर्गिक शेतीसारख्या मोहिमा पुढे नेत आहोत. आपण आपल्या नद्या स्वच्छ केल्या पाहिजेत.भूगर्भातील पाण्याचे संवर्धन करायचे आहे . हे सर्व विषय असे आहेत की, कुठेतरी ते आपल्या हजारो वर्ष जुन्या संस्कृतीशी आणि परंपरांशी निगडीत आहेत. त्यामुळे या प्रयत्नांना जितके तुमचे सहकार्य मिळेल, तितकीच देशसेवा अधिक व्यापक होईल.
मला आशा आहे की ब्रह्मकुमारी राष्ट्र उभारणीशी संबंधित नवीन विषय अभिनव पद्धतीने पुढे नेईल. विकसित भारताची निर्मिती करून आपण ‘‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा मंत्र जगाला देऊ. आणि आत्ताच इथे जी -20 शिखर परिषदेची चर्चा झाली हे तुम्हाला माहीत आहे. जी -20 शिखर परिषदेतही आपण जगासमोर,जेव्हा जग महिलांच्या विकासाबद्दल बोलते , तेव्हा आपण जी -20 मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकास जगासमोर नेत आहोत.
महिलांच्या नेतृत्वाखाली विकास, त्या दिशेने आपण काम करत आहोत.मला पूर्ण विश्वास आहे की, तुम्हा सर्वांची एक अतिशय चांगली संस्था ,व्यापक संस्था देशाच्या प्राधान्यक्रमांशी जोडून अनेक नवीन शक्ती आणि सामर्थ्यांसह स्वतःचा विस्तार करेल आणि देशाचा विकास देखील करेल.
या सदिच्छेसह , मी तुम्हा सर्वांना धूप खूप धन्यवाद देतो. आणि तुम्ही मला इथे बोलावले, आमंत्रित केले. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी नेहमी तुमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतो. कारण इथे आल्यावर मी काहीतरी घेऊन जातो.आशीर्वाद असो, प्रेरणा असो, ऊर्जा असो जी मला देशासाठी काम करण्यास भाग पाडते, मला नवीन शक्ती देते. त्यामुळे मला इथे येण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो.
ॐ शांती !