नमस्कार!
आताच आपण यूएनईपी प्रमुख एचिम स्टायनर, यूएनडीपी प्रमुख डेव्हिड मालपास ,
जागतिक बँकेचे अध्यक्ष निकोलस स्टर्न, प्रा.कॅस संस्टेन, माझे मित्र बिल गेट्स, अनिरुद्ध दासगुप्ता, आणि भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे अंतर्मुख करणारे विचार ऐकले.
त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांसाठी मी त्यांचे आभार मानतो.
महिला गण आणि सज्जनहो,
मित्रांनो , नमस्ते
आजचा प्रसंग आणि आजची तारीख, दोन्ही खूप समर्पक आहेत. आपण लाईफ म्हणजे लाइफस्टाइल फॉर द एनवायरन्मेन्ट या पर्यावरण संरक्षण चळवळीचा प्रारंभ करत आहोत. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे- ''केवळ एक पृथ्वी''. आणि लक्षित क्षेत्र आहे - ''निसर्गाशी सुसंवाद राखत एकरूप होत जगणे''. या वाक्यामध्ये महत्व आणि उपाय सुंदरपणे मांडले आहेत.
मित्रांनो,
आपल्या ग्रहावरील आव्हाने आपल्या सर्वांना माहित आहेत. मानवकेंद्रित, सामुहिक प्रयत्न आणि शाश्वत विकासासाठी ठोस कृती ही काळाची गरज आहे. गेल्या वर्षी ग्लासगो
येथे कॉप -26 शिखर परिषदेत. मी मिशन LiFE-लाइफस्टाइल फॉर द एनवायरन्मेन्टचा प्रस्ताव मांडला होता. या मिशनला जगभरातून
पाठिंबा मिळाला. लाइफ चळवळीचा हा संकल्प आज साकार होत आहे याचा मला
आनंद आहे. अशा विक्रमी समर्थनाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. नावाप्रमाणेच, मिशन
लाइफ हे आपल्या सर्वांना या वसुंधरेसाठी आपण शक्य ते प्रयत्न करण्याची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी सोपवते. आपल्या ग्रहाशी सुसंगत आणि त्याला हानी
पोहोचणार नाही अशी जीवनशैली जगणे हा लाईफ मागचा दृष्टिकोन आहे. आणि जे अशी जीवनशैली जगतात त्यांना ''प्रो-प्लॅनेट पीपल'' म्हणतात. मिशन लाईफ भूतकाळातून शिकते , वर्तमानात कृती करते आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करते.
मित्रांनो,
पृथ्वीच्या दीर्घायुष्यामागील रहस्य हे आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी जपलेली एकरूपता आहे. जेव्हा परंपरेचा मुद्दा येतो तेव्हा जगातील बहुतांश सर्व भागांमध्ये अशा परंपरा आहेत ज्या पर्यावरण संबंधी समस्यांवर एक सोपा आणि टिकाऊ उपाय दर्शवितात.
घानामध्ये, पारंपारिक नियमांमुळे कासव संवर्धनात मदत झाली आहे. टांझानियाच्या सेरेनगेटी प्रदेशात, हत्ती आणि छोटे हरिण ( बुश बक्स) पवित्र मानले जातात. त्यामुळे त्यांना अवैध शिकारीचा कमी त्रास सहन करावा लागला आहे. इथिओपियामध्ये ओकपाघा आणि ओग्रीकी ही झाडे खास आहेत. जपानमध्ये फुरोशिकी आहे जो प्लास्टिकला शाश्वत पर्याय असू शकतो. स्वीडनचे लागोम तत्त्वज्ञान संतुलित जीवनाला प्रोत्साहन देते. भारतात आपण निसर्गाला देवाप्रमाणे मानले आहे. आपल्या देवी-देवतांचा झाडे आणि प्राणी यांच्याशी संबंध आहे. मी फक्त काही उदाहरणे दिली आहेत. अशा अनेक प्रथा आहेत. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल अर्थात "कमी वापरा, पुन्हा वापरा आणि आणि पुनर्चक्रीकरण करा " या संकल्पना आपल्या जीवनात गुंफलेल्या आहेत. चक्राकार अर्थव्यवस्था हा आपल्या संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे.
मित्रांनो,
आपण आपल्या देशात पर्यावरणासाठी अनेक चांगल्या गोष्टी करू शकलो आहोत, त्याबद्दल आपल्या 1.3 अब्ज भारतीयांचे आभार मानतो . आपले वनक्षेत्र वाढत आहे आणि त्याचप्रमाणे सिंह, वाघ, बिबट्या, हत्ती आणि गेंड्यांची लोकसंख्या वाढत आहे. भारताने आपल्या सध्याच्या विद्युत निर्मितीच्या क्षमतेच्या 40% वीज जीवाश्मेतर इंधनांपासून मिळविण्याचे आपले उद्दिष्ट नियत वेळेच्या 9 वर्षे आधीच साध्य केले आहे. गेल्या काही वर्षांत सुमारे 370 दशलक्ष एलईडी दिवे वितरित करण्यात आले आहेत. यामुळे दरवर्षी सुमारे 50 अब्ज युनिट विजेची बचत झाली आहे. तसेच दरवर्षी सुमारे 40 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईडची घट देखील सुनिश्चित केली आहे. आम्ही पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रण नोव्हेंबर 2022 च्या निर्धारित मुदतीच्या पाच महिने आधीच पूर्ण झाले आहे.
2013-14 ,मध्ये मिश्रणाचे हे प्रमाण केवळ 1.5% होते तर 2019-20 मध्ये ते 5% होते, हे लक्षात घेता, आजचे यश नक्कीच मोठे आहे. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा वाढली आहे, 5.5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कच्च्या तेलाची आयात कमी झाली आहे. यामुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 2.7 दशलक्ष टनांनी कमी झाले आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न जवळपास 5.5 अब्ज डॉलर्सनी वाढले आहे. नवीकरणीय ऊर्जा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे आणि या क्षेत्राच्या विकासावर आमच्या सरकारचा मोठा भर आहे.
महात्मा गांधींनी शून्य-कार्बन जीवनशैलीबद्दल सांगितले. आपल्या दैनंदिन जीवनातील निवडींमध्ये, स्वच्छ भारत हा सर्वात टिकाऊ पर्याय असून आपण री-यूज, रिड्यूस आणि री-सायकल या तत्त्वाचे पालन करूया. आपली पृथ्वी एकच आहे , मात्र आपले प्रयत्न अनेक असायला हवेत.
मित्रांनो,
चांगल्या वातावरणासाठी तसेच जागतिक आरोग्यासाठी आणि कोणत्याही प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत तयार आहे. आमच्या गटात भूतकाळ स्वतःच बोलत आहे. योग अधिक लोकप्रिय करण्यात पुढाकार घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी , एक सूर्य , एक विश्व , एक ग्रीड, आपत्ती रोधक पायाभूत पायाभूत सुविधा यासारख्या उपक्रमांनी मोठे योगदान दिले आहे. जग या प्रयत्नांना पाठिंबा देत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मला खात्री आहे की, लाइफ चळवळ आपल्याला आणखी एकत्र करेल आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य सुनिश्चित करेल. मी पुन्हा एकदा जगाला या यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. आपण सर्वांनी मिळून आपली पृथ्वी अधिक चांगली करू या. चला एकत्र काम करूया. ठोस कृती करण्याची हीच वेळ आहे. पर्यावरण सुरक्षेसाठी ठोस कृती, पर्यावरणासाठी जीवनशैलीसाठी कृती.
धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद!