860 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन
“राजकोट हे सौराष्ट्राच्या विकासाचे इंजिन म्हणून ओळखले जाते”
“मी नेहमीच माझ्यावर असलेले राजकोटचे ऋण चुकवण्याचा प्रयत्न करतो”
“आम्ही सुशासनाची हमी घेऊन आलो आणि आम्ही त्याची पूर्तता करत आहोत”
“नवमध्यमवर्ग आणि मध्यमवर्ग या दोन्ही वर्गांना सरकार प्राधान्य देत आहे”
“हवाई सेवांच्या विस्तारामुळे भारताच्या हवाई क्षेत्राला नवी उंची मिळाली आहे”
“जीवनमान सुलभता आणि जीवन गुणवत्ता या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी आहेत”
“आज रेरा कायद्यामुळे लाखो लोकांचा त्यांच्या पैशाची लूट होण्यापासून बचाव झाला आहे”
“आपल्या शेजारी देशांमध्ये महागाई 25-30 टक्के दराने वाढत आहेत. भारतात मात्र तशी स्थिती नाही”

सर्वजण कसे आहात? मजेत ना? गुजरातचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री ज्योतिरार्दित्य सिंदियाजी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाई विजय रुपाणीजी, सी आर पाटील जी !

मित्रांनो,

आत्ताच विजय सुद्धा माझ्या कानात सांगत होते आणि मी सुद्धा हे पाहतोय की राजकोट मध्ये कार्यक्रम असेल आणि  सुट्टीचा दिवस नसेल वा सुट्टी नसेल आणि दुपारची वेळ असेल, तर  राजकोट मध्ये कुणी अशा वेळी सभा घेण्याचा विचारही करणार नाही, तिथे एवढ्या मोठ्या संख्येने आज सभेसाठी विशाल जनसागर उसळला आहे, आज राजकोटने राजकोटचेच सर्व विक्रम मोडीत काढले आहेत! नाहीतर गेल्या अनेक वर्षांपासून आपण हे पाहत आलोय की संध्याकाळी आठ वाजल्यानंतर तर ठीक आहे बाबा, पण राजकोटला तर तसा दुपारीही झोप घेण्यासाठी थोडा वेळ हवा असतोच!

आज राजकोट बरोबरच संपूर्ण सौराष्ट्र आणि गुजरात साठी मोठा दिवस आहे. मात्र सुरुवातीला, नैसर्गिक आपत्तींमध्ये मोठं नुकसान सोसावं लागलेल्या कुटुंबांप्रती माझ्या सहवेदना मला व्यक्त करायच्या आहेत, त्यांच्या दुःखात मला सहभागी व्हायचे आहे. काही दिवसांपूर्वीच या भागात चक्रीवादळ आलं होतं आणि नंतर पुरानेसुद्धा मोठे नुकसान केले होते. या  संकटसमयी पुन्हा एकदा जनता आणि सरकार यांनी एकत्र मिळून या संकटाचा सामना केला आहे. या सर्व आपत्तीग्रस्त कुटुंबांचे आयुष्य, दैनंदिन जीवन लवकरात लवकर पूर्वपदावर येऊन सुरळीत होण्यासाठी भूपेंद्र भाईंचे सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार सुद्धा राज्य सरकारला आवश्यक असलेल्या सर्व सहकार्याची पूर्तता करत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

गेल्या काही वर्षांमध्ये आपण राजकोटची सर्वांगाने प्रगती होत राहिलेली पाहिली आहे. राजकोटची ओळख आता सौराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनच्या रूपातही अर्थात विकास रथ म्हणूनही निर्माण होत आहे. इथे एवढे काही आहे. उद्योगधंदे आहेत, व्यवसाय आहेत, संस्कृती आहे, खाद्यपेय संस्कृती आहे. मात्र एक कमतरता नेहमीच जाणवत होती आणि आपण सर्वजण सुद्धा वारंवार मला  सांगत होता आणि आज ती कमतरता सुद्धा पूर्ण झाली आहे.

आत्ताच काही वेळापूर्वी मी नव्या विमानतळावर असताना आपल्या या स्वप्नपूर्तीचा आनंद, मी सुद्धा अनुभवला. आणि मी हे नेहमी सांगतो राजकोटनेच मला खूप काही शिकवले आहे. मला पहिल्यांदा आमदार बनवले. माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात, माझ्या राजकीय प्रवासाला हिरवा झेंडा दाखवण्याचे काम राजकोटने केले आहे आणि म्हणूनच राजकोटचे हे कर्ज, हे उपकार माझ्यावर नेहमीच राहिले आहेत. आणि माझा सुद्धा हा प्रयत्न असतो की ही कर्जफेड, या उपकाराची परतफेड मी सातत्याने करत राहीन.

आज राजकोटला नवा आणि मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाला आहे. आता राजकोटहून देशातल्या विविध भागांसोबतच जगभरातल्या अनेक शहरांसाठी थेट विमान उड्डाणे शक्य होतील. या विमानतळावरून प्रवास करणे तर सोपे होणारच आहे, सोबतच या संपूर्ण क्षेत्रातील उद्योगांना सुद्धा खूप फायदा होईल. आणि जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, सुरुवातीचे दिवस होते, खूप काही अनुभव गाठीशी नव्हता आणि तेव्हा एकदा मी असे म्हणालो होतो की हे तर माझे मिनी जपान, जपानची एक दुसरी छोटी आवृत्तीच निर्माण होत आहे, तर तेव्हा लोकांनी माझी चेष्टा केली होती. मात्र माझे ते शब्द,  आपण आज खरे करून दाखवले आहेत.

 

मित्रहो,

इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता आपली फळ-फळावळ, भाजीपाला, देश परदेशातल्या बाजारपेठांमध्ये पाठवणे सोपे होईल. म्हणजे राजकोटला फक्त एक विमानतळच मिळालेले नाही, तर या संपूर्ण क्षेत्राच्या विकासाला नवी ऊर्जा देणारा, नवी उसळी देणारा एक शक्तिस्रोत मिळाला आहे.

आज इथे सौनी योजनेच्या अंतर्गत अनेक प्रकल्पांचे लोकार्पण सुद्धा झाले आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सौराष्ट्रातल्या डझनावारी गावांमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त सुद्धा राजकोटच्या विकासाशी निगडित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची संधी, आज मला इथे मिळाली आहे. मी या सर्व प्रकल्पांसाठी आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो!

 

मित्रांनो,

गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्र सरकारने समाजातील प्रत्येक वर्ग, प्रत्येक क्षेत्रातील जीवन सुकर बनवण्यासाठी काम केले आहे. आम्ही उत्तम राज्यकारभाराची, सुशासनाची हमी देऊन सत्तेवर आलो आहोत. आज आम्ही या हमीची पूर्तता करून दाखवत आहोत. आम्ही, गरीब असो, दलित असो, मागासवर्गीय असो, आदिवासी असो, सगळ्यांचेच जीवन चांगले बनवण्यासाठी निरंतर काम केले आहे.

आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आज देशात गरिबी वेगाने कमी होत आहे. अलीकडेच आलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की आमच्या सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात साडेतेरा कोटी लोक, गरीबीच्या गर्तेतून बाहेर आले आहेत. म्हणजे आज भारतात, गरिबीतून बाहेर पडून एक निओ मिडल क्लास, म्हणजेच  अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा लाभ मिळालेला नवा मध्यमवर्ग निर्माण होत आहे. म्हणूनच आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमात, मध्यम वर्ग सुद्धा आहे, निओ मध्यमवर्ग सुद्धा आहे, एक प्रकारे संपूर्ण मध्यमवर्ग आहे.

मित्रहो,

तुम्ही जरा आठवण्याचा प्रयत्न करा, 2014 च्या आधी मध्यमवर्गाची एक खूपच  सार्वत्रिक सामायिक तक्रार काय असायची? लोक म्हणायचे, दळणवळणाच्या-संपर्काच्या सुविधा किती ढिसाळ आहेत, आमचा कितीतरी वेळ कसा येण्या जाण्यामध्येच वाया जातो!

जेव्हा लोक परदेशाचा दौरा करून यायचे, परदेशी चित्रपट बघायचे, दूरदर्शनवर जगभरातील गोष्टी न्याहाळायचे तेव्हा त्यांना प्रश्न पडायचे, त्यांना वाटायचे की आपल्या देशात असे कधी होईल, असे रस्ते कधी बांधले जातील, असे विमानतळ केव्हा तयार होतील? शाळा-कार्यालयात ये-जा करण्यात अडचण, उद्योग-व्यवसाय करण्यात अडचण. देशातील दळणवळणाची ही स्थिती होती. गेल्या 9 वर्षांत ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. 2014 मध्ये फक्त 4 शहरांमध्ये मेट्रोचे जाळे होते. आज देशातील 20 हून अधिक शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार झाला आहे. आज वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्या देशात 25 वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत. 2014 मध्ये देशात जवळपास 70 विमानतळे होती. आता त्यांची संख्याही वाढून दुप्पट झाली आहे.

हवाई सेवेच्या विस्तारामुळे भारताच्या विमानसेवा क्षेत्राला जगात नवी उंची प्राप्त झाली आहे. आज भारतीय कंपन्या लाखो- कोट्यवधी रुपये किमतीची नवीन विमाने खरेदी करत आहेत. कोणी नवीन सायकल, नवीन गाडी किंवा नवीन स्कूटर घेतली तर त्याची चर्चा होते. मग आज हिंदुस्थानकडे एक हजार नवीन विमानांची मागणी नोंदवण्यात आली आहे. आणि येत्या काही दिवसांत दोन हजार विमानांची मागणी येण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला आठवतं का, मला आठवतंय, मी तुम्हाला गुजरात निवडणुकीच्या वेळी सांगितले होते - तो दिवस दूर नाही जेव्हा गुजरातही विमाने बनवेल. आज गुजरात या दृष्टीने वेगाने वाटचाल करत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

जगण्याची सुलभता, जीवनाची गुणवत्ता ही आमच्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. देशातील जनतेला यापूर्वी कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला ते सुद्धा आपण विसरू शकत नाही. वीज, पाणी बिल भरायचे असेल तर रांगेत उभे राहा. रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील तरी लांबच लांब रांग. तुम्हाला विमा आणि निवृत्तीवेतन घ्यायचे असले तरीही अनेक समस्या होत्या. प्राप्तीकर विवरणपत्रे भरताना देखील अडचणी होत्या. या सर्व समस्यांवर आम्ही डिजिटल इंडियाद्वारे मार्ग काढला आहे. पूर्वी बँकेत जाऊन काम उरकण्यासाठी इतका वेळ आणि ऊर्जा लागायची मात्र आज तुमची बँक तुमच्या मोबाईल फोनवर आहे. अनेकांना ते मागच्या वेळी कधी बँकेत गेले ते आठवतही नसेल. जाण्याची गरजच पडत नाही.

 

मित्रांनो,

ते दिवसही आठवा जेव्हा प्राप्तीकर विवरणपत्रे भरणेही मोठे आव्हान असायचे. यासाठी कोणीतरी शोधा, इकडे- तिकडे धावपळ करा. असंच सर्व करावं लागायचं. आज तुम्ही सहजपणे कमी वेळात ऑनलाइन विवरणपत्रे भरू शकता. जर परतावा असेल तर त्याचे पैसेही काही दिवसात तुमच्या खात्यात जमा होतात, नाहीतर पूर्वी महिनो न महिने लागायचे.

मित्रांनो,

पूर्वीच्या सरकारांना मध्यमवर्गीय लोकांकडे स्वतःचे घर असावे याची कोणतीही काळजी नव्हती. आम्ही गरिबांच्या घरांचाही विचार केला आणि मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची व्यवस्थाही केली. पीएम आवास योजनेंतर्गत आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे बांधण्यासाठी विशेष अनुदान दिले. या अंतर्गत 18 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना मदत देण्यात आली. आतापर्यंत देशातील 6 लाखांहून अधिक मध्यमवर्गीय कुटुंबांनी याचा लाभ घेतला आहे. येथे गुजरातमधील देखील 60 हजारांहून अधिक कुटुंबांनी केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेतला आहे.

मित्रांनो,

केंद्रात जुने सरकार असताना घराच्या नावावर फसवणूक झाल्याचे, दगाफटका झाल्याचे अनेकदा ऐकायला मिळाले, अनेक वर्षे घराचा ताबा मिळत नव्हता. कायदा व सुव्यवस्था नव्हती. विचारणारं कुणी नव्हतं. मात्र आमच्या सरकारने रेरा कायदा लागू केला, लोकांचे हित सुरक्षित केले. रेरा कायद्यामुळे आज लाखो लोकांचे पैसे लुटण्यापासून वाचले आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

आज देशात इतकं काम होत असताना, देश प्रगती करत असताना काही लोकांना त्याचा त्रास होणं अगदी स्वाभाविक आहे. जे लोक नेहमीच देशातील जनतेला ताटकळत ठेवत होते, ज्यांना देशातील जनतेच्या गरजा आणि महत्वाकांक्षेशी काही देणेघेणे नव्हते, ते लोक आज देशातील जनतेची स्वप्ने साकारताना पाहून जरा जास्तच भडकले आहेत.

आणि म्हणूनच आपण पाहत असाल की आजकाल या भ्रष्ट आणि घराणेशाहीवाल्यांनी आपल्या 'गटाचे' नावही बदलले आहे, व्यक्ती त्याच आहेत, पाप देखील तेच, मार्गही तोच, फक्त 'गटाचे' नाव बदलले. त्यांच्या चालीरीतीही तशाच आधीच्याच आहेत. त्यांचे हेतूही बदललेले नाहीत. मध्यमवर्गीयांना एखादी वस्तू स्वस्तात मिळाली की, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याचे ते सांगतात. जेव्हा शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतो तेव्हा हे म्हणतात की महागाई वाढत आहे. हा दुटप्पीपणा त्यांचे राजकारण आहे.

आणि तुम्ही पाहा, महागाईच्या बाबतीत त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे? केंद्रात सत्तेवर असताना त्यांनी महागाईचा दर 10 टक्क्यांवर नेला होता. आपल्या सरकारने महागाई नियंत्रणात आणली नसती, तर आज भारतातील भाव गगनाला भिडले असते. देशात पूर्वीचे सरकार असते तर आज दूध 300 रुपये लिटर, डाळ 500 रुपये किलोने विकली गेली असती. मुलांच्या शाळेच्या फीपासून ते येण्या-जाण्याचा खर्च हे सगळेच कैक पटीने वाढले असते.

पण मित्रांनो, कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाही आपल्या सरकारने महागाई नियंत्रणात ठेवली आहे. आज आपल्या शेजारील देशांमध्ये महागाई 25-30 टक्के दराने वाढत आहे. पण भारतात तसे नाही. आम्ही पूर्ण संवेदनशीलतेने महागाई नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आलो आहोत आणि भविष्यातही करत राहू.

बंधू आणि भगिनींनो,

गरीब आणि मध्यमवर्गीयांचे खर्च कमी करण्याबरोबरच मध्यमवर्गीयांना जास्तीत जास्त बचत करता यावी यासाठीही सरकारने प्रयत्न केले आहेत. तुम्हाला आठवत असेल की 9 वर्षांपूर्वीपर्यंत 2 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कर आकारला जात होता. तुम्‍ही आज 7 लाख रुपयांपर्यंत कमावले तरीही कर किती आहे तर शून्य.

सात लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. यामुळे शहरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांची दरवर्षी हजारो रुपयांची बचत होत आहे. अल्पबचतीवर जास्त व्याज देण्याचे पाऊलही आम्ही उचलले आहे. यंदा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (इपीएफओ)वर सव्वा आठ टक्के व्याज निश्चित करण्यात आले आहे.

मित्रांनो

सरकारच्या धोरणांमुळे आणि निर्णयांमुळे पैशांची कशी बचत होत आहे याचे मोबाईल फोन हेही एक उदाहरण आहे. कदाचित तुमचे लक्ष तिकडे गेले नसते. श्रीमंत असो की गरीब, बहुतेक लोकांकडे सध्या फोन नक्कीच असतो. आज प्रत्येक भारतीय दर महिन्याला सरासरी 20 जीबी डेटा वापरतो. 2014 मध्ये 1 जीबी डेटाची किंमत काय होती? हे  तुम्हाला माहिती आहे का.  2014 मध्ये 1 जीबी डेटासाठी 300 रुपये मोजावे लागत होते.

आज जर तेच पूर्वीचे सरकार असते तर तुम्हाला दरमहा किमान 6 हजार रुपये मोबाईल बिलासाठीच द्यावे लागले असते. तर आज 20 जीबी डेटासाठी फक्त तीनशे ते चारशे रुपये बिल येते. म्हणजेच आज लोक त्यांच्या मोबाईल बिलात दरमहा सुमारे 5 हजार रुपये वाचवत आहेत.

मित्रांनो,

कुटुंबात ज्येष्ठ नागरीक, वृद्ध आई-वडील, आजी-आजोबा असतील आणि त्यांना काही आजार असेल तर त्यांना नियमितपणे औषधे घ्यावी लागतात. आपले सरकार त्यांच्यासाठीही योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बचत करत आहे. पूर्वी या लोकांना बाजारात चढ्या दराने औषधे खरेदी करावी लागत होती. त्यांना या चिंतेतून बाहेर काढण्यासाठी आम्ही जनऔषधी केंद्रात स्वस्तात औषधे देण्यास सुरुवात केली.

या स्टोअर्समुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे सुमारे 20,000 कोटी रुपये वाचले आहेत. गरिबांसाठी मध्यमवर्गीयांसाठी संवेदनशील असलेले सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर भार पडू नये म्हणून एकामागून एक पावले उचलत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

केंद्र सरकार गुजरातच्या आणि सौराष्ट्राच्या विकासासाठी पूर्ण संवेदनशीलतेने काम करत आहे. पाणीटंचाई म्हणजे काय, हे गुजरात आणि सौराष्ट्रपेक्षा कोणाला चांगल्या प्रकारे माहीत आहे? सौराष्ट्रात सौनी योजनेपूर्वी काय परिस्थिती होती आणि सौनी योजनेनंतर काय बदल झाले हे आपण पाहतो. सौराष्ट्रात आज डझनभर धरणे, हजारो चेकडॅम पाण्याचे स्त्रोत बनले आहेत. हर घर जल योजनेंतर्गत गुजरातमधील कोट्यवधी कुटुंबांना आता नळाद्वारे पाणी मिळत आहे.

एकापाठोपाठ एक पाऊल टाकत, सामान्य माणसाची सेवा करून आणि त्यांच्या गरजा पूर्ण करून आम्ही गेल्या 9 वर्षांत देशात सिद्ध केलेले हे सुशासनाचे मॉडेल आहे. त्यात समाजातील प्रत्येक घटकाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेतल्या जातात. विकसित भारत घडवण्याचा हा मार्ग आहे. या मार्गावर चालताना अमृतकालाचे संकल्प सिद्ध करावे लागतील.

राजकोटमधून इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आला आहात. तुम्हा सगळ्यांना नवीन विमानतळ आणि तेही आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. तसेच इतर अनेक प्रकल्पांची भेट माझ्या सौराष्ट्रच्या लोकांना माझ्या गुजरातमधल्या राजकोटच्या लोकांना  मिळाली आहे.

या सगळ्यासाठी मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भूपेंद्रभाईंचे सरकार तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे.

या स्वागताबद्दल, या प्रेमाबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार मानतो.

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Ayushman driving big gains in cancer treatment: Lancet

Media Coverage

Ayushman driving big gains in cancer treatment: Lancet
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 डिसेंबर 2024
December 23, 2024

PM Modi's Rozgar Mela – Youth Appreciate Job Opportunities

Citizens Appreciate PM Modi Vision of Sabka Saath, Sabka Vikas