हर हर महादेव!
वणक्कम् काशी।
वणक्कम् तमिलनाडु।
कार्यक्रमाला उपस्थित उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री धर्मेंद्र प्रधान जी, माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन जी, बनारस हिंदू विद्यापीठाचे प्र-कुलगुरु सुधीर जैन, राज्यसभा खासदार इलैईराजा जी,आयआयटी मद्रासचे संचालक प्राध्यापक कामाकोट्टि जी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,
जगातील सर्वात प्राचीन चैतन्यमय शहर काशीच्या पवित्र भूमीवर आपल्या सर्वांना बघून मला खूप आनंद झाला आहे. मला इथे खूप छान वाटत आहे. मी आपल्या सर्वांचे महादेवाची नगरी काशी इथे, काशी-तामिळ संगमम् मध्ये मी हार्दिक स्वागत करतो. आपल्या देशात संगमांचे खूप महत्त्व, अतिशय महती आहे. नद्या आणि प्रवाहांच्या संगमापासून, विचार ते विचारधारा, ज्ञान-विज्ञान आणि समाज-संस्कृती यांच्या सगळ्या संगमाचा आपण उत्सव केला आहे. आणि म्हणूनच, काशी-तामिळ संगमम् चे विशेष महत्त्व आहे. ते अद्वितीय आहे. आज आपल्यासमोर एकीकडे संपूर्ण भारताला आपल्यात सामावून घेणारी आपली सांस्कृतिक राजधानी काशी आपल्यासमोर आहे. तर दुसरीकडे, भारताची प्राचीनता आणि गौरवाचे केंद्र असलेले तामिळनाडू आणि तामिळ संस्कृती आहे.
हा संगम देखील गंगा-यमुनेच्या संगमाइतकाच पवित्र आहे. या संगमात देखील, गंगा-यमुनेइतक्याच अपार संधी आणि सामर्थ्य सामावलेले आहे. मी काशी आणि तामिळनाडू इथल्या सर्व लोकांचे या आयोजनासाठी हार्दिक अभिनंदन करतो. मी देशाचे शिक्षण मंत्रालय आणि उत्तरप्रदेश सरकारला शुभेच्छा देतो. त्यांनी केवळ एका महिन्यात, हा व्यापक कार्यक्रम साकार केला आहे. यात, बनारस हिंदू विद्यापीठ आणि आयआयटी मद्रास सारख्या महत्वाच्या शिक्षणसंस्था देखील सहकार्य करत आहेत. विशेषतः काशी आणि तामिळनाडू इथल्या विद्वानांचे, विद्यार्थ्यांचे, अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आपल्या ऋषिमुनींनी सांगितले आहे- “‘एको अहम् बहु स्याम्’! याचा अर्थ, एकच चेतना विविध रूपात प्रकट होत असते. काशी आणि तामिळनाडू च्या संदर्भात हे तत्वज्ञान साक्षात साकार होताना आपण बघू शकतो आहोत. काशी आणि तामिळनाडू ही दोन्ही स्थाने, संस्कृती आणि सभ्यता यांची कालातीत केंद्रे आहेत. दोन्ही क्षेत्रे, संस्कृत आणि तामिळसारख्या जगातील सर्वात प्राचीन भाषांची केंद्रे आहेत. काशी इथे बाबा विश्वनाथ आहेत, तर तामिळनाडू मध्ये भगवान रामेश्वराचा आशीर्वाद आहे. काशी आणि तामिळनाडू दोन्ही तीर्थे शिवमय आहेत, शक्तीमय आहेत. एक स्वयं काशी आहे तर तामिळनाडू इथे दक्षिण काशी आहे. ‘काशी-कांची’ च्या रूपाने, दोन्ही तीर्थक्षेत्रांची सप्तपुरियांची आपली महती आहे. काशी आणि तामिळनाडू दोन्ही क्षेत्रे संगीत, साहित्य आणि कलेचीही अद्भुत स्त्रोत आहेत. काशीचा तबला तर तामिळनाडूचा तन्नुमाई. वाराणसीमध्ये बनारसी साडी मिळेल, तर तामिळनाडूची कांजीवरम सिल्क जगभरात प्रसिद्ध आहे. दोन्ही क्षेत्रे अध्यात्म क्षेत्रातील, जगातील सर्वात महान आचार्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. काशी भक्त तुलसीदासांची भूमी तर तामिळनाडू संत तिरुवल्लवर यांची भूमी. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात, आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये काशी आणि तामिळनाडूच्या विविध रंगांमध्ये एकसारखी ऊर्जा आपल्याला जाणवू शकेल. आजही तामिळ विवाह परंपरेत, काशी यात्रेचा उल्लेख होतो. म्हणजेच, तामिळ युवकांच्या आयुष्याचा नवा प्रवास, काशी यात्रेशी जोडला जातो. हे तामिळी लोकांच्या हृदयात काशीसाठी असलेले अविनाशी प्रेम आहे. जे भूतकाळात कधीही संपले नाही, ना भविष्यात कधी संपेल. ही तीच, “एक भारत, श्रेष्ठ भारताची’ परंपरा आहे. जी आपले पूर्वज जगत असत. आणि आज हा काशी-तामिळ संगम, पुन्हा एकदा हा गौरव पुढे घेऊन जात आहे.
मित्रांनो,
काशीच्या उभारणीत, काशीच्या विकासात देखील तमिळनाडूने अभूतपूर्व योगदान दिले आहे. तामिळनाडूमध्ये जन्मलेले डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी कुलगुरु होते. त्यांच्या योगदानाचे आजही बीचयू मध्ये स्मरण केले जाते. श्री राजेश्वर शास्त्री यांच्यासारखे तामिळ मूळ असलेले प्रसिद्ध वैदिक विद्वान काशीमध्ये राहिले होते. त्यांनी रामघाटावर सांगवेद विद्यालयाची स्थापना केली. अशाच प्रकारे, श्री पट्टाभिराम शास्त्रीजी, जे हनुमान घाटावर राहत असत, त्यांचेही काशीचे लोक स्मरण करतात. आपण जर काशीत फिराल, तर आपल्याला दिसेल की हरिश्चन्द्र घाटावर, “काशी कामकोटिश्वर पंचायतन मंदिर’ आहे, हे एक तामिळी मंदिर आहे. केदार घाटावर देखील 200 वर्षे जुना कुमारस्वामी मठ आहे, मार्कण्डेय आश्रम आहे.
हनुमान घाट आणि केदार घाटाच्या आजूबाजूला तामिळनाडूतील लोक मोठ्या संख्येने राहतात, त्यांनी पिढ्यानपिढ्या काशीसाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे. तामिळनाडूचे आणखी एक महान व्यक्तिमत्व, महान कवी श्री सुब्रमण्यम भारती जी, जे एक महान स्वातंत्र्यसैनिक देखील होते, त्यांनीही काशीमध्ये कितीतरी काळ वास्तव्य केले. इथेच त्यांनी मिशन कॉलेज आणि जैननारायण महाविद्यालयात शिक्षण घेतले. काशीशी ते इतके जोडले गेले होते, की काशी त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनली. त्यांच्या त्या लोकप्रिय मिशाही त्यांनी इथे ठेवल्याचं बोललं जातं. अशा अनेक व्यक्तिमत्त्वांनी, कितीतरी परंपरा, अनेक श्रद्धांनी काशी आणि तामिळनाडूला राष्ट्रीय एकात्मतेच्या धाग्याने जोडले आहे. आता सुब्रमण्यम भारती यांच्या नावाचे अध्यासन स्थापन करून बीएचयूने आपल्या सन्मानात भरच घातली आहे.
मित्रांनो,
काशी-तमिळ संगम चे आयोजन अशा काळात होत आहे, जेव्हा भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश केला आहे. अमृतकाळातील आपले संकल्प संपूर्ण देशाची एकता आणि एकत्रित प्रयत्नातूनच पूर्ण होणार आहेत.
हजारो वर्षांपासून 'सं वो मनांसी जानताम्', या मंत्राचा जप करत, 'एकमेकांचे मन जाणून' घेत, एकमेकांचा आदर राखत, सांस्कृतिक एकात्मता अगदी स्थायी भावाने जगत आलेला भारत हा देश आहे. आपल्या देशात सकाळी उठल्यावर, 'सौराष्ट्रे सोमनाथम्' ते 'सेतुबंधे तू रमेशम्' अशा 12 ज्योतिर्लिंगांचे स्मरण करण्याची परंपरा आहे. थोडक्यात परमेश्वराचे स्मरण करत असतानाही आपण देशाच्या विविध भागात वास करत असलेल्या आपल्या दैवतांचे स्मरण करुन एकप्रकारे देशाच्या आध्यात्मिक एकतेचे स्मरण करतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतो. स्नान करताना, पूजा करताना सुद्धा आपण मंत्रांचे पठण करतो – गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिं सन्निधिम् कुरु. म्हणजेच स्नान करताना गंगा, यमुनेपासून गोदावरी आणि कावेरीपर्यंत सर्व नद्यांचे पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात समाविष्ट होऊन आपल्याला या सर्व नद्यांमध्ये स्नान करण्याचे सद्भाग्य लाभावे, अशी आपली भावना असते. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा, हा वारसा, आपल्याला स्वातंत्र्यानंतर सुद्धा पक्का करायचा होता. तो देशाला एकतेच्या सुत्रात बांधणारा धागा बनवायचा होता. मात्र, दुर्दैवाने यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. आपल्या अनेक वर्षांच्या या इच्छेची पूर्तता करण्यासाठी, काशी-तमिळ संगम हे यापुढे एक व्यासपीठ असेल. हा संगम आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देईल आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी बळ मिळवून देईल.
मित्रहो,
विष्णु पुराणातील एक श्लोक, भारताचे स्वरूप काय आहे, एकंदर देहधारणा काय आहे, ते विशद करतो. हा श्लोक म्हणतो- उत्तरं यत् समुद्रस्य हिमद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षां तद् भारतम् नाम भारती यत्र संतति:॥ म्हणजेच भारत हा, हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत सर्व विविधता आणि वैशिष्ट्यांना सामावून घेतलेला देश आहे आणि त्याचे प्रत्येक अपत्य हे अस्सल भारतीय आहे. हजारो किलोमीटर दूर असूनही उत्तर आणि दक्षिण भारत, सांस्कृतिकदृष्ट्या किती जवळ आहेत हे लक्षात घेतले तर, यावरुन भारताची ही मुळे किती खोलवर रुजली आहेत, दूर दूर पर्यंत पसरली आहेत, हे अनुभवता येईल. संगम तमिळ साहित्यात हजारो मैल दूर वाहणाऱ्या गंगा नदीचे गुणगान झाले होते, कलितोगै या तमिळ ग्रंथात वाराणसीच्या लोकांची प्रशंसा केली गेली आहे. तिरुप्पुगलच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी, भगवान मुरुगा म्हणजेच कार्तिकेय किंवा कार्तिकस्वामी आणि काशीचा महिमा एकत्र गायला आहे आणि दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या तेनकाशीची स्थापना केली होती.
मित्रांनो,
उत्तर आणि दक्षिण भारत असा भौगोलिक आणि भाषा भेद असला, तरी त्यावर मात करणाऱ्या या सांस्कृतिक जवळिकी मुळेच, स्वामी कुमारगुरुपर तामिळनाडूहून काशीला आले आणि त्यांनी काशी ही आपली कर्मभूमी बनवली. धर्मापुरम आधिनामचे स्वामी कुमारगुरुपर यांनी केदार घाट इथे केदारेश्वर मंदिर बांधले होते. नंतर त्यांच्या शिष्यांनी तंजावर जिल्ह्यातील कावेरी नदीच्या काठी काशी विश्वनाथ मंदिराची स्थापना केली. मनोन्मणियम सुंदरनारजी यांनी तामिळनाडूचे राज्य गीत 'तमिळ ताई वाङ्तु' लिहिले आहे. असे म्हणतात की त्यांचे गुरू कोडगा-नल्लूर सुंदरर स्वामीगलजी यांनी काशीच्या मणिकर्णिका घाटावर बराच काळ व्यतित केला होता. खुद्द मनोन्मणियम सुंदरनारजी यांच्यावर सुद्धा काशीचा खूप प्रभाव होता. तामिळनाडूत जन्मलेल्या रामानुजाचार्यांसारखे संतही काशीपासून काश्मीरपर्यंत हजारो मैलांचा पायी प्रवास करत असत. आजही त्यांचे ज्ञान हा विद्वत्तेचा मापदंड मानला जातो. आजही संपूर्ण देश, अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, सी. राजगोपालाचारी यांनी लिहिलेल्या रामायण आणि महाभारतापासून प्रेरणा घेत असतो. मला आठवते, माझ्या एका शिक्षकांनी मला सांगितले होते की, तू रामायण आणि महाभारत तर वाचलेच असेल, पण जर तुला ते अगदी मुळापासून समजून घ्यायचे असेल, तर जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा राजाजींनी लिहिलेले रामायण आणि महाभारत वाच, तेव्हा कुठे मग तुला ते काही अंशी समजेल. माझा अनुभव आहे, दक्षिणेतील रामानुजाचार्य आणि शंकराचार्यांपासून ते राजाजी आणि सर्वपल्ली राधाकृष्णन अशा विद्वानांनी मांडलेले भारतीय तत्त्वज्ञान समजून घेतल्याशिवाय आपल्याला भारत कळू शकत नाही, हे सर्व महापुरुष आहेत, आपण त्यांना समजून घेतले पाहिजे.
मित्रहो,
भारताने आज आपल्या पंचप्रणांपैकी 'वारशाचा अभिमान' हा आपला पाचवा प्रण, म्हणजेच पाचवा पण-निश्चय समोर ठेवला आहे. जगातील कोणत्याही देशाला प्राचीन वारसा लाभला असेल तर त्या देशाला त्याचा अभिमान वाटतो. तो देश अभिमानाने जगभर त्याचा प्रचार-प्रसार करतो. इजिप्तच्या पिरॅमिडपासून ते इटलीतील कोलोसियम (प्रेक्षकांची वर्तुळाकार बसायची सोय असलेले खुले नाट्य किंवा प्रेक्षागृह, ज्याला इंग्रजीत Amphitheatre म्हणतात) आणि पिसाच्या झुकलेल्या मनोऱ्यापर्यंत अशी याची कैक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आपल्याकडे सुद्धा जगातील सर्वात जुनी भाषा, तमिळ आहे. अगदी आज सुद्धा ही भाषा तितकीच लोकप्रिय, तितकीच जिवंत आणि सक्रीय आहे. जगातील सर्वात जुनी भाषा भारतात आहे हे जेव्हा जगातील लोकांना कळते तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. आपण मात्र या गोष्टींचा गौरव, गवगवा करण्यात कमी पडतो. आपला हा तमिळ भाषेचा वारसा जतन करून तो आणखी समृद्ध सुद्धा करण्याची जबाबदारी आपणा सर्व 130 कोटी देशवासियांची आहे. आपण तमिळ भाषेकडे दुर्लक्ष केले तर देशाचे नुकसान होईल, तमिळवर बंधने लादली तरीही नुकसानच होईल. आपण लक्षात ठेवले पाहिजे - आपण भाषाभेद दूर करूया, भावनिक ऐक्य प्रस्थापित करूया.
मित्रांनो,
काशी-तमिळ संगम हा शब्दांपेक्षा अनुभवायचा विषय आहे, असे मला वाटते. या काशी यात्रेदरम्यान तुम्ही काशीच्या स्मृतींमध्ये रममाण होणार आहात आणि हीच तुमची आयुष्यभराची कमाई, भांडवल ठरेल. माझे काशीचे रहिवासी तुमच्या आदरातिथ्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाहीत. तमिळनाडू आणि दक्षिणेकडील इतर राज्यांमध्येही असे कार्यक्रम व्हावेत, देशाच्या इतर भागातील लोकांनी तिथे जावे, भारत प्रत्यक्ष अनुभवून पहावा, भारत जाणून घ्यावा, असे मला वाटते. काशी-तमिळ संगमातून प्रसवणारे अमृत, संशोधन आणि संशोधनात्मक अभ्यासाच्या माध्यमातून युवावर्गाला उपलब्ध करून दिले जावे, अशी माझी इच्छा आहे. आज पेरलेल्या या बीजातूनच पुढे राष्ट्रीय एकात्मतेचा वटवृक्ष बहरावा. राष्ट्रहित हेच आपले हित आहे - 'नाट्टू नलने नामदु नालन', हा मंत्र आम्हा देशवासियांचा जीवनमंत्र बनला पाहिजे. या सदिच्छांसह, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
भारत मातेचा विजय असो,
भारत मातेचा विजय असो,
भारत मातेचा विजय असो,
धन्यवाद!
वणक्कम् !