नमस्कार,
माझ्या समोर एक अद्भुत दृश्य आहे. ते भव्य आहे, विराट आहे आणि विहंगम आहे. आणि आजचा हा जो प्रसंग आहे, त्यामागे जी कल्पना आहे आणि आपल्या डोळ्यांसमोर ते स्वप्न साकार होत असलेले पाहताना मला एका प्रसिद्ध कवितेतील ओळी गुणगुणाव्याशा वाटत आहेत :
नया प्रात है, नई बात है, नई किरण है, ज्योति नई।
नई उमंगें, नई तरंगे, नई आस है, साँस नई।
उठो धरा के अमर सपूतो, पुनः नया निर्माण करो।
जन-जन के जीवन में फिर से नई स्फूर्ति, नव प्राण भरो।
आज हा दिव्य आणि भव्य 'भारत मंडपम' पाहताना प्रत्येक भारतीयाचा ऊर आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने भरून आला आहे. ‘भारत मंडपम’ हे भारताचे सामर्थ्य, भारताची नवीन ऊर्जेचे आवाहन आहे. 'भारत मंडपम' हे भारताच्या भव्यतेचे आणि भारताच्या इच्छाशक्तीचे दर्शन आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक काळात जेव्हा सर्वत्र काम ठप्प झाले होते, तेव्हा आपल्या देशाच्या मजुरांनी रात्रंदिवस मेहनत करून याचे बांधकाम पूर्ण केले आहे.
'भारत मंडपम' च्या बांधकामाशी संबंधित प्रत्येक कामगार बंधू आणि भगिनींचे मी आज मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज सकाळी मला या सर्व कामगारांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांचा सन्मान करण्याचे सौभाग्य मला लाभले होते. आज त्यांची मेहनत पाहून संपूर्ण भारत आश्चर्यचकित झाला आहे.
नवीन आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र - 'भारत मंडपम' च्या उद्घाटनाबद्दल मी राजधानी दिल्लीतील जनतेचे आणि संपूर्ण देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. देशाच्या विविध भागातून आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनापासून स्वागत करतो. दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याबरोबर सहभागी झालेल्या कोट्यवधी लोकांचेही मी अभिनंदन करतो.
मित्रहो,
आजचा दिवस देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, आज कारगिल विजय दिवस आहे. देशाच्या शत्रूंनी जे दुःसाहस केले होते, त्याला भारतमातेच्या सुपुत्रांच्या पराक्रमाने पराभूत केले होते. कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या प्रत्येक वीराला कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो.
मित्रहो,
जसे पीयूषजींनी आता आपल्याला सांगितले की 'भारत मंडपम' हे नाव भगवान बसवेश्वरांच्या 'अनुभव मंडपम 'पासून प्रेरित आहे. ‘अनुभव मंडपम’ (ज्याला जगातील पहिली संसद म्हणून संबोधले जाते) हे वादविवाद, चर्चा आणि विचारांच्या अभिव्यक्तीसाठी लोकशाही व्यासपीठाचे प्रतिनिधित्व करते. आज संपूर्ण जग हे मान्य करत आहे की भारत ही लोकशाहीची जननी आहे. तामिळनाडूतील उथिरामेरूर येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखांपासून ते वैशालीसारख्या स्थानापर्यंत भारताची चैतन्यशील लोकशाही ही शतकानुशतके आपला अभिमान राहिली आहे.
आज आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त अमृत महोत्सव साजरा करत असताना, 'भारत मंडपम' ही आपणा भारतीयांकडून आपल्या लोकशाहीला एक सुंदर भेट आहे. काही आठवड्यांत, याच ठिकाणी जी - 20 शी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे, ज्यामध्ये जगातील प्रमुख राष्ट्रांचे नेते उपस्थित राहणार आहेत. भारताची वाढती प्रगती आणि वाढत सन्मान या भव्य 'भारत मंडपम'द्वारे संपूर्ण जग पाहणार आहे.
मित्रहो,
आजच्या परस्परांशी संबंधित आणि परस्परांवर अवलंबून असलेल्या या जगात, जागतिक स्तरावर विविध कार्यक्रम आणि शिखर परिषदा सातत्याने सुरु असतात. कधी एका देशात तर कधी दुसऱ्या देशात. त्यामुळे, भारतात, विशेषत: राजधानी दिल्लीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक संमेलन केंद्र असणे आवश्यक होते. गेल्या शतकात अनेक दशकांपूर्वी बांधण्यात आलेल्या विद्यमान सुविधा आणि सभागृहे 21व्या शतकातील भारताशी ताळमेळ राखू शकली नाहीत. 21 व्या शतकात आपल्याकडे भारताच्या प्रगतीला अनुरूप 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करणाऱ्या सुविधा आपण निर्माण केल्या पाहिजेत.
म्हणूनच 'भारत मंडपम' ही भव्य निर्मिती आता माझ्या देशबांधवांसमोर आणि तुमच्यासमोर आहे. 'भारत मंडपम' भारतातील आणि परदेशातील मोठ्या आयोजकांना मदत करेल. 'भारत मंडपम' हे देशातील परिषद पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल. 'भारत मंडपम' हे आपल्या स्टार्ट-अप्सची ताकद दाखवण्याचे माध्यम होईल. 'भारत मंडपम' आपली चित्रपटसृष्टी आणि कलाकारांच्या कामगिरीचा साक्षीदार ठरेल.
'भारत मंडपम' कारागीर आणि हस्तकला कारागिरांच्या परिश्रमांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे माध्यम बनेल, “भारत मंडपम हे आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल अभियानाचे प्रतिबिंब होईल. अर्थव्यवस्थेपासून ते पर्यावरणापर्यंत आणि व्यापार ते तंत्रज्ञान पर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रासाठी एक मंच म्हणून उदयाला येईल अर्थव्यवस्थेपासून पर्यावरणापर्यंत आणि व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंतच्या विविध प्रयत्नांसाठी 'भारत मंडपम' एक भव्य मंच तयार होईल.
मित्रहो,
'भारत मंडपम' सारख्या सुविधांची उभारणी अनेक दशकांपूर्वी व्हायला हवी होती. पण मला वाटते की अनेक कामे माझ्या हातून होण्याचे योजलेले आहे. आपण पाहतो की जेव्हा एखादा देश ऑलिम्पिक स्पर्धा किंवा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करतो तेव्हा जागतिक स्तरावर त्याचा चेहरामोहरा लक्षणीयरित्या बदलतो. जगात अशा गोष्टींचे महत्त्व खूप वाढले आहे आणि देशाच्या बाह्य रुपरेखेला खूप महत्त्व आहे. अशा प्रकारच्या व्यवस्था एक प्रकारे त्याचे महत्व आणखी वाढवतात.
मात्र आपल्या देशात वेगळी मानसिकता असलेले लोकही आहेत. नकारात्मक विचार करणाऱ्यांची इथे नक्कीच कमतरता नाही. या प्रकल्पाच्या उभारणीत अडथळे निर्माण करण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले. त्यांनी खूप गोंधळ घातला आणि कोर्टकचेरीच्या चकरा मारल्या.
मात्र जिथे सत्य नांदते तिथे ईश्वरही वास करतो. आता हा सुंदर परिसर आपणा सर्वांसमोर आहे.
खरंतर काही लोकांची प्रवृत्तीच असते, प्रत्येक चांगल्या कामात अडथळा आणण्याची, टीका करण्याची. आपल्याला आठवत असेल कर्तव्य पथ तयार होताना काय-काय सांगितले जात होते, पहिल्या पानावर, ब्रेकिंग न्यूज म्हणून काय काय सुरु होते. न्यायालयातही किती प्रकरणे नेण्यात आली. मात्र आता कर्तव्य पथ निर्माण झाल्यानंतर ते लोकही चांगले झाले, देशाची शोभा वाढवणारा आहे असे दबक्या आवाजात आता म्हणत आहेत. काही काळानंतर ‘भारत मंडपम’साठीही विरोध करणारे स्पष्टपणे म्हणोत किंवा ना म्हणोत मनातून मात्र त्यांनी याचे महत्व स्वीकारले असेल याची मला खात्री आहे, कदाचित एखाद्या समारंभात इथे व्याख्यान द्यायलाही ते येतील.
मित्रांनो,
कोणताही देश असो, कोणताही समाज असो, तो छोटा विचार करत, तुकड्या-तुकड्यांमध्ये काम करत प्रगती करू शकत नाही. आमचे सरकार समग्रतेने, दूरदृष्टीने काम करत आहे याची साक्ष आज हे संमेलन केंद्र ‘भारत मंडपम’ देत आहे. यासारख्या केंद्रात येणे सुलभ व्हावे, देश-विदेशातल्या कंपन्या इथे याव्यात यासाठी आज भारत 160 पेक्षा जास्त देशांना ई कॉन्फरन्स व्हिसा सुविधा देत आहे. म्हणजे केवळ हे केंद्र उभारले असे नव्हे तर पुरवठा साखळी, व्यवस्था साखळी यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
2014 मध्ये दिल्ली विमानतळाची वर्षाला 5 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता होती. आज यात वाढ होऊन ही क्षमता साडेसात कोटी झाली आहे. टर्मिनल दोन आणि आणि चौथा रनवेही सुरु झाला आहे. ग्रेटर नोएडाच्या जेवर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यानंतर याला आणखी बळ मिळेल. गेल्या काही वर्षात दिल्ली-एनसीआर मध्ये हॉटेल व्यवसायाचाही मोठा विस्तार झाला आहे. म्हणजेच परिषद पर्यटनासाठी संपूर्ण परिसंस्था उभारण्यासाठी आम्ही नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत.
मित्रहो,
याशिवाय राजधानी दिल्लीमध्येही जे प्रकल्प निर्माण झाले आहेत ते देशाच्या गौरवात भर घालत आहे. देशाचे नवे संसद भवन पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल. आज दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारक आहे, पोलीस स्मारक आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे. आज कर्तव्य पथाच्या आजूबाजूला सरकारची आधुनिक कार्यालये उभारण्याचे काम झपाट्याने सुरु आहे. आम्हाला कार्य संस्कृतीत आणि वातावरणातही परिवर्तन घडवायचे आहे.
आपण सर्वांनी पाहिले असेल की पंतप्रधान संग्रहालयातून देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांची माहिती जाणून घेण्याची संधी नव्या पिढीला मिळत आहे. लवकरच दिल्लीमध्ये आणि आपणा सर्वांसाठीही ही आनंदाची बाब असेल, जगासाठीही खुश खबर असेल, लवकरच दिल्लीत जगातले सर्वात मोठे आणि मी जेव्हा जगातले सर्वात मोठे असे म्हणतो, जगातले सर्वात मोठे संग्रहालय युगे-युगीन भारतात उभारण्यात येत आहे.
मित्रांनो,
आज अवघे जग भारताकडे पाहत आहे. पूर्वी जे कल्पनेपलीकडचे वाटत होते, ज्याचा कोणी विचारही करू शकत नव्हते असे यश भारत आज प्राप्त करत आहे. विकसित होण्यासाठी आपले विचारही उत्तुंग हवेत, मोठी उद्दिष्टे साध्य करावीच लागतील. म्हणूनच ‘उत्तुंग विचार,मोठी स्वप्ने,भव्य कृती’ ही उक्ती आचरणात आणत भारत आज झपाट्याने मार्गक्रमण करत आहे. ‘आकाशाइतकी उंच भरारी घ्या’ असे म्हटले जाते. आम्ही आधीपासूनच भव्य निर्मिती करत आहोत, आम्ही आधीपासूनच उत्तम निर्मिती करत आहोत, आम्ही आधीपासूनच वेगाने निर्मिती करत आहोत.
पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडत आहे. जगातले सर्वात मोठे सोलर विंड पार्क आज भारतात उभे राहत आहे. जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आज भारतात आहे.10 हजार फुटापेक्षा जास्त उंचावर जगातला सर्वात लांबीचा बोगदा आज भारतात आहे. जगातला सर्वात उंचीवरचा वाहनयोग्य रस्ता आज भारतात आहे. जगातले सर्वात मोठे क्रिकेट स्टेडीयम आज भारतात आहे. जगातला सर्वात उंच पुतळा आज भारतात आहे. आशियामधला सर्वात मोठा दुसरा रेल्वे-रस्ता पूलही भारतात आहे. हरित हायड्रोजन वर इतक्या मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या जगातल्या काही देशांपैकी भारत एक आहे.
मित्रांनो,
आमच्या सरकारच्या सध्याच्या कार्यकाळातल्या आणि मागच्या कार्यकाळातल्या कामांचे सुपरिणाम अवघा देश आज पाहत आहे. भारताची विकास गाथा आता थांबणार नाही यावर देशाचा ठाम विश्वास आहे. आमच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरवातीला जगात भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती. लोकांनी माझ्या हाती जबबदारी सोपवली तेव्हा आपण दहाव्या क्रमांकावर होतो. दुसऱ्या कार्यकाळात आज भारत जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे. ही कामगिरी लक्षात घेता, केवळ बोलत नाही तर आधीच्या कामगिरीच्या आधारे बोलत आहे.
मी देशाला विश्वास देतो की तिसऱ्या कार्यकाळात जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये एक नाव भारताचे असेल. म्हणजेच तिसऱ्या कार्यकाळात पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारत अभिमानाने उभा असेल. तिसऱ्या कार्यकाळात सर्वोच्च तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारत पोहोचेल ही मोदी यांनी दिलेली हमी आहे. 2024 नंतर आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाची विकासाची घोडदौड अधिक वेग घेईल असा विश्वासही मी देशवासियांना देतो. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात आपण आपली स्वप्ने पूर्ण होताना पाहाल.
मित्रांनो,
आज भारतात नव निर्माणाची क्रांती सुरु आहे. गेल्या 9 वर्षात भारतात आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सुमारे 34 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या वर्षाच्या अर्थसंकल्पातही भांडवली खर्चासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवे विमानतळ, नवे द्रुतगती मार्ग, नवे रेल्वे मार्ग, नवे पूल, नवी रुग्णालये, आज भारत ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात काम करत आहे ते खरोखरच अभूतपूर्व आहे.
गेल्या 70 वर्षात, आणि मी हे केवळ कोणावर टीका करण्यासाठी सांगत नाही, तर केवळ हा विषय समजून घेण्यासाठी काही संदर्भ जाणून घेणे गरजेचे आहेत. आणि म्हणूनच मी त्या संदर्भाच्या आधारावर बोलत आहे.
पहिल्या 70 वर्षांत, भारतात केवळ 20,000, किलोमिटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले होते. मात्र, गेल्या नऊ वर्षांत, भारतात जवळपास 40,000 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. 2014 पूर्वी, आपल्या देशात महिन्याला अंदाजे 600 मीटर, किलोमीटर नव्हे, नवे मेट्रो मार्ग बनत होते. आज भारतात दर महिन्याला, 6 किलोमीटर नवे मेट्रो मार्ग तयार होत आहेत. 2104 पूर्वी, देशात 4 लाख किलोमीटर पेक्षा कमी ग्रामीण रस्ते होते. आज, देशात 7.25 लाख किलोमीटर पेक्षा जास्त ग्रामीण रस्ते आहेत. 2014 पूर्वी, आपल्या देशात जवळपास 70 विमानतळे होती. आज, विमानतळांची संख्या वाढून 150 च्या आसपास पोचली आहे. 2014 पूर्वी, शहरी गॅस वितरण व्यवस्था केवळ 60 शहरांत होती. आज, 600 पेक्षा जास्त शहरांत गॅस वितरण व्यवस्था उभी करण्यात आली आहे.
मित्रांनो,
जुन्या आव्हानांचा सामना करत, कायमस्वरूपी तोडगा काढत, भारत प्रगती करत आहे आणि पुढे जात आहे. विविध समस्यांवर दूरगामी उपाय योजना शोधण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. याचे उदाहरण म्हणजे पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा. उद्योग क्षेत्रातील मित्र इथे बसले आहेत आणि माझी इच्छा आहे की तुम्ही या बाबत विचार करावा. रेल्वे, रस्ते, शाळा, रुग्णालये या सारख्या भौतिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा यासाठी पीएम गतिशक्ती बृहद आराखडा अमुलाग्र बदल घडवून आणणारा ठरत आहे. या आराखड्यात 1600 पेक्षा जास्त विविध स्तरातून माहिती गोळा करून डिजिटल पद्धतीने एकत्रित केली जाते, जेणेकरून देशाच्या आर्थिक स्रोत तसेच वेळेचा प्रभावी वापर केला जाईल आणि नासाडी होणार नाही.
मित्रांनो,
आज भारतासमोर मोठ्या संधी आहेत. मी मागच्या शतकाबद्दल बोलत आहे, 100 वर्षांपूर्वी, जेव्हा भारत स्वातंत्र्याचा लढा देत होता, मागच्या शतकाच्या तिसऱ्या दशकात. मला आपले लक्ष 1923-1930 या कालखंडाकडे वेधायचे आहेत, जे मागच्या शतकातील तिसरे दशक होते आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. त्याच प्रमाणे, 21 व्या शतकाचे हे तिसरे दशक तितकेच महत्त्वाचे आहे. मागच्या शतकातील तिसऱ्या दशकात, एक ओढ होती, ' स्वराज्य ' मिळविण्याचे ध्येय होते. आज, आपले ध्येय आहे, प्रगत भारताची, विकसीत भारताची निर्मिती. त्या तिसऱ्या दशकात, देश स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढत होता, आणि स्वातंत्र्याचे नारे देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येत होते. स्वराज्य मोहिमेचे सर्व घटक, मग ते क्रांतीचे मार्ग असोत अथवा असहकार चळवळ, हे पूर्णपणे जागृत होते आणि ऊर्जेने परिपूर्ण होते. त्याचाच परिणाम म्हणून, देशाने 25 वर्षांत स्वातंत्र्य मिळविले, आणि आपले स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता, या शतकाच्या तिसऱ्या दशकात, पुढच्या 25 वर्षांसाठी आपले एक नवे ध्येय आहे. प्रगतिशील आणि विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासाला आपण निघालो आहोत. भारताला नव्या उंचीवर घेऊन जाणे, प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाने बघितलेले स्वप्न पूर्ण करणे हे आपले ध्येय आहे.
हा संकल्प पूर्ण करण्यासाठी, देशाचा प्रत्येक नागरिकाने, सर्व 140 कोटी भारतीयांनी, दिवस रात्र योगदान दिले पाहिजे. आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगू इच्छितो, मी एकामागे एक यश बघितले आहे. मी आपल्या देशाची शक्ती ओळखली आहे, क्षमता ओळखल्या आहेत, आणि यांच्या आधारावर, मी विश्वासाने सांगतो, 'भारत मंडपम' मध्ये उभा राहून आणि भारताच्या या सक्षम लोकांसमोर, की भारत विकसीत देश बनू शकतो, नक्कीच बनू शकतो. भारत गरिबी निर्मूलन करू शकतो, हे नक्की होऊ शकते. आणि आज मी तुम्हाला माझ्या या विश्वासाचा आधार काय आहे ते सांगतो. नीती आयोगाच्या अहवालात असे म्हटले आहे की गेल्या केवळ पाच वर्षात भारतात 13.5 कोटींपेक्षा जास्त लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. इतकेच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय संस्था देखील म्हणत आहेत की भारतातून तीव्र गरिबी संपण्याच्या मार्गावर आहे. याचा अर्थ असा आहे, गेल्या नऊ वर्षांत देशाने आणलेली धोरणे आणि घेतलेले निर्णय देशाला योग्य दिशा दाखवत आहेत.
मित्रांनो,
जर उद्देश साफ असेल तरच देशाची प्रगती शक्य आहे. आज उद्देश आणि देशात चांगले बदल घडवून आणण्यासाठी योग्य रणनीती यात पूर्ण स्पष्टता आहे. भारताच्या जी 20 च्या अध्यक्षतेखाली देशभरात होत असलेले कार्यक्रम हे याचेच उदाहरण आहे. आम्ही जी 20 च्या बैठका केवळ एका शहरापुरत्या किंवा ठिकाणा पुरत्या मर्यादित ठेवल्या नाहीत. आम्ही या बैठका देशातल्या 50 पेक्षा जास्त शहरांत घेऊन गेलो. या द्वारे, आम्ही देशाची विविधता आणि सांस्कृतिक वैभव जगाला दाखवले. आम्ही जगाला, भारताचे सांस्कृतिक सामर्थ्य आणि वारसा दाखवला, इतकी विविधता असताना भारत कशी प्रगती करत आहे, आणि भारत या विविधतेचा कसा उत्सव करतो.
आज या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक भारतात येत आहेत. जी 20 च्या बैठका विविध शहरांत घेतल्याने त्या ठिकाणी नव्या सुविधा निर्माण झाल्या, सध्या असलेल्या सुविधांचे आधुनिकीकरण झाले, ज्याचा लाभ देश लोकांना होत आहे. उत्तम प्रशासनाचे हे मोठे उदाहरण आहे. राष्ट्र प्रथम आणि नागरिक प्रथम या भावनेने आपण भारताचा विकास करणार आहोत.
मित्रांनो,
या महत्त्वाच्या प्रसंगी आपण इथे आलात, ही तुमच्या मनात भारताविषयी असलेली स्वप्ने जोपासण्याची एक मोठी संधी आहे. 'भारत मंडपम' या भव्य दिव्य सुविधेसाठी पुन्हा एकदा, मी दिल्लीच्या नागरिकांचे अभिनंदन करतो, देशाच्या नागरिकांचे अभिनंदन करतो. इतक्या मोठ्या संख्येने इथे अलेल्यांचे मी मनापासून स्वागत करतो, आणि पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
धन्यवाद!