भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र सिंह जी तोमर, वीरेंद्र कुमार जी, ज्योतिरादित्य सिंधिया जी, इतर सर्व मान्यवर, आणि येथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या कुटुंबियांनो, ग्वाल्हेरच्या या ऐतिहासिक भूमीला माझे शत शत प्रणाम!
ही भूमी धैर्य, स्वाभिमान, लष्करी अभिमान, संगीत, रसना आणि मोहरीचे प्रतीक आहे. ग्वाल्हेरने देशाला एकापेक्षा एक क्रांतिकारक दिले आहेत. ग्वाल्हेर-चंबळने आपले शूर पुत्र देशाच्या रक्षणासाठी आणि आपल्या सैन्यासाठी दिली आहेत. ग्वाल्हेरने भाजपाचे धोरण आणि नेतृत्वालाही आकार दिला आहे.
राजमाता विजयराजे सिंधिया जी, कुशाभाऊ ठाकरे जी आणि अटल बिहारी वाजपेयी जी यांना ग्वाल्हेरच्या मातीने घडवले आहे. ही भूमी स्वतःच एक प्रेरणा आहे. या भूमीत ज्या देशप्रेमी व्यक्तीने जन्म घेतला, त्याने स्वतःला देशासाठी वाहून घेतले, त्याने आपले जीवन देशासाठी समर्पित केले.
माझ्या कुटुंबियांनो,
आपल्यासारख्या कोट्यवधी भारतीयांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचे भाग्य लाभले नाही, मात्र भारताला विकसित बनवण्याचे, भारताला समृद्ध बनवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. आजही हे मिशन पुढे नेण्यासाठी मी पुन्हा एकदा ग्वाल्हेरला, तुमच्यामध्ये आलो आहे. आज या ठिकाणी जवळजवळ 19 हजार कोटी रुपये किमतीच्या विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले.
आणि मी पाहत होतो की उद्घाटनाचे किंवा पायाभरणीचे पडदे एकामागून एक उघडत होते. पडदे इतक्या वेळा उघडले की टाळ्या वाजवून तुम्ही थकलात. तुम्ही कल्पना करू शकता की आमचे सरकार एका दिवसात लोकार्पण आणि पायाभरणीची एवढी कामे करते, जे कोणतेही सरकार एका वर्षात करू शकत नाही, आणि लोक टाळ्या वाजवून थकतील, एवढी कामे करण्याचे आमचे सामर्थ्य आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी मध्य प्रदेशातील सुमारे 2.25 लाख कुटुंबे आज आपल्या नवीन घरात प्रवेश करत आहेत. आज येथे अनेक दळणवळण प्रकल्पही सुरू झाले आहेत. उज्जैनमधील विक्रम उद्योगपुरी आणि इंदूरमधील मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क मध्य प्रदेशच्या औद्योगिकीकरणाचा विस्तार करेल. इथल्या तरुणांसाठी हजारो नवीन नोकऱ्या आणि नवीन संधी निर्माण होणार आहेत. आज आयआयटी इंदूरमध्येही अनेक नवीन कामे सुरु झाली आहेत.
आज ग्वाल्हेरसह, विदिशा, बैतुल, कटनी, बुरहानपूर, नरसिंगपूर, दमोह आणि शाजापूर येथेही नवीन आरोग्य केंद्रे आली आहेत. आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी गंभीर आजारांवर उपचार करण्याची सुविधा आहे. या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हा सर्वांचे आणि मध्य प्रदेशातील माझ्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो.
मित्रहो,
ही सर्व कामे डबल इंजिन सरकारच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहेत. जेव्हा दिल्ली आणि भोपाळ या दोन्ही ठिकाणी समविचारी, जनतेच्या सेवेसाठी समर्पित सरकारे असतात, तेव्हा अशी कामे जलद गतीने होतात. म्हणूनच मध्यप्रदेशचा विश्वास डबल इंजिन सरकारवर आहे. डबल इंजिन म्हणजेच एमपी चा डबल विकास.
माझ्या कुटुंबियांनो,
गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या सरकारने मध्यप्रदेशला एका बिमारू राज्यापासून टॉप-10 राज्यांमध्ये आणले आहे. इथून पुढे मध्य प्रदेशला देशातील टॉप-3 राज्यांमध्ये नेण्याचे आमचे ध्येय आहे. एमपी ने टॉप-3 मध्ये जायला हवे की नाही? एमपी चे स्थान टॉप-3 मध्ये असायला हवे की नाही? मोठ्या अभिमानाने पहिल्या तीन मध्ये स्थान मिळवायचे आहे की नाही? हे काम कोण करू शकेल? ही हमी कोण देऊ शकेल? तुमचे उत्तर चुकीचे आहे, ही हमी, एक जबाबदार नागरिक म्हणून तुमचे एक मत मध्य प्रदेशला तिसऱ्या क्रमांकावर नेऊ शकते. डबल इंजिनला दिलेले तुमचे प्रत्येक मत एमपीला टॉप-3 मध्ये घेऊन जाईल.
माझ्या कुटुंबियांनो,
ज्यांच्याकडे नवीन विचार किंवा विकासाचा पथदर्शक आराखडा नाही अशा लोकांकडून एमपीचा विकास होऊ शकत नाही. या लोकांचे एकच काम आहे - देशाच्या प्रगतीचा द्वेष, भारताच्या योजनांचा द्वेष. आपल्या द्वेषामुळे त्यांना देशाच्या कामगिरीचाही विसर पडतो. तुम्हीच पहा, आज संपूर्ण जग भारताचे गुणगान करत आहे. आज जगात भारताचा गौरव ऐकू येत आहे की नाही? आज जग भारतामध्ये आपले भविष्य पाहतो. परंतु जे राजकारणात गुंतले आहेत, खुर्चीपुढे ज्यांना अन्य काही दिसत नाही, त्यांना आज जगात भारताचा आवाज बुलंद झाला आहे, तेही आवडत नाही.
भारत, विचार करा मित्रहो, 9 वर्षांमध्ये दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकाची आर्थिक ताकद बनला आहे. मात्र, असे झालेच नाही, हे सिद्ध करण्यात विरोधक गुंतले आहेत. पुढील कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, अशी हमी मोदींनी दिली आहे. त्यामुळे काही सत्तेसाठी भुकेल्या लोकांच्या पोटात दुखत आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
या विकासविरोधी लोकांना देशाने 6 दशके दिली होती. 60 वर्षे हा काही कमी काळ नाही. जर नऊ वर्षांमध्ये एवढे काम होऊ शकते, तर साठ वर्षांमध्ये किती होऊ शकले असते, त्यांनाही संधी मिळाली होती. ते करू शकले नाहीत, हे त्यांचे अपयश आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
मोदींनी गरीब, दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबांना कायमस्वरूपी घरांची हमी दिली आहे. आतापर्यंत या अंतर्गत देशातील 4 कोटी कुटुंबांना त्यांची कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. इथे मध्यप्रदेशातही आजवर लाखो घरे गरीब कुटुंबांना देण्यात आली आहेत आणि आजही एवढ्या मोठ्या प्रमाणात घरांचे लोकार्पण झाले आहे. दिल्लीत या लोकांचे सरकार असताना गरिबांच्या घरांच्या नावावर फक्त लूटमारच होत होती. या लोकांनी बांधलेली घरे राहण्यालायक सुद्धा नव्हती. देशभरात असे लाखो लाभार्थी आहेत ज्यांनी त्या घरांमध्ये पायही ठेवला नाही. मात्र,आज बांधल्या जात असलेल्या घरांमध्ये गृह प्रवेश आनंदाने होत आहे. कारण प्रत्येक लाभार्थी बंधू आणि भगिनी आपल्याला हवी तशी ही घरे बांधत आहेत. आपल्या स्वप्नांनुसार, आपापल्या गरजांनुसार गृहनिर्माण होत आहे.
आमचे सरकार, जस जसे काम होत जाते, तस तशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यावर देखरेख ठेवते आणि थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवते. कोणतीही चोरी (निधीची गळती) होत नाही, कुठे मधले दलाल नाहीत, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही. त्यांच्या घराचे बांधकाम पुढे सरकत जाते. पूर्वी घराच्या नावावर फक्त चार भिंती उभ्या रहात असत. आज जी घरे मिळत आहेत, त्यात शौचालय, वीज, नळाचे पाणी, उज्ज्वला गॅस, सर्व काही एकत्र उपलब्ध आहे. आज इथे, ग्वाल्हेर आणि श्योपूर जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या जलप्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधल्या घरांनाही पाणीपुरवठा होण्यास मदत मिळणार आहे.
मित्रांनो
या घरांच्या लक्ष्मी म्हणजेच माझ्या माता-भगिनी याच या घरांच्या मालकही राहतील याचीही हमी मोदींनी दिली आहे. तुम्हाला माहित आहे ना की पीएम आवास योजनेतील घरेही महिलांच्या नावावर नोंदणीकृत होतात? प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरांच्या माध्यमातून कोट्यवधी भगिनी लक्षाधीश झाल्या आहेत. लाखो किमतीची ही घरे, ज्यांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही, अशांच्या नावावर नोंदवण्यात आली आहेत. आजही वाटप झालेली बहुतांश घरे भगिनींच्या नावावर नोंदणीकृत केलेली आहेत.
आणि बंधू आणि भगिनींनो,
मोदींनी आपली हमी पूर्ण केली आहे. मला तुम्हा भगिनींकडूनही हमी हवी आहे. मला जरा भगिनींना विचारायचे आहे, मी तर माझी हमी पूर्ण केली आहे, तुम्ही एक हमी द्याल का? तुम्ही मला हमी द्याल, नक्की द्याल? तर मला अशी हमी हवी आहे, की घर मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे, त्यांना काही कौशल्ये शिकवायची आहेत, तुम्ही हे कराल?..... तुमची ही हमी मला काम करण्यासाठी बळ देते.
माझ्या कुटुंबियांनो,
महिला सक्षमीकरण ही भारतासाठी मतपेढी नसून राष्ट्र कल्याण आणि राष्ट्र उभारणीसाठी समर्पित एक वसा आहे. यापूर्वी अनेक सरकारे आली आणि गेली, हे आपण पाहिले आहे. लोकसभा आणि संसदेत 33 टक्के आरक्षणाची खोटी आश्वासने देऊन आमच्या भगिनींची वारंवार मते मागितली गेली. मात्र संसदेत कारस्थान करुन त्यासाठीचा कायदा बनण्यापासून रोखला गेला, तो पुन्हा पुन्हा रोखण्यात आला. मात्र, मोदींनी भगिनींना हमी दिली होती. आणि मोदींची हमी म्हणजे प्रत्येक हमीच्या पूर्ततेची हमी!
आज नारी शक्ती वंदन कायदा वास्तवात उतरला आहे. मी या सभेत आणि यापुढेही सांगत राहीन की विकासाच्या या गाथेमध्ये आपल्या मातृशक्तीचा सहभाग वाढेल आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल अशाच पद्धतीने आपल्याला पुढे जावे लागेल.
बंधू भगिनींनो,
आज हा कायदा झाल्यामुळे, आम्ही राबवलेल्या सर्व विकास प्रकल्पांना बळ मिळणार आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
ग्वाल्हेर-चंबळ आज संधींची भूमी बनत आहे.मात्र परिस्थिती नेहमीच अशी नव्हती. अनेक दशके सरकारमध्ये राहिलेल्या आणि आज इथे मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांचा गतइतिहास काय सांगतो? आपले युवा सहकारी, पहिल्यांदाच मतदार झालेले आमचे युवा मित्र-मैत्रिणी, यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात फक्त भाजपाचे सरकार पाहिले आहे. त्यांनी तर एक पुरोगामी प्रगतिशील मध्य प्रदेश पाहिला आहे. विरोधी पक्षांच्या या बोलघेवड्या नेत्यांना मध्य प्रदेशात अनेक दशके राज्य करण्याची संधी मिळाली आहे.
यांच्या राजवटीत ग्वाल्हेर-चंबळमध्ये अन्याय-अत्याचारच फोफावले. यांच्या राजवटीत सामाजिक न्याय कायम उपेक्षितच राहिला. त्यावेळी दुर्बल, दलित, मागासलेल्या लोकांचे कुणीच काही ऐकत नसत. लोक कायदा हातात घेत असत. सर्वसामान्यांना रस्त्यावरून चालणे फिरणे कठीण बनले होते. अथक परिश्रमांनी आपले सरकार या क्षेत्राला आजच्या पातळीवर आणण्यात यशस्वी झाले आहे. आता इथून मागे वळून पाहण्याची गरज नाही.
पुढील ५ वर्षे मध्य प्रदेशसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आज पहा, ग्वाल्हेरमध्ये नवीन विमानतळ टर्मिनल बनत आहे, एक उन्नत रस्ता बनवला जात आहे. इथे हजार खाटांचे नवीन रुग्णालय बांधण्यात आले आहे. नवीन बसस्थानक, आधुनिक रेल्वे स्थानक, नवीन शाळा-महाविद्यालये, एकापाठोपाठ एक संपूर्ण ग्वाल्हेरचा चेहरामोहरा बदलत चालला आहे. अशाच प्रकारे संपूर्ण मध्य प्रदेशचे चित्र बदलायचे आहे आणि म्हणूनच इथे दुहेरी इंजिनचे सरकार आवश्यक आहे.
मित्रहो,
आधुनिक पायाभूत सुविधांमुळे जीवन सुकर तर होतेच पण त्या समृद्धीचा मार्ग देखील आहेत. आजच झाबुआ, मंदसौर आणि रतलाम यांना जोडणाऱ्या 8 मार्गिकांच्या द्रुतगती मार्गाचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे. गेल्या शतकातील मध्य प्रदेशाची 2 मार्गिकावाल्या चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत तगमग व्हायची. तर आज मध्यप्रदेशात 8 मार्गिकांचे द्रुतगती मार्ग तयार होत आहेत. इंदूर, देवास आणि हरदाला जोडणाऱ्या 4 मार्गिकावाल्या रस्त्याचे कामही आज सुरू झाले आहे. रेल्वेच्या ग्वाल्हेर ते सुमावली विभागाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे कामही पूर्ण झाले आहे. आता यामार्गावरील पहिल्या ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीच्या या कामांचा या भागाला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
मित्रहो,
आधुनिक पायाभूत सुविधा आणि उत्तम कायदा व सुव्यवस्थेमुळे मग ते शेतकरी असोत वा उद्योग, व्यापार, व्यवसाय असोत, प्रत्येकाची भरभराट होत असते. जिथे विकासविरोधी सरकारे सत्तेवर येतात तिथे या दोन्ही यंत्रणा कोलमडतात. तुम्ही राजस्थानात बघा, उघडपणे गळे चिरले जातात आणि तिथले सरकार बघत राहात आहे. हे विकासविरोधी लोक जिथे जातात तिथे तुष्टीकरणही येते. त्यामुळे गुंड, गुन्हेगार, दंगेखोर, भ्रष्ट लोक यांच्यावर कोणाचाही अंकुश राहात नाही. महिला, दलित, मागासवर्गीय, आदिवासींवरील अत्याचार वाढत जातात. गेल्या काही वर्षांत या विकासविरोधींच्या राज्यांमध्ये गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार सर्वात जास्त प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशला या लोकांपासून खूपच सावध रहावे लागणार आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
आमचे सरकार प्रत्येक वर्गापर्यंत, प्रत्येक भागापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ज्यांना कोणी विचारत नाही, मोदी त्यांना विचारतात, मोदी त्यांची पूजा करतात. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे, 2014 पूर्वी कोणी दिव्यांग हा शब्द ऐकला होता का? शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्यांना आधीच्या सरकारांनी निराधार अवस्थेत सोडून दिले होते.
हे आमचे सरकार आहे ज्याने, दिव्यांगांची काळजी घेतली, त्यांच्यासाठी आधुनिक उपकरणे उपलब्ध केली आणि त्यांच्यासाठी सामान्य सांकेतिक भाषा विकसित केली. आजच ग्वाल्हेरमध्ये दिव्यांगांसाठी एका नवीन क्रीडा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे ग्वाल्हेरची देशातील एक मोठे क्रीडा केंद्र म्हणून ओळख आणखी बळकट होईल. आणि मित्रांनो, माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा, जगात खेळांची चर्चा होईल, दिव्यांगांच्या खेळांची चर्चा होईल, ग्वाल्हेरला अभिमान वाटेल; लिहून ठेवा.
आणि म्हणूनच मी म्हणतो, ज्यांना कोणी विचारले नाही, त्यांना मोदी विचारतात, मोदी त्यांची पूजा करतात. इतकी वर्षे देशातील लहान शेतकऱ्यांचा कोणीच विचार केला नाही. मोदींनी या लहान शेतकऱ्यांचा विचार केला, त्यांची काळजी केली. आमच्या सरकारने आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक लहान शेतकर्यांच्या खात्यात 28 हजार रुपये पाठवले आहेत. आपल्या देशात 2.5 कोटी लहान शेतकरी भरडधान्य पिकवतात. भरडधान्य पिकवणार्या लहान शेतकर्यांची पूर्वी कोणीच काळजी केली नव्हती. आमच्या सरकारनेच बाजरीला 'श्री-अन्न' ही ओळख दिली आहे आणि ती जगभरातील बाजारपेठांमध्ये नेली जात आहे.
मित्रहो,
आमच्या सरकारच्या याच भावनेचा आणखी एक मोठा दाखला म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना आहे. आमचे कुंभार बंधू-भगिनी, लोहार बंधू-भगिनी, सुतार बंधू-भगिनी, सोनार बंधू-भगिनी, माळा तयार करणारे बंधू-भगिनी, शिंपी बंधू-भगिनी, धोबी बंधू-भगिनी, पादत्राणे बनवणारे भाऊ-बहीण, केश कर्तनाचा व्यवसाय करणारे बंधू-भगिनी, अशी अनेक कामे करणाऱ्या लोकांसाठी आमचे सहकारी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पना करणे अशक्य आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतर आता आमच्या सरकारने त्यांची दखल घेतली आहे.
हे सहकारी समाजात मागे पडले होते, आता त्यांना पुढे आणण्याचे सर्वात मोठे अभियान मोदी यांनी चालवले आहे. या सहकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकार हजारो रुपये देईल. आधुनिक उपकरणांसाठी 15 हजार रुपये सरकार देईल. लाखो रुपयांचे स्वस्त कर्ज देखील या सहकाऱ्यांना दिले जात आहे. विश्वकर्मा सहकाऱ्यांना कर्ज देण्याची हमी मोदी यांनी घेतली आहे, केंद्र सरकारने घेतली आहे.
माझ्या कुटंबियांनो,
देशाच्या विकासाचे विरोधक असलेल्या राजकीय पक्षांचे मध्य प्रदेशला पिछाडीवर नेण्याचे मनसुबे आहेत. तर आमचे डबल इंजिनचे सरकार भविष्याचा विचार करणार आहे. म्हणूनच विकासाबाबत केवळ आणि केवळ डबल इंजिन सरकारवरच विश्वास ठेवता येऊ शकतो. विकासाच्या संदर्भात मध्य प्रदेशला देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये आणण्याची हमी केवळ आमचे सरकार देऊ शकते.
मी आताच, शिवराजजी सांगत होते की स्वच्छतेच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात अव्वल आहे. आज गांधी जयंती आहे, गांधीजी स्वच्छतेविषयी बोलायचे. काल संपूर्ण देशात स्वच्छतेचा कार्यक्रम झाला. एका तरी काँग्रेस कार्यकर्त्याला तुम्ही स्वच्छता करताना पाहिले आहे का? स्वच्छता करण्यासाठी आवाहन करताना पाहिले आहे का? मध्य प्रदेशचे नाव स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल झाले आहे ही बाब काँग्रेसवाल्यांना आवडलेली नाही, ते मध्य प्रदेशचे तरी भले काय करणार आहेत भाऊ? अशा लोकांवर विश्वास ठेवता येईल का?
आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांना हा आग्रह करेन की बंधू-भगिनींनो विकासाचा हा वेग आणखी वाढवायचा आहे. खूप जास्त प्रमाणात वाढवायचा आहे आणि आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आला आहात मी ग्वाल्हेर-चबंळच्या सहकाऱ्यांचे इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी येथे आल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो.
माझ्या सोबत बोला-
भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
खूप-खूप धन्यवाद.