भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
रेल्वेच्या क्षेत्रात आज मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन राष्ट्राला समर्पित करतांना मला अत्यंत आनंद होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, महाराष्ट्राचे मंत्री, सर्व खासदार, आमदार, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनिनो
आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी, विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक दळणवळणव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आज पहिल्यांदाच एकाचवेळी दोन वंदे भारत गाड्या सुरू झाल्या आहेत. या वंदे भारत गाड्या, मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना आपल्या श्रद्धास्थानांशी जोडणार आहे. यामुळे, कॉलेजला येणारे, नोकरी आणि व्यवसायासाठी येणारे लोक, शेतकरी आणि भाविक सर्वांना यामुळे सुविधा मिळणार आहे. ह्या गाड्या महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रेला मोठी चालना देणारी आहे. शिर्डीत साईबाबांचे दर्शन करायचे असेल, नाशिकच्या रामकुंड इथे जायचे असेल,त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीला जायचे असेल, तर नवी वंदे भारत गाडी अत्यंत सोयीची ठरणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन मुळे, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, किंवा मग आई तुळजाभवानीचे दर्शन खूप सुलभ होणार आहे.आणि मला माहिती आहे, की जेव्हा वंदे भारत ट्रेन सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून पुढे जाईल, तेव्हा या ट्रेनमधल्या प्रवाशांना अत्यंत विलोभनीय अशा निसर्गसौंदर्याचाही अनुभव घेता येणार आहे. मी मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांचे या नव्या वंदे भारत ट्रेनसाठी खूप खूप अभिनंदन करतो देतो.
मित्रांनो,
ही वंदे भारत ट्रेन आजच्या आधुनिक होत असलेल्या भारताची अतिशय रुबाबदार प्रतिमा आहे. ही भारताची गती आणि व्याप्ती या दोन्हीचे प्रतिबिंब आहे. आपण बघू शकता, की किती वेगाने भारत आज वंदे भारत ट्रेन सुरू करत आहे. आतापर्यंत अशा 10 गाड्या देशभरात सुरू झाल्या आहेत.
मला आठवतंय, एक काळ असा होता की, जेव्हा खासदार पत्र लिहून विनंती करत असत की आमच्या मतदारसंघात, रेल्वे स्थानकावर गाडी थांबवण्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी, एक दोन मिनिटांचा थांबा मंजूर करावा. आता देशभरातील खासदार जेव्हा भेटतात तेव्हा मागणी करतात, आग्रह करतात की आमच्या क्षेत्रात देखील वंदे भारत रेल्वेगाडी सुरु करा. वंदे भारत गाड्यांचे आज आकर्षण निर्माण झाले आहे.
मित्रांनो,
आज मुंबईतील जनतेचे जीवन अधिक सुलभ करणारे प्रकल्प देखील येथे सुरु झाले आहेत हे पाहून मला आनंद झाला आहे. आज ज्या उन्नत मार्गीकेचे उद्घाटन होत आहे तो मुंबईच्या पूर्व-पश्चिम भाग जोडणीची गरज पूर्ण करेल.मुंबईतील लोक बऱ्याच काळापासून या सुविधेच्या प्रतीक्षेत होते. दररोज दोन लाखांहून अधिक गाड्या या मार्गिकेचा वापर करून प्रवास करू शकणार आहेत, यामुळे लोकांच्या वेळेची देखील बचत होणार आहे.आता या मार्गीकेमुळे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील उपनगरी भाग एकमेकांना अधिक उत्तम प्रकारे जोडले जाणार आहेत. कुरार येथील अंडरपास देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईकरांचे विशेष अभिनंदन करणार आहे.
मित्रांनो,
एकविसाव्या शतकातील भारताला अत्यंत वेगाने देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा कराव्या लागतील. जितक्या जलदगतीने आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधुनिक होत जाईल तितकेच देशातील नागरिकांची जीवन जगण्यातील सुलभता वाढेल. त्यांच्या जीवनाच्या दर्जात सुखदायक सुधारणा होईल. याच विचारांसह आज देशात आधुनिक रेल्वेगाड्या चालविल्या जात आहेत, मेट्रो सेवेचा विस्तार होतो आहे, नवनवे विमानतळ आणि बंदरे उभारली जात आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा देशाचा अर्थसंकल्प सादर झाला,त्यामध्ये देखील याच कल्पनेला सशक्त करण्यात आले आहे, आणि आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्याची तोंडभरून प्रशंसा देखील केली. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच, केवळ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दहा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या नऊ वर्षांच्या तुलनेत, पाचपटींनी अधिक आहे आणि यात देखील रेल्वे विभागाचा वाटा जवळजवळ अडीच लाख कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्राकरिता देखील रेल्वे विभागासाठीच्या तरतुदीत ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे.मला असा विश्वास वाटतो की दुहेरी इंजिन सरकारच्या दुप्पट प्रयत्नांमुळे, महाराष्ट्रामध्ये संपर्क सुविधा अधिक वेगाने आधुनिक होत जातील.
मित्रांनो,
पायाभूत सुविधांमध्ये गुंतवला गेलेला प्रत्येक रुपया, नव्या रोजगारांच्या संधी निर्माण करत असतो. यात जे सिमेंट लागते, वाळू लागते, लोखंड लागते, बांधकामासाठी यंत्रसामुग्री लागते, याच्याशी संबंधित प्रत्येक उद्योगाला यामुळे बळ मिळते. यामुळे व्यापार करणाऱ्या मध्यमवर्गीयांना लाभ होतो, गरीबांना रोजगार मिळतो, यामुळे अभियंत्यांना काम मिळते, मजुरांना रोजगार मिळतो , म्हणजे पायाभूत विकास प्रकल्पाची निर्मिती होते तेव्हा सर्वाना रोजगार मिळतो, कमाई होते, आणि जेव्हा तयार होतो, तेव्हा देखील नवीन उद्योगांना व्यवसायाचे नवे मार्ग खुले करतो.
बंधू भगिनींनो,
यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला कशा प्रकारे मजबुती देण्यात आली आहे याबाबत मी मुंबईच्या लोकांना खास सांगू इच्छितो, पगारदार वर्ग असो किंवा व्यापार -व्यवसायातून कमावणारा मध्यमवर्गीय, या दोघांना या अर्थसंकल्पाने खुश केले आहे. तुम्ही पहा, 2014 पूर्वी काय स्थिती होती, जी व्यक्ती वर्षातून दोन लाख रुपये जास्त कमावत होती, त्यावर कर आकारला जात होता. भाजपा सरकारने आधी 5 लाख रुपये उत्पन्नावर करसवलत दिली आणि या अर्थसंकल्पात ती मर्यादा सात लाखा रुपयांपर्यंत वाढवली. आज ज्या कमाईवर मध्यमवर्गीय कुटुंबाचा कर शून्य आहे, त्यावर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार 20 टक्के कर आकारत होती. आता हे युवा मित्र , ज्यांची नवी नवी नोकरी लागली आहे, ज्यांचे मासिक उत्पन्न 60-65 हजार रुपयांपर्यंत आहे, ते आता जास्त गुंतवणूक करू शकतील. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी काम करणारे सरकार असेच निर्णय घेते. मित्रानो, मला पूर्ण विश्वास आहे कि सबका विकासद्वारे , सबका प्रयास भावनेला सशक्त करणारा हा अर्थसंकल्प प्रत्येक कुटुंबाला बळ देईल. आपण सर्वांना विकसित भारताच्या निर्मितीसाठी प्रोत्साहित करेल . पुन्हा एकदा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचे अर्थसंकल्प आणि नव्या रेल्वेगाड्यांसाठी खूप खूप अभिनंदन करतो. अनेक शुभेच्छा देतो, तुम्हा सर्वांना
खूप धन्यवाद!