केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अश्विनी वैष्णव, दर्शनाबेन जर्दोश, गुजरातच्या मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार आणि आमदार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो !
गुजरातच्या विकासासाठी, गुजरातच्या संपर्क व्यवस्थेच्या दृष्टीने आज फार महत्त्वपूर्ण दिवस आहे. गुजरातचे लाखो लोक एका मोठ्या क्षेत्रात ब्रॉड गेज लाईन नसल्यामुळे त्रस्त होते, त्यांना आजपासून खूप मोठा दिलासा मिळणार आहे. थोड्याच वेळापूर्वी मला असारवा रेल्वे स्थानकावर असारवा ते उदयपूर जाणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. लूणीधर ते जेतलसर स्थानकांदरम्यान मोठ्या लाईनवर चालणाऱ्या रेल्वेंनाही आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
मित्रांनो,
आजचे हे आयोजन फक्त दोन रेल्वे मार्गावर दोन गाड्या चालवणे इतकेच नव्हते. हे किती मोठे कार्य संपन्न झाले आहे याचा अंदाज बाहेरचे लोक सहजासहजी लावू शकत नाहीत. हे काम पूर्ण होण्याची वाट पाहण्यात अनेक दशके उलटून गेली. पण हे काम पूर्ण होण्याचे सौभाग्य माझ्याच खात्यामध्ये लिहिलेले होते.
मित्रांनो,
बिना ब्रॉड गेजची रेल्वे लाईन एका निर्जन बेटाप्रमाणे असते. म्हणजे कोणाशीही संपर्क नसलेली. हे तसेच आहे, जसे की बिना इंटरनेटचा कंप्युटर, बिना कनेक्शनचा टीव्ही, बिना नेटवर्कचा मोबाईल. या मार्गावर चालणाऱ्या रेल्वे देशातील इतर राज्यात जाऊ शकत नव्हत्या आणि इतर राज्यातील रेल्वे इकडे येऊ शकत नव्हत्या. आज या रेल्वे मार्गाचा कायापालट झाला आहे. आता असारवा ते उदयपूर व्हाया हिम्मतनगर ही मीटर गेज लाईन ब्रॉड गेज लाईनमध्ये परावर्तित झाली आहे. आणि आज या आपल्या कार्यक्रमाला गुजरातसोबतच राजस्थानातील लोक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. लूणीधर ते जेतलसर दरम्यान जे गेज परिवर्तनाचे काम झाले आहे, ते देखील या क्षेत्रातील रेल्वे संपर्क सुगम बनवेल. येथून निघणारी ट्रेन देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकेल.
मित्रांनो,
जेंव्हा एखाद्या मार्गावर मीटर गेज लाईन ब्रॉड गेजमध्ये बदलली जाते तेंव्हा ती आपल्यासोबत अनेक नव्या संधी घेऊन येते. असारवा ते उदयपूर पर्यंत सुमारे 300 किलोमीटर लांब रेल्वे लाईन, त्याचे ब्रॉड गेजमध्ये झालेले रुपांतर यासाठीही महत्वपूर्ण आहे. या रेल्वे मार्गाच्या भागाचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर झाल्यामुळे गुजरात आणि राजस्थान मधले आदीवासी बहुल भाग दिल्लीला जोडले जातील, उत्तर भारताला जोडले जातील. या रेल्वे मार्गाच्या भागाचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर झाल्यामुळे अहमदाबाद आणि दिल्लीसाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध झाला आहे. इतकेच नाही तर आता कच्छमधली पर्यटन स्थळे आणि उदयपूरमधली पर्यटन स्थळे यांच्या दरम्यानही एक थेट रेल्वे संपर्क सुविधा स्थापित होईल. यामुळे कच्छ, उदयपूर, चित्तौड़गढ़ आणि नाथद्वाराच्या पर्यटन स्थळांना प्रोत्साहन मिळेल. येथील व्यापाऱ्यांना दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादसारख्या मोठ्या औद्योगिक केंद्रांशी थेट जोडले जाण्याचा लाभ मिळेल. विशेषत: हिम्मतनगरच्या टाईल्स उद्योगाला तर खूप मोठी मदत होणार आहे. याच प्रकारे लूणीधर जेतलसर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज झाल्यामुळे आता ढसा ते जेतलसर खंड पूर्णपणे ब्रॉड गेज लाईनमध्ये परावर्तित झाला आहे. हा रेल्वे मार्ग बोटाद, अमरेली आणि राजकोट या जिल्ह्यातून जातो, जिथे आतापर्यंत सिमित रेल्वे संपर्क सुविधा होती. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता भावनगर आणि अमरेली या भागातील लोकांना सोमनाथ आणि पोरबंदर बरोबर थेट संपर्काचा लाभ मिळणार आहे.
आणि मित्रांनो, याचा आणखी एक फायदा होणार आहे. या मार्गामुळे भावनगर आणि सौराष्ट्र क्षेत्राच्या आपल्या राजकोट पोरबंदर आणि वेरावल अशा शहरांमधले अंतर देखील कमी झाले आहे. सध्या भावनगर-वेरावळ हे अंतर सुमारे 470 किलोमीटर आहे. या प्रवासासाठी 12 तास लागतात. हे ब्रॉड गेजचे काम पूर्ण झाल्यानंतर, नवा मार्ग सुरू झाल्यामुळे हे अंतर कमी होऊन 290 किलोमीटर झाले आहे. यामुळे प्रवासाचा वेळही पूर्वीच्या 12 तासांहून कमी होऊन साडे सहा तास झाला आहे.
मित्रांनो,
नवा मार्ग सुरू झाल्यानंतर भावनगर-पोरबंदरमधील अंतर सुमारे 200 किलोमीटर आणि भावनगर-राजकोट दरम्यानचे अंतर सुमारे 30 किलोमीटरने कमी झाले आहे. हा रेल्वे मार्ग अतिशय वर्दळ असणाऱ्या सुरेन्द्रनगर-राजकोट-सोमनाथ-पोरबंदर या मार्गासाठी एका पर्यायी मार्गाच्या रुपात उपलब्ध झाला आहे.
ब्रॉडगेज मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमुळे गुजरातच्या औद्योगिक विकासालाही गती मिळेल, गुजरातमधील पर्यटनही त्यामुळे सहजसाध्य होईल आणि देशातील दुर्गम असलेल्या विभागांना देशातील इतर भागांशी पुन्हा जोडेल. आज, राष्ट्रीय एकता दिनाच्या दिवशी,या परियोजनांचा आरंभ करणे,हे विशेष महत्त्वाचे ठरते.
मित्रांनो,
जेव्हा दुहेरी इंजिनचे सरकार काम करते तेव्हा त्याचा परिणाम केवळ दुप्पट नाही तर अनेक पटीने जास्त होत असतो. येथे आणि एक अधिक एक एकत्र येत दोनच होतात असे नाही तर एक च्या पुढे एक, अकरा अशी शक्ती वाढते. गुजरातमधील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास हेही यांचे एक असेच उदाहरण आहे. 2014 पूर्वी मला गुजरातमधील नवीन रेल्वे मार्गांच्या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे वारंवार जावे लागत असे, ते दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. पण, तेव्हाही इतर क्षेत्रांप्रमाणेच रेल्वेच्याबाबतीतही गुजरातला अन्यायकारक वागणूक मिळत असे. दुहेरी इंजिनाच्या 'सरकार' मुळे गुजरातमधील कामांचा वेग वाढला आहे. 2009 ते 2014 या कालावधीत सव्वाशे किलोमीटरच्यापेक्षाही कमी लांबीच्या रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण झाले होते, पण 2014 ते 2022 दरम्यान पाचशे पेक्षा अधिक लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण गुजरातमध्ये आता झाले आहे. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये 2009 ते 2014 दरम्यान सुमारे 60 किमी लांबीच्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात झाले होते,तर 2014 ते 2022 दरम्यान 1700 किमी पेक्षा जास्त लांबीच्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच ‘डबल इंजिन’ सरकारने पूर्वीपेक्षा ‘कित्येक पटींनी जास्त काम’ करून दाखवले आहे.
आणि मित्रांनो, आम्ही फक्त कामाचे प्रमाण वाढवले आणि वेग सुधारला नाही तर अनेक स्तरांवर सुधारणा केली आहे. ही सुधारणा गुणवत्तेत झाली आहे, सोयीसुविधांमधे झाली आहे, सुरक्षेत झाली आहे, स्वच्छतेत झाली आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांची स्थिती आज सुधारली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही आता तेच वातावरण मिळत आहे, जे पूर्वी केवळ भल्याभल्यांनाच उपलब्ध होते. गांधीनगर स्थानक किती आधुनिक आणि भव्य झाले आहे हे तुम्ही पाहतच आहात. आता अहमदाबाद स्थानकाचाही असाच विकास केला जात आहे. याशिवाय भविष्यात सुरत, उधना, साबरमती, सोमनाथ, न्यू भुज ही स्थानकेही नव्या रूपात आधुनिक अवतारात समोर येऊ लागली आहेत. आता गांधीनगर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सेवाही सुरू झाली आहे. या मार्गावर सर्वात वेगवान रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे हा देशातील सर्वात महत्त्वाचा बिझनेस कॉरिडॉर बनला आहे.हे यश केवळ डबल इंजिन सरकारमुळेच शक्य झाले आहे.
मित्रांनो,
पश्चिम रेल्वेच्या विकासाला नवे परिमाण देण्यासाठी 12 गती शक्ती कार्गो टर्मिनलची योजनाही तयार करण्यात आली आहे. बडोदा मंडल विभागात पहिला गती शक्ती मल्टीमॉडेल, कार्गो टर्मिनल, सुरू करण्यात आले आहे.लवकरच उर्वरित टर्मिनलही त्यांच्या सेवा पुरविण्यासाठी सज्ज होतील.दुहेरी इंजिनच्या सरकारमुळे प्रत्येक क्षेत्रातील विकासाचा वेगही वाढत आहे आणि त्याची ताकदही वाढत आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतर अनेक दशके आपल्या देशात गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी, गाव-शहरातील दरी, असंतुलित विकास अशी मोठी आव्हान उभी राहिली आहेत. आमचे सरकारही देशासमोरील हे आव्हान सोडवण्यात गुंतलेले आहे. सर्वांच्या विकासाची आमची नीती अगदी स्पष्ट आहे. पायाभूत सुविधांवर भर देणे, मध्यमवर्गीयांना सुविधा देणे आणि गरिबांना गरिबीशी लढण्याचे साधन देणे.विकासाची ही परंपरा आज संपूर्ण देशात रुजली आहे. गरीबांसाठी पक्की घरे, शौचालय, वीज, पाणी, गॅस, मोफत उपचार आणि विमा सुविधा,ही आमच्या सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत. आज मेट्रो कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, स्वस्त इंटरनेट, चांगले रस्ते, एम्स सारख्या संस्था,वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटी, अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा आज देशवासियांना नवीन संधी उपलब्ध करून देत आहेत.सामान्य कुटुंबांचे जीवन सुसह्य कसे करता येईल, याचाच प्रयत्न आहे.दळणवळण, व्यवसाय करणे करणे सोपे कसे करावे सुलभ कसे होईल, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
देशातील कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टिकोनात आता आमूलाग्र बदल झाला आहे. आता इतकंच नाही की तर कुठेतरी रस्ता बांधला गेला, कुठेतरी रेल्वे रुळ टाकला गेला, कुठे तिसर्या ठिकाणी विमानतळ बांधलं गेल,असं होत नाही.आता कनेक्टिव्हिटीसाठी संपूर्ण यंत्रणा सुसज्ज केली जात आहे.
म्हणजे प्रवासाची वेगवेगळी माध्यमे एकमेकांना जोडलेली असतील, हेसुद्धा सुनिश्चित करण्याचे काम केले जात आहे. येथे अहमदाबादमध्येच रेल्वे, मेट्रो आणि बसच्या सुविधा एकमेकांशी जोडल्या जात आहेत. याच प्रकारे अन्य़ शहरांमध्येही काम सुरू आहे. प्रवास असो की मालवाहतूक, सर्व प्रकारे एक सातत्य त्यात रहावे, याच दृष्टीने प्रयत्न जारी आहेत. एका प्रवासाच्या साधनातून बाहेर पडले की लगेच दुस-या प्रवासाच्या साधनात चढणे आता शक्य होत आहे. यामुळे वेळेची बचत तर होईलच पण पैशाचीही बचत होईल.
मित्रांनो, गुजरात एक मोठे असे औद्योगिक केंद्र आहे. येथे पुरवठा साखळीवर होणारा खर्च हा खूप मोठा चिंतेचा विषय होता. त्यामुळे व्यापार उद्योग जगताला अडथळे तर होतेच, पण मालाची किंमतही या वाहतूक खर्चामुळे भरमसाठ वाढत होती. यामुळे आज रेल्वे असो, महामार्ग असोत, विमानतळ असोत की बंदरे असोत. त्यांच्या एकमेकांशी संपर्कव्यवस्थेवर जोर दिला जात आहे. गुजरातचे बंदर जेव्हा सुसज्ज असतात, तेव्हा त्याचा परिणाम पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. याचा अनुभव आम्ही गेल्या 8 वर्षांत घेतला आहे. या कालावधीदरम्यान, गुजरातच्या बंदरांची क्षमता जवळपास दुप्पट वाढली आहे. आता पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेद्वारे गुजरातच्या बंदरांना देशाच्या अन्य भागांशी जोडले जात आहे. या योजनेच्या एका मोठ्या भागाचे कामही पूर्णही झाले आहे. मालगाड्यांसाठी जे स्वतंत्र रूळ टाकले जात आहेत, त्यामुळे गुजरातेतही उद्योगांचा मोठा विस्तार होणार आहे. नवीन क्षेत्रांसाठी संधीही उपलब्ध होणार आहेत. अशाच प्रकारे, सागरमाला योजनेंतर्गत सर्व किनारपट्टीच्या प्रदेशात चांगल्या रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे.
मित्रांनो, विकास एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. विकासाशी जोडली गेलेली लक्ष्ये ही एखाद्या पर्वत शिखरांप्रमाणे असतात. एका शिखरावर चढले की लगेच दुसरे शिखऱ खुणावू लागते. पुन्हा त्या शिखरापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न सुरू होतात. विकास ही सुद्धा अशीच एक प्रक्रिया आहे. गेल्या 20 वर्षात गुजरातने विकासाची अनेक शिखरे सर केली आहेत. परंतु येत्या 25 वर्षांत विकसित गुजरातचे एक अतिविशाल लक्ष्य आमच्या समोर आहे. ज्या प्रकारे गेल्या दोन दशकांमध्ये आम्ही सर्वांनी मिळून यश साध्य केले आहे, त्याचप्रकारे अमृतकाळातही प्रत्येक गुजराती माणसाला झोकून देऊन काम करायचे आहे, प्रत्येक गुजरातवासियाला झोकून देऊन काम करायचे आहे. विकसित भारतासाठी विकसित गुजरातचे निर्माण करायचे, हेच आमचे ध्येय आहे. आणि आम्हा सर्वांना हे माहीतच आहे की एकदा गुजराती माणसाने एखादा निश्चय मनाशी केला की तर तो पूर्ण करूनच मग तो विसावा घेतो. याच संकल्पबोधासह, मी आज विचार करतो की, आज सरदार पटेल यांची जन्मजयंती आहे. देशासाठी गौरवाचा क्षण आहे. ज्या पुरूषने, ज्या महापुरूषाने हिंदुस्थानाला जोडले, हिंदुस्थानाला एकत्र आणले, आज त्या ऐक्याचा लाभ आम्ही घेत आहोत. सरदार वल्लभ भाई पटेल देशाचे पहिले गृहमंत्री होते. देशाला जोडण्याचे काम त्यांनी केले होते. प्रत्येक हिंदुंस्थानी नागरिकाला वल्लभभाई यांच्याबद्दल अभिमान वाटतो, वाटतो की नाही? अभिमान होतोच. सरदार वल्लभभाई पटेल भाजपचे होते? ते तर भाजपचे नव्हते. सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ नेते राहिले होते. आज त्यांच्या जयंतीदिनी दोन वर्तमानपत्रे माझ्या वाचण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या राजस्थान सरकारने गुजराती वर्तमानपत्रांमध्ये पूर्ण पानभर जाहिरात छापून आणली आहे. काँग्रेसच्या सरकारची जाहिरात, पण त्यात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त जाहिरातीत न सरदार पटेल यांचे नाव नाही की सरदार पटेल यांचे छायाचित्र नाही. सरदारांना श्रद्धांजलीही अर्पण केली नाही. हा अपमान आणि तोही गुजरातच्या धरतीवर केला आहे. जी काँग्रेस सरदार पटेल यांना आपल्यासमवेत जोडू इच्छित नाही, ती काय देश जोडू शकणार आहे? हा सरदार साहेबांचा अपमान आहे, हा देशाचा अपमान आहे. सरदार तर भाजपचे नव्हते, ते तर काँग्रेसचे होते. परंतु देशासाठी जगले आणि देशासाठी काही तरी महान कार्य करून गेले. आज आम्हाला त्यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा बनवून अभिमान वाटतो, पण काँग्रेस त्यांचे नावही घ्यायला तयार नाही.
बंधु भगिनींनो,
गुजरात असे गोष्टींना, कामांना कधीही माफ करणार नाही. देशही कधीच माफ करणार नाही. मित्रांनो, ही रेल्वे जोडण्याचेही काम करत आहे. उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम जोडण्याच्या प्रक्रियेला गती देणे, त्याचा विस्तार करण्याचे काम निरंतर सुरू आहे. जोरदार गतीने सुरू आहे. आणि त्याचा एक लाभ आज आपल्यालाही मिळत आहे. माझ्या वतीने आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद.