पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर आणि मार्गदर्शक नेतृत्वाखाली उत्पादन क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या विविध सहाय्यक उपाययोजनांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला आणखी गती मिळाली आहे : जपानचे पंतप्रधान किशिदा
“मारुती-सुझुकीचे यश हे भारत-जपानच्या मजबूत भागीदारीचे प्रतीक आहे ”
"गेल्या आठ वर्षांत भारत आणि जपानमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत"
"जेव्हा या मैत्रीबाबत बोलले जाते तेव्हा प्रत्येक भारतीयाला आपले मित्र माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांची आठवण येते
"आमच्या प्रयत्नांमध्ये जपानबद्दल नेहमीच गांभीर्य आणि आदर आहे, त्यामुळेच गुजरातमध्ये सुमारे 125 जपानी कंपन्या कार्यरत आहेत"
"पुरवठा, मागणी आणि परिसंस्थेच्या बळकटीकरणामुळे, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र निश्चितच प्रगती करेल"

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री भाई श्रीकृष्ण चौटाला, संसदेतले माझे सहकारी सी.आर पाटील, सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी मंडळी, भारतातील  जपानचे राजदूत, मारूती-सुझुकीचे वरिष्ठ अधिकारी, आणि इतर मान्यवर तसेच बंधू आणि भगिनींनो,  

सर्वात प्रथम मी सुझुकी आणि सुझुकी परिवाराबरोबर जोडले गेलेल्या सर्व लोकांचे हार्दिक अभिनंदन करतो.

भारत आणि भारतातल्या लोकांबरोबर सुझुकी कुटुंबाचे नाते आता 40 वर्षांचे झाले आहे. आज एकीकडे गुजरातमध्ये इलेक्ट्रिक वाहन बॅटरीचे उत्पादन करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केली जात आहे तर त्याचबरोबर हरियाणामध्ये नवीन कार निर्मितीच्या सुविधेचा प्रारंभही होत आहे.

मला असे वाटते की, हा विस्तार भविष्यामध्ये सुझुकीसाठी अनेक शक्यतांचा आधार बनेल. यासाठी  मी सुझुकी मोटारचे, या विशाल परिवारातल्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे. विशेष रूपाने, मी ओसामू सुझुकी आणि श्रीमती तोषी-रिहिरो सुझुकी या दोघांचेही अभिनंदन करतो आहे. ज्यावेळी तुम्ही मला भेटत असता, त्यावेळी भारतामध्ये सुझुकीच्या नवीन ‘व्हिजन’चे चित्र समोर दाखवत असता.  अगदी याचवर्षी मे महिन्यात आमची ज्यावेळी  भेट झाली, त्यावेळी त्यांनी मला 40 व्या वर्षाच्या कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला होता. अशा भविष्यातील उपक्रमाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार बनणे माझ्यासाठी एक सुखद अनुभव आहे.

मित्रांनो,

मारूती - सुझुकी यांचे यश म्हणजे भारत -जपान यांच्यामध्ये असलेल्या मजबूत भागीदारीचेही प्रतीक आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये तर आम्ही दोन्ही देशांमधले हे नाते, नवीन उंचीवर नेले आहे. आज गुजरात –महाराष्ट्रामध्ये बुलेट ट्रेनपासून उत्तर प्रदेशमध्ये बनारसच्या रूद्राक्ष केंद्रापर्यंत, विकासाचे कितीतरी प्रकल्प भारत-जपान यांच्यातील मैत्रीचे उदाहरण आहेत. आणि अशा मैत्रीची ज्यावेळी चर्चा होते, त्यावेळी प्रत्येक भारतवासीयाला आमचे मित्र दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांची आठवण नक्कीच होते. आबे -सान ज्यावेळी गुजरात आले होते, त्यांनी जो काळ इथे व्यतीत केला, त्या काळाची गुजरातचे लोक खूप आत्मीयतेने आठवण काढतात. आपल्या देशांना अधिक जवळ आणण्यासाठी जे प्रयत्न त्यांनी केले होते, तेच कार्य आज पंतप्रधान किशिदा पुढे नेत आहेत. आत्ताच आपण पंतप्रधान किशिदा यांचा दृकश्राव्य संदेशही पाहिला-ऐकला. यासाठी मी पंतप्रधान किशिदा आणि जपानच्या सर्व नागरिकांचे भारताच्या वतीने अभिनंदन करतो.

मित्रांनो,

याप्रसंगी मी, गुजरात आणि हरियाणाच्या लोकांनाही अनेक-अनेक शुभेच्छा देतो. कारण  या राज्यांचे लोक  देशाच्या औद्योगिक विकासाला  आणि ‘मेक इन इंडिया’ला सातत्याने गती देत आहेत. या दोन्ही राज्यांतल्या सरकारांचे जी विकासपुरक, उद्योगपुरक धोरणे  आहेत, ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या दिशेने जे प्रयत्न केले जात आहेत, त्याचा लाभ कोट्यवधी राज्यवासियांना आणि विशेषतः युवकांना मिळत आहे.

मित्रांनो,

या विशेष कार्यक्रमामध्ये आज मला अनेक जुन्या गोष्टींची आठवण येणे  स्वाभाविक आहे. मला चांगले आठवते की, 13 वर्षांपूर्वी सुझुकी कंपनी आपला निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी गुजरातमध्ये आली होती. त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो की,‘‘ जसं-जसे आपले मारूतीचे मित्र गुजरातचे पाणी प्यायला लागतील, तसं-तसे त्यांना चांगले समजेल की, विकासाचे अगदी ‘परफेक्ट मॉडेल’ कुठे आहे?’’ आज मला आनंद वाटतो की, गुजरातने सुझुकीला स्वीकारले, आपलेसे केले, आणि दिलेले वचन चांगल्या पद्धतीने निभावले. सुझुकीनेही  गुजरातचे  म्हणणे तितक्याच आदराने स्वीकारले. आज गुजरात देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये ‘टॉप ऑटो-मोटिव्ह’ उत्पादनाचे केंद्र म्हणून समोर आले आहे.

मित्रांनो,

आजच्या याप्रसंगी, ज्यामध्ये मी गुजरात आणि जपानच्या आत्मीय ऋणानुबंधांविषयी जितकी चर्चा करेन, तितकी ती कमी असेल. गुजरात आणि जपानच्या दरम्यान जे नाते निर्माण झाले आहे, ते राजनैतिक परिघापेक्षाही खूप मोठे असून, विक्रमी उंचीवर गेले आहे.

मला चांगले स्मरते की, ज्यावेळी 2009 मध्ये ‘व्हायब्रंट गुजरात’च्या शिखर परिषदांच्या आयोजनाला प्रारंभ झाला होता, त्यावेळेपासून जपान एक भागीदार देश म्हणून कायम जोडला गेला आहे. आणि यामध्‍ये खूप मोठी गोष्ट अशी आहे की,  एकीकडे एक राज्य आणि दुसरीकडे एक विकसित देश! अशा दोन्हींची एकमेकांबरोबरची सुरू झालेली वाटचाल ही गोष्ट एकप्रकारे खूप मोठी आहे. आजही ‘व्हायब्रंट गुजरात’ परिषदेमध्ये जपानची भागीदारी सर्वात जास्त असते.

मुख्यमंत्री असताना, मी नेहमीच एक गोष्ट वारंवार म्हणत असे - ‘‘ आय वॉंट टु क्रिएट ए मिनी-जपान इन गुजरात’’ - म्हणजेच मला एक छोटा जपानच या गुजरातमध्ये निर्माण करायचा आहे. यामागे एक भावना अशी होती की, जपानच्या आमच्या या पाहुण्यांना गुजरातमध्येही जपानची अनुभूती यावी, आपण जपानमध्येच आहोत, असे त्यांना वाटावे, जपानच्या लोकांना, जपानच्या कंपन्यांना इथे कोणत्याही प्रकारे त्रास होवू नये, यासाठी आम्ही प्रयत्न केला.

तुम्ही मंडळी अंदाज लावू शकता की, किती लहान-लहान गोष्टींकडे आम्ही लक्ष देत होतो. अनेक लोकांना या गोष्टी ऐकून आश्चर्यही वाटेल की, आता आम्हा सर्वांना माहिती झाले आहे की, जपानचे लोक असतील आणि गोल्फ खेळण्याविषयी चर्चा झाली नाही, तर ते बोलणे अर्धेच राहिले, असे मानतात. गोल्फच्या चर्चेविना जपानी लोकांचे बोलणे, कोणी कल्पनाच करू शकत नाही. आता आमच्या गुजरातचे, या गोल्फच्या दुनियेशी कोणत्याही प्रकारे घेणे-देणे नाही. तर मग जर मला जपानला इथे घेवून यायचं आहे, तर इथे  गोल्फ कोर्स सुरू करणे गरजेच आहे, हे आम्ही लक्षात घेतले.  आणि मला आनंद वाटतो की, आज गुजरातमध्ये  गोल्फची अनेक मैदाने तयार झाली आहेत. जिथे आमचे जपानचे लोक काम करतात, त्यांना सुट्टीचा काळ घालविण्यासाठी गोल्फच्या मैदानावर जाण्याची संधी मिळते. अनेक रेस्टॉरंटसमध्ये जपानी पदार्थ उपलब्ध होवू शकतील, अशी व्यवस्था करून आम्ही त्यांची ही चिंताही दूर केली होती.

जपानमधून येणा-या सहकारी मंडळींना कोणत्याही प्रकारच्या समस्या जाणवू नयेत, यासाठी अनेक गुजरातींनी जपानी भाषाही शिकून घेतली  आणि आता तर जपानी भाषांचे वर्गही सुरू झाले आहेत.  

मित्रांनो,

आम्ही जे काही प्रयत्न केले आहेत, ते सर्व गांभीर्याने, त्यांचे महत्व ओळखून केले आणि  त्यातून  जपानविषयी स्नेहही निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम म्हणजे, आज सुझुकीसहीत जपानमधल्या सव्वाशेपेक्षा जास्त कंपन्या गुजरातमध्ये काम करीत आहेत.

वाहनउद्योगापासून पासून जैव इंधनापर्यंतच्या क्षेत्रात जपानी कंपन्या इथे आपला विस्तार करत आहेत. JETRO ने स्थापन केलेल्या अहमदाबाद बिजनेस सपोर्ट सेंटरमध्ये एकाच वेळी अनेक कंपन्यांना प्लग अँड प्ले वर्क स्पेस फॅसिलिटी देता येईल अशी सुविधा उपलब्ध आहे. आज गुजरातमध्ये दोन जपान-इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रत्येक वर्षी शेकडो युवकांना प्रशिक्षित करत आहेत.

कितीतरी कंपन्या गुजरातची तंत्रज्ञान विद्यापीठे तसेच आयटीआय यांच्याशी सुद्धा संलग्न आहेत. अहमदाबाद मध्ये झेन गार्डन आणि कायझेन अकॅडमीची स्थापना करण्यात ह्योओगो आंतरराष्ट्रीय संस्थेचे अमूल्य योगदान आहे, जे गुजरात कधीही विसरू शकत नाही. असेच पर्यावरणस्नेही उद्यान स्टॅच्यू ऑफ युनिटी च्या जवळ विकसित केले जात आहे. कायझेन संदर्भात 18-19 वर्षांपूर्वी जे प्रयत्न गुजरात मध्ये झाले, विचारपूर्वक राबवण्यात आले त्याचा निश्चितपणे गुजरातला फायदा झाला. गुजरातने आज विकासाची जी उंची गाठली आहे त्यात निश्चितच कायझेनची महत्वाची भूमिका आहे.

जेव्हा मी पंतप्रधान म्हणून दिल्लीला गेलो तेव्हा कायझेनचा अनुभव पंतप्रधान कार्यालय तसेच केंद्र सरकारतील इतर विभागात सुद्धा ही पद्धत राबवण्यासाठी कामी आला. आता देशाला कायझेनचा फायदा जास्त प्रमाणात मिळत आहे. शासनात आम्ही जपान प्लस ही विशेष व्यवस्थासुद्धा राबवली आहे. गुजरात आणि जपानच्या या एकत्रित प्रवासाला संस्मरणीय बनवणारे जपानचे अनेक मित्र, माझे अनेक जुने साथीदार आज या कार्यक्रमात येथे उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

भारतात आज इलेक्ट्रिक वाहनांचा बाजारपेठ जेवढ्या वेगाने विस्तारत आहे त्याची कल्पनाही काही वर्षांपूर्वी कोणी केली नसेल. इलेक्ट्रिक वाहनांचे एक मोठे वैशिष्ट्य हे असते की ती आवाज- रहित असतात. दोन चाकी असो की चार चाकी, आवाज करत नाहीत. ही आवाज-रहित असणे  आता केवळ त्यांच्या तंत्रज्ञानाचा भाग नाही तर ही देशात एका सुप्त क्रांतीच्या पाऊलखुणा आहेत. आज लोक इलेक्ट्रिक वाहनांना एक वेगळं वाहन समजत नाहीत ते त्यांना प्रमुख वाहन म्हणू लागले आहेत.

देश या बदलांसाठी गेल्या आठ वर्षांपासून प्राथमिक तयारी करत आहे. आज आपण इलेक्ट्रिकल वाहनांच्या पुरवठा आणि मागणी या काम करत आहोत. सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे मागणीत वाढ होऊ शकेल.प्राप्तिकरात सवलतीपासून ते कर्ज सुलभता यासारखी अनेक पावले उचलली गेली आहेत, जेणेकरून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढावी.

त्याचप्रमाणे पीएलआय योजनेच्या माध्यमातून वाहन आणि वाहनांच्या सुट्ट्या भागांचा पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीनेही वेगाने काम होत आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्राला वेग देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. पीआयएल योजनेच्या माध्यमातून विद्युतघट (बॅटरी) उत्पादनासाठीही प्रोत्साहन मिळत आहे. 

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सुद्धा देशाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. 2022 च्या अर्थसंकल्पात बॅटरी स्वॅपिंग धोरण सादर केले गेले.  तंत्रज्ञान शेअरिंग सारख्या धोरणांचा नव्याने उद्य झाला आहे. पुरवठा मागणी आणि बळकट इकोसिस्टीम या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र खात्रीने पुढे जाईल म्हणजेच ही ‘आवाज- रहित क्रांती’येत्या काळात मोठा बदल घडवून आणण्यासाठी तयार आहे.

मित्रांनो,

आज आपण इलेक्ट्रिक वाहन या क्षेत्राबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला देशाच्या हवामानाच्या संदर्भातील कटीबद्धता आणि त्या संदर्भातील उद्दिष्टे लक्षात घेणे आवश्यक आहे. भारताने सीओपी-26 मध्ये घोषणा केली आहे की आपण 2030 पर्यंत आपल्या इलेक्ट्रीक क्षमतेच्या उभारणीतील 50 टक्के क्षमता बिगर-जीवाक्ष्म इंधनापासून मिळवू. नेट झिरो हे लक्ष्य आपण 2070 साठी ठेवले आहे. त्यासाठी आपण इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्थानक व ग्रीड स्केल बॅटरी सिस्टीम यासारख्या उर्जा साठवणाऱ्या व्यवस्था या पायाभूत सुविधा सुसंगत यादीत आणण्यावर काम करत आहे. त्याबरोबरच आपल्याला बायोगॅस इंधन, फ्लेक्स फ्युएल अश्या तऱ्हेच्या पर्यायांचा अधिक विस्तार करणे आवश्यक आहे.  

मला याचे समाधान वाटते की जैव-इंधन, बायो-मिथेन, इथेनॉल मिश्रित इंधन, हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन यासारखे सर्व पर्याय आजमावण्याच्या दिशेने मारुती- सुझुकी काम करत आहेत. याचसोबत सुझुकीने दाबाखालील जैवमिथेन वायू म्हणजेच CBG  सारख्या पर्यायांशी संबधित प्रकल्पांवरही काम करावे अशी माझी सूचना आहे. भारतातील इतर कंपन्याही या दिशेने काम करत आहेत.  आपल्याकडे निरोगी स्पर्धेसोबतच परस्परसंवादी अभ्यासाचं वातावरण असावं असं मला वाटतं. त्याचा उपयोग देश आणि उद्योगक्षेत्र या दोन्हीला होईल.

मित्रांनो,

येत्या 25 वर्षाच्या अमृतकाळात आपलं लक्ष्य आहे ते भारत आपल्या उर्जा आवश्यकतांच्या बाबतीत आत्मनिर्भर बनणे. आज उर्जा आयातीचा मोठा भाग वाहतुकीशी जोडलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे. म्हणून या बाबतीत संशोधन आणि काम ही आपली प्राथमिकता असायला हवी. आपल्या आणि ऑटो सेक्टरच्या सर्व साथीदारांच्या मदतीने हा देश आपले हे उद्दिष्ट जरूर पूर्ण करेल. जो वेग आपल्याला द्रुतगती मार्गावर दिसून येतो त्या वेगाने आपण विकास आणि समृध्दीचे लक्ष्य प्राप्त करु.

याच भावनेतून मी आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सुझुकी परिवाराला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मी आपणा सर्वांना हा विश्वास देतो की आपण विस्ताराच्या संदर्भात जी स्वप्ने बाळगली आहेत त्यांना वेग देण्यासाठी राज्य सरकार असो वा केंद्र सरकार आम्ही मागे रहाणार नाही.

याच भावनेतून, आपणा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Making Digital India safe, secure and inclusive

Media Coverage

Making Digital India safe, secure and inclusive
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella meets Prime Minister, Shri Narendra Modi
January 06, 2025

Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella met with Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi.

Shri Modi expressed his happiness to know about Microsoft's ambitious expansion and investment plans in India. Both have discussed various aspects of tech, innovation and AI in the meeting.

Responding to the X post of Satya Nadella about the meeting, Shri Modi said;

“It was indeed a delight to meet you, @satyanadella! Glad to know about Microsoft's ambitious expansion and investment plans in India. It was also wonderful discussing various aspects of tech, innovation and AI in our meeting.”