ऎल्लरिगू नमस्कारम।
सुत्तूरु संस्थानवु शिक्षण, सामाजिक सेवे, अन्नदा-सोहक्के, प्रख्याति पडेदिरुव, विश्व प्रसिद्ध संस्थेया-गिदे, ई क्षेत्रक्के, आगमि-सिरु-वुदक्के, ननगे अतीव संतोष-वागिदे।
आदरणीय श्री शिवरात्री देशिकेंद्र महास्वामीजी, श्री सिद्धेश्वर महास्वामीजी, श्री सिद्धलिंग महास्वामीजी, कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसवराजजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशीजी, कर्नाटक सरकारचे मंत्री, खासदार, आमदार आणि सुत्तूर मठाशी संबंधित असलेले आपण सर्व श्रद्धाळू भाविक! तसेच आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे आलेला पूजनीय संत समुदाय!
म्हैसूरची अधिष्ठात्री देवी चामुंडेश्वरी मातेला मी नमन करतो. मला आज म्हैसूर येथे येण्याचे भाग्य प्राप्त झाले आणि म्हैसूरच्या विकासासाठी अनेक मोठ्या कामांचे लोकार्पण करण्याची संधी देखील मिळाली ही मातेचीच कृपा आहे असे मी मानतो. आणि आता, येथे तुम्हां सर्व संतांच्या उपस्थितीत या पुण्याच्या कामासाठी उपस्थित राहिल्याने मला स्वतःला धन्य धन्य वाटते आहे. येथून आता मी चामुंडेश्वरी मातेच्या चरणांशी जाऊन मातेचे आशीर्वाद देखील घेणार आहे. या अध्यात्मिक प्रसंगी मी श्री सुत्तूर मठाचे संतगण, आचार्य तसेच उपासकांना, या मठाच्या महान परंपरेला, त्यांच्या प्रयत्नांना वंदन करतो. विशेषतः या अध्यात्मिक वटवृक्षाचे बीज लावणारे आदि जगतगुरू शिवरात्री शिवयोगी महास्वामीजी यांना मी नमन करतो. ज्ञान तसेच अध्यात्माच्या या महान परंपरेला आज सुत्तूर मठाचे विद्यमान मठाधीश पूजनीय श्री शिवरात्री देशिकेंद्र महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात बहर आलेला दिसत आहे. श्री मंत्र महर्षीजी यांनी सुरु केलेल्या पाठशाळेने श्री राजेंद्र महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली एवढ्या विशाल प्रकल्पाचे रूप घेतले आहे. भारतीय संस्कृती आणि संस्कृत भाषेच्या अध्यापनाच्या उद्देशाने या पाठशाळेत उभारण्यात आलेल्या नव्या भवनाचे लोकार्पण देखील आज झाले आहे. या आधुनिक आणि भव्य स्वरुपासह ही संस्था भविष्य घडविण्याच्या स्वतःच्या संकल्पांचा अधिकाधिक विस्तार करेल असा विश्वास मला वाटतो. या अभिनव प्रयत्नांसाठी मी तुम्हां सर्वांचे नतमस्तक होऊन अभिनंदन सुद्धा करतो आणि तुम्हांला अनेकानेक शुभेच्छा देखील देतो.
मित्रांनो,
नारद भक्ती सूत्र, शिव सूत्र आणि पतंजली योग सूत्र यांच्यावर श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांनी केलेल्या टिप्पणीचे लोकार्पण करण्याची संधी देखील आज मला मिळाली आहे. शास्त्र वचनांमध्ये ज्या परंपरेला श्रुत परंपरा म्हणजेच श्रवण परंपरा म्हणतात त्या भारताच्या प्राचीन ऋषी परंपरेचे प्रतिनिधित्व परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी करत आहेत. श्रुत परंपरा म्हणजे जे विचार कानावर पडले, ऐकले, ते मस्तकात आणि हृदयात कोरून ठेवले. जागतिक योग दिनानिमित्त, पतंजली योग सूत्रावरील टिप्पणी, नारद भक्ती सूत्र आणि शिव सूत्र यांच्या माध्यमातून भक्तीयोग तसेच ज्ञानयोगाला सहज सोपे करण्याचा हा प्रयत्न यांचा लाभ केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मिळणार आहे. आणि आज तुम्हां सर्वांमध्ये उपस्थित असताना, कर्नाटकच्या विद्वतजनांकडे मी अशी प्रार्थना करेन की गेल्या चार-पाच शतकांमध्ये जगात समाजशास्त्राबद्दल जे काही लिखाण झाले आहे त्याचा अभ्यास त्यांनी करावा. त्यानंतर या संदर्भातील जाणकार अशा निष्कर्षाप्रत येतील की, नारद सूक्त हे त्या सर्वांहून अधिक प्राचीन आहे आणि आपल्याकडे समाजशास्त्राचे एक खूप मोठे आणि उत्तम ज्ञान भांडार उपलब्ध आहे. याचा एकदा अभ्यास होणे जगासाठी आवश्यक आहे. जे पश्चिमी विचारांचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी एकदा नारद सूक्ताचा तपशीलवार अभ्यास करावा. हे नारद सूत्र म्हणजे जगाकडे पाहण्याचा, समाज व्यवस्थेकडे पाहण्याचा, मानवी मूल्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन देणारा अद्भुत ग्रंथ आहे आणि आज आधुनिक परिभाषेत त्याची व्याख्या करण्यात आली आहे. तुम्ही सर्वांनी केलेली ही फार मोठी समाजसेवा आहे.
मित्रांनो,
आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की, ज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीही नाही आणि ज्ञानाला पर्याय ठरेल अशी कोणतीही गोष्ट नाही. आणि म्हणूनच आपले ऋषीमुनी, उपासक यांनी, ज्ञानाने प्रेरित आणि विज्ञानाने विभूषित अशा चैतन्यासह भारताची घडण केली आहे. ही चैतन्याची प्रेरणा बोधातून वाढते आणि शोधांद्वारे मजबूत होते. युगे बदलली, काळ बदलला, भारताने जाणाऱ्या काळासोबत अनेक वादळांना तोंड देखील दिले. मात्र, जेव्हा-जेव्हा भारतातील चैतन्य क्षीण होताना दिसले तेव्हा-तेव्हा देशाच्या काना-कोपऱ्यात संतांनी, ऋषी-मुनींनी, गुरुवर्यांनी, महान पंडितांनी संपूर्ण भारताचे मंथन करून देशाच्या आत्म्याला पुनरुज्जीवन दिले आहे. उत्तरेत माझ्या काशीपासून, येथे जवळच असलेल्या नंजनगुड दक्षिण काशीपर्यंत, मंदिर आणि मठांच्या सशक्त संस्थानांनी गुलामीच्या दीर्घ कालखंडात देखील भारताची ज्ञानज्योत तेवत ठेवली. म्हैसूरमध्ये श्री सुत्तुरू मठ, तुमकुरू मधील श्री सिद्धगंगा मठ, चित्रदुर्गातील श्री सिरिगेरे मठ, श्री मुरुगु-राजेंद्र मठ! चिकमंगळूर येथील श्री रंभापुरी मठ, हुबळीतील श्री मुरुसावीरा मठ, बीदरमध्ये असलेला बसवकल्याण मठ! फक्त दक्षिण भारताचाच विचार केला तरी हा भाग अशा कितीतरी मठांचे केंद्रस्थान आहे ते दिसून येते. हे मठ शतकानुशतके असंख्य विविध शैलींची आणि अनंत प्रकारच्या विद्या प्रकारांची जोपासना करत आलेले आहेत.
मित्रांनो,
सत्याचे अस्तित्व साधनसंपत्तीवर नाही तर सेवा आणि त्यागावर आधारलेले असते. श्री सुत्तूर मठ आणि जेएसएस महाविद्यापीठ हे याचे फार मोठे उदाहरण आहे. श्री शिवरात्री राजेंद्र महास्वामीजी यांनी समाजसेवेचा संकल्प सोडून जेव्हा येथे मोफत वसतिगृह सूरु केले होते, तेव्हा त्यांच्याकडे कोणती साधने उपलब्ध होती? भाडेकरारावर इमारत घेतली होती, किराणा सामान इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यासाठी देखील पैसे नव्हते. आणि मी असे देखील ऐकले आहे की, एकदा पैशांची चणचण निर्माण झाल्यामुळे स्वामीजींना “लिंगम करडिगे” सुद्धा विकावे लागले होते. यावरून दिसून येते की त्यांनी सेवेच्या व्रताला श्रद्धेपेक्षा देखील उच्च स्थान दिले होते. अनेक दशकांपूर्वी त्यांनी केलेला हा त्याग आज सिद्धीच्या स्वरुपात आपल्यासमोर आहे. आजच्या घडीला जेएसएस महाविद्यापीठ देशभरात 300 हून अधिक शैक्षणिक संस्था आणि देश-परदेशात दोन विद्यापीठे चालवीत आहे. या संस्था केवळ भारताच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक राजदूत म्हणूनच कार्य करत नाहीत तर त्या विज्ञान, कला आणि वाणिज्य या क्षेत्रांमध्ये देखील तितकेच भरीव योगदान देत आहेत. सुत्तुरू मठ, गरीब मुलांची, आदिवासी समाजाची आणि आपल्या गावांची ज्या प्रकारे सेवा करत आहे ते देखील एक उत्तम उदाहरणच आहे.
मित्रांनो,
कर्नाटक, दक्षिण भारत आणि भारताबाबत बोलायचे झाले, शिक्षण, समानता आणि सेवा असे विषय असले तर ही चर्चा भगवान बसवेश्वरांच्या आशीर्वादाने आणखी विस्तारत जाते. भगवान बसवेश्वरजींनी आपल्या समाजाला जी ऊर्जा दिली, त्यांनी मांडलेले लोकशाही, शिक्षण आणि समतेचे आदर्श हे आजही भारताचा पाया आहेत. मला एकदा लंडनमध्ये भगवान बसवेश्वरजींच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभले. त्यावेळी मी म्हणालो होतो की, एका बाजूला मॅग्ना कार्टा आणि दुसऱ्या बाजूला भगवान बसवेश्वरांची वचने ठेवा, तुम्हाला समजेल की मॅग्ना कार्टाच्या कितीतरी शतकांपूर्वी माझ्या देशात समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन काय होता, ते यातून दिसून येईल.
मित्रांनो,
त्याच आदर्शांना अनुसरून श्री सिद्धगंगा मठ आज दीडशेहून अधिक संस्था चालवत आहे, समाजात शिक्षण आणि अध्यात्माचा प्रसार करत आहे आणि मला सांगण्यात आले की, सिद्धगंगा मठाच्या शाळांमध्ये सध्या सुमारे दहा हजार विद्यार्थी ज्ञान प्राप्त करत आहेत. ही भगवान बसवेश्वरांची प्रेरणा, ही निःस्वार्थ सेवेची ही निष्ठा, हाच आपल्या भारताचा पाया आहे. हा पाया जितका बळकट असेल तितका आपला देश बळकट होईल.
मित्रांनो,
आज जेव्हा आपण देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहोत, तेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत काळचा हा कालावधी म्हणजे 'सबका प्रयास' ची उत्तम संधी आहे. आपल्या ऋषीमुनींनी सर्वांच्या सहकाराच्या, सहकार्याच्या आणि प्रयत्नांच्या या संकल्पाला 'सहनववतु सहानुभुनक्तु' म्हटले आहे. ते आपल्याला सह वीर्यं करववाहै सारख्या वेदांच्या रचनांच्या रूपात दिले आहे. हजारो वर्षांचा तो अध्यात्मिक अनुभव प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत आपण पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्याची वेळ आज आली आहे. त्यासाठी आपल्या प्रयत्नांना अधिक गती द्यावी लागेल. आपल्या प्रयत्नांना देशाच्या संकल्पाशी जोडले पाहिजे.
मित्रांनो,
आज शिक्षण क्षेत्रात ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ चे उदाहरण आपल्यासमोर आहे. शिक्षण हा आपल्या भारताचा स्वाभाविक गुण राहिला आहे. या सहजतेने आपल्या नव्या पिढीला पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी स्थानिक भाषांमध्ये अभ्यास करण्याचे पर्याय दिले जात आहेत. कन्नड, तमिळ, तेलुगू या भाषांसोबतच संस्कृतसारख्या भाषांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. आपले सर्व मठ आणि धार्मिक संस्था शतकानुशतके या कार्यात गुंतलेल्या आहेत. म्हैसूर हे असे ठिकाण आहे जिथून आजही देशातील एकमेव संस्कृत दैनिक सुधर्मा प्रकाशित होत आहे. आता देशही या प्रयत्नांना सहकार्य करत आहे, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचप्रमाणे आरोग्य आणि निरामयतेसाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांमुळे आज जगभरात आयुर्वेद आणि योगाभ्यासाला नवी ओळख मिळाली आहे. देशातील एकही नागरिक या वारशापासून अनभिज्ञ आणि वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. हे अभियान पूर्ण करण्यासाठी आपल्या अध्यात्मिक संस्थांचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. याचप्रमाणे आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी, जलसंधारणासाठी, पर्यावरणासाठी आणि स्वच्छ भारतासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. दुसरा महत्त्वाचा संकल्प म्हणजे नैसर्गिक शेतीचाही आहे. आपले अन्न जितके शुद्ध असेल तितके आपले जीवन आणि मन अधिक निरोगी आणि शुद्ध असेल. मला असे वाटते की, या दिशेने आपल्या सर्व धार्मिक मठांनी आणि संस्थांनीही पुढे येऊन लोकांना जागरूक केले पाहिजे. आपल्या या भारत मातेला, आपल्या धरणी मातेला, आपण तिला रसायनांपासून मुक्त केले पाहिजे. यासाठी आपण जितके काही करू, मातेचा आशीर्वाद आपल्याला शतकानुशतके उपयोगी पडणार आहे.
मित्रांनो,
ज्या कार्यात संतांच्या प्रयत्नांची भर पडते त्यात आध्यात्मिक चैतन्य आणि दैवी आशीर्वादही जोडले जातात. माझा विश्वास आहे की, तुम्हा सर्व संतांचे आशीर्वाद निरंतर देशाला मिळत राहतील. आपण मिळून नव्या भारताचे स्वप्न पूर्ण करू. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भाग्याचा क्षण आहे. पूज्य संतांनी माझ्याबद्दल ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, मला माहित आहे, माझ्यासाठी जे काही बोलले गेले आहे, मला अजूनही तेथे पोहोचण्यासाठी खूप काही करायचे आहे. पण मला या गोष्टीची खात्री आहे की, हे संतांचे आशीर्वाद, आपला महान सांस्कृतिक वारसा आणि तुम्हा सर्व संतांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, तुम्हीही मला घडवत राहाल, तुम्ही मला दिशा देत राहाल आणि तुमच्या मार्गदर्शनाने, संतांच्या मार्गदर्शनाने, महान वारशाच्या प्रेरणेने मी ती कामे पूर्ण करू शकेन, असे आशीर्वाद तुम्ही मला द्या, जेणेकरून माझ्या कामात कोणतीही उणीव राहू नये आणि तुमच्या अपेक्षा अपूर्ण राहू नयेत.
या माझ्या भावना व्यक्त करताना, मला तुम्हा सर्वांमध्ये येण्याची संधी मिळाली. माझे जीवन धन्य वाटत आहे. मी तुमचा पुन्हा एकदा आभारी आहे.
येल्लारिगु नमस्कार.