हर हर महादेव !
श्री सद्गुरु चरण कमलेभ्यो नमः।
व्यासपीठावर उपस्थित उत्तरप्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, उत्तरप्रदेशचे उर्जावान-कर्मयोगी मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, सद्गुरू आचार्य श्री स्वतंत्रदेव जी महाराज,संत प्रवर श्री विज्ञानदेव जी महाराज, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि याच भागातले खासदार श्री महेंद्रनाथ पांडे जी, इथलेच आपले लोकप्रतिनिधी आणि योगी सरकार चे मंत्री श्रीमान अनिल रानभर जी, देश विदेशातून या कार्यक्रमाला आलेले सर्व साधक आणि भाविक, बंधू आणि भगिनींनो, आणि सर्व उपस्थित मित्रांनो !!
काशीची ऊर्जा अक्षुण्ण तर आहेच,पण ही ऊर्जा नित्य नव्या स्वरूपात, नवनव्या रुपात विस्तारत राहते. काल काशी ने भव्य 'विश्वनाथ धाम' महादेवाच्या चरणी अर्पण केला आहे. आणि आज 'विहंगम योग संस्थान' ने केलेलं हे अद्भुत आयोजन होत आहे. या दैवी भूमीवर ईश्वर आपल्या अनेक इच्छांच्या पूर्ततेसाठी संतांनाच निमित्तमात्र बनवतात. आणि ज्यावेळी संतांना पुण्यफळापर्यंत पोचते, त्यावेळी सुखद योगायोग देखील घडत जातात.
आज आपण बघत आहोत, अखिल भारतीय विहंगम योग संस्थेचा 98 वा वार्षिकोत्सव, स्वतंत्र आंदोलनात सद्गुरू सदाफल देव जी यांच्या कारावासाला 100 वर्ष आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हे सर्व, आपण सर्व, एकत्र याचे साक्षीदार बनत आहोत. या सर्व योगायोगांसोबतच आज गीता जयंती देखील आहे. आजच्या दिवशीच कुरुक्षेत्रच्या रणभूमीवर जेव्हा सैन्य समोरासमोर उभी होती, संपूर्ण मानव जातीला योग, अध्यात्म आणि परमार्थाचं परमोच्च ज्ञान मिळालं. मी या प्रसंगी भगवान कृष्णाला नमन करतो आणि आपणा सर्वांना आणि सर्व देशवासियांना गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
बंधू आणि भगिनींनो,
सद्गुरु सदाफल देव जी यांनी समाज जागृतीसाठी ‘विहंगम योग’ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून, यज्ञ केला होता, आज ते संकल्प बीज आपल्या समोर विशाल वट वृक्ष बनून उभं आहे. आज एक्कावन शे यज्ञ कुंड असलेल्या विश्व शांती बैदिक महायज्ञ या रुपात, इतक्या मोठ्या सह-योगासन प्रशिक्षण शिबीराच्या रुपात, इतक्या सेवा प्रकल्पांच्या रुपात आणि लाखो लाखो साधकांच्या या विशाल कुटुंबाच्या रुपात आपण त्या संत संकल्प सिद्धीची अनुभूती घेत आहोत.
मी सद्गुरु सदाफल देव जी यांना नमन करतो, त्यांच्या अध्यात्मिक उपस्थितीला प्रणाम करतो. मी श्री स्वतंत्रदेव जी महाराज आणि श्री विज्ञानदेव जी महाराज यांचे देखील आभार मानतो ज्यांनी हि परंपरा जिवंत ठेवली आहे, तिचा विस्तार करत आहेत आणि आज एक भव्य अध्यात्मिक भूमी निर्माण होत आहे. मला याचं दर्शन घेण्याची संधी मिळाली. जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा केवळ काशीच नाही तर हिंदुस्तानसाठी एक फार मोठी भेट असेल.
मित्रांनो,
आपला देश इतका अद्भुत आहे की, इथे जेव्हा कठीण काळ येतो, तेव्हा कुठला न कुठला संत – महान व्यक्ती, काळाची पावलं वळवायला अवतार घेतो. हा भारतच आहे ज्याच्या स्वातंत्र्याच्या सर्वात मोठ्या नायकाला जग महात्मा म्हणून ओळखतं, हा तोच भारत आहे जिथे स्वातंत्र्याच्या राजनैतिक आंदोलनात देखील अध्यात्मिक चेतना अविरत प्रवाहित होती, आणि हा तोच भारत आहे, जिथे साधकांची संस्था आपला वार्षिकोत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या रुपात साजरा करत आहे.
मित्रांनो,
इथे प्रत्येक साधकाला, आपल्या पारमार्थिक गुरूने स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली होती आणि असहकार आंदोलनात तुरुंगवास भोगणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींमध्ये संत सदाफलदेव जी देखील होते, याचा अभिमान आहे. तुरुंगात असतानाच त्यांनी ‘स्वर्वेद’ वर विचारमंथन केले, तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला मूर्त रूप दिले.
मित्रांनो,
शेकडो वर्षांच्या इतिहासात आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचे असे अनेक पैलू आहेत ज्यांनी या देशाला एकतेच्या सूत्रात बधून ठेवले आहे. असे कितीतरी संत होते जे अध्यात्मिक तपश्चर्या सोडून स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा हा अध्यात्मिक पैलू इतिहासात ज्या प्रकारे नोंदला जायला हवा होता, त्या प्रकारे तो झाला नाही. आज जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा हा पैलू जगासमोर आणणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच, आज देश स्वातंत्र्य लढ्यातील आपले गुरु, संत आणि तपस्वींच्या योगदान आणि त्यागाच्या स्मृती जागवतो आहे, नव्या पिढीला या त्यागाची ओळख करून देत आहे. मला आनंद आहे की विहंगम योग संस्थेचा देखील यात सक्रीय सहभाग आहे.
मित्रांनो,
भविष्यात भारताला सशक्त बनविण्यात आपल्या परंपरा, आपल्या ज्ञानाचा विस्तार, ही काळाची गरज आहे. हे घडवून आणण्यासाठी काशी सारखे आपले अध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र एक प्रभावी मध्यम बनू शकते. आपल्या संस्कृतीचे हे प्राचीन शहर संपूर्ण जगाला दिशा दाखवू शकते. बनारस सारख्या शहरांनी कठीणातल्या कठीण काळात देखील भारताची ओळख, कला, उद्योजकता यांची बीजे सांभाळून ठेवली. जिथे बीज असते, वृक्षाचा विस्तार तिथूनच सुरु होतो. आणि म्हणूनच, आज जेव्हा आपण बनारसच्या विकासाबद्दल बोलतो, तेव्हा यातून संपूर्ण भारताच्या विकासाचा आराखडा तयार होत असतो.
बंधू आणि भगिनींनो,
आज आपण इथे उपस्थित आहात. आपण वेगवेगळ्या राज्यांतून, वेगवेगळ्या ठिकाणाहून आले आहात. आपण काशीला आपली श्रद्धा, आपला विश्वास, आपली उर्जा, आणि आपल्या सोबत अपरिमित शक्यता, असं कितीतरी घेऊन आला आहात. आपण जेव्हा काशीहून परत जाल, तेव्हा नवा विचार, नवा संकल्प, इथला आशीर्वाद, इथे अनुभव असं कितीतरी घेऊन जाल. पण तो दिवस आठवा, जेव्हा आपण इथे येत होतात, तेव्हा काय परिस्थिती होती. जे स्थान इतकं पवित्र आहे, त्याची बकाल अवस्था लोकांना निराश करत असे. पण आज ही परिस्थिती बदलली आहे.
आज जेव्हा देश - विदेशातून लोक येतात तेव्हा विमानतळाच्या बाहेर आल्यावर त्यांना सगळं बदललेलं दिसतं. विमानतळापासून सरळ शहरात यायला आता तितका वेळ लागत नाही. रिंगरोडचं काम देखील काशीने विक्रमी वेळात पूर्ण केलं आहे. मोठ्या गाड्या आणि मोठी वाहनं आता बाहेरच्या बाहेर निघून जातात. बनारसला येणारे अनेक रस्ते आत रुंद झाले आहेत. जे लोक रस्त्याने बनारसला येतात त्यांना, आता सुविधा किती बदलल्या आहेत, हे चांगलंच समजलं असेल.
इथे आल्यावर तुम्ही बाबा विश्वनाथाचं दर्शन घ्या, किंवा मग गंगेच्या घाटांवर जा, प्रत्येक ठिकाणी काशीचे तेज तिच्या महिमेच्या अनुरूप वाढत आहे. काशीमध्ये असलेल्या विजेच्या तारांचा गुंता सोडवून, जमिनीखालून नेण्याचं काम सुरु आहे, लाखो लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया देखील होत आहे. या विकासाचा फायदा इथे आस्था आणि पर्यटनासोबतच इथल्या कला - संस्कृतीला देखील फायदा होत आहे.
व्यापार सुविधा केंद्र असो, रुद्राक्ष संमेलन केंद्र असो, विणकर - कारागीरांसाठी चालवले जाणारे कार्यक्रम असो, आज काशीच्या कौशल्याला नवी ताकद मिळत आहे. आरोग्य क्षेत्रात देखील आधुनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांमुळे बनारस एक मोठे वैद्यकीय केंद्र म्हणून उदयास येत आहे.
मित्रांनो,
मी जेव्हा काशीला येतो, किंवा दिल्लीत जरी असलो तरी बनारसमध्ये होत असलेल्या विकास कामांच्या गतीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतो. काल रात्री 12 -12.30 वाजल्यानंतर मला, संधी मिळाली, आणि मग मी निघालो, माझ्या काशीत जी कामं सुरु आहेत, जी कामं झाली आहेत, ती बघायला. गौदोलियामध्ये जे सौंदर्यीकरण झालं आहे, ते खरोखरच बघण्यासारखं आहे. तिथे अनेक लोकांशी मी बोललो. मी मडूवाडीहमध्ये बनारस रेल्वे स्थानक देखील बघितलं. या स्थानकाचा आता कायापालट झाला आहे. पुरातन गोष्टी टिकवून ठेऊन नवीन रूप धारण करत बनारस देशाला नवी दिशा देत आहे.
मित्रांनो,
या विकासाचा सकारात्मक परिणाम बनारस सोबतच इथे येणाऱ्या पर्यटकांवर देखील होतो आहे. जर आपण 2019-20 बद्दल विचार केला तर, 2014-15 च्या तुलनेत इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे. 2019-20 मध्ये कोरोना काळात एकट्या बाबतपूर विमानतळवर 30 लाखांहून जास्त पर्यटकांची ये जा झाली. हा बदल घडवून काशीने दाखवून दिलं आहे की इच्छाशक्ती असेल तर परिवर्तन शक्य आहे.
हाच बदल आज आपल्या इतर तीर्थक्षेत्रात देखील दिसत आहे. केदारनाथ, जिथे अनेक समस्या असायच्या, 2013 च्या प्रलयानंतर लोकांचं येणं जाणं कमी झालं होतं, तिथे आता विक्रमी संख्येत भक्त येत आहेत. यामुळे विकास आणि रोजगाराच्या कितीतरी अपरिमित संधी तयार होत आहेत, तरुणांच्या स्वप्नांना बळ मिळत आहे. हाच विश्वास आज संपूर्ण देशात दिसत आहे, याच गतीने आज देश विकासाचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.
मित्रांनो,
सद्गुरू सदाफलजींनी स्वर्वेद मध्ये म्हटलं आहे -
दया करे सब जीव पर, नीच ऊंच नहीं जान।
देखे अंतर आत्मा, त्याग देह अभिमान॥
म्हणजे सर्वांवर प्रेम, सर्वांवर दया, लहान - मोठे, भेदभावापासून मुक्ती! हीच तर देशाची प्रेरणा आहे! आज देशाचा मंत्र आहे - ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’. मी - माझं हा स्वार्थ सोडून आज देश ‘सबका प्रयास’ हा संकल्प घेऊन पुढे जात आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी सद्गुरूंनी आपल्याला स्वदेशीचा मंत्र दिला होता. आज त्याच भावनेतून देशाने आता 'आत्मनिर्भर भारत मिशन' सुरू केले आहे. आज देशातील स्थानिक व्यवसाय-रोजगार मजबूत होत आहेत, उत्पादनांना बळ दिले जात आहे, स्थानिक, जागतिक (लोकलला ग्लोबल) बनवले जात आहे. गुरुदेवांनी आपल्याला स्वर्वेदातील विहंगम योगाचा मार्गही सांगितला होता. योग लोकांपर्यंत पोहोचावा आणि भारताची योगशक्ती संपूर्ण जगात प्रस्थापित व्हावी, हे त्यांचे स्वप्न होते. आज जेव्हा आपण संपूर्ण जग योग दिन साजरा करताना आणि योगाचे पालन करताना पाहतो तेव्हा आपल्याला असे वाटते की सद्गुरूंचा आशीर्वाद फळाला येत आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारतासाठी आज स्वराज्य जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे सुराज्य. या दोन्हींचा मार्ग भारतीय ज्ञान-विज्ञान, जीवनशैली आणि पद्धती यातूनच निघेल. मला माहीत आहे, अनेक वर्षांपासून हा विचार विहंगम योग संस्था, पुढे नेत आहे. तुमचे बोधवाक्य आहे- “गावो विश्वस्य मातरः”. गौमातेशी असलेले हे नाते दृढ करण्यासाठी, गो-धन हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ बनवण्यासाठी देशात अनेक प्रयत्न केले जात आहेत.
मित्रांनो,
आपले गो-धन हे आपल्या शेतकऱ्यांसाठी केवळ दुधाचे स्त्रोत राहू नयेत, तर गो-वंश प्रगतीच्या इतर आयामांनाही मदत करावी असा आमचा प्रयत्न आहे. आज जग आरोग्याबाबत जागरूक होत आहे, रसायने सोडून सेंद्रिय शेतीकडे परतत आहे, शेण हा एकेकाळी सेंद्रिय शेतीचा मोठा आधार होता, तो आपल्या ऊर्जेच्या गरजाही पूर्ण करत असे. आज देश गोबर-धन योजनेद्वारे जैवइंधनाला चालना देत आहे, सेंद्रिय शेतीला चालना देत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एक प्रकारे पर्यावरणाचेही रक्षण होत आहे.
आजपासून दोन दिवसांनी म्हणजे 16 तारखेला ‘झिरो बजेट-नैसर्गिक शेती’ या विषयावर मोठा राष्ट्रीय कार्यक्रमही होणार आहे. यामध्ये देशभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत. 16 डिसेंबर रोजी आपण सर्वांनी नैसर्गिक शेतीबद्दल अधिकाधिक माहिती मिळवावी आणि नंतर शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन सांगावे अशी माझी इच्छा आहे. हे एक असे अभियान आहे जे एक जनआंदोलन बनले पाहिजे आणि तुम्ही सर्वजण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकता.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देश अनेक संकल्पांवर काम करत आहे. विहंगम योग संस्थान, सद्गुरु सदाफल देवजी यांच्या निर्देशांचे पालन करत, समाज कल्याणाच्या अनेक मोहिमा प्रदीर्घ काळापासून राबवत आहे. आजपासून दोन वर्षांनंतर तुम्ही सर्व साधक 100 व्या अधिवेशनासाठी येथे एकत्र याल. हा 2 वर्षांचा खूप चांगला काळ आहे.
हे लक्षात घेऊन आज मी तुम्हा सर्वांना काही संकल्प करायला सांगू इच्छितो. हे संकल्प असे असावेत ज्यात सद्गुरूंचे संकल्प पूर्ण होतात आणि ज्यात देशाच्या मनोरथांचाही समावेश असावा. हे असे संकल्प असू शकतात ज्यांना पुढील दोन वर्षांत गती मिळावी, ते एकत्रितपणे पूर्ण केले जावेत.
उदाहरणार्थ, एक संकल्प असू शकतो - आपण आपल्या मुलींना शिक्षण दिले पाहिजे, तसेच आपण आपल्या मुलींना कौशल्य विकासासाठी तयार केले पाहिजे. आपल्या कुटुंबासोबतच जे समाजाची जबाबदारी घेऊ शकतात, त्यांनी एक-दोन गरीब मुलींच्या कौशल्य विकासाची जबाबदारीही उचलली पाहिजे.
दुसरा संकल्प पाणी वाचवण्याचा असू शकतो. आपण आपल्या नद्या, गंगाजी, सर्व जलस्रोत स्वच्छ ठेवले पाहिजेत. यासाठी तुमच्या संस्थेतर्फे नवीन मोहिमाही सुरू करता येतील. मी आधी म्हटल्याप्रमाणे आज देश नैसर्गिक शेतीवर भर देत आहे. यासाठी तुम्ही सर्वजण लाखो शेतकरी बंधू भगिनींना प्रेरित करण्यासाठी खूप मदत करू शकता.
आपल्या सभोवतालची साफसफाई आणि स्वच्छतेकडेही विशेष लक्ष द्यायचे आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी घाण पसरणार नाही याची काळजी घ्यायची आहे. भगवंताच्या नामस्मरणात तुम्हाला अशी काही सेवा नक्कीच करावी लागेल, ज्याचा सर्व समाजाला फायदा होईल.
मला खात्री आहे की, या पवित्र प्रसंगी संतांच्या आशीर्वादाने हे संकल्प नक्कीच पूर्ण होतील आणि नव्या भारताची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करतील.
याच विश्वासासह, आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
पूज्य स्वामीजींचा मी आभारी आहे. या महत्वपूर्ण पवित्र प्रसंगी मलाही आपल्या सर्वांच्या सान्नीध्यात येण्याची संधी मिळाली. या पवित्र स्थाानाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो.
हर हर महादेव !
खूप-खूप धन्यवाद !!