कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत जी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी, श्री यदुवीर कृष्णा दाता चामराजा वाडीयार जी, राजमाता प्रमोदा देवी, मंत्री सर्बानंद सोनोवाल जी, देश आणि जगभरातील सर्व लोकांना आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज योगदिनानिमित्त मी कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी, आध्यात्म आणि योगाची भूमी म्हैसूरला वंदन करतो. म्हैसूर सारख्या भारताच्या आध्यात्मिक केंद्रांनी ज्या योग ऊर्जेला गेली कित्येक शतके जोपासले आहे, समृद्ध केले आहे, आज तीच योग ऊर्जा जगाच्या आरोग्याला योग्य दिशा देत आहे. आज योग जागतिक सहकार्याचा पारस्परिक आधार बनत आहे. आज योग, संपूर्ण मानवतेला निरोगी जीवनाचा विश्वास देत आहे.
आज सकाळपासून आपण बघतो आहोत, की केवळ काही घरात किंवा आध्यात्मिक केंद्रात दिसणारा योग आज जगाच्या कानाकोपऱ्यात बघायला मिळत आहे. हे चित्र आत्मिक बोधाच्या विस्ताराचे चित्र आहे.हे चित्र एक सहज, स्वाभाविक आणि सामाईक मानवी चेतनेचे प्रतीमा आहे. विशेषतः जेव्हा जगाने गेल्या दोन वर्षात शतकातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना केला, त्यावेळी याचे औचित्य अधिक महत्वाचे आहे. या परिस्थितीत, देश, उपखंड, खंड या सगळ्या सीमांच्या पलीकडे योग दिनाचा हा उत्साह, आपल्या चैतन्य वृत्तीचा प्रत्यय देणारा आहे.
योग आता एक जागतिक उत्सव ठरला आहे. योग केवळ एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी आहे. म्हणूनच, यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना आहे—‘मानवतेसाठी योग!’ या संकल्पनेच्या माध्यमातून योगाचा संदेश संपूर्ण मानवतेपर्यन्त पोहोचवण्यासाठी मी संयुक्त राष्ट्रांचे आभार मानतो आणि सर्व देशांनाही मनःपूर्वक धन्यवाद देतो. मी जगभरातील सर्व नागरिकांचे सर्व भारतीयांच्या वतीने आभार मानतो.
मित्रांनो,
योगाचे वर्णन करतांना आमचे ऋषिमुनी, आमचे आचार्य यांनी म्हटले आहे- - “शांतिम् योगेन विंदति”।
याचा अर्थ, योग आपल्यासाठी शांतता घेऊन येतो. योगामुळे मिळणारी शांती ही फक्त एखाद्या व्यक्तीसाठी नसते, तर योग संपूर्ण समाजासाठी शांती घेऊन येतो. योग आपल्या देशांमध्ये आणि संपूर्ण जगात शांतता घेऊन येतो. योग आपल्या संपूर्ण विश्वासाठी शांतता घेऊन येणारा आहे. कदाचित कोणाला हा विचार फार पुढचा वाटेल, पण भारतातील ऋषिमुनींनी याचे उत्तर एका साध्या मंत्रात कित्येक वर्षांपूर्वी दिले आहे--
- “यत् पिंडे तत् ब्रह्मांडे”। ( म्हणजेच- जे पिंडी तेच ब्रह्मांडी)
हे संपूर्ण ब्रह्मांड आपलं शरीर आणि आत्म्यापासून सुरु होतं. ब्रह्मांड आपल्यापासून सुरु होतं आणि योगामुळे आपल्यात जे आहे त्याविषयी आपण जागृत होतो. याची सुरवात स्वयंचेतनेनं होते आणि त्यातून जगात चेतना निर्माण होते. जेव्हा आपल्यामध्ये स्वतःविषयी आणि जगाविषयी जागृती निर्माण होते, तेव्हा आपल्याला आपल्यात आणि जगात अशा गोष्टी दिसू लागतात ज्यात सुधारणा करण्याची गरज आहे.
यात वैयक्तिक आयुष्याशी निगडीत समस्या असू शकतात किंवा हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष यासारख्या जागतिक समस्या असू शकतात. योग आपला विवेक जागृत करतो, आपल्याला सक्षम बनवतो आणि या आव्हानांविषयी संवेदनशील बनवतो. समान सद्सद्विवेक आणि एकमत असलेले लक्षावधी लोक, मनाची शांतता लाभलेले लक्षावधी लोक जगात शांती नांदावी यासाठी वातावरण निर्मिती करतील. अशाप्रकारे योग लोकांना एकत्र आणू शकतो. अशाप्रकारे योग देशांना एकत्र आणू शकतो. अशाप्रकारे योग आपल्या सगळ्या समस्या सोडवू शकतो.
मित्रांनो,
भारतात यंदा आपण योगदिन अशा प्रसंगी साजरा करत आहोत, जेव्हा देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करतो आहे, अमृतमहोत्सव साजरा करतो आहे. योग दिनाची ही व्यापकता, ही स्वीकारार्हता म्हणजेच भारताच्या त्या अमृत भावनेची स्वीकारार्हता आहे, ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला उर्जा मिळाली होती.
याच भावनेचा उत्सव साजरा करण्यासाठी आज देशाच्या विविध शहरांत 75 ऐतिहासिक स्थळांसोबतच इतर शहरांतले लोक देखील ऐतिहासिक स्थळांवर योग करत आहेत. ही सगळी ऐतिहासिक स्थळे भारताच्या इतिहासाची साक्षीदार आहेत, जी ठिकाणे देशाची सांस्कृतिक उर्जा केंद्रे आहेत, ती सगळी आज योगदिनाच्या माध्यमातून एकत्र आली आहेत.
या म्हैसूर च्या राजवाड्याला पण इतिहासात आपले स्वतःचे असे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.भारतातील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी सामूहिक योगाचा अनुभव घेणे हे,भारताचा भूतकाळ, भारतातील विविधता आणि भारताच्या विस्ताराला एका सूत्रात गुंफण्यासारखे आहे.यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर"गार्डीयन रिंग ऑफ योगा" हा अभिनव प्रयोग आज संपूर्ण जगभरात सादर होत आहे.जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये सूर्योदयापासून, सूर्याच्या गतिसोबत,नागरीक योगाभ्यास करत आहेत योगासोबत जोडून घेत आहेत.जसा जसा सूर्य उगवत वर येत जाईल, त्याचा उदय होत जाईल, त्याच्या पहिल्या किरणापासून विविध देश योगाभ्यास करत एकमेकांशी जोडले जातील, संपूर्ण पृथ्वीवर योगाची एकच साखळी तयार होईल. हाच आहे "गार्डिनर रिंग ऑफ योगा" हा उपक्रम. योगाचे हे प्रयोजन आरोग्य, संतुलन आणि सहयोग यासाठी विस्मयकारक प्रेरणा देत आहे.
मित्रांनो,
जगातल्या लोकांना, योग आज आमच्यासाठी केवळ जीवनाचा एक भाग नाही, तर कृपया याचे स्मरण करून द्या, की योग आता जीवनाचा मार्ग बनला आहे.आपल्या दिवसाचा प्रारंभ योगाभ्यासाने होणे यापेक्षा, उत्तम सुरुवात दुसरी कोणती असू शकते? पण, आम्ही योगाला एक खास वेळ आणि स्थान इथपर्यंत मर्यादित ठेवू इच्छित नाही.आपण हे पहातो की आपल्या, घरातील आपले जेष्ठ योग साधक दिवसभरात वेगवेगळ्या वेळी प्राणायाम करतात.अनेक लोक आपल्या कार्यालयांत काम केल्यावर थोड्या वेळ दंडासन करतात,परत फिरून कामाची सुरुवात करतात. आम्ही कितीही तणावपूर्ण वातावरणात असलो तरीही काही मिनिटांचे ध्यान आम्हाला तणावमुक्त करते, आमची कार्यक्षमता वाढवते.
मित्रांनो,
म्हणून, योगाभ्यासाला एक अतिरिक्त काम अशा स्वरूपात, पहायचे नाही.आम्हाला योग जाणून घ्यायचा आहे,योगासह जीवन व्यतीत करायचे आहे. आम्हाला योगाचा स्विकार करायचा आहे आणि जेव्हा आम्ही योगासह जीवन जगायला आरंभ करु त्यावेळी योगदिन आमच्यासाठी योगाभ्यास करण्यासाठी नाही: तर आरोग्य, सुख आणि समाधान मिळवण्याचे माध्यम होऊन जाईल.
मित्रांनो,
योगाच्या अनंत शक्यता साकार करण्याचा योग्य काळ आज आला आहे.आज आमचा युवावर्ग मोठ्या संख्येने योगक्षेत्रात नवनवीन संकल्पना घेऊन येत आहे. या दिशेने वाटचाल करण्यासाठी आमच्या देशातील आयुष मंत्रालयाने ‘स्टार्टअप योगा चॅलेंज’ हा उपक्रम सुरू केला आहे. योगाची पार्श्वभूमी, योगाभ्यासाचा प्रवास आणि योगाशी निगडित शक्यता दर्शविणारे एक कल्पक डिजिटल प्रदर्शन या म्हैसूरु दसरा मैदानावर आयोजित केले आहे.
मी देशातील, तसेच जगभरातील सर्व युवावर्गाला अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सक्रीय राहण्याचे आवाहन करतो. 2021 या वर्षी ‘योगाचा प्रचार आणि विकास यासाठी उल्लेखनीय योगदानासाठी पंतप्रधान पुरस्कार’ प्राप्त विजेत्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे, योगाची ही अनादि यात्रा अनंत भविष्याच्या दिशेने अविरत वाटचाल करत राहील.
आम्ही ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः’या भावनेने एक निरामय आणि शांतिपूर्ण विश्व निर्माण करण्यासाठी योगाच्या माध्यमातून त्यास गती देऊ . याच भावनेने, तुम्हा सर्वांना परत एकदा योग दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा,
धन्यवाद