भारत आणि अमेरिकेचे विशेष अतिथी
नमस्कार!
यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम-अर्थात ‘यूएसआयएसपीएफ’च्यावतीने अमेरिका आणि भारत यांच्या 2020 च्या शिखर परिषदेमध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना एका व्यासपीठावर आणणे म्हणजे, एक निश्चितच अनोखे काम आहे. भारत आणि अमेरिका यांना एकमेकांच्या अधिक जवळ आणण्यासाठी ‘यूएसआयएसपीएफ’च्यावतीने करण्यात येत असलेले निरंतर प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून मी जॉन चेंबर्स यांना खूप चांगले ओळखत आहे. भारताशी त्यांचे अतिशय घट्ट ऋणानुबंध जोडले गेले आहेत. काही वर्षे झाली, त्यांना ‘पद्मश्री’ या नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
मित्रांनो,
‘‘नवीन आव्हानांचा सामना करणे’’- ही यावर्षी निश्चित करण्यात आलेली संकल्पना अत्यंत प्रासंगिक आहे. वर्ष 2020च्या प्रारंभी कोणालाही कल्पना नव्हती की, या वर्षाच्या अखेरीपर्यंत काय काय होणार आहे. एका वैश्विक महामारीचे प्रत्येकाला दुष्परिणाम सहन करावे लागले आहेत. आपल्या सर्वांचे दृढ विचार, आपल्या सार्वजनिक आरोग्य सेवा, आपली आर्थिक धोरणे या सर्वांची जणू कठोर परीक्षा घेतली जात आहे.
सध्याच्या स्थितीमध्ये एक विशिष्ट दृष्टिकोण बाळगण्याची अत्यंत आवश्यकता आहे. यामध्ये मनुष्य केंद्रित विकासाचा दृष्टिकोण असण्याची गरज आहे. यासाठी सर्वांच्यामध्ये सहकार्य-सहयोगाची भावना प्रबळ असली पाहिजे.
मित्रांनो,
भविष्यासाठी कोणत्याही योजना बनविताना आपल्या क्षमतावृद्धी करतानाच आर्थिक दुर्बल घटकाला सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे. आपल्या नागरिकांचे आजारांपासून रक्षण करणे सुनिश्चित करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. भारत याच मार्गावरून जात आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये योग्य व्यवस्था स्वीकारणा-या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य सुरक्षासंबंधीच्या उपाय योजनांमध्ये मास्क आणि चेहरा झाकून वावरण्याचा आग्रह धरणा-या देशांपैकी भारत सर्वात आघाडीवर होता. इतकेच नाही तर, भारतासारख्या काही देशांनीही सर्वात प्रथम ‘सामाजिक अंतर’ राखण्यासाठी जनजागरण मोहीम सुरू केली. भारतामध्ये कमी काळामध्ये विक्रमी आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा उपलब्धता करून देण्यासाठी वेगाने काम करण्यात आले. यामध्ये मग कोविडसाठी विशेष रुग्णालये असो अथवा अति दक्षता विभागांची क्षमता वाढविण्याचे काम असो, हे खूप झपाट्याने करण्यात आले. जानेवारीमध्ये देशात फक्त एकच चाचणी- परीक्षण प्रयोगशाळा होती. सध्या आमच्या देशामध्ये जवळपास सोळाशे चाचणी- परीक्षण करणा-या प्रयोगशाळा आहेत.
भारताने अशी ठोस पावले वेगाने उचलली आहेत, त्याचा परिणामही खूप चांगला दिसून आला आहे. भारताच्या 1.3 अब्ज लोकसंख्येच्या तुलनेत मर्यादित वैद्यकीय साधन सामुग्री आहे. अशावेळी इतर देशांच्या कोविड मृत्यूदराशी तुलना केली तर लक्षात येते की, भारताचा प्रति दशलक्ष मृत्यूदर जगामध्ये सर्वात कमी आहे. देशामध्ये कोविडच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आमच्या देशातले व्यावसायिक समुदाय, लहान-लहान उद्योजक, व्यवसायिक या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत, याचा मला आनंद होत आहे. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही अजिबात काम करीत नव्हतो, अशा पीपीई संच निर्मिती करण्यामध्ये आता आमचा देश संपूर्ण जगात दुस-या क्रमांकावर आहे.
अशा अडचणीच्या काळामध्ये ठामपणाने उभे राहून समोरच्या आव्हानाला, संकटालाच आव्हान देण्याची प्रवृत्ती ही भारताच्या खोल मनातली भावना आहे आणि त्या अनुरूप देशवासियांनी वर्तन केले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण देशाने कोविडच्या बरोबरच महापूर, दोनवेळा आलेली चक्रीवादळे, काही राज्यांमध्ये पिकांवर टोळधाडीने केलेला हल्ला, अशा अनेक संकटांचा सामना केला आहे. तथापि, या संकटांनी लोकांचे संकल्प अधिक मजबूत केले आहेत.
मित्रांनो,
कोविड-19 आणि लॉकडाउनच्या काळामध्ये भारत सरकारने एक दृढ निश्चिय केला की, कोणत्याही परिस्थितीमध्ये देशात आर्थिक दुर्बल घटकाचे रक्षण केले पाहिजे. भारतातल्या गरीब जनतेसाठी सुरू करण्यात आलेली ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ जगातली सर्वात मोठी गरीब कल्याण योजनांपैकी एक आहे. यामध्ये 800 दशलक्ष लोकांना मोफत अन्नधान्य पुरविण्यात येत आहे. ही योजना गेल्या आठ महिन्यापासून चालविण्यात येत आहे. 800 दशलक्ष लोक म्हणजे अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. देशातल्या जवळपास 80 दशलक्ष कुटुंबियांना मोफत स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर देण्यात आला आहे. तसेच जवळपास 345 दशलक्ष शेतकरी बांधव आणि गरजू लोकांना रोख रकमेची मदत करण्यात आली आहे. या योजनेमुळे जवळपास 200 दशलक्ष कार्य दिवस सृजित करून प्रवासी श्रमिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मित्रांनो,
कोविड-19 महामारीचा अनेक क्षेत्रांवर, अनेक गोष्टींवर प्रभाव पडला आहे. परंतु त्यामुळे 1.3 अब्ज भारतीय जनतेच्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षांवर कोणताही परिणाम झालेला नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा झालेल्या दिसून येत आहेत. यामध्ये ‘इज ऑफ डुइंग’ याचा विचार करून व्यवसाय अधिक सुकर करणे आणि लालफितीचा कारभार कमी करणे, अशा गोष्टी झाल्या आहेत. जगातल्या सर्वात मोठ्या घरकुल योजनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रातल्या कामाचा विस्तार केला जात आहे. रेल्वे, महामार्ग आणि हवाई संपर्क व्यवस्था अधिक विस्तारण्यात येत आहे. आपल्या देशामध्ये एका राष्ट्रीय आरोग्य मिशनची स्थापना करण्यासाठी विशेष डिजिटल मॉडेल तयार करण्यात येत आहे. आम्ही कोट्यवधी लोकांना बँकिंग, कर्ज, डिजिटल माध्यमाने देयके देणे आणि विमाकवच उपलब्ध करण्यासाठी सर्वात उत्कृष्ट वित्तीय तंत्रज्ञानाचा (फिन-टेक) उपयोग करीत आहोत. अशा पद्धतीने विश्वस्तरीय तंत्रज्ञान आणि सर्वश्रेष्ठ जागतिक कार्यप्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे.
मित्रांनो,
या महामारीमुळे संपूर्ण जगाला दाखवून दिले की, वैश्विक पुरवठा साखळीमध्ये विकासाशी संबंधित केवळ किंमत-मूल्यांच्या आधारे पुढे जाऊन चालणार नाही. तर विश्वासाच्या आधारेही पुढे गेले पाहिजे. भौगोलिक क्षेत्राच्या सामर्थ्याबरोबर, कंपन्यां आता विश्वसनीयता आणि स्थायी धोरणांचाही विचार करीत आहेत. भारताकडे हे सर्व विशेष घटक आहेत.
याचा परिणाम असा की, भारत परदेशी गुंतवणूकीसाठी आघाडीचे ठिकाण ठरत आहे. अमेरिका असेल, खाडी देश असतील, युरोप आणि ऑस्ट्रेलिया असेल सर्वांचा आमच्यावर विश्वास आहे. यावर्षी आमच्याकडे 20 अब्ज डॉलर्स एवढी परकीय गुंतवणूक झाली. गुगल, अॅमेझॉन आणि मुबादाला इन्व्हेस्टमेंट यांनी भारतात दीर्घकालीन गुंतवणूकीची योजना जाहीर केली आहे.
मित्रांनो,
भारतात पारदर्शक आणि अनुमानित कर व्यवस्था आहे. आमची व्यवस्था प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन आणि समर्थन देते. आमच्याकडील जीएसटी, एकीकृत आणि पूर्णपणे माहिती तंत्रज्ञानावर आधारीत अप्रत्यक्ष करप्रणाली आहे. दिवाळखोरी आणि नादारी संहितेमुळे संपूर्ण आर्थिक प्रणालीचा धोका कमी झाला आहे. व्यापक श्रम सुधारणांमुळे नियोजनकर्त्यांवरील ताण कमी झाला आहे. तसेच यामुळे कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवली जाणार आहे.
मित्रांनो,
विकासाला गती देण्यामध्ये गुंतवणूकीचे महत्त्व कमी करता येत नाही. आम्ही मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाबींवर लक्ष ठेवून आहोत. भारत जगातील सर्वात कमी कर आकारणारा देश आणि नवीन उत्पादन घटकांना प्रोत्साहन देणारा देश म्हणून आकार घेत आहे. नागरिकांच्या सुलभतेसाठी अनिवार्य ई-प्लॅटफॉर्म आधारित ‘फेसलेस मुल्यांकन’ एक दीर्घकालीन पाऊल आहे. तसेच करदात्यांची सनदही यादिशेने टाकलेले पाऊल आहे. बॉण्ड बाजारात सुरु असलेल्या नियमन सुधारणांमुळे गुंतवणूकदारांना लाभ होईल. पायाभूत गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणूकीसाठी ‘सॉवरेन वेल्थ फंड्स’ आणि ‘पेन्शन फंड्स’ यांना करामध्ये सूट दिली आहे. 2019 मध्ये भारताच्या एफडीआयमध्ये 20 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. ही महत्त्वाची बाब आहे, कारण जागतिक एफडीआयमध्ये 1 टक्क्यांनी घट झाली आहे. यातून आमच्या एफडीआय प्रणालीचे यश दिसते. या सर्व उपायांमुळे एक उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित होईल. तसेच ते मजबूत जागतिक अर्थव्यवस्थेत योगदान देतील.
मित्रांनो,
1.3 अब्ज भारतीय ‘आत्मनिर्भर भारत’ किंवा स्वावलंबी भारत बनवण्यासाठीच्या मोहिमेवर काम करत आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ स्थानीय (लोकल) उत्पादनांना जागतिक (ग्लोबल) सोबत जोडते. यातून एक जागतिक शक्तीच्या रुपाने भारताची ताकद दिसून येते. वेळोवेळी भारताने हे दाखवून दिले आहे की, जागतिक हित हे आमचे ध्येय आहे. आमच्या गरजा स्थानिक असल्या तरी, आम्ही जागतिक जबाबदारी टाळत नाही. आम्ही जगातील जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा उत्पादक या रुपाने आपली जबाबदारी पूर्ण केली. आम्ही जगात नियमतिपणे याचा पुरवठा केला आहे. आम्ही कोविड-19 वर लस संशोधनातही अग्रणी आहोत. एक आत्मनिर्भर आणि शांतीपूर्ण भारत चांगले विश्व सुनिश्चित करतो.
‘आत्मनिर्भर भारत’ म्हणजे भारताला निष्क्रिय बाजारपेठेतून सक्रीय जागतिक मूल्य पुरवठा साखळीच्या केंद्रस्थानी परिवर्तित करणे होय.
मित्रांनो,
पुढील मार्ग अनेक संधींनी युक्त आहे. या संधी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आहेत. प्रमुख आर्थिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रांचा यात समावेश आहे. नुकतेच खुले करण्यात आलेले कोळसा, खाण, रेल्वे, संरक्षण, अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्राचाही यात समावेश आहे. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे, औषधी क्षेत्रासंबंधी प्रोत्साहन योजना सुरु करण्यात आल्या आहेत, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर चॅम्पिअन क्षेत्रासाठीही अशा योजना सुरु करण्यात येत आहेत. कृषी विपणनात सुधारण्या केल्या आहेत आणि 14 अब्ज डॉलर्सची कृषी वित्त सुविधा, यामुळे अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
मित्रांनो,
भारतातील आव्हानांसाठी, तुमच्याकडे असे सरकार आहे, जे निकाल देण्यावर विश्वास ठेवते. या सरकारसाठी सुगम जीवनशैली (इज ऑफ लिव्हिंग) व्यवसाय सुलभतेवढीच (इज ऑफ डूइंग बिझनेस) महत्वाची आहे. तुम्ही एका युवा देशाकडे पाहत आहात, ज्याची 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहे. तुम्ही एका आकांक्षी देशाकडे पाहत आहात, ज्या देशाने नवी उंची गाठण्याचा निर्णय घेतला आहे. ही तीच वेळ आहे, जेंव्हा आम्ही स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश केला आहे. तुम्ही अशा देशाकडे पाहत आहात, ज्याठिकाणी राजकीय स्थैर्य आणि सातत्य आहे. तुम्ही अशा देशाकडे पाहत आहात, जो लोकशाही आणि विविधतेसाठी कटिबद्ध आहे.
या, आमच्यासह प्रवासात सहभागी व्हा.
धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद.